1. कृषीपीडिया

Summer Crop Management : उन्हाळी हंगामासाठी सूर्यफुल लागवड तंत्रज्ञान

Sunflower cultivation : बागायती पिकास प्रति हेक्टरी ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद व ३० किलो पालाश द्यावे व उरलेल्या ३० किलो नत्राची मात्रा पेरणीनंतर एक महिन्याच्या आत द्यावी. गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी २० किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडुळ खतातून द्यावे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Sunflower cultivation update

Sunflower cultivation update

डॉ. आदिनाथ ताकटे, डॉ.मंगेश दुधे, डॉ.अनिल राजगुरु

शेतकऱ्यांकडून लागवड केल्या जाणाऱ्या बहुतांशी पिकांची ठराविक हंगामातच उदा. ज्वारी-खरीप व रब्बी, तुर खरीप, भुईमूग-खरीप व उन्हाळी, गहु, हरभरा, करडई-फक्त रब्बी इत्यादी तसेच यांच्या पेरणीचा कालावधीही ठरलेला आहे. पीक वाढीच्या दरम्यान देखील या पिकांच्या हवामानाच्या गरजा ठरलेल्या आहेत. यात बदल झाल्यास पीक वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. सुर्यप्रकाशाच्या तीव्रतेचा परिणाम न होणारे हे पीक कोणत्याही हंगामात तसेच कोणत्याही कालावधीत लागवडीखाली घेतले जाते. याचा पिकाच्या उत्पादनावर कोणताही अनिष्ठ परिणाम होत नाही.

जमीन

सूर्यफुल लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. आम्लयुक्त व पाणथळ जमिनीत हे पिक चांगले येत नाही.

पूर्वमशागत

जमिनीची खोल नांगरट करुन त्यानंतर कुळवाच्या उभ्या आडव्या दोन ते तीन पाळ्या घ्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी हेक्टरी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत घालावे.

पेरणीची वेळ/पेरणीचे अंतर/पेरणी पध्दत

उन्हाळी हंगामातील लागवडीकरिता फेब्रुवारीचा पहिला पंधरवडा हि पेरणीची उत्तम वेळ आहे. बागायती पिकाची लागवड सरी वरंबा वरंब्यावर टोकण पध्दतीने करावी.

मध्यम ते खोल जमीन - ४५ x ३० सें.मी.
भारी जमीन - ६० x ३० सें.मी.
संकरीत वाण - ६० x ३० सें.मी.

बियाणे

सुर्यफुलाचे पेरणीसाठी सुधारीत वाणाचे ८-१० किलो तर संकरीत वाणाचे ५-६ किलो बियाणे प्रती हेक्टरी वापरावे.

बीजप्रक्रिया

•मर रोगाच्या प्रतिबंधासाठी २ ते २.५ ग्रॅम थायरम किंवा ग्रासिकॉल प्रति किलो बियाण्यास चोळावे.
•केवडा रोग टाळण्यासाठी ६ ग्रॅम अॅप्रॉन ३५ प्रती किलो बियाण्यास चोळावे.
•तसेच विषाणुजन्य (नेक्रॉसीस) रोगाच्या प्रतिबंधासाठी इमिडॅक्लोप्रिड ७० डब्ल्यू.ए. गाऊचा ५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे.
•त्यानंतर अँझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणु खत २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे.

रासायनिक खते

बागायती पिकास प्रति हेक्टरी ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद व ३० किलो पालाश द्यावे व उरलेल्या ३० किलो नत्राची मात्रा पेरणीनंतर एक महिन्याच्या आत द्यावी. गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी २० किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडुळ खतातून द्यावे.

आंतरमशागत

पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी दोन रोपातील अंतर ३० सें.मी. ठेवून विरळणी करावी. पेरणीनंतर १५ दिवसांनी एक खुरपणी करावी. तसेच दोन कोळपण्या कराव्यात. पहिली कोळपणी पेरणीनंतर २० दिवसांनी व दुसरी कोळपणी ३५ ते ४० दिवसांनी करावी.

पाणी व्यवस्थापन

सुर्यफूलाच्या पिकास संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे. सुर्यफुलाच्या संवेदनक्षम अवस्था जसे की १. रोप अवस्था २. फुलकळी अवस्था ३. फुलो-याची अवस्था ४. दाणे भरण्याची अवस्था या संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये. फुलकळी अवस्था ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळ राहतात व उत्पादनात घट येते.

पीक संरक्षण

•विषाणुजन्य रोग हा रस शोषणा-या फुलकिड्यांमार्फत होतो. त्यांच्या नियंत्रणासाठी इमिडोक्लोप्रीड २०० एस. एल. २ मि.ली. प्रती १० लीटर पाणी या प्रमाणात पेरणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने तीन वेळा फवारण्या कराव्यात.
•मावा व तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी डायमिथेएट ३० प्रवाही ०.०३ टक्के फवारावे. घाटे अळीच्या नियंत्रणासाठी एन्डोसल्फान ३५ प्रवाही ७०० मिली किंवा क्विनॉलफॉस २५ प्रवाही १००० मिली ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी वापरावे.
•केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी अळ्यांचे पुंजके येथून रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकुन त्यांचा नाश करावा किंवा क्विनॉलफॉस १.५ टक्के किंवा कार्बारिल १० टक्के भुकटी २५ किलो प्रति हेक्टरी बारा शांत असताना धुरळावी.
जैविक किड नियंत्रण सुर्यफुलावरील पाने खाणारी अळी, केसाळ अळी, घाटे अळी यांच्या नियंत्रणासाठी एच.एन.पी.व्ही. या विषाणुंची फवारणी करावी.

काढणी

सुर्यफुलाची पाने,देठ व फुलाची मागील बाजु पिवळी झाल्यानंतर पिकाची कापणी करावी. कणसे चांगली वाळवून नंतर मळणी करावी.

उत्पादन

संकरीत वाणापासून १२ ते १५ क्विंटल आणि बागायती संकरीत वाणापासून प्रतिहेक्टरी १५ ते २० क्विंटल उत्पादन मिळते.

विशेष बाबी :

पीक फुलो-यात असतांना सकाळी ७ ते ११ या वेळेत हाताला तलम कापड गुंडाळून फुलाच्या तबकावरुन हळुवार हात फिरवावा म्हणजे कृत्रिम परागीभवन होऊन दाणे भरण्याचे प्रमाण वाढते.
सुर्यफुलाच्या फुल उमलण्याच्या अवस्थेत व त्यानंतर आठ दिवसांनी २ ग्रॅम बोरॅक्स प्रती लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे दाणे भरण्याचे प्रमाण व दाण्याचे वजन वाढते.
परागीभवन होण्यासाठी प्रति हेक्टरी ४-५ मधमाश्यांच्या पेट्या ठेवाव्यात.
सूर्यफूल पिकाची फेरपालट करावी. सुर्यफूलाची मुळे जमिनीत खोलवर जातात. दरवर्षी त्याच जमिनीत वारंवार हे पीक घेतल्यास जमिनीचा पोत बिघडून उत्पादन क्षमता कमी होते. तसेच रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यासाठी कमीत कमी ३ वर्षे तरी त्याच जमिनीत सुर्यफुलाचे पीक घेवू नये.
पीक फुलोऱ्यात असतांना किटकनाशकाची फवारणी करु नये. अगदीच आवश्यक असेल तर एन्डोसल्फान ३५ प्रवाही या किटकनाशकाची संध्याकाळच्या वेळेस फवारणी करावी.

लेखक - डॉ. आदिनाथ ताकटे,मृदशास्रज्ञ,एकात्मिक शेती संशोधन प्रकल्प, म.फु.कृ.वि., राहुरी मो.९४०४०३२३८९
डॉ. मंगेश दुधे, भारतीय तेलबिया संशोधन संस्था, हैद्राबाद
डॉ. अनिल राजगुरू, सहाय्यक प्राध्यापक,कृषि महाविद्यालय,पुणे

English Summary: Summer Crop Management Sunflower cultivation technology for summer season Published on: 30 January 2024, 12:06 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters