1. कृषीपीडिया

Seed Update : बियाण्यांची साठवणूक कशी करावी?

धान्य साठवणुकीत साधारणतः १०% धान्याचा नाश होतो. अशा प्रकारे आपल्या देशात अंदाजे ४५०० कोटी रुपयांचे तर महाराष्ट्रात ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या धान्याचा नाश होतो. यावरून काळजीपूर्वक साठवणुकीचे महत्त्व सहज लक्षात येते. पीक काढणीपासून ते परत पेरणीपर्यंत मधला काळ जवळजवळ पाच ते सात महिन्यांचा असतो.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Seed Update

Seed Update

डॉ. सुखदेव रणसिंग, डॉ. सूरज रणसिंग, जयंत नवले

आधुनिक शेती पद्धतीत शुद्ध व चांगले गुणधर्म असलेल्या बियाण्याचा वापर हे सर्वात स्वस्त असे भांडवल आहे. म्हणूनच अंकुरक्षम व अधिक जोम असलेल्या बियाण्याची पेरणीच्या वेळी सहज उपलब्धता हे अपेक्षित उत्पन्न मिळवण्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. यजुर्वेदासारख्या पुरातन साहित्यातसुद्धा बियाणे हे अंकुरक्षम असावे, असे चांगल्या बियाण्याचे महत्त्व सांगितले आहे. शुद्ध व चांगली गुणवत्ता असलेल्या बियाण्याचा वापर केल्याशिवाय शेतीत मशागत, खते, पाणी इ. रूपाने दिलेल्या भांडवलाचा पुरेपूर मोबदला मिळू शकणार नाही, याची जाणीव शेतकऱ्यांना झालेली आहे.

बहुतांश शेतकरी आता बीजोत्पादन करू लागले आहेत. बीजोत्पादन करताना विशेष काळजी घेऊन चांगल्या प्रकारचे व शुद्ध बियाणे तयार करतात. बीजोत्पादन करून निर्माण केलेले शुद्ध व गुणवत्ता असलेले बियाणे हे साठवणुकीत अधिक काळपर्यंत अंकुरक्षम ठेवणे महत्त्वाचे असते. त्यासाठी बी योग्य प्रकारे साठवणे हा सर्वात स्वस्त मार्ग आहे. खरे पाहता बियाण्याची योग्य प्रकारे साठवण करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे बियाण्यांची अंकुरक्षमता व जोम यात होणारी घट कमी करणे, हा होय, बियांच्या अंकुरणक्षमतेमध्ये होणारी घट ही त्याच्या साठवणूक प्रक्रियेत पूर्णतः थांबवता येत नाही की वाढवताही येत नाही. म्हणून होणारी घट ही कमीत कमी प्रमाणात कशी होईल, हे पाहणेच जास्त व्यवहार्य ठरते.

धान्य साठवणुकीत साधारणतः १०% धान्याचा नाश होतो. अशा प्रकारे आपल्या देशात अंदाजे ४५०० कोटी रुपयांचे तर महाराष्ट्रात ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या धान्याचा नाश होतो. यावरून काळजीपूर्वक साठवणुकीचे महत्त्व सहज लक्षात येते. पीक काढणीपासून ते परत पेरणीपर्यंत मधला काळ जवळजवळ पाच ते सात महिन्यांचा असतो. एका वर्षात त्याच पिकाचे जर दोन हंगाम घेतले, तर हा काळ एक किंवा दोन महिनेही असू शकतो. या काळात बियांची साठवण करावी लागते. तसेच जरुरीपेक्षा जास्त प्रमाणात तयार केलेल्या बियाण्यांची साठवण करावी लागते.

सर्वसाधारणपणे या प्रकारच्या साठवणुकीची आवश्यकता बीजोत्पादन करणाऱ्या संस्थांना किंवा संघटनांना भासते. यात बियाणे १२ ते १८ महिन्यांपर्यंत साठवावे लागते. मूलभूत बियाणे, जनुकीय प्रजाती, त्याचप्रमाणे बीज परीक्षण प्रयोगशाळेत चाचणी केलेले बियाण्यांचे नमुने इत्यादीची साठवण ही दीर्घ काळापर्यंत करावी लागते. अंकुरणक्षमता कमी न होता दीर्घकाळ साठवणूक करण्याच्या पद्धती अधिक खर्चिक असतात.

बियाणे पक्व झाल्याबरोबर अंकुरणक्षमता कमी व्हावयास सुरुवात होते, ती बियाण्याची पेरणी होईपर्यंत तशीच सुरू राहते. या काळात ह्या बियाणांना अनेक अवस्थांमधून जावे लागते. यात अ ) कापणीपूर्वी शेतात, ब) कापणी ते प्रक्रिया होईपर्यंत, क) प्रक्रिया झाल्यानंतर विक्री होईपर्यंत, ड) वाहतुकीत, इ) किरकोळ विक्रीच्या ठिकाणी, ई) शेतकऱ्यांच्या घरी. अशा प्रत्येक ठिकाणी बियाण्याची साठवण केली जाते व तेथील वातावरणाचा बियाण्याच्या अंकुरणक्षमतेवर परिणाम होत असतो. बियांच्या अंकुरणक्षमतेमध्ये नियमित परंतु हळूहळू घट होत असते. बियांची अंकुरणक्षमता व जोम यातील साठवणुकीच्या काळात होणारी घट याचा संबंध पाहिल्यास असे आढळते, की प्रथम बियांचा जोम कमी होतो व नंतर अंकुरणक्षमता कमी होते.

साठवणुकीत बियाण्याचे आयुष्यमान हे हवेतील आर्द्रता आणि तापमान या घटकांवर बरेचसे अवलंबून असते. हॅरिंग्टन नावाच्या शास्त्रज्ञाने १९५९मध्ये याचे महत्त्व ओळखून त्यांचे बियाण्यांच्या आयुष्यावर होणारे परिणाम दाखविण्यासाठी दोन साधे नियम दिले आहेत.
• बियाण्यातील ओलाव्याच्या प्रमाणात होणाऱ्या प्रत्येक एक टक्का वाढीमुळे बियाण्याचे आयुष्य निम्म्याने कमी होते. बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण अंदाजे ५- १४ टक्के दरम्यान असल्यास हा नियम लागू होतो.
• बियाणे साठवणुकीच्या तापमानात होणाऱ्या प्रत्येक ५ डिग्री सेल्सिअस वाढीमुळे बियाण्याचे आयुष्य निम्म्याने कमी होते. हा नियमसुद्धा तापमान ० ते ५० डिग्री सेल्सिअस दरम्यान असेल तेव्हाच लागू होतो..

वातावरणातील आर्द्रता व तापमान यांचे महत्त्व

साठवणुकीत बियाण्याची उगवण क्षमता व जोम यावर प्रामुख्याने बियाण्यातील ओलाव्याचे किंवा वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण, साठवणुकीच्या काळातील तापमान, साठवणुकीच्या काळातील वायू, . बियाण्याची भौतिक स्थिती, आनुवंशिकता, अतिसूक्ष्म जिवाणू व किडी आणि बियांची सुरुवातीची उगवण क्षमता व जोम याचा परिणाम होतो. यांपैकी बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण आणि बीज भांडारातील तापमान व वातावरणातील आर्द्रता यांचे महत्त्व अधिक आहे. वातावरणातील आर्द्रता जास्त असल्यास त्यात साठवलेल्या बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाणही वाढते. आर्द्रतेचे प्रमाण ० ते २५% दरम्यान असल्यास, बियाण्यातील ओलावा अधिक जलद प्रमाणात वाढतो. २५ ते ७०% दरम्यान मध्यम गतीने, तर ७० ते १००% दरम्यान पुन्हा जलद गतीने वाढतो. सर्वसाधारणपणे बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्यास ते बियाण्याच्या अंकुरणक्षमतेला हानिकारक असते. तसेच बियांची चांगल्या प्रकारे व अधिक काळपर्यंत साठवणूक करण्यासाठी थंड वातावरण अधिक उपयुक्त असते. अतिथंड (१५ डिग्री सेल्सिअसच्या खाली) व अतिउष्ण (४० डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त) तापमान बियाण्याला हानिकारक असते. ५ डिग्री सेल्सिअस ते पाण्याच्या गोठणबिंदू दरम्यान (४ डिग्री सेल्सिअस) तापमान साठवणुकीस फायद्याचे असते. साधारणपणे तापमानात जसजशी वाढ होत जाते, तसतशी बियाण्याच्या
आयुष्यमानात घट होत जाते.

जीवनासाठी प्राणवायू जरी आवश्यक असला तरी बियांची साठवणूक प्राणवायूविरहित जागेत सुरक्षितपणे करता येते. नत्रवायू हा इतर कुठल्याही वायूपेक्षा बियाण्यांचे साठवणुकीतील आयुष्यमान वाढविण्यात अग्रेसर ठरला आहे. त्याचप्रमाणे बियाण्यांची काढणी करताना व त्यावर प्रक्रिया करताना बियाण्यास पोहोचणारी इजा ही बहुतेक करून साठवणुकीच्या काळात उगवण शक्ती कमी करण्यास कारणीभूत होते. आनुवंशिकतासुद्धा बियांची साठवणूक शक्ती जास्त अथवा कमी असण्यासाठी कारणीभूत असते.

बुरशी व किडीमुळे होणारा उपद्रव

अतिसूक्ष्म जीवाणू, बुरशी व धान्य भांडारातील किडी यांच्या प्रादुर्भावाने बियाण्यांची उगवण शक्ती व जोम यावर अनिष्ट परिणाम होतो. वेगवेगळ्या बुरशींच्या प्रकारांपैकी ॲस्परजीलस व पेनिसिलीयम या प्रकारच्या बुरशीच्या निरनिराळ्या जाती, मुख्यतः भांडारात बियाण्यांना जास्त अपाय पोहोचवतात. अर्थात त्यांचा उपसर्ग किंवा प्रादुर्भाव वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यावरच होतो. या बुरशीमुळे बियाण्यांची उगवण शक्ती कमी होणे, बियांच्या अथवा त्यांच्या अंकुराच्या रंगात बदल होणे, बियांत विषारी बुरशीजन्य द्रव्ये तयार होणे, त्यांना कुबट वास येणे आणि त्या केकसारख्या एकमेकांना घट्ट चिकटून बसणे असे नुकसान होते. या प्रकारच्या नुकसानीमुळे बिया कुजतात.

किडींच्या प्रादुर्भावामुळे बियांची उगवण शक्ती अनेक मार्गांनी कमी होते. भांडारात किडींची संख्या जास्त झाली तर भांडार व त्यातील वातावरण तापमान, आर्द्रता व कार्बन डाय ऑक्साईड वायूचे प्रमाण वाढल्याने निरुपयोगी होते. अळ्या अथवा किडी मुख्यतः बियांतील अंकुर खातात. किडीमुळे बियांमध्ये बुरशीचा सुद्धा प्रादुर्भाव होतो. कित्येक वेळा किडी बियांत कोष अथवा जाळ्या तयार करतात. त्यामुळे बियाणे स्वच्छ करताना अडथळा येतो व बरेचसे बियाणे वायाही जाते. त्याचप्रमाणे किडीच्या नायनाटासाठी वापरलेल्या औषधांचा बियाण्यांच्या उगवण शक्तीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो.

रासायनिक औषधांचा वापर

याण्याचे भांडारात होणारे टाळण्यासाठी कीटकनाशके व बुरशीनाशकांचा उपयोग अधिक प्रभावशाली होऊ शकतो. बियाणे प्रक्रिया केंद्रात साफ केल्यानंतर त्यास थायरम, कॅप्टन, विटावेक्स, बेनलेट, सेरेसान, मोनोसान, अग्रॉसॉन, प्लॅटवॅक्स आदी पारायुक्त अथवा ताम्रयुक्त बुरशीनाशकांपैकी पिकानुसार योग्य ते बुरशीनाशक शिफारस केलेल्या प्रमाणात चोळावे. त्यामुळे भांडारात असे बियाणे पुढील पेरणी हंगामापर्यंत सुरक्षित राहू शकते.

बियाणे भांडारात ठेवण्यापूर्वी भांडार काळजीपूर्वक स्वच्छ करून घेणे अधिक महत्त्वाचे असते. यासाठी बीजभांडारात ०.५% मेलॅथिऑनची भिंतीवर, छतावर आणि बी ठेवण्यासाठी लागेल तेवढ्या जमिनीवर फवारणी करावी किंवा धुरीजन्य कीटकनाशके वापरावी.

बियाणे भरण्यासाठी वापरलेल्या गोण्या अथवा पोती ही सुद्धा कडक उन्हात वाळवून. कीडनाशकांची प्रक्रिया करूनच वापरावे. परंतु बी भरण्यासाठी शक्यतो नव्या गोण्या वापरणेच योग्य ठरते. ते शक्य नसल्यास ०.१४ मेलॅथिऑन, सायपरमेथ्रीन, फेनव्हलरेटच्या द्रावणात मिनिटे बुडवून सावलीत वाळवून वापरावीत. तसेच मेलॅथिऑन कीटकनाशकाचा फवारा ०.१% प्रमाणात रिकाम्या भांडारात व पोत्यावर मारावा किंवा स्वच्छ केलेल्या गोण्यांवर बाहेरील बाजूने पायरेथ्रम (०.०६% भुकटी) प्रति चौरस मीटरला २५ ग्रॅमप्रमाणे धुरळावी किंवा डी.डी. व्ही. पी. नामक धुरीजन्य कीटकनाशकाची प्रक्रिया करूनच ह्या गोणी वापराव्यात.

भांडारात बियाणे साठवल्यानंतर किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नियमितपणे ठरावीक काळानंतर कीटकनाशकाची फवारणी मोकळ्या जागेत करणे आवश्यक असते. बियाणे साठवलेल्या पोत्यांमध्ये अथवा वर कीड आढळल्यास धुरी देणे आवश्यक असते. त्यासाठी सेल्फॉस किंवा अमिफॉस गोळ्या किंवा इ.डी. बी. द्रावण वापरतात. यासाठी बीजभांडार हवाबंद असणे फार आवश्यक असते. हवाबंद भांडारात ५० पोत्यांत मावेल त्यापेक्षा जास्त बियाणे नसल्यास ई.डी.बी. हे धुरीजन्य कीटकनाशक वापरावे. त्यापेक्षा जास्त बियाणे असल्यास ॲल्युमिनियम फॉस्फाईड वापरावे.

एक घनमीटर (सुमारे ५ पोती) जागेतील बियांसाठी ५० मिलीलिटर इ.डी.बी. पुरेसे असते. हायड्रोजन फॉस्फाईड या गोळ्या वापरावयाच्या असल्यास ३ ग्रॅम वजनाची एक गोळी १० पोत्यांना पुरते. याशिवाय कार्बन डाय सल्फाईड, ई.डी. सी. टी. मिश्रण, मिथाईल ब्रोमाईड ड्युरोफूम ही धुरीजन्य कीटकनाशके वापरावीत. मात्र ही कीटकनाशके तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच वापरावीत. कमी प्रमाणावर धुरी देण्यासाठी पोत्याच्या ढिगाऱ्यात या गोळ्या ठेवून संपूर्ण दग ताडपत्रीने अथवा त्याच्यासारख्या जाड कापडाने सर्व बाजूंनी झाकावा. अशा परिस्थितीत ३-४ दिवस पोती झाकून टाकल्यास किडींचा बंदोवान होतो. रासायनिक कीटकनाशकांची बीजप्रक्रिय केलेले बियाणे खाण्यासाठी लगेच वापरू नये. धुरीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १५ दिवसांच्या अंतराने आपण खाण्यासाठीदेखील करू शकतो.

इतर धुरीजन्य कीटकनाशके

एच.सी.एन. पावडर प्रकारातील हे धुरोक्य कीटकनाशक आहे. हवेतील आर्द्रतेबरोबर संयोग झाल्यावर यातून वायू बाहेर पडून कीटकांचा नाश करते. हे कोरड्या पदार्थासाठी किंवा धान्यासाठी वापरतात. फळे किंवा भाजीपाला साठवणुकीसाठी याचा वापर करू नये.

लेखक - डॉ. सुखदेव रणसिंग, कृषि संशोधन केंद्र, चास
डॉ. सूरज रणसिंग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
जयंत नवले, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

English Summary: Seed Update How to store seeds Published on: 22 January 2024, 01:58 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters