1. कृषीपीडिया

मातीचे नमुना परीक्षण

माती परीक्षण म्हणजे जमिनीची कमीत कमी वेळात केलेली रासायनिक व भौतिक तपासणी. यात साधारपणे जमिनीचा सामू (पीएच) विद्राव्य क्षारांचे प्रमाण, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद आणि पालाश तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये लोह, जस्त, तांबे, मंगल आणि बोरॉन या गुणधर्मासाठी मातीचे परीक्षण केले जाते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra

माती परीक्षण म्हणजे जमिनीची कमीत कमी वेळात केलेली रासायनिक व भौतिक तपासणी. यात साधारपणे जमिनीचा सामू (पीएच) विद्राव्य क्षारांचे प्रमाण, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद आणि पालाश तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये लोह, जस्त, तांबे, मंगल आणि बोरॉन या गुणधर्मासाठी मातीचे परीक्षण केले जाते. त्यानुसार वरील अन्नद्रव्यांचे जमिनीतील प्रमाण या बाबत माहिती मिळते व त्यानुसार पिकांच्या आवश्यकते नुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा समतोल प्रमाणात करता येतो. माती परीक्षणानुसार योग्य प्रमाणात सेंद्रिय व रासायनिक खताचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होतेच पण अन्नद्रव्यांवर होणार्‍या खर्चात बचत होऊन अधिक फायदा मिळतो. त्याचप्रमाणे जमिनीची सुपीकता कायम टिकविण्यास व तिची उत्पादन क्षमता वाढविण्यास मदत होते. जमिनीचा सामू व क्षारता या गुणधर्माच्या मूल्यमापनावरून क्षारयुक्त किंवा खार जमिनीबाबत तात्पुरती कल्पना येऊन त्यानुसार सुधारणा करण्यासाठी मदत होते म्हणून माती परीक्षण करून घेणे शेतकर्‍यांच्या दृष्टीने महत्वाची बाब होय.

पिकांना विविधप्रकारच्या १७ अन्नद्रव्यांची कमी प्रमाणात गरज असते. पिके ही अन्नद्रव्ये, हवा, पाणी व जमिनीतून शोषूण घेतात. जमिनीत सतत पिके घेतली जात असल्यामुळे तसेच अधिक उत्पादन देणार्‍या जातींची लागवड व सधन शेती पद्धतीमुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण झपाट्याने कमी होते. त्याचप्रमाणे नत्र, स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये पिके जास्त प्रमाणात शोषून घेतात. म्हणून त्याचा पुरवठा सेंद्रिय किंवा रासायनिक खताद्वारे करण्यात येतो. पिकाला ज्या प्रमाणात अन्नद्रव्यांची गरज आहे त्यानुसार पुरवठा करणे ही अधिक उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी माती परीक्षण करून जमिनीचा सामू, विद्राव्य क्षार, तसेच सेंद्रिय कर्ब, उपलब्ध स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून घेऊन त्यानुसार पिकांना या अन्नद्रव्यांचा पुरवठा सेंद्रिय व रासायनिक खताद्वारे केल्यास उत्पादनात वाढ होतेच व आर्थिक फायदा सुद्धा होतो. माती परीक्षणानुसार खताच्या मात्रा दिल्यास सर्वसाधारणपणे १५ ते ४० टक्के फायदा शेतकर्‍यांना मिळण्यास मदत होते.

मातीचा नमुना घेण्याबाबतची दक्षता:

मातीचा नमुना घेताना खालील बाबी काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे.

◆ जमिनीला खते दिल्यानंतर अडीच ते तीन महिन्याच्या आत मातीचा नमुना घेऊ नये.

◆ शेतात पीक असल्यास दोन ओळीतील जागेतून मातीचा नमुना घ्यावा.

◆ निरनिराळ्या प्रकारचे किंवा निरनिराळ्या शेतातील मातीचे नमुने एकत्र मिसळू नयेत.

◆ शेतातील झाडाखालील, विहीरी जवळील, जनावरे बसण्याच्या जागा आणि पाणी साचत असलेले भाग एत्यादी ठिकाणाहून नमुना घेऊ नये.

◆ मातीचे नमुने प्रयोग शाळेत पाठविण्यासाठी रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्यांचा वापर करू नये.

◆ मातीचा नमुना साधारणपणे पिकाची कापणी झाल्यावर परंतु जमिनीच्या पूर्व मशागतीपूर्वी घ्यावा.

 

मातीचा नमुना कसा घ्यावा ?

◆ माती परीक्षणाचे महत्त्व, त्याची सत्यता व त्यापासून मिळणारे फायदे मातीचा नमुना चुकीच्या पद्धतीने घेतल्यास माती परीक्षणाच्या इतर पैलूंचे महत्व कमी ठरते व त्यानुसार अपेक्षित फायदा मिळू शकत नाही म्हणून मातीचा नमुना योग्य पद्धतीने घेणे हितावह ठरते. साधारणपणे मातीचे नमुने खालील उद्देशांसाठी घेतले जातात.

◆ जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण तपासून त्याप्रमाणे खतांचा पुरवठा करणे.

◆ फळबाग लागवडीसाठी माती परीक्षण करणे.

◆ खारवट किंवा चोपण जमिनी सुधारण्यासाठी मातीची तपासणी करणे.

 

मातीचा नमुना घेतांना घ्यावयाची काळजी:

◆ शेतातील जनावरे बसण्याच्या जागा, खत साठवण्याची व केरकचरा टाकण्याची जागा, विहीरीचे किंवा शेताचे बांध इ. जागेमधून मातीचे घेऊ नये.

◆ मातीचा नमुना साधारणपणे पिकांची कापणी झाल्यानंतर परंतु नांगरणीपूर्वी घ्यावा.

◆ शेतात पीक उभे असल्यास दोन ओळीतील जागेमधून मातीचा नमुना घ्यावा.

◆ वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीचे किंवा निरनिराळ्या शेतातील मातीचे नमुने एकत्र मिसळू नयेत.

◆ मातीचा नमुना घेण्यासाठी स्वच्छ आणि कापडाच्याच पिशव्या वापराव्यात. (रासायनिक खतांच्या, सिमेंटच्या वापरु नयेत)

◆ जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण तपासून त्याप्रमाणे खतांचा पुरवठा करणे

◆ मातीचा नमुना घेण्यासाठी सर्वसाधारणपणे पिके जमिनीच्या कोणत्या भागातून अन्नद्रव्य शोषण करतात यावरून मातीचा नमुना घेतला जातो.

◆ ज्वारी, भुईमूग, गहू, भात इ.- १५ ते २० से.मी खोल.

◆ कापूस, केळ, ऊस- ३० से.मी खोल.

◆ फळझाडाच्या बुंध्यापासून ३० ते ४५ से.मी लांब सोडून बाहेरच्या परिघामधून- ३० से.मी. खोल.

 

मातीचा नमुना घेण्याची पद्धत:

मातीचा नमुना प्रातिंनिधक असणे महत्वाचे आहे. म्हणून जमिनीच्या गुणधर्मानुसार केलेल्या विभागानुसार निरनिराळ्या १०-१२ ठिकाणी खड्डे करून नमुने घ्यावेत. नमुना घ्यावयाच्या जागेवरील कडीकचरा बाजूला करून त्याठिकाणी टिकास, फावड्याच्या साहाय्याने १५-२० से.मी. खोलीपर्यंत व्ही आकाराचे खड्डे करून खड्ड्यातून बाजूची वरपासून तळापर्यंत २-३ से.मी. जाडीची माती खुरपीने घ्यावी. नमुण्यासाठी निवडलेल्या क्षेत्रातील प्रत्येक खड्ड्यातून वरील प्रमाणे माती काढावी व ती स्वच्छ घमेल्यात किंवा बादलीत जमा करावी. त्यानंतर एकत्र केलेली मातीचे चार भाग करून समोरासमोरील दोन भाग काढून टाकावेत व उरलेले दोन भाग एकत्र करून अर्धा ते एक किलो माती शिल्लक राहील तोपर्यंत या पद्धतीचा अवलंब करावा. अशा प्रकारे प्रत्येक विभागातून अर्धा ते एक किलो मातीचा प्रातिनिधिक नमुना अलग-अलग घ्यावा. माती ओली असल्यास ती सावलीत वाळवावीव नंतर स्वच्छ कापडी पिशवीत भरून खलील महितीसह प्रयोगशाळेला नमुना पाठवावा.

 

फळबाग लागवडीसाठी माती परीक्षण करणे:

फलबाग हे बहुवर्षीय पीक असल्याने जमिनीचे परीक्षण करूनच फळझाडाची लागवड करावी. जमिनीची योग्य निवड केळी नाही तर कालांतराने फळ झाडांना बहरन येणे, झाडांची वाढ खुंटने, झाडे अकाली वाळणे अशा अनेक समस्या निरम्न होतात. म्हणून फलबागसाठी माती परीक्षण करणे जरूरी आहे. फळझाडांची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे जमिनीत दीड मीटर किंवा अगोदरच मुरूम लागल्यास, मुरूमापर्यंत खोल खड्डा करून मातीचा नमुने घ्यावे. याकरिता जमिनीच्या गुणधर्मानुसार किंवा प्रकारानुसार पूर्वी सांगितल्याप्रमाणे विभाग करून प्रत्येक विभागात एक या प्रमाणे दीड मीटर किंवा मुरूम लागेपर्यंत खोल खड्डा करावा.

       खड्ड्याच्या उभ्या छेदाचे १५, ३०, ६० ९०, १२० आणि १५० से.मी. असे भाग पाडावेत. त्यानंतर बादली किंवा घमेला १४ से.मी. खुनेजवळ धरून जमिनीच्या पृष्ट भागापासून १५ से.मी. खोलपर्यंत सारख्या जाडीची अर्धा किलो माती निघेल एवढी माती कुदळीने खोदून घमेल्यात जमा करावी. हा ०-१५ से.मी. खोलीचा नमुना कापडी पिशवीत भरावा. या प्रमाणे राहिलेल्या प्रत्येक थरातून सारख्या जाडीची माती अर्धा किलो काढून वेगवेगळ्या पिशव्यात भरावी. जर चुंखाडीचा किंवा कठीण मातीचा थर आढळल्यास त्याच्या खोलीची व जाडीची नोंद करून या थराचा नमुना वेगळा घ्यावा. पिशवीत शेतकर्‍यांचे नाव, पत्ता, शेत सर्व्हे नंबर, नमुण्याची खोली वगैरे माहितीची चिठ्ठी टाकावी.

 

खारवट किंवा चोपण जमिनी सुधारण्यासाठी मातीची तपासणी करणे:

जमिनीच्या प्रकारानुसार शेतीचे पूर्वी सांगितल्याप्रमाणे विभाग पाडून एका विभागातील एक या प्रमाणे एक मीटर लांब, एक मीटर रुंद व एक मीटर खोल या आकाराचे खड्डे करावेत खड्ड्याच्या उभ्या छेदाचे ०-१५, १५-३०, ३०-६० आणि ६०-९० से.मी. असे भाग पाडावेत. या भागातून  सारख्या जाडीचा थर कुदळीने खोदून घमेल्यात जमा करावा. प्रत्येक थरातून दीड किलो माती काढून वेगवेगळ्या पिशव्यात भरावी, पिशवीत चिठ्ठी टाकावी. मातीचा किंवा चुनखडीचा थर आढळून आल्यास त्याच्या खोलीचा व जाडीची नोंद करून त्याचा नमुना वेगळा घ्यावा.

लेखक:

एस. एच. टिमके (पीएच.डी. विद्यार्थी)

8459950081

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

एन. व्ही. लांडे (पीएच.डी. विद्यार्थी)

8802360388

राष्ट्रीय पादप जीनोम अनुसंधान संस्थान, नवी दिल्ली

डॉ. एस. जी. वाघ (सहायक प्राध्यापक)

9673806666

एस. डी. एम. व्ही. एम. कृषि बायोटेक्नॉलॉजी कॉलेज, औरंगाबाद

डॉ. ए. ए. दसपुते (सहायक प्राध्यापक)

9607705240

कृषि बायोटेक्नॉलॉजी कॉलेज मदडगाव, अहमदनगर

 

English Summary: Soil sample testing Published on: 27 November 2020, 01:44 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters