भाऊसाहेब उपाख्य डॉ.पंजाबराव देशमुख या महान व्यक्तिमत्वाने हिमालयाच्या उंचीचे कार्य करून ठेवले आहे. आज ते पाहाता त्यांची दुरदृष्टी वर्तमानाचा वेध घेणारी आणि भविष्यातील पाऊले ओळखणारी होती याची आपल्याला जाणीव झाल्याशिवाय राहात नाही. एका ध्येयाने प्रेरीत झालेले ते व्यक्तिमत्व होते. भाऊसाहेबांचे उद्दीष्ट, ज्ञान आणि दुरदृष्टी अचंबित करणारी होती. भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख हे खऱ्या अर्थाने समाजसुधारक म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात नावाजलेले एक मोठं नाव आणि शिक्षण क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे त्यांनी उभ्या केलेल्या शिक्षण संस्थानांच्या माध्यमातून आज दिसत आहे. पण तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते, अस्पृश्य, गरीब व शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी झटणारे नेते म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख ओळखल्या जातात. भाऊसाहेबांचा जन्म वडील शामराव व आई राधाबाई यांच्या पोटी २७ डिसेंबर १८९८ या दिवशी विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. पुढे चालून आपला मुलगा शिक्षण क्षेत्रात बदल घडवेल असे त्यांच्या आई वडिलांना किंचितही वाटले नव्हते. खरे तर मूळचे कदम आडनाव असलेले आणि देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रूढ होत असताना कदम हे आडनाव मागे पडायला लागले. अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी त्यांचे बालपणीचे शिक्षण आणि मॅट्रिकही ते तिथेच उत्तीर्ण झाले. जेव्हा ते मॅट्रिकची परीक्षा अमरावतीला द्यायला आले होते, तेव्हाच त्यांनी ठरवले की मला उच्च शिक्षण घेणे हे फार महत्वाचे आहे, म्हणून त्यांनी पुणे गाठले. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल झाले. पण पदवी घेण्यापूर्वीच त्यांना शिक्षणासाठी इंग्लंडला जायची संधी मिळाली. आणि मग आईवडिलांच्या संमतीने ते इंग्लंडला गेले. इंग्लंडला एडिम्बर्ड विद्यापीठात एम.ए. आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात डी. फील ची पदवी त्यांनी घेतली. परदेशात शिक्षण घेताघेता त्यांनी 'वैदिक वाङ्मयातील धर्माचा उगम व विकास' हा सर्वात मोठा प्रबंध त्यांनी लिहिला. आणि याच प्रबंधावर त्यांना पी.एच.डी. सुद्धा मिळाली. इंग्लंडमध्ये त्यांना बार ऍट लॉ ची पदवीही मिळाली.
१९२६ ला भाऊसाहेबांनी "मुष्कीफंड" च्या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी 'श्रद्धानंद छात्रालय' काढले. शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा 'कर्ज लवाद कायदा' पारित करण्यासाठी त्यांनी महत्वाचा सिंहाचा वाटा उचलला.
भाऊसाहेबांनी १९५० ला 'लोकविद्यापीठाची' स्थापना पुणे येथे केली त्यानंतर 'यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये' त्याचे रूपांतर झाले. म्हणजे आजचे 'यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ' हे भाऊसाहेबांनीच पुण्याला लोकविद्यापीठ या नावाने स्थापन केलेले होते. १९५५ ला 'भारत कृषक समाजाची' स्थापना करून त्याच्याच विद्यमाने 'राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना भाऊसाहेबांनी केली. विदर्भात खऱ्या अर्थाने सहकारी चळवळ चालवण्याचे श्रेय हे भाऊसाहेबांनाच दिल्या जाते. १९५६ ला अखिल भारतीय दलित संघाची स्थापना करून " भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा" हा महत्वाचा नारा त्यांनी दिला. १८ ऑगस्ट १९२८ ला बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेत सर्वात आधी अमरावतीत अंबाबाई मंदिर असपृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह करणारे विदर्भातील एकमेव समाजसुधारक म्हणजे डॉ. पंजाबराव देशमुख हेच आहेत. १९३० ला प्रांतिक कायदेमंडळावर निवड होऊन शिक्षण, कृषी आणि सहकार ह्या तीनही महत्वाच्या खात्यांची मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळून तिनही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे भारताचे केंद्रीय मंत्री म्हणजे भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख. १९५२ ते १९६२ मध्ये भाऊसाहेब भारताचे प्रथम केंद्रीय कृषिमंत्री होते. भाऊसाहेबांचे कार्य हे कुठल्याही एका क्षेत्राशी संबंधित नव्हते, तर ते सर्वव्यापी होते. भाऊसाहेबांची महत्वाकांक्षा उत्तुंग होती आणि या गरूड झेपेला केवळ आकाशाची मर्यादा होती.
भाऊसाहेंबांनी केलेल्या कार्यामुळे हे घडले:-
भाऊसाहेबांनी त्यांच्या संस्थेची उभारणीच शेतकऱ्यांचे हित लक्षात घेउन केली. त्यांचे स्वप्नं होते की कास्तकार शिकला पाहिजे. शिक्षण खेड्यापर्यंत पोहोचले. शेतकऱ्यांची मुले उच्चशिक्षीत झाली आणि होत आहेत. आज आजुबाजुच्या जिल्ह्यांमध्ये जी साक्षरता आपल्याला पहावयास मिळते त्याची मुळं पंजाबराव देशमुखांच्या कृतीत रूजलेली आहेत. शेतकरी व्यवसायात व्यापारात फार उंचीवर पोहोचला नसला तरी देखील लहान, मोठे व्यापार करण्याची तो हिम्मत करतांना दिसतो आहे. शेतकरी गावाच्या आर्थिक विकासात सहभागी झाला आहे.कृषी महाविद्यालयाचे आणि कृषी विद्यापिठांचे संशोधन गाव खेड्यापर्यंत पोहोचते आहे. त्या संशोधनातुन शेतकरी नवनवे प्रयोग करण्यास पुढाकार घेतांना दिसतो आहे. अधिक उत्पादनाकरता शेतकरी बांधव नवनव्या तंत्रज्ञानाचा आणि बियाण्यांचा उपयोग करतायेत. संस्थेच्या वैद्यकिय महाविद्यालयाची सेवासुविधा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
नुकतेच काही दिवसांपूर्वी संसदेमध्ये जे नागरिकत्व बिल पास झाले त्या नागरिकत्वासंबंधीच्या तरतुदीविषयीची भाऊसाहेबांची मते जेव्हा की, ते संविधानसभेचे सदस्य म्हणून होते:-१. ज्या दिवशी संविधान अंमलात येईल त्या दिवशी भारताचे अधिवासी (डोमिसाइल)असलेल्या आणि भारतात जन्मलेल्या व्यक्ती भारतीय प्रजासत्ताकच्या नागरिक बनतील.
२.भारतात ज्यांचा जन्म झाला पण ज्या व्यक्ती अनेक वर्षांपासून येथील अधिवासी आहेत अशा व्यक्तींना मग त्या भारतातील पोर्तुगीजांच्या किंवा फ्रेंचाच्या वसाहतीत राहणाऱ्या असोत अगर भारताबाहेर जन्मलेले पण अनेक वर्षे भारताचे रहिवासी असलेले इराणी असोत, त्यांना भारतीय नागरिक होता येईल. ३.भारताचे रहिवासी असूनही फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींना किंवा ४.पाकिस्तानात राहणाऱ्या पण फाळणीनंतर भारतात आलेल्या व्यक्तींना भारताचे नागरिक होता येईल. ५.ज्या व्यक्तींचा किंवा त्यांच्या मातापित्यांचा जन्म भारतात झाला असेल पण ज्यांचे वास्तव्य परदेशांमध्ये असेल त्यांनाही भारतीय नागरिकत्व दिले जाईल. डॉ. आंबेडकरांनी सुधारित कलमांमध्ये सुचवलेल्या कलमांवर भाऊसाहेबांनी कडक टीका केली. ते म्हणाले, 'नव्या पाचव्या कलमानुसार व्यक्तीच्या अधिवासाला प्रथम स्थान देण्यात आले आहे. अधिवासी व्यक्ती भारतात जन्मलेली असली तरी पुरेसे आहे. तिच्या मातापित्याशी असलेला संबंध महत्त्वाचा नाही, एखादे परदेशी दांपत्य विमानाने प्रवास करीत असेल आणि ते विमान काही तासांसाठी मुंबई विमानतळावर थांबलेले असताना त्या दांपत्यांपैकी गरोदर महिला विमानातच प्रसूत होऊन तिने अपत्याला जन्म दिला, तर केवळ जन्म भारतात झाला या कारणामुळे ते अपत्य भारताचे नागरिक बनेल. भारताचे नागरिकत्व इतक्या स्वस्तात व सहजासहजी मिळेल अशी तरतूद करू नये.’
सामान्यत: किमान पाच वर्षे भारतात राहिलेल्या व्यक्तीस भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद भाऊसाहेबांना बिलकूल आवडली नव्हती. अशा व्यक्तीच्या मातापित्याचे राष्ट्रीयत्व किंवा त्यांचा देश कोणता याचा जसा उल्लेख कलमात नव्हता, तसाच कोणत्या हेतूनं पाच वर्षे व्यक्ती भारतात राहत होती याची सखोल चौकशी करण्याची भाऊसाहेबांना गरज वाटत होती. भारताच्या स्वातंत्र्याला घातपात करण्याच्या उद्देशाने हेरगिरीसारख्या पंचमस्तंभी (फिक्स कॉलमिस्ट) कारवाया करण्याच्या हेतूने एखादी व्यक्ती भारतात राहण्याची शक्यता पंजाबरावांनी बोलून दाखवली. म्हणून त्यांनी पाच वर्षांच्या वास्तव्याच्या अटीऐवजी किमान बारा वर्षांच्या वास्तव्याची अट असावी असे सुचवले. व अन्य कोणत्याही देशाचा नागरिक नसलेल्या प्रत्येक हिंदूला व शिखाला भारतीय नागरिकत्व हक्काने मिळाले पाहिजे असा त्यांनी आग्रह धरला.
शिक्षणा व्यतिरीक्त कृषी आणि सहकार क्षेत्रात देखील भाऊसाहेबांनी क्रांती घडवुन आणली होती त्यामुळे गाडगे बाबांच्या हृदयात त्यांच्याविषयी अपार प्रेम होते.अश्या पध्दतीने शिक्षणाचे मुल्य समजण्याकरता आज पुन्हा एकदा आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, पंजाबराव देशमुखांसारख्या थोर व्यक्तिमत्वांची आवश्यकता आहे.
Share your comments