भुईमूग हे पीक तेलबिया पिकांमधील मुख्य पीक आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने नाशिक जिल्हयाच्या मालेगाव तालुक्याच्या बहुतेक भागात भुईमूग पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते होते. परंतु कालांतराने घटती मागणी, मजुरांचा पुरवठा, भावातील अनियमितता, उत्पादन व उत्पादन खर्चातील मोठी तफावत या अशा बहुसंख्य कारणांमुळे भुईमूग लागवड क्षेत्रात बरीच घट झाली. पण आत्ता तेलाच्या वाढत्या मागणीमुळे भुईमूगच्या लागवड क्षेत्रात वाढ करणे गरजेचे आहे. शास्त्रशुद्ध नियोजन केले तर भुईमूगचे विक्रमी उत्पादन घेता येते. भारतात हे पीक खरीप, रब्बी व उन्हाळी या तीनही हंगामात घेता येते.
लागवड तंत्रज्ञान -
जमीन - भुईमूगच्या लागवडीसाठी मध्यम पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन व वाळू सेंद्रीय पदार्थ मिश्रित जमीन योग्य असते. या प्रकारच्या जमिनी नेहमी भुसभुशीत राहतात त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते. त्यामुळे मुळे खोल जाण्यास मदत होते, त्यामुळे आऱ्या चांगल्या पोसल्या जातात व शेंगा पोसण्यास मदत होते.
हवामान
पीकवाढीच्या दृष्टीने भरपूर सूर्यप्रकाश व उबदार हवामानाची आवश्यकता असते. हे पीक उष्ण व समशीतोष्ण कटिबंधात चांगल्या प्रकारे येते.
पूर्वमशागत - या पिकासाठी मऊ आणि भुसभुशीत जमीन उपयुक्त असते त्यामुळे भुईमुगाच्या मुळे व त्यावरील गाठ पोसण्यास मदत होते. त्यासाठी जमिनीची मशागत होणे फार महत्वाचे आहे. त्यासाठी जमिनीची चांगल्या प्रकारे नांगरणी करून घ्यावी कुळवाच्या 3 पाळ्या करून घ्याव्यात. 7 टन शेणखत शेवटच्या कुलावण्याआधी शेतात चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावीत.
पेरणी
खरिपात जर पेरणी करायची असेल तर जून किंवा जुलै महिन्यात वेळेवर करावी. जर उन्हाळ्यात लागवड करायची असेल तर 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी ह्या काळातच करावी कारण या कालावधीत थंडीचे प्रमाण कमी असल्यामुळे उगवण चांगल्या पद्धतीने होते.
पेरणी करताना प्रती किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरम ने बीजप्रक्रिया करून घ्यावी. पेरणीच्या वेळी बारीक बियाणे बाजूला काढून घ्यावे. पेरणी करताना साधारणपणे 5 सेमी खोलवर करावी.
लागवड तंत्र - सपाट वाफा पद्धत -पेरणी जर सपाट वाफ्यावर करायची असेल तर 30 सेमी अंतर असलेले पेरणी यंत्र वापरावे किंवा टोकन पद्धतीने लावणी करावी. पेरणीसाठी दोन ओळींतील अंतर 30 सेमी तर दोन रोपांतील अंतर 10 सेमी ठेवावे व लगेचच पाणी द्यावे (आवश्यकता असेल तर ). टोकन पद्धतीने पेरणी केली तर 25 टक्के बियाण्याची बचत होते.
रुंद वाफा पद्धत - गादी वाफ्यावरील लागवड ही बऱ्याच अंशी फायदेशीर आहे. गादी वाफ्यावरील जमीन भसभुसीत राहत असल्यामुळे हवा खेळती राहते, त्यामुळे पिकांची मुळांची वाढ चांगल्याप्रकारे होते त्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते. या पद्धतीत पाटाने किंवा तुषार सिंचनेने सुलभरित्या पाणी देता येते. संतुलित खत व्यवस्थापन केल्याने पिकाला अन्नद्रव्याची कमतरता येत नाही. त्यामुळे योग्यप्रकारे पिकाची वाढ होऊन उत्पादनात वाढ होते.
रासायनिक खते - पेरणीच्या वेळेस 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद प्रती हेक्टरी द्यावे. पिकास नत्र व स्फुरद या अन्नद्रव्याची आवश्यकता असते. त्याचबरोबर सल्फर व कॅलसिम या दुय्यम अन्नद्रव्याची आवश्यकता असते म्हणुन पेरणी करताना या अन्नद्रव्याची उपलब्धता हेक्टरी 200 किलो जिप्सम टाकून करावी. तसेच 20 किलो जस्त व 5किलो बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा प्रती हेक्टरी करावा. त्यामुळे शेंगा लागण्याचे प्रमाण वाढून उत्पादनात वाढ होते.
सुधारित जाती - फुले प्रगती (जे. एल. -24), टीएजी -24, फुले व्यास (जे. एल. -220)कोयना (बी -95)इत्यादी जाती लागवडीसाठी उपयुक्त आहेत.
Share your comments