डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला हे विद्यापीठ विदर्भातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील किंबहुना देशातील शेतकरी बांधवांकरीता वरदान ठरत आहे. या विद्यापीठाने विविध पिकामध्ये अधिक उत्पादनक्षम, रोग व किडीस प्रतिकारक आणि विविध हवामानात लागवडी करीता योग्य अशा वेगवेगळ्या वाणांची निर्मिती केलेली आहे. बऱ्याच दिवसांपासून विद्यापीठाकडून सोयाबीनच्या नवीन वाणांच्या बियाण्याची मागणी राज्यातील शेतकरी बांधवांकडून येत होती. त्यामुळे या विद्यापीठाच्या प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावती येथील सोयाबीन संशोधन केंद्रावरील शास्त्रज्ञांच्या चमूने गेल्या आठ ते दहा वर्षापासून अथक परिश्रम घेवून मागील तीन वर्षात अधिक उत्पादन देणाऱ्या सोयाबीनच्या चार नविन वाणांची निर्मिती केली आहे राज्यातील शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी बांधवाना या वर्षी या चार वाणांचे बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
डॉ पं.दे.कृ.वि., अकोला निर्मित सोयाबीनचे नविन वाण
१) सोयाबीन पिडीकेव्ही येलो गोल्ड (एएमएस-१००१):- हा वाण महाराष्ट्र राज्याकरिता सन २०१८ मध्ये प्रसारित करण्यात आलेला आहे. या वाणाची सरासरी उत्पादकता हेक्टरी २२ ते २६ क्विंटल असून ९५ ते १०० दिवसात परिपक्व होतो झाडाची सरासरी उंची ४६ ते ५५ से.मी. असून या वाणाच्या झाडाला ३७ ते ५१ शेंगा लागतात. शेंगातील दाण्यांची संख्या २.६ प्रति शेंग असून पानांचा आकार टोकदार व अंडाकार आहे. या वाणांच्या फुलांचा रंग जांभळा असून १०० दाण्यांचे वजन १०.५ ते ११.५ ग्रॅम आहे. पिडीकेव्ही येलो गोल्ड हा वाण मुळकुज/खोडकुज व पिवळा मोझक या रोगास मध्यम प्रतिकारक आहे.
तसेच चक्रभुंगा व खोडमाशी या किडीस मध्यम प्रतिकारक आहे. या वाणातील तेलाचे प्रमाण १८ ते २० टक्के असून प्रथिनांचे प्रमाण ३८ ते ४० टक्के आहे. हा वाण सन २०१९ मध्ये भारत सरकार कडून अधिसूचित करण्यात आलेला असून या वाणांचे खरीप २०२२ करीता एकूण ३३० क्विंटल बियाणे विद्यापीठाकडे उपलब्ध असून यामध्ये २०० क्विंटल पैदासकार बियाणे आणि १३० क्विंटल सत्यप्रत बियाणे उपलब्ध होणार आहे. या वाणाला शेतकरी बांधवांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून खरीप-२०२० व खरीप-२०२१ या दोन हंगामामध्ये या वाणाच्या पैदासकार बियाण्याचे राज्यातील शेतकरी उत्पादक संस्थासोबत सामंजस्य करार करण्यात आलेले असून या माध्यमातून पिडीकेव्ही येलो गोल्ड या वाणाचे पैदासकार बियाणे शेतकरी उत्पादक संस्था याना पुरविण्यात येत आहे.
डॉ पं.दे.कृ.वि., अकोला निर्मित सोयाबीनचे नविन वाणांचे गुणधर्म
२) सुवर्ण सोया (एएमएस-एमबी-५-१८) :- सन २०१९ या वर्षी विद्यापीठाने सुवर्ण सोया (एएमएस-एमबी-५-१८) हा वाण राज्यातील शेतकऱ्यांकरिता प्रसारीत करून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हा वाण सन २०२१ मध्ये भारत सरकार द्वारा अधिसूचित करण्यात आलेला आहे. हा वाण महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशातील बुंदेलखंड भाग या पाच राज्यांमध्ये लागवडी करीता प्रसारित करण्यात आलेला आहे. विद्यापीठाच्या सुवर्ण सोया (एएमएस-एमबी-५-१८) या वाणाची सरासरी उत्पादकता हेक्टरी २४ ते २८ क्विंटल असून हा वाण काढणीकरीता ९८ ते १०२ दिवसात तयार होतो. या वाणाच्या झाडांची सरासरी उंची ५२ ते ६० से.मी. असून या वाणाच्या प्रति झाडाला सरासरी ७७ ते ९० शेंगा लागतात. या वाणाच्या शेंगातील दाण्याचे प्रमाण २.१ प्रति शेंग असू पानाचा आकार गोल अंडाकार आहे. सुवर्ण सोया या वाणाचे वैशिष्ठ्य म्हणजे या वाणाच्या झाड व शेंगावर दाट, तपकिरी रंगाचे केस आढळतात. या वाणाच्या फुलाचा रंग पांढरा असून १०० ग्रॅम दाण्याचे वजन १० ते ११ ग्रॅम आहे. सुवर्ण सोया हा वाण मुळकुज/खोडकुज व पानावरील बुरशीजन्य ठिपके या रोगास प्रतिकारक आहे. तर चक्रभुंगा व खोडमाशी या किडीस मध्यम प्रतिकारक आहे. या वाणातील दाण्यांमध्ये तेलाचे प्रमाण १९ ते २० टक्के असून प्रथिनांचे प्रमाण ४० ते ४२ टक्के आहे. विद्यापीठाकडे या वाणाचे खरीप-२०२२ करीता एकूण ३८० क्विंटल बियाणे उपलब्ध असून त्यामध्ये पैदासकार बियाणे २०० क्विंटल आणि शेतकरी बांधवांना लागवडीकरीता १८० सत्यप्रत क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.
राज्याचे कृषि सचिव श्री एकनाथजी डवले यांची विद्यापीठाच्या सोयाबीन वाणांना दिली पसंती
३) पिडीकेव्ही अंबा (एएमएस-१००-३९):- विद्यापीठाने सन २०२१ मध्ये हा वाण प्रसारित केला असून ह्या वाणाला शेतकरी बांधवांची आणि शेतकरी उत्पादक संस्थांची मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे. हा वाण भारत सरकार कडून २०२१ मध्येच अधिसुचीत करण्यात आलेला असून या वाणाची लागवड मुख्यत्वे राज्याचा विदर्भ आणि मराठवाडा, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान आणि उत्तरप्रदेशच्या बुन्देलखंड या राज्यांमध्ये लागवडी करीता प्रसारित करण्यात आलेला आहे. या वाणाची सरासरी उत्पादकता हेक्टरी २८ ते ३० क्विंटल असून हा वाण ९४ ते ९६ दिवसात काढणीकरीता परिपक्व होतो. या वाणाच्या झाडाची उंची ५४ ते ६० से.मी. असून झाडाला ४५ ते ६० सरासरी शेंगा लागतात. शेंगातील दाण्याचे प्रमाण २.९ दाणे प्रति शेंग असून या वाणाच्या झाडाची पाने गोल अंडाकार आहेत. पिडीकेव्ही अंबाच्या फुलांचा रंग जांभळा असून १०० दाण्यांचे वजन ११.५ ते १२.५ ग्रॅम आहे. हा वाण मुळकुज/खोडकुज या रोगास मध्यम प्रतिकारक असून चक्रभुंगा व खोडमाशी या किडीस मध्यम प्रतिकारक आहे. या वाणातील तेलाचे प्रमाण १९.५ ते २०.५ टक्के असून प्रथिनांचे प्रमाण ४२ ते ४४ टक्के आहे. विद्यापीठाकडे खरीप-२०२२ करीता १२० क्विंटल पैदासकार बियाणे आणि ४० क्विंटल सत्यप्रत बियाणे उपलब्ध आहे.
४) पिडीकेव्ही पूर्वा (एएमएस-२०१४-१):- हा वाण सन २०२१ मध्ये विद्यापीठाने प्रसारित केलेला असून २०२१ मध्येच अधिसूचित झालेला आहे. हा वाण मुख्यत्वे: पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, छत्तीसगढ आणि ओरिसा या राज्यांमध्ये लागवडीकरीता प्रसारीत झालेला आहे. या वाणाची सरासरी उत्पादकता हेक्टरी २२ ते २६ क्विंटल असून हा वाण १०२ ते १०५ दिवसात काढणीकरीता तयार होतो. या वाणाच्या झाडाची उंची ५६ ते ६५ से.मी. असून या वाणाच्या एका झाडाला सरासरी ४२ ते ५५ शेंगा लागतात.
या वाणाच्या शेंगामध्ये २.७ दाणे प्रति शेंग या प्रमाणात असून या वाणाच्या झाडाची पाने गोल अंडाकार आहेत. फुलांचा रंग जांभला असून १०० दाण्यांचे वजन ९.५ ते १० ग्रॅम आहे. हा वाण पिवळा मोझाक या रोगास प्रतिकारक असून चक्रभूंगा आणि खोडमाशी या किडीस मध्यम प्रतिकारक आहे. या वाणामधील तेलाचे प्रमाण १८ ते २० टक्के असून प्रथिनांचे प्रमाण ४२ ते ४४ टक्के आहे. विद्यापीठाकडे खरीप-२०२२ करीता पिडीकेव्ही पूर्वा या वाणाचे ८ क्विंटल न्युक्लीयस बियाणे, २२ क्विंटल पैदासकार बियाणे आणि १५ क्विंटल सत्यप्रत बियाणे उपलब्ध आहे.
डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाकडून या निमित्ताने जाहीर आवाहन करण्यात येते की उपरोक्त वाणांचे बियाणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे शेतकरी बांधव, शेतकरी उत्पादक संस्था, शासनमान्य बियाणे संस्था व खाजगी बियाणे कंपन्या यांनी खरीप-२०२२ हंगामाकरीता उपलब्ध होणाऱ्या बियाण्याची येणाऱ्या मे-जून-२०२२ मध्ये लागवडीकरीता उचल करून घ्यावी.
बियाण्याच्या अधिक माहितीसाठी डॉ नितीन पतके उपसंचालक बियाणे यांच्याशी संपर्क साधावा
Share your comments