भाजीपाला लागवडीमध्ये रासायनिक खतांचा, कीटकनाशक आणि रोगनाशक औषधांचा वापर दिवसेंदिवस अतिशय वाढत आहे. त्यांच्या अतिवापरामुळे निसर्गातील मूलभूत साधन संपत्तीच्या घटकांवर तसेच उत्पादित मालाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे. विशेष म्हणजे रोग नाशके व कीडनाशके यांच्या पिकांवरील अतिवापरामुळे मानवी जीवनावर त्यांचे विपरीत परिणाम होत असतात.
भाजीपाला हा नाशवंत असल्यामुळे जास्त काळ साठविता येत नाही. म्हणून त्यांचा वापर त्वरित करावा लागतो. कीडनाशके वापरल्यानंतर ८ ते १० दिवस भाजीपाल्याची विक्रीसाठी काढणी करू नये, अशा सूचना दिल्या असल्या तरी त्या कितपत पाळल्या जातात, हे सांगता येत नाही. सेंद्रिय खतांचा आणि जैविक तथा वनस्पतिजन्य रोग-कीडनाशक औषधांचा वापर करून केलेल्या शेती पद्धतीला सेंद्रिय शेती असे म्हणतात. सेंद्रिय शेती पद्धतीत खालील बाबींवर विशेष लक्ष दिले जाते.
- कृषी किंवा तत्सम उत्पादनावर आधारित उद्योगांमधून निर्माण झालेल्या सेंद्रिय पदार्थांच्या अधिकाधिक व कार्यक्षम पद्धतीने त्यापासून सेंद्रिय खत तयार करून वापर करणे.
- शेतातील काडीकचरा, धसकटे, तण, जनावरांचे मलमूत्र, वनस्पती अवशेष इत्यादी कुजवून किंवा त्यांवर प्रक्रिया करून त्यापासून कंपोस्ट खत, शेणखत, गांडूळ खत निर्माण करून रासायनिक खतांऐवजी किंवा त्यांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा अधिक वापर करणे.
- डाळवर्गीय पिकांचा वापर करून हिरवळीच्या खताचा वापरही सेंद्रिय खत म्हणून वापर करणे.
- सेंद्रिय खतांमुळे पिकांना लागणाऱ्या पोषक अन्नद्रव्यांसोबतच जमिनीचा कस व जलधारणा शक्ती वाढते. जमीन भुसभुशीत राहून हवाही खेळती राहते. शिवाय या सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनीत उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंची वाढ होण्यासाठी मदत होते.
- जिवाणु संवर्धके : एकदल पिकांना अॅझोटोबॅक्टर जिवाणु खत आणि कडधान्य पिकांसाठी रायझोबियम जिवाणु खत बियाण्याला लावतात. हे जिवाणू जमिनीत हवेतील नत्र शोषून घेऊन साठवतात व नंतर तो पिकांना उपलब्ध करून देतात. स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणु संवर्धकाची (फॉस्फेट सोल्यूबलायझिंग बॅक्टेरिया) बियाण्यावर प्रक्रिया करून किंवा वनस्पतींच्या मुळांशी ते शेणखतामध्ये मिसळून देतात. हे जिवाणू जमिनीतील स्थिर झालेल्या विद्राव्य स्फुरदाचे विघटन करून तो विरघळवून पिकास उपलब्ध करून देतात.
- मित्र कीटकांचा किंवा जिवाणूंचा वापर : परोपजीवी किंवा परभक्षक किडी - या किडी पिकांचे नुकसान करणाऱ्या किडींवर आपली उपजीविका करतात. या जैविक घटकांचा वापर करून काही भयानक किडींचा बंदोबस्त करता येतो. उदाहरणार्थ, क्रायसोपा आणि लेडीबर्ड बिटल ही कीड मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, पतंगवर्गीय कीटकांच्या अंडी आणि अळ्यांचा नाश करतात. ट्रायकोग्रामा हे परोपजीवी कीटक पतंगवर्गीय किडींच्या अंड्यांमध्ये अंडी घालून त्यांचा नाश करतात. हिरव्या अळीसाठी याचा व्यापारी तत्त्वावर वापर होत आहे. घाटे अळी विषाणू एच.एन.पी.व्ही. तर काळ्या अळीच्या नियंत्रणास एस.एन.पी.व्ही. वापरतात.
- ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर पिकांच्या मुळावरील बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी केला जात आहे. याशिवाय निंबोळी अर्काचाही वापर कीड-रोग नियंत्रणासाठी करतात. सध्या जिवाणू औषध बॅसीलस थ्युरिंजिएनसीस या जिवाणूंचा फवारा बोंड अळी, भेंडी, टोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या अळी (लेपिडोप्टेरा) या कीटकांच्या नियंत्रणासाठी करतात.
- शेतात कमीत कमी काडीकचरा, तण ठेवल्यामुळे किडींची संख्या कमी करण्यास मदत होते.
- शक्य त्या पिकांमध्ये शिफारस केलेल्या रोग-कीड प्रतिबंधक जातींचा वापर केल्यास कीड व रोग यावर नियंत्रण ठेवता येते.
रासायनिक खते, कीटकनाशके आणि रोग नाशके यांचा वापर कमी करण्यासाठी हे सर्व सेंद्रिय शेतीचे घटक वापरणे आवश्यक आहे. जेणेकरून रासायनिक पदार्थांचे वातावरणावर आणि मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम टाळता येतील.
लेखक:-
1) ज्ञानेश्वर सुरेशराव रावणकार (पी.एच.डी विद्यार्थी)
भाजीपाला शास्त्र विभाग,
डॉ पं.दे.कृ.वि. अकोला
2) प्रा, शुभम विजय खंडेझोड (एम.एस.सी. हॉर्टीकल्चर)
सेंद्रिय उत्पादक (प्रशिक्षक) PMKVY
Share your comments