1. कृषीपीडिया

सोयाबीन लागवड व्यवस्थापन

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Soybean

Soybean

सोयाबीन (शास्त्रीय नाव: ग्लायसीन मॅक्स (Glycine max)) पीकाचे मूळस्थान  पूर्व आशियातील असून ही कडधान्य गटातील वनस्पती आहे. परंतू सोयाबीनापासून मिळणाऱ्या तेलामुळे त्यांना तेलबियांमध्येही गणले जाते. सोयाबीन हे भारतातील इतर तेलबिया व नगदी पीका प्रमाणे महत्वाचे नगदी पीक आहे.

उपयोग:

 • आशियातली बहुतांश देशांमध्ये रोजच्या आहारात सोयाबीनचा उपयोग केला जातो.
 • मनुष्याच्या आहारामध्ये सोयाबीन हे उत्तम दर्जाचे प्रोटीन स्रोत आहे.
 • सोयाबीन मध्ये मुख्यतः ४०% प्रथिने आणि २१% कर्बोदके घटक आहेत.
 • सोयाबीन हे मानवी रक्तातील कोलेस्ट्रॉल ची मात्रा कमी करण्यास मदत करते.
 • सोयाबीनचे दूध तयार करून पर्यायी निर्भेळ दूध तयार केले जाते.
 • सोयाबीनची कणिक वापरून पोळ्या, ब्रेड, बिस्किटे, नानकटाई, केक करता येतात, तसेच
 • डाळीचे पदार्थ म्हणजे शेव, चकली, मिसळ बनवता येते.
 • सोयाबीनचे तेल आहारात स्वस्त खाद्यतेल म्हणून वापरले जाते तर पेंडीचा उपयोग कोंबड्यांचे खाद्य म्हणून केला जातो.

जमिन:

 • उत्तम निचरा असणारी व मध्यम काळी पोयट्याची, सेंद्रिय युक्त जमिनीत हे पीक चांगले येते. सोयाबीनची लागवड ४.५ ते ८.५ च्या पीएच (सामु) असलेल्या जमिनीत करावी.

पूर्व मशागत:

 • हिवाळी पीक काढल्यावर लगेच उन्हाळी नांगरट करावी.
 • २-३ कुळवाच्या पाळ्या देऊन जमिन भुसभुशीत करावी.
 • हेक्टरी २५ ते ३० गाड्या कुजलेले शेणखत शेवटच्या कुळवाच्या अगोदर मातीत मिसळून घ्यावे आणि जमिन पेरणीसाठी तयार करून घ्यावी.

हेही वाचा:तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या किडी व त्यांचे व्यवस्थापन

पेरणीची वेळ:

 • सोयाबीनची लागवड जुन ते जुलै महिन्यात करावी.
 • लागवड करताना पावसाचा अंदाज घेवुन लागवड करावी. पेरणीनंतर जास्त काळ राहणारा कोरडा काळ सोयाबीन पीकासाठी हानीकारक ठरतो. अशा कोरड्या काळामध्ये रोपांची मर होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मान्सुन व्यवस्थित स्थिर झाल्यानंतरच पेरणी करावी.

पेरणी अंतर:

 • भारी जमिन: दोन ओळीत अंत ४५ से.मी. आणि दोन रोपांतील अंतर ५ सें.मी.
 • मध्यम जमिन: दोन ओळीत अंतर ३० से.मी. आणि दोन रोपांतील अंतर १० सें.मी.

बियाणे प्रमाण:

 • सलग पेरणी साठी: ७५-८० किलो प्रती हेक्टर बीज वापरावे.
 • टोकन पेरणी साठी: ४५-५० किलो प्रती हेक्टर बीज वापरावे.

सुधारित जाती:

जे.एस. ३३५, फुले आग्रणी, फुले कल्याणी, एम.ए.सी.एस. ११८८, जे.एस. ९३-०५, के.एस.एल. ४४१, एम.ए.यु.एस ७१, एम.ए.यु.एस. ८१.

बीज प्रक्रिया: बुरशी जन्य रोगांपासून सरंक्षण करण्यासाठी प्रती किलो २.५ ग्रॅम बाविस्टीन किंवा ४ ग्रॅम ट्राइकोडर्मा चोळावे.

आंतरपीक: सोयाबीन + तूर (३:२) या प्रमाणात घावे.

खत मात्रा:

 • पेरणीच्या वेळेस–हेक्टरी ५० किलो नत्र आणि ७५ किलो स्फुरद द्यावे.

पीक वाढीच्या महत्वाच्या अवस्था खालील प्रमाणे:

 • पीकाला फांद्या फुटताना म्हणजेच पेरणी नंतर ३० ते ३५ दिवसांनी.
 • पीक फुलोऱ्यात असताना म्हणजेच पेरणी नंतर ४५ ते ५० दिवसांनी.
 • शेंगा भरताना म्हणजेच पेरणी नंतर ६० ते ६५ दिवसांनी.

पीक वाढीच्या महत्वाच्या अवस्थेमध्ये जर पावसाने ताण दिला तर पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

आंतरमशागत:

 • पीक वाढीच्या काळात जर तणाचा प्रादुर्भाव असेल तर त्याचा पीक वाढीवर मोठा दुष्परिणाम होतो. त्या मुळे योग्य वेळी आणि योग्य पध्दतीने तण नियंत्रण करणे खूप गरजेचे आहे.

सोयाबीन मधील तण नियंत्रणासाठी उपयोगात येणारी तण नाशके खालील प्रमाणे:

तण नाशकाचे प्रकार

तणनाशक

केव्हा वापरावे

पेरणी नंतरचे तण नाशक

 पॅराक्वेट/ ब्युटँक्लोर  

पेरणी नंतर २ दिवस

तण उगवणी नंतरचे तण नाशक

 टरगा/परस्युट

तणाच्या वाढीच्या सक्रीय काळात


तसेच पीक उगवणीनंतर १५ ते २० दिवसांनी एक कोळपणी व नंतर खुरपणी करून शेत तण मुक्त ठेवावे.

पीक संरक्षण: सोयाबीन पीकावर पाने खाणाऱ्या अळ्या, खोडमाशी या किडींचा तसेच तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.


कीड व्यवस्थापन:

किडीचे नाव

पीकावरील लक्षणे

नियंत्रण

खोडमाशी

 

पाने किडणे, वाळू लागणे.
एखादी फांदी सुकलेली असणे.
रोपांवर जमिनीपासून काही अंतरावर छिद्रे आढळणे.

पेरणीच्या वेळी: हेक्टरी १० किलो १० टक्के दाणेदार फोरेट वापरावे.
उगवणी नंतर: इथोफेनप्रॉक्स १० इ.सी. २० मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे.

 

पाने खाणारी आळी

 

सुरवातीला आळ्या समूहानेच पानावर उपजीविका करतात.
पानाचा पापुद्रा शाभूत ठेऊन त्यातील हरितद्रव्य संपुष्टात आणतात त्यामुळे पाने पांढरट पडून पारदर्शक होतात.
नंतरच्या काळात मोठ्या झालेल्या आळ्या पानावर आणि शेंगांवर तुटून पडतात.

मोनोक्रोटोफॉस ३६ इ.सी. ८.५ मिली अथवा ट्रायझोफॉस ३० इ.सी. १० मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे.

हेही वाचा:चांदा ते बांदा अंतर्गत नारळाच्या साखळी प्रक्रियेवर भर

रोग व्यवस्थापन:

रोगाचे नाव

पीकावरील लक्षणे

नियंत्रण

तांबेरा (बुरशीजन्य रोग)

पानावर तपकिरी रंगाचे टिपके पडून पाने व शेंगा पिवळसर तपकिरी रंगाचे होणे.
पान गळ होणे.

प्रोपीकोनॅझोल किंवा हेक्झाकोनॅझोल बुरशीनाशकाची (टिल्टची) फवारणी १० मिली प्रती १० लिटर या प्रमाणत करावी.


काढणी:

 • लागवड केलेल्या जातीच्या पक्वतेच्या कालावधी नुसार ९० ते ११५ दिवसात काढणी करावी.
 • सोयाबीनच्या शेंगांचा रंग तांबूस झाल्यानंतर तसेच पान गळती सुरु झाल्यावर पीक काढणीस सुरवात करावी.
 • पीक काढण्यास उशीर झाल्यास दाने गळण्यास सुरवात होते.

उत्पादन:

योग्य व्यवस्थापन आणि नियोजन केले तर सोयाबीन पीकाचे उत्पादन २० ते २५ क्विंटल प्रती हेक्टरी मिळते.

लेखक: 
श्री. अजित मो. शितोळे 
कृषी संशोधक
mr.ajitshitole@gmail.com

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters