1. कृषीपीडिया

ज्वारीचे पक्षांपासून संरक्षण व साठवणूक

KJ Staff
KJ Staff


जिल्ह्यातील बहुतांश ज्वारी ही काही ठिकाणी फुलोऱ्यात तर काही ठिकाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. अशा ज्वारीची राखणी न केल्यास उत्पादनात घट येते. सर्वसाधारणपणे ज्वारीची पेरणी झाल्यानंतर 90-95 दिवसात दाणे चिकाच्या अवस्थेत असतात. जिल्ह्यातील बहुतांश शिवारात ज्वारीची कणस निसावली आहेत.

ज्वारीचे पिक तयार होत असतांना दाणे भरण्यास सुरुवात झाल्यानंतर 35-40 दिवस पक्षांपासून पिकांचे रक्षण करणे गरजेचे आहे. त्याकरिता पक्षी ज्या झुडूपात लपतात त्याचा डहाला करावा. पिकाच्या भोवती पक्षी प्रतिबंधक बेगडपट्टी बांधावी. सर्वसाधारणपणे सकाळी 7 ते 11 व दुपारी 3 ते 6 या वेळात पक्षापासून पिक वाचवण्यासाठी राखणीची स्वतंत्र माणसे ठेवावीत. पिकाचे राखण न झाल्यास प्रसंगी 60 ते 70 टक्के धान्याचा पक्षी फडशा पाडतात. त्यामुळे पाखरांपासून रक्षण करण्यास गोफणीचा वापर करावा. त्यासाठी शेतात मचाण बांधणे आवश्यक आहे. दाणे खाऊन पाहिल्यास प्रथम फुटताना टच आवाज येतो आणि ज्वारी पिठाळ लागते. ज्वारीचे बारकाईने निरीक्षण केल्यास दाण्याच्या टोकाकडील भागाजवळ काळा ठिपका आढळून येतो ही लक्षणे दिसताच ज्वारीची काढणी करावी.

सर्वसाधारणपणे 70-75 दिवसात ज्वारी फुलोऱ्यात येते. या अवस्थेत पाणी मिळाल्याने कणसात दाणे भरण्यास मदत होते आणि कणसाचे वजन वाढून एकूण उत्पादन वाढते. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असेल त्यांनी ज्वारीच्या पिकास पाणी दयावे.

ज्वारीची पेरणी झाल्यानंतर 90-95 दिवसात दाणे चिकाच्या अवस्थेत असतात. पिकास पाण्याची गरज असल्यास चौथे पाणी दयावे. हलक्या व मध्यम जमिनीतील ज्वारीस या पाण्याची गरज भासते. भारी जमिनीत ओल धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते. तसेच या अवस्थेत काळ्या भारी जमिनीस भेगा पडलेल्या असतात. भेगाळलेल्या जमिनीस पिकाला पाणी देणे मुश्किल होते आणि गरजेपेक्षा जास्त पाणी दयावे लागते आणि ज्वारी लोळण्याचे प्रमाण वाढते. भारी जमिनीत तीन पाणी दिले असता मिळणारे उत्पादन, चार पाण्याच्या उत्पादनाच्या जवळपास मिळते.


सर्वसाधारणपणे रब्बी ज्वारी फेब्रुवारीमध्ये काढणीस तयार होते.जातीपरत्वे 100 ते 125 दिवसात ज्वारी पक्व होते. कणसाचा दांडा पिवळा झाला म्हणजे पिक तयार झाले असे समजावे. कणसाचा खालच्या भागातील दाणे टणक झाल्यावर पिक काढावे. शास्त्रोक्तरीत्या  भोंडातील दाण्याचा खालचा भाग काळा झाला म्हणजे पिक काढणीस तयार होते. रब्बीत जिरायत पिकांची हाताने उपटून काढणी करतात, तर बागायत पिकांची विळ्याने कापून काढणी करतात. कापणीनंतर कडबा बांधावर तिरकस उभा करून वाळविण्यासाठी ठेवतात. कणसे उन्हात चांगली वाळल्यावर बैलाच्या पायाखाली तुडवून अगर ट्रॅक्टर किंवा दगडी रूळ फिरवून किवा मळणी यंत्राने मळणी करावी. उफणणी नंतर 1-2 उन्हे द्यावीत म्हणजे साठवणीत किडींचा जास्त उपद्रव होणार नाही.

ज्वारी काढणीनंतर 8 ते 10 दिवस उन्हात वाळवून झाल्यानंतर मळणी करावी. धान्य उफणणी करून तयार झाल्यानंतर त्याला पुन्हा साठवणुकीपूर्वी  उन्हात वाळवावे. काढणीनंतर पाऊस पडल्यास धान्याची बुरशीपासून नासाडी थांबविण्यासाठी धान्य चांगले वाळवावे. सर्वसाधारणपणे कापणीच्या वेळी दाण्यात 17 ते 18 टक्के ओलाव्याचे प्रमाण असते मात्र साठवणीत धान्य चांगले राहण्यासाठी ओलाव्याचे प्रमाण 10 ते 11 टक्के असावे त्यासाठी मळणीनंतर धान्य चांगले उन्हात वाळवावे. शक्य असल्यास ड्रायर (वाळवणी यंत्र) व पंख्याचा वापर करून दाण्यातील ओलावा कमी करावा सर्वसाधारणपणे 50 किलोची पोती भरून ठेवल्यास पुढे बाजारपेठेत विक्री करणे सोपे जाते.

ज्वारी साठवितांना घ्यावयाची काळजी

धान्य साठवितांना त्यामध्ये आद्रतेचे प्रमाण जास्त असेल तर ते किडीस पोषक असते व त्यामुळे किडींचे प्रमाण वाढते. आद्रतेमुळे धान्यात उष्णता वाढते. असे धान्य तसेच राहू दिल्यास त्यास कुबट वास येऊ लागतो तसेच धान्याची चकाकी निघून जाते. धान्याच्या गुठळ्या तयार होतात आणि त्यावर बुरशी वाढते. असे धान्य खाण्यास योग्य रहात नाही कोठरात पावसाचे पाणी गळाल्यास तसेच भिंतीतून, जमिनीतून ओल आल्यास धान्य खराब होण्याचा संभव असतो. नवीन धान्यात साधारणपणे 14 टक्क्यांच्यावर आर्द्रता असते. ती 8 टक्क्यापर्यंत कमी करणे साठवणीच्या दृष्टीने जरुरीचे असते. यासाठी साठवण्यापूर्वी धान्य उन्हात चांगले वाळविणे हे अत्यंत महत्वाचे आहे. कोठारात पोती रचण्यापूर्वी खाली तळवट अंथरावा त्यामुळे ओल लागणार नाही. पोती रचताना भिंतीला चिकटवून ठेवू नयेत त्यामुळे भिंतीतून ओल लागणार नाही. कोठारात हवा खेळती रहावी अशी त्याची रचना असावी.

यंदा ज्वारी भाव खाणार

पावसाळ्यात कमी झालेल्या पावसाचा रब्बी ज्वारीच्या पेरण्यांना चांगलाच फटका बसला आहे. रब्बी हंगामात पुणे विभागातील नगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील ज्वारीचे सुमारे 10 लाख 34 हजार 134 हेक्टर क्षेत्र पेरणीपासून वंचित राहिले आहे. त्यामुळे ज्वारीच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. रब्बी ज्वारीच्या पेरण्यांची भिस्त बहुतांश  परतीच्या पावसावर असल्याने, शेतकरी काही प्रमाणात अवलंबून होते. मात्र परतीच्या पावसानेही हुलकावणी दिल्याने जमिनीत पुरेशी ओल होऊ शकली नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी ज्वारीला चांगले भाव मिळतील अशी आशा करू यात.  

डॉ. आदिनाथ ताकटे
प्रभारी अधिकारी, मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे विभाग)
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
9404032389

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters