MFOI 2024 Road Show
  1. कृषीपीडिया

शाश्वत पीक उत्पादनासाठी मृद व जलसंधारण

शेतकरी बंधुनो, कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी हंगामाच्या दृष्टीने जमिनीतील ओलाव्याचे नियोजन अर्थात मृद व जलसंधारण कसे करावे? याबाबत...कोरडवाहू शेतीच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न कोरडवाहू शेतीत “ ओल तसे मोल “ या उक्तीस पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Soil and water conservation news

Soil and water conservation news

डॉ. आदिनाथ ताकटे

राज्यातील एकूण लागवडी योग्य जमिनी पैकी ८० टक्के शेती हि पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर म्हणजेच निसर्गावर अवलंबून आहे. या कोरडवाहू (अवर्षण प्रवण) भागातील पावसाच प्रमाण कमी, अनियमित आणि लहरी असल्यामुळे पीक उत्पादन हे अनिश्चित स्वरूपाचे असते. या कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांचा विचार केल्यास, त्यांना आपली शेती हि निसर्गाच्या लहरीप्रमाणे करावी लागते आणि म्हणूनच कोरडवाहू क्षेत्रातील पिकांचे नियोजन करताना उत्पादन वाढीच्या दृष्टीने विविध सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करण गरजेचे आहे.

शेतकरी बंधुनो, कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी हंगामाच्या दृष्टीने जमिनीतील ओलाव्याचे नियोजन अर्थात मृद व जलसंधारण कसे करावे? याबाबत... कोरडवाहू शेतीच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न कोरडवाहू शेतीत “ ओल तसे मोल “ या उक्तीस पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. जमिनीतील ओलावा हा पडणाऱ्या पावसावर आणि जमिनीच्या खोलीवर अवलंबून असतो. एकूण पडणाऱ्या पावसापैकी १० ते २० टक्के पाणी जमिनीवरून वाहून जाते. १० टक्के पाणी निचऱ्याद्वारे आणि ६० ते ७० टक्के पाणी बाष्पीभवनाद्वारे निघून जाते.वाहून जाणारे,निचऱ्या द्वारे आणि बाष्पीभवनाद्वारे वाया जाणारे पाणी जमिनीत जास्तीत जास्त प्रमाणात कसे साठविता येईल आणि त्या ओलाव्याचा उपयोग कोरडवाहू शेतीच्या पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीने करण अतिशय महत्वाचे आहे.त्यासाठी पावसाच्या पाण्याचे नियोजन हे अतिशय महत्वाच आहे.

पावसाच्या पाण्याचे नियोजन

•अवर्षण प्रवण क्षेत्रातील पावसाचा अभ्यास केला तर अस दिसून येते कि या भागात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी,(सरासरी ५०० ते ७५० मि.मी. पेक्षा कमी) पाऊस हा अनिश्चित, लहरी, बेभरवशाचा आणि प्रतिकूल असतो.
•सर्व साधारणपणे जून-जुलै मध्ये पाऊस सुरु होतो.जुलै-ऑगस्ट मध्ये पावसाचे प्रमाण घटते आणि त्याचबरोबर तो अनिश्चित असतो.
•सप्टेंबर महिन्यात म्हणजे उत्तरा व हस्त नक्षत्रा मध्ये सर्वात जास्त म्हणजे १५० ते २०० मि.मी.पाऊस पडतो.
•चित्रा नक्षत्रात म्हणजेच ऑक्टोबरच्या मध्यानंतर पाऊस पूर्णपणे थांबतो म्हणून या भागातील ७० टक्के क्षेत्र रब्बी पिकाखाली असते आणि त्यापैकी ८० टक्के क्षेत्रावर शेतकरी रब्बी ज्वारीची पेरणी करतात.
•त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसाठी ओलावा साठविण्याच्या दृष्टीने खरीप हंगामातील ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब जमिनीत, जिरवणे, मुरविणे आणि साठविणे अत्यावश्यक आहे.
•या जमिनीत मुरलेल्या पावसावरच रब्बी पिकांचे उत्पादन अवलंबून आहे.त्यासाठी खरीप हंगामात पडलेल्या पाऊस जमिनीत कसा मुरविता येईल हे शेतकऱ्यांनी पाहिलं पाहिजे.

सपाट वाफे : कोरडवाहू शेतीमध्ये जेथे पाणी मुरण्याचा वेग जास्त आहे आणि जमिनीला फारसा उतार नाही अशा ठिकाणी उतारला आडवे वाफे तयार करावेत.वाफे तयार करतांना प्रथम कुळवाची पाळी द्यावी. त्यानंतर बळीराम नांगराने उभे - आडवे ६ मीटर x ६ मीटर अंतरावर उतारास आडवे सपाट वाफे तयार करावेत. वरंब्याची उंची साधारणपणे २० ते ३० से.मी. ठेवावी. असे वाफे जागोजागी पाणी मुरविण्यास मदत करतात. त्यामुळे जमिनीमध्ये नेहमीपेक्षा ५० टक्के जास्त ओल साठवली जाते. या पद्धतीमुळे रब्बी ज्वारीचे हेक्टरी उत्पादन २ ते ३ क्विंटल पर्यंत वाढल्याचे आढळून आले आहे.

सरी वरंबे: मध्यम ते भारी जमिनीत खरीप हंगामात बळीराम नांगराने उतारास आडवे तास घालावेत. त्यामुळे सऱ्या तयार होतात आणि पडणाऱ्या पावसाचे पाणी सऱ्या मधून जमिनीत मुरते. या पद्धतीत ८० टक्क्यापर्यंत पाणी जमिनीत मुरते. जमिनीतून पाणी वाहून जात नाही.सऱ्यांची लांबी ९० मीटर पर्यंत ठेवावी.या पद्धतीमुळे उत्पादनात ३५-४० टक्के वाढ दिसून आली आहे.

बंदिस्त सरी वरंबे: या पद्धतीत मुख्य वरंबे उतारास आडवे ठेवावेत तर बंदिस्त वरंबे उतारच्या दिशेने ठेवावेत.अशा रीतीने उताराला आडवे बंदिस्त सरी वरंबे तयार होतात.मुख्य वरंब्याची लांबी ६ मीटर व उंची ३० से.मी.ठेवावी. तर बंदिस्त वरंब्याची उंची २० से.मी. व दोन वरंब्यातील अंतर ३ मीटर ठेवावे. या पद्धतीत जास्त पाऊस पडला तरी बंदिस्त वरंबे फुटून संथ गतीने पाणी शेतातून बाहेर जाते. ही पद्धत कोरडवाहू भागात चोपण व क्षारयुक्त जमिनीत पाणी मुरविण्यासाठी उपयुक्त असून त्यामुळे जमिनीतील विद्राव्य क्षारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

जैविक बांध: समपातळीत उतारास आडवे मातीचे बांध टाकण्याऐवजी वनस्पतींची अंजन, खस गवत आणि सुबाभूळ अशा वनस्पतींची निवड करावी. गवतांचे ठोंब किंवा बी समपातळीत उताराला आडवे दोन ओळीत पावसाळ्याच्या सुरुवातीस लावावे. दोन ओळीत ३० से.मी. अंतर ठेवावे.दोन रोपातील अंतर १५ ते २० से.मी. ठेवावे.जैविक बांधामुळे वाहून जाणाऱ्या पाण्यास अडथळा निर्माण होऊन पाण्याचा वेग कमी केला जातो. जमिनीची धूप कमी होते.गवती बांधामुळे जनावरांना चारा मिळतो.सुबाभूळीच्या जैविक बांधाची उंची ३० से.मी ठेवून कापलेल्या कोवळ्या फांद्याचा जनावरांना वैरण म्हणून किंवा जमिनीत गाड्ल्यास हिरवळीचे खत म्हणून उपयोग होतो.दोन जैविक बांधामुळे ह्या कोवळ्या फांद्या कापून टाकल्यास त्याचा धूप प्रतिबंधक म्हणून उपयोग होतो व सेंद्रिय कर्बाचे प्रमाणही वाढते.त्याद्वारे रब्बी पिकांमध्ये प्रती हेक्टरी २५ ते ५० किलो नत्राची बचत करता येते. जैविक बांधामुळे उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ झाल्याचे आढळून आले आहे.

समपातळीत लागवड व मशागत : जमिनीचे सपाटीकरण, नांगरणी, कुळवणी, कोळपणी यासारख्या मशागती व पेरणी समपातळीत पण उताराच्या आडव्या दिशेने कराव्यात. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो.पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते.वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी केला जातो आणि धुपीस आळा बसतो. कोळपणी व खुरपणीमुळे जमिन भुसभुशीत होते. भेगा कमी प्रमाणात पडतात. त्यामुळे जमिनीतील भेगांमधून बाष्पीभवनाद्वारे होणाऱ्या पाण्याचा ऱ्हास कमी होतो.जमिनीत ओलावा जास्त काळ व जास्त प्रमाणात साठविला जातो. मशागतीमुळे तणांचा नाश होऊन ताणांमुळे कमी होणारा ओलावा वाचून दीर्घकाळ पिकास उपयोगी पडतो.

रब्बी ज्वारीसाठी मूलस्थानी जलसंधारण

रब्बी हंगामातील ज्वारीसाठी पाण्याचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने खरीप हंगामातील ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब जमिनीत मुरविणे अतिशय महत्वाचे आहे. त्यसाठी उन्हाळ्यात शेती मशागतीची कामे उतारास आडवी करावीत.
नांगरट झाल्यानंतर हेक्टरी १० ते १२ गाड्या शेणखत जमिनीत मिसळून द्यावे.त्यानंतर कुळवाच्या पाळ्या देऊन शेतातील काडी कचरा ,धसकटे वेचून शेत साफ करावे.
पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी जमिनीच्या उतारावर वाफे तयार करावेत.(३.६० X ३.६० चौ. मी. आकाराचे) वाफे तयार करताना सारा यंत्राने सारे करून त्यामध्ये बळीराम नांगराने दंड टाकल्यास कमी खर्चात वाफे तयार होतात.
सदर वाफे रब्बी ज्वारीच्या पेरणीपूर्वी ४५ दिवस अगोदर करावेत म्हणजे १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर हा काळ रब्बी ज्वारीच्या कोरडवाहू क्षेत्रामध्ये पेरणी करण्यासाठी शिफारस केलेला आहे.
तेव्हा १५ सप्टेंबर पूर्वी ४५ दिवस म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाफे तयार करावेत. पेरणीपूर्वी जेवढा पाऊस पडेल तेवढा त्यामध्ये जिरवावा.
पेरणीच्या वेळी वाफे मोडून पेरणी करावी व पुन्हा सारा यंत्राच्या सहाय्याने गहू, हरभरा पिकासारखे सारे पडून आडवे दंड पाडावेत म्हणजे पेरणीनंतर पाऊस पडल्यानंतर तो आडवून जिरवता येईल या तंत्राने रब्बी ज्वारीचे ३०ते ३५ % उत्पादन वाढते.

लेखक - डॉ. आदिनाथ ताकटे, मृद शास्त्रज्ञ,मो. ९४०४०३२३८९, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषि विद्यापीठ ,राहुरी

English Summary: Soil and water conservation for sustainable crop production Published on: 04 July 2024, 09:47 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters