1. कृषीपीडिया

नारळावरील स्पायरलिंग पांढरी माशी

नारळ हे कोकणातील तसेच सागरी किनारपट्टीवरील लोकांचे महत्त्वाचे पीक आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
नारळावरील स्पायरलिंग पांढरी माशी

नारळावरील स्पायरलिंग पांढरी माशी

भारतात या पिकाचे उत्पादन मुख्यतः महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळची पश्चिम किनारपट्टी, तमिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यांत तसेच अंदमान, निकोबार व लक्षद्वीप बेटांवर घेतले जाते. नारळाचे उत्पादन घटण्यास नैसर्गिक बदल, कीड व रोग तसेच लागवडीनंतर घ्यायची काळजी (तण नियंत्रण, खत व्यवस्थापन, छाटणी) इत्यादी कारणे जबाबदार आहेत. त्यापैकी महत्त्वाचा घटक म्हणजे कीड होय. ही कीड लागवडीपासून ते फळ काढणीपर्यंत दिसून येते. नारळावर आढळणाऱ्या महत्त्वाच्या किडी गेंड्या भुंगा, सोंड्या भुंगा, काळ्या डोक्याची अळी, उंदीर व इरिओफाइड माईट (कोळी) इत्यादी आहेत. त्यापैकी गेंड्या भुंगा व सोंड्या भुंगा हे वर्षभर आढळून येतात. परंतु नारळ रोपवाटिका तसेच मध्ये सध्या नव्याने स्पायरलींग पांढरीमाशी नावाची कीड धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. ही एक दुय्यम कीड असून हवामान बदल व वाढीसाठी अनुकूल वातावरण प्राप्त झाल्यामुळे एक महत्त्वाची कीड म्हणून नारळ रोपवाटिका तसेच बागायातीदारांसमोर आव्हान म्हणून उभी आहे.

 

किडीची ओळख व जीवनक्रम

या किडीचे शास्त्रीय नाव 'अलेयुरोडीकस रुगोपरक्युलॅटस मार्टिन' असून हेमीप्टेरनवर्गीय अलेयुरोडीडी कुळातील आहे. या किडीची प्रौढ माशी ही इतर पिकांवर आढळणाऱ्या पांढऱ्या माशीपेक्षा आकाराने जरा मोठी असते. *नर माशी ही मादी माशीपेक्षा आकाराने मोठी असते. एक प्रौढ मादी माशी साधारणतः १४ ते २६ व जास्तीत जास्त ५१ ते ६४ अंडी पानाच्या खालच्या बाजूवर मुक्त स्वरूपात मेणासारख्या तंतुमय पदार्थाने वलयांकित (गोलाकार / चक्राकार) पद्धतीने घालते, यामुळे तिला स्पायरलींग पांढरी माशी हे नाव पडले.* कीडिची अंडी पिवळसर पांढरट रंगाची असून ७ ते १० दिवसानंतर त्यातून पिलावळीची प्रथम अवस्था बाहेर पडते, या पिलावळीला सरपटत जाण्याची सवय असून ती चपळ असते. पण पिलावळीच्या पुढील तीन अवस्थेमध्ये हे दिसून येत नाही. त्या एका जागी स्थिर राहून स्वतः भोवती मेणासारख्या पदार्थाने झाकून घेतात. पिलावळीच्या चार अवस्थेमधील कालावधी अनुक्रमे ३ ते ७, ४ ते ७, ४ ते ७ व ६ ते १० दिवसांचा असतो. त्यातील अंतिम अवस्थेला कोषावस्था संबोधले जाते, हे कोष दिसण्यास हिरवट पांढरसर अंडाकृती, गोलाकार असतात. प्रौढ माशीचा जगण्याचा कालावधी साधारणपणे २ आठवड्यांचा असतो.

नुकसानीचा प्रकार:-

 या माशीचे प्रौढ व पिलावळ पानाच्या मागील बाजूने रस शोषून घेतात आणि मधाच्या द्रावणासारखा गोड चिकट पदार्थ स्थावतात. या चिकट स्रावामुळे बुरशींची वाढ होऊन पाने पूर्णपणे काजळीने काळपट पडतात व झाडाची प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते. याचा परिणाम झाडाच्या उत्पादकतेवर होतो. तसेच हिच्या प्रादुर्भावामुळे नारळ बागांमध्ये 'लिथल यलोइंग' (पाने पिवळी पडणे) नावाच्या विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो. स्पायरलींग पांढरीमाशीची कार्यक्षमता १२.३ ते ३२.३० अंश सें.ग्रे. तापमानात अधिक प्रमाणात दिसून येते. दापोली तहसील, जिल्हा रत्नागिरी व परिसरात स्पायरलींग पांढरीमाशीचे एकूण २२ कुळातील ३१ यजमान वनस्पतींची नोंद केली गेली, त्यापैकी २१ वनस्पतींची नोंद कोकणात प्रथम करण्यात आली.

एकात्मिक व्यवस्थापन:-

१)या किडीचा प्रादुर्भाव मान्सूनच्या सुरुवातीला कमी असतो, त्यावेळी मित्रकिटकांची संख्या वाढण्यासाठी महत्त्वाचे असल्यामुळे या कालावधीत कुठल्याही रासायनिक कीटकनाशकांचा वापर करणे टाळावे. 

२) बुरशीची वाढ होऊन पूर्णपणे काजळीने काळपट पडलेल्या भागावर कपडे धुण्याची पावडरीचे ५ टक्के द्रावण किंवा १ टक्का स्टार्चचे द्रावण यांची फवारणी करून वरील थर घालवावा. 

३) प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या खोडावर १ मी. उंचीवर पिवळ्या रंगाचे चिकट सापळे टांगावेत.

४) वनस्पतिजन्य कीटकनाशकांपैकी तंबाखूचा ४ टक्के अर्क, निंबोळी तेल २ टक्के, निंबोळीच्या बियांचा अर्क ३ टक्के यापैकी कुठलीही फवारणी घेऊ शकता.

५) जैविक कीटकनाशकांपैकी व्हटींसिलियम लिकॅनी या बुरशीची ५ ग्रॅम .प्रति लीटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

६) एन्कारसिया, लेडी बीटल आणि क्रायसोपा या मित्रकिडींचे संवर्धन करून प्रादुर्भावीत क्षेत्रात संवर्धन करावे.

७) तीव्र प्रादुर्भाव आढळून आल्यास निंबोळी तेल ५% किंवा रासायनिक कीटकनाशकांपैकी लॅम्बडा सायहेलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ०.०५ टक्के, सायपरमेथ्रिन १० टक्के प्रवाही ०.०१२५ टक्के, प्रोफेनोफॉस ५ टक्के प्रवाही ०.०५ टक्के, थायोमेथॉक्झाम २५ टक्के दाणेदार पाण्यात विरघळणारे ०.००३ टक्के व इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ०.०५ टक्के कुठलेही एक कीटकनाशक माडाच्या खालच्या देठाकडच्या पानावर फवारावे. सतत एकाच वर्गातील कीटकनाशकाची फवारणी टाळावी.

८) या माशीच्या यजमान वनस्पतींचे नारळ बागांमधून समूळ उच्चाटन करावे.

 

  स्रोत:-शेतकरी मासिक

 डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी

संकलन - IPM SCHOOL

 

English Summary: Spiraling white fly on coconut Published on: 08 October 2021, 09:35 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters