1. कृषीपीडिया

अधिक उत्पादनासाठी ऊस लागवड करताना ऊस बेणेप्रक्रिया गरजेची

KJ Staff
KJ Staff

ऊस उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये घट आणणाऱ्या रोग किडींचे नियंत्रण करण्यासाठी बेणे प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे.  सध्या रासायनिक खतांच्या किमती झपाट्याने वाढत आहेत तसेच रासायनिक खते बऱ्याच वेळा वेळेवर उपलब्ध होत नाहीत.  अशा परिस्थितीत ऊसासाठी ऍझेटोबॅक्‍टर व स्फुरद विघटक जिवाणूंची प्रक्रिया केल्यास रासायनिक खत आपल्याला बचत करता येते.  ऊसामध्ये सुद्धा शुद्ध, निरोगी आणि चांगल्या बेण्याचा वापर केल्यास ऊस उत्पादनामध्ये 10 ते 15 टक्के वाढ झाल्याचे सिद्ध झाले आहे.

ऊस उत्पादनामध्ये घट येण्याची ही प्रमुख कारणे आहेत. त्यामध्ये शुद्ध निरोगी आणि चांगल्या बेण्याच्या अभाव हे प्रमुख कारण आहे.  ऊस बेणे प्रक्रियाचे दोन प्रकार आहेत.

रासायनिक बेणेप्रक्रिया- लागवडीसाठी बेणे मेळ्या तील दहा ते अकरा महिन्याचे रसरशीत व शुद्ध बेणे वापरावे.  सर्वप्रथम अशा ऊसाच्या एक किंवा दोन डोळ्यांच्या टिपऱ्या खांडून  घ्याव्यात.  त्यानंतर 100 लिटर पाण्यात 100 ग्रॅम कार्बेन्डाझिम आणि 300 मिली मॅलेथिऑन किंवा डायमेथोएट मिसळून द्रावण तयार करून घ्यावे. ऊसाच्या एक किंवा दोन डोळ्यांच्या टिपऱ्या या द्रावणात दहा मिनिटे बुडवून काढाव्यात. या रासायनिक बेणे प्रक्रियेमुळे ऊसावर सुरुवातीच्या काळात येणारे खवले कीड आणि पिठ्या ढेकूण या किडीपासून आणि जमिनीमधून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळते.  बेण्याची उगवण चांगली होते तसेच रोपांची सतेज जोमदार वाढ होतेच शिवाय उत्पादनही वाढते.

 


जैविक बेणेप्रक्रिया- रासायनिक बेणेप्रक्रिया नंतर ऊसाच्या टिपर्‍या यांना जैविक बेणेप्रक्रिया करावी. यासाठी प्रथम 100 लिटर पाण्यात 10 किलो ऍझेटोबॅक्‍टर जिवाणूसंवर्धक आणि .250 किलो स्फुरद विघटक जिवाणूसंवर्धक चांगल्याप्रकारे मिसळावे. त्यानंतर ऊसाच्या टिपऱ्या या द्रावणात 30 मिनिटे बुडवून लागवडीसाठी वापराव्यात. ऊसाच्या टिपर्‍या मध्ये ऍझेटोबॅक्‍टरचा शिरकाव होऊन सदर जिवाणू उगवणीनंतर ऊसामध्ये आंतरप्रवाही अवस्थेत राहून हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून हा नत्र ऊसाला उपलब्ध करून देतात. त्यामुळे ऊसाला वापरण्यात येणाऱ्या रासायनिक नत्र खत( युरिया) त पन्नास टक्के बचत करता येते. त्याचप्रमाणे सदर मिश्रणात वापरण्यात आलेले स्फुरद विघटक जिवाणू ऊसाखालील जमिनीतील अविद्राव्य स्फुरदाचे विघटन करून ऊसाला स्फुरत उपलब्ध करून देतात. स्फुरद विघटक जिवाणू संवर्धकाच्या वापरामुळे ऊसाला वापरण्यात येणाऱ्या रासायनिक स्फुरत खतात 25 टक्के बचत करता येते.

ऊसामध्ये बेणेप्रक्रियाचे फायदे

  •  बेण्याची उगवण चांगली होते तसेच रोपे सत्तेच व जोमदार दिसतात.
  • सुरुवातीच्या काळात पिकास कीड व रोगांपासून संरक्षण मिळते.
  • उगवणीनंतर रोग व कीड नियंत्रण आपेक्षा बेणेप्रक्रिया कमी खर्च व कमी वेळ लागतो.
  • जैविक बेणे प्रक्रियेमुळे रासायनिक खतात बचत करता येते.
  • उत्पादन वाढीवर जमिनीची सुपीकता टिकून राहते.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters