मात्र नंतरच्या टप्प्यात वातावरण निवळल्यानंतर एकदाच लागवडी आल्याने मजूरटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. ‘‘शेत तयार, रोपे तयार; मात्र मजूर मिळेना त्यामुळे उन्हाळ कांदा लागवड एक युद्धच’’असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एकंदरीत उन्हाळ कांदा लागवडीचा प्रश्न गंभीर वळणावर येऊन ठेपला आहे.
जिल्ह्यातील कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव, चांदवड, येवला, सिन्नर तालुक्यांत उन्हाळ कांदा लागवडीला वेग आला आहे.
अशा परिस्थितीत शेतकरी मजुरांअभावी कोंडीत सापडल्याची स्थिती आहे. गावागावांमध्ये कांदा लागवडीसाठी मजुरांच्या टोळ्या आहेत; मात्र बाहेरच्या गावात अधिकचा दर मिळविण्यासाठी मजुरांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते आहे. ज्यांना तातडीने लागवडी करायच्या अशा शेतकऱ्यांना त्यांची ने-आण, चहापाणी अन् एवढेच काय तर त्यांच्या मनमानी दर घेऊन लागवडी पूर्ण कराव्या लागत आहेत.
एकंदरीतच लागवडीसाठी चालू वर्षी अव्वाच्या सव्वा रुपये मोजण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
एकीकडे मजूर उपलब्ध होईना अन् झालेच तर अधिक दराची बोली करून जो अधिक दर देईल त्याच्या क्षेत्रात लागवडीला मजूर पसंती देत आहेत. आता लागवडी करायच्या; तर मजूर टोळ्या अधिक भाव देणाऱ्यांना पसंदी देत असल्याची स्थिती आहे. एकीकडे कृषिपंपासाठी वीजपुरवठ्याचा प्रश्न, वेळेवर मजूरअभावी खोळंबलेल्या लागवडीमुळे कांद्याचे रोपे खराब होत आहेत.
जिल्ह्यात ७२ हजार ९७० हेक्टर क्षेत्रावर (ता.२३) अखेर कांदा लागवडी पूर्ण झाल्याने विक्रमी कांदा लागवडीचा अंदाज आहे.
Share your comments