Cotton Crop Management :- सध्या महाराष्ट्र मध्ये पावसाने खंड दिलेला आहे. त्यामुळे कपाशी सोबतच इतर पिकांना देखील पाण्याची दुर्भिक्ष जाणवत आहे. त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनाला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. परंतु अशाही परिस्थितीमध्ये जर आपण कापूस या पिकाचा विचार केला तर हा कालावधी कापूस पिकासाठी खूप महत्त्वाचा असून व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून देखील या कालावधीचे महत्त्व खूप अनन्यसाधारण असे आहे.
साधारणपणे हा कालावधी कापूस पिकाला पाते, बोंड लागण्याचा कालावधी असून यावरच कपाशीचे पुढील उत्पादन अवलंबून असते. त्यामुळे हवामानातील बदल किंवा एखाद्या वेळेस जास्त पाऊस पडून गेल्यानंतर उद्भवणारी स्थिती किंवा पाण्याचा ताण पडल्यानंतर कापूस पिकावरील पाते आणि बोंडगळीची समस्या निर्माण होते. ही समस्या जर जास्त प्रमाणात उद्भवली तर नक्कीच उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. या अनुषंगाने आपण या लेखांमध्ये या कालावधीमध्ये कापूस पिकाची काळजी कशी घ्यावी याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.
पाते आणि बोंड लागण्याच्या कालावधीत अशी घ्यावी काळजी
1- यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा कपाशीला अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जे फुल येतात त्यांचे रूपांतर पाते आणि बोंडामध्ये होत असते. परंतु गेल्या काही वर्षापासून आपण बघत आहोत की याच कालावधीमध्ये नेमके पाने लाल पडण्याची विकृती म्हणजेच आपण त्याला लाल्या रोग म्हणतो याचा अटॅक कपाशीवर होताना दिसून येतो.
याच्या नियंत्रणाकरिता आपल्याला मुख्य अन्नद्रव्य देणे गरजेचे आहेच परंतु त्यासोबतच इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी देखील आवश्यक आहे. कपाशीवर लाल्या रोग येऊ नये याकरिता मॅग्नेशियम सल्फेट एक टक्के म्हणजेच दहा ग्रॅम आणि त्यासोबत युरिया एक टक्के म्हणजेच दहा ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. ही फवारणी करताना कुठल्याही प्रकारचा कीडनाशकाचा यामध्ये समावेश करू नये.
2- दुसरे महत्त्वाचे म्हणजे पीक जेव्हा फुलोरा अवस्थेमध्ये असते तेव्हा दोन टक्के युरिया किंवा दोन टक्के डीएपी म्हणजेच वीस ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा 19:19:19 पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे या अन्नद्रव्यांचे लागवडीच्या 45 व 65 व्या दिवशी फवारणी करावी. तसेच फुलोरा अवस्थेमध्ये पीक असेल तर 00:52:34 चार ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
3- फुलोरा अवस्थे नंतर पाते व बोंडे तयार होतात व ही अवस्था खूप महत्त्वाची असते. या कालावधीमध्ये पोटॅशियम नायट्रेट एक टक्का म्हणजेच दहा ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.
4- अनेक नैसर्गिक कारणांमुळे किंवा इतर कारणांमुळे देखील कपाशीची पाते, बोंडांची मोठ्या प्रमाणावर गळ होते. हे टाळण्याकरिता नॅपथील ऍसिटिक ऍसिड म्हणजेच एनएए तीन ते चार मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणामध्ये पहिली फवारणी करावी व त्यानंतर पंधरा ते वीस दिवस झाल्यानंतर दुसरी फवारणी घ्यावी.
5- बऱ्याचदा आपल्याला कपाशीची कायिक वाढ खूप मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीमध्ये कपाशीला बोंडांची संख्या खूप कमी प्रमाणात लागते. त्यामुळे यावर उपाय म्हणून क्लोरमेकॉट क्लोराईड (50% एसएल) या वाढनियंत्रकाची दहा मिली प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करून घ्यावी.
6- कपाशीचे जे काही बोंड असतात त्यांची वाढ पूर्ण झाल्यानंतर बाहेरच्या बाजूने बोंडे सडायला लागण्याचे प्रमाण दिसून येते. हा प्रादुर्भाव टाळण्याकरता प्रोपीकोनॅझोल( 25 टक्के ई.सी.) एक मिली किंवा प्रोपीनेब( 70 डब्ल्यू पी) अडीच ते तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
Share your comments