भारताचा गव्हाच्या प्रतिहेक्टर उत्पादकतेत चीन नंतर जगात दुसरा क्रमांक लागत असला तरी पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनचे गव्हाचे लागवड क्षेत्र भारताच्या लागवड क्षेत्राच्या केवळ ८२ टक्के एवढेच आहे.
भारताची गव्हाची सरासरी उत्पादकता (३१.२० क्विं. प्रतिहेक्टर) जगाच्या उत्पादकतेएवढी (३१.६० क्विं. प्रतिहेक्टर) आहे.
जर्मनी, इंग्लंड, डेन्मार्क आणि फ्रान्स या देशांची गव्हाची सरासरी उत्पादकता भारताच्या सरासरी उत्पादकतेच्या जवळपास दुप्पट किंवा त्याहून जास्त आहे.
भारतातील पंजाब व हरियाना राज्यांची गव्हाची सरासरी उप्तादकता ४५ क्विं. प्रतिहेक्टरच्या आसपास आहे.
ठळक बाबी
देशाच्या सरासरी उत्पादकतेच्या निम्म्याहून कमी उत्पादकता महाराष्ट्र राज्याची आहे.
पंजाब व हरियाना या राज्यांची गव्हाची उत्पादकता महाराष्ट्रापेक्षा तिपटीने जास्त आहे.
१) जमीन :- पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन आवश्यक असते.
२) हवामान :- गहू पिकाला थंड कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाशित हवामान चांगले मानवते. पिकाच्या वाढीसाठी ७ ते २१ डिग्री सेल्सियस तापमानाची आवश्यकता असते. दाणे भरण्याच्या वेळी २५ डिग्री सें. तापमान असल्यास दाण्याची वाढ चांगली होऊन त्याचे वजन वाढते.
३) पूर्वमशागत :- खरीप पीक काढणीनंतर लोखंडी नांगराने जमिनीची १५ ते २० सें.मी. खोलवर नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या ३ ते ४ पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुसीत करावी. शेवटच्या कुळवणी आधी हेक्टरी २५ ते ३० बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरून टाकावे. पूर्वीच्या पिकांच धसकटे व अन्य काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे.
४) पेरणीची वेळ :- जिरायत गव्हाची पेरणी आक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. बागायती वेळेवर पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. बागायत उशिरा पेरणी १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरच्या दरम्यान करावी. बागायती गव्हाची पेरणी १९ नोव्हेंबर नंतर उशिरा केल्यास प्रत्येक उशिराच्या पंधरवड्यात गव्हाचे उत्पादन प्रत्येकी हेक्टरी २.५ क्विंटलने घटते.
५) पेरणी पद्धत :- गव्हाच्या जिरायती आणि बागायती वेळेवर पेरणीसाठी दोन ओळींत २२.५ सें.मी. आणि बागायती उशिरा पेरणीसाठी दोन ओळींत १८ सेंमी. अंतर ठेवून पाभरीने पेरणी करावी. शक्यतो पेरणी दक्षिणोत्तर तसेच ५ ते ६ सेंमी. खोल करावी.
६) हेक्टरी बियाणे :-
- a) जिरायत पेरणी :- ७५ ते १०० किलो
- b) बागायत वेळेवर पेरणी :- १०० किलो
- c) बागायत उशिरा पेरणी :- १२५ ते १५० किलो
७) बीजप्रक्रिया :- पेरणीपूर्वी बियाणास कॅप्टन किंवा थायरम या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी, तसेच प्रति १० किलो बियाण्यासाठी ॲझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू प्रत्येकी २५० ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया करावी.
८) खत व्यवस्थापन :-
अ) जिरायत पेरणी :- ४० किलो नत्र व २० किलो स्फुरद प्रति हेक्टरी पेरणीवेळी द्यावे.
ब) बागायत वेळेवर पेरणी :- ६० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश प्रतिहेक्टरी पेरणीच्या वेळी व ६० कि. नत्र प्रतिहेक्टरी पेरणीनंतर तीन आठवड्यांनी द्यावे.
क) बागायत उशिरा पेरणी :- प्रत्येकी ४० किलो नत्र स्फुरद व पालाश प्रतिहेक्टरी पेरणीच्या वेळी व ४० किलो नत्र प्रतिहेक्टरी पेरणीनंतर तीन आठवड्यांनी द्यावे.
९) पाणी व्यवस्थापन :-
अ) मध्यम ते भारी जमिनीत २१ दिवसांच्या अंतराने गहू पिकास खालील संवेदनक्षम अवस्थेत पाणी द्यावे. (दिवस पेरणीनंतरचे)
- A) मुकुटमुळे फुटण्याची अवस्था :- १८-२१ दिवसांनी
- B) कांडी धरण्याची अवस्था :- ४० ते ४२ दिवसांनी
- C) फुलोरा येण्याची अवस्था :- ६५-७० दिवसांनी
- D) दाणे भरण्याची अवस्था :- ८० ते ८५ दिवसांनी
ब) अपुऱ्या पाणीपुरवठा परिस्थितीतील सिंचन :-
- A) एकच पाणी देणे शक्य असल्यास ते पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी द्यावे.
- B) दोन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी व दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.
- C) तीन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी, दुसरे पाणी ४० ते ४२ दिवसांनी व तिसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.
१०) आंतरमशागत :-
- a) जरूरीप्रमाणे एक किंवा दोन वेळा खुरपणी करावी.
- b) गव्हामधील रूंद पानाच्या तणांच्या नियंत्रणासाठी तणे दोन ते तीन पानांच्या अवस्थेत आल्यावर मेटसल्फ्युरॉन मिथाईल (२० टक्के) हेक्टरी २० ग्रॅम प्रति ८०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
११) पीक संरक्षण :-
गहू पिकावर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव आढळतो. काही प्रमुख किडी अशा...
- A) मावा :- ही कीड ढगाळ हवामान रात्रीच्या आणि दिवसाच्या तापमानातील मोठा फरकामुळे गहू पिकावर प्रादुर्भाव करते. दिवसाचे तापमान २८ ते ३१ अंश सेल्सिअस आणि रात्रीचे तापमान ८-१० अंश से. हे या किडीच्या वाढीसाठी पोषक असते.
ओळख :- ही कीड साधारणपणे दोन ते तीन मि.मी. लांबीची, फिकट पिवळसर- काळपट, हिरवट रंगाची असते. या किडीच्या शरीराच्या पाठीमागच्या बाजूस दोन नलिकांसारखे अवयव असतात.
प्रादुर्भाव :- या किडीचे पिल्ले व प्रौढ पानांच्या पाठीमागील बाजूस, कोवळे शेंडे तसेच खोडावर समूहाने एकवटलेले दिसून येतात व त्यातील पेशीरस शोषून घेतात. त्यामुळे गहू पिकाचे पाने पिवळसर, रोगट होतात; तसेच ही कीड मधाप्रमाणे गोड चिकट द्रव विष्ठेद्वारे पानांवर, खोडावर व गव्हाच्या कोवळ्या शेंड्यांवर टाकते. त्यावर काळी बुरशी वाढून पानाची प्रकाशसंश्लेषण क्रिया बंद होते. परिणामी, गव्हाचे रोपे किंवा झाडे मरतात आणि पीक उत्पादनात मोठी घट येते.
उपाययोजना :- मावा किडीने आर्थिक नुकसानीची पातळी म्हणजे साधारणपणे दहा मावा कीड (पिल्ले किंवा प्रौढ) प्रति झाड किंवा फुटवा गाठल्यानंतरच कीड नियंत्रणासाठीच्या उपाययोजना हाती घ्याव्यात.
नियंत्रण :- थायामिथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) एक ग्रॅम किंवा ॲसिटामिप्रीड पाच ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे.
जैविक उपायांमध्ये व्हर्टिसिलियम लेकॅनी किंवा मेटारायझियम ॲनिसोप्ली प्रत्येकी ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे.
- B) तुडतुडे :- या किडीचा प्रादुर्भाव गहू पिकावर यापूर्वी दिसून येत नव्हता; परंतु आता रोपावस्थेपासून वाढीच्या अवस्थेदरम्यान काही प्रमाणात तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. तुडतुडे हे कीटक तीन ते चार मि.मी. लांब, पाचरीच्या आकाराचे हिरवट- राखाडी रंगाचे असतात आणि हे गव्हाच्या पानांवर दोन्ही बाजूंस तिरकस चालताना आढळून येतात.
प्रादुर्भाव :- तुडतुडे किडीचे पिल्ले आणि प्रौढ पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पानांचे शेंडे पिवळे पडतात व रोपाची वाढ खुंटते.
नियंत्रण :- डायमिथोएट (३० ईसी) १५ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे. पिकावर मावा आणि तुडतुडे एकत्रितपणे आढळून आल्यास मावा किडीच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या उपायांचा वापर करावा. त्यामुळे तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी वेगळी उपाययोजना करण्याची गरज नाही.
- C) वाळवी :- ही कीड फक्त गहू पिकावरच येते असे नसून, ती शेतामध्ये आढळून येते आणि या किडीच्या नियंत्रणासाठी शेतातील आणि बांधावरील वाळवीचे वारुळे शोधून त्यातील राणीसह नष्ट करावीत.
- D) कोळी :- पाण्याची कमतरता, गहू वाढीच्या अवस्थेत सरासरीपेक्षा जास्तीचे तापमान आणि ढगाळ हवामानामुळे गहू पिकावर कोळी या किडीचा प्रादुर्भाव होतो.
ओळख :- ही कीड गव्हाच्या रव्याच्या कणाएवढी लांब वर्तुळाकार, लाल-पिवळसर, पांढरट तपकिरी रंगाची असून ती पानांच्या पाठीमागच्या बाजूस राहून पानांतील पेशीरस शोषण करते. साधारणपणे इतर पिकांत कोळी ही कीड पानांच्या पाठीमागच्या बाजूस बारीक तंतूंची जाळी तयार करते; मात्र गहू पिकावरील कोळी कीड अशा प्रकारची जाळी तयार करत नाही.
नियंत्रण :- या किडीच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे गंधक (८० डब्ल्यूपी) २० ग्रॅम किंवा डायकोफॉल १० मि.लि. किंवा डायमिथोएट १५ मि.लि. किंवा ॲबामेक्टिन तीन मि.लि. प्रति १० लिटर पाण्यातून १० ते १२ दिवसांच्या अंतराने किमान दोन वेळा आलटून पालटून फवारावे.
- E) मावा किडीचा प्रादुर्भाव लक्षात घ्या :-
अनेक वेळा शेतकरी मावा किडीच्या विष्ठेद्वारे पानांवर, खोडावर व गव्हाच्या कोवळ्या शेंड्यांवर टाकल्या जाणाऱ्या चिकट द्रवाच्या स्वरूपातील काळ्या बुरशीला तांबेरा समजून तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी सुचविलेल्या उपायांचा अवलंब करतात. असे केल्याने मावा किडीचे नियंत्रण होत नाही. परिणामी, गहू पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
माव्याचा प्रादुर्भाव झाला आहे हे ओळखण्यासाठी चिकट द्रवाच्या स्वरूपातील काळ्या बुरशीच्या ठिकाणी बारीक काठीने किंवा गव्हाच्या पानाच्या साहाय्याने स्पर्श करावा. त्यातून माव्याची हालचाल होताना सहज दिसते. त्यामुळे मावा किंवा तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव ओळखता येतो.
- F) गव्हावरील तांबेऱ्याचे प्रकार आणि नियंत्रण :-
विविध भागांत तापमानाच्या अनुकूलतेनुसार गव्हावरील तांबेऱ्याचे प्रकार आढळतात. महाराष्ट्रात व दक्षिण मध्य भारतात खोडावरील काळा तांबेरा व पानांवरील नारिंगी तांबेरा हे दोनच प्रकार आढळून येतात. उत्तर भारत व दक्षिण भारतातील निलगिरी पर्वत परिसरात पिवळा तांबेरा दिसून येतो.
- a) खोडावरील काळा तांबेरा :-
प्रादुर्भाव आणि लक्षणे :- हा रोग पीक ओंबीच्या अवस्थेत असताना दिसतो. गव्हाचे खोड, पानांचे देठ, पाने, ओंबी, कुसळे इत्यादी सर्वच भागांवर या रोगाची लक्षणे दिसतात. तपकिरी (तपकिरी अंधूक लाल) रंगाच्या पुळ्या उठणे हे या रोगाचे प्रमुख लक्षण आहे. अशा प्रकारे असंख्य पुळ्या खोड व पानभर दिसतात. पुळ्यांच्या संख्येत वाढ होते, तेव्हा त्या एकमेकांत मिसळतात. खोडावरील व पानाचा पापुद्रा फाडून बाहेर आलेले हे फोड म्हणजेच या बुरशीचे बीजाणू असतात. हाताचे बोट यावरून अलगद फिरवल्यास तपकिरी भुकटी बोटास लागते. जसजसे तापमान वाढत जाते, तसतसा खोडावरील काळा तांबेरा वाढत जातो. तांबेरावाढीसाठी योग्य तापमान १५ अंश ते ३५ अंश से. आवश्यक असते, तसेच आर्द्रताही पुरेशी लागते.
पिकांची वाढ पूर्णावस्थेकडे जाताना हवेतील तापमान जसे वाढत जाते, तसतसे या पुळ्यांचे रूपांतर काळ्या रंगात होते. या पुळ्या प्रामुख्याने खोडावर आढळतात, म्हणून याला खोडावरील काळा तांबेरा असे म्हणतात.
- b) पानांवरील नारिंगी तांबेरा :-
प्रादुर्भाव आणि लक्षणे :- गव्हाची पाने व खोडावरील देठांवर नारंगी रंगाच्या, गोलाकार व आकाराने लहान पुळ्या दिसून येतात. या पुळ्या सुरवातीला पानाच्या वरच्या पृष्ठभागावर दिसून येतात. त्यानंतर दोन्ही भागांवर ही लक्षणे दिसतात. रोगग्रस्त पानांवरून हलके बोट फिरविल्यास नारिंगी रंगाची भुकटी बोटास लागते. या तांबेरावाढीस १५ अंश सेल्सिअस ते २५ अंश सेल्सिअस इतके तापमान आवश्यक असते.
- c) पिवळा तांबेरा :-
पिवळा तांबेरा हा महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश तसेच कर्नाटक राज्यात आढळून येत नाही. या तांबेऱ्यास भरपूर प्रमाणात थंड हवामानाची गरज असते.
- d) काळा व नारिंगी तांबेरा रोगाचा प्रसार :-
गहू पिकावरील तांबेरा रोगाची बुरशी फक्त गव्हाच्या जिवंत पिकावरच आपले अस्तित्व टिकवू शकते. ज्या वेळेस मैदानी प्रदेशातील गव्हाची काढणी संपते, त्या वेळेस या बुरशीचे बीजाणू नाश पावतात. गव्हावरील तांबेऱ्याची बुरशी ही दक्षिण भारतातील तमिळनाडू राज्यातील निलगिरी व पलणी टेकड्यांवर वर्षभर असते. तेथील शेतकऱ्यांनी लावलेल्या उन्हाळी किंवा गैरहंगामी गहू पिकावर किंवा आपोआप उगविलेल्या गव्हावर ही बुरशी वर्षभर जिवंत असते. नोव्हेंबर महिन्यानंतर दक्षिण समुद्रात होणाऱ्या वादळी वाऱ्यांमार्फत या बुरशीचे जीवाणू निलगिरी व पलणी टेकड्यांवरून प्रवास करतात. वादळी पाऊस जेथे होईल, त्या पावसाबरोबर हे बीजाणू हवेमार्फत १८०० किलोमीटर अंतरापर्यंत वाहून नेले जातात. जर याच वेळेस मैदानी प्रदेशात गहू पिकाची लागवड असेल, तर अनुकूल हवामानात ते गहू पिकावर रुजतात. वाऱ्यांमार्फत या रोगाचा फैलाव पुन्हा निरोगी गहू पिकाच्या क्षेत्राकडे होत राहतो.
नियंत्रणासाठी उपाय :-
रोगाचा प्रादुर्भाव होताच २०० मि.लि. प्रोपिकोनॅझोल प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी. किंवा दोन ग्रॅम मॅन्कोझेब किंवा दोन ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तांबेरा रोगास बळी न पडणाऱ्या किंवा तांबेरा प्रतिकारक्षम जातींची शिफारशीनुसार निवड करावी.
रासायनिक खतांची संतुलित मात्रा घ्यावी. नत्राचा शिफारशीपेक्षा अधिक वापर केल्यास गव्हाचे पीक तांबेरा रोगास जास्त प्रमाणात बळी पडते.
भारी जमिनीत पिकास पाणी देताना पाणी जरुरीपुरते व बेताचे द्यावे.
साधारणपणे मध्यम ते भारी जमिनीत १८ ते २१ दिवसांच्या अंतराने व हलक्या जमिनीत १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या एकूण तीन ते चार पाळ्या द्याव्यात. अति पाणी दिल्याने त्या शेतातील हवामान जास्त दमट होऊन तांबेरा रोगाच्या फैलावास मदत होते.
पूर्वी जिरायती क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या, उंच वाढणाऱ्या बन्सी वा बक्षी गव्हाच्या जातींवर खोडावरील काळा तांबेरा मोठ्या प्रमाणात येत असे; मात्र सध्या गहू पीक हे बहुतांशी बागायत क्षेत्रात घेतले जाते. तसेच, बुटक्या सरबती जातीही विकसित करण्यात आल्या असल्याने खोडावरील काळा तांबेरा आता क्वचितच आढळतो.
सध्या लागवड करण्यात येणाऱ्या काही जातींत पानांवरील नारिंगी तांबेऱ्याचा प्रादुर्भाव होताना दिसून येतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आणि काही संशोधन संस्थांनी अलीकडे विकसित केलेल्या गव्हाच्या जाती तांबेरा प्रतिकारक आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले पंचवटी, गोदावरी, त्र्यंबक, एनआयएडब्ल्यू- ३४, तपोवन किंवा नेत्रावती हे सर्व वाण तांबेरा प्रतिकारक आहेत.
एक वेळा तांबेरा प्रतिबंधक जातीची लागवड केल्यानंतर त्यापासून मिळणाऱ्या गव्हाचा वापर शेतकरी पुढील वर्षी बियाणे म्हणून करू शकतात. कारण गव्हामध्ये परस्पर संकर नसतो किंवा हे पीक स्वपरागीकरण (सेल्फ पॉलिनेटेड) करणारे आहे.
तांबेरा रोगास प्रतिकारक असणाऱ्या जातींची उत्पादन क्षमता जास्त असते. या जाती खतांच्या वाढीव मात्रांना चांगला प्रतिसाद देतात, तसेच त्या बुटक्या असल्याने वाऱ्याने लोळतही नाहीत.
गव्हावरील तांबेरा रोगाचे प्रकार :-
१) खोडावरील काळा तांबेरा (पुक्सीनिया ग्रॅमिनीज ट्रीटिसी),
२) पानांवरील नारिंगी तांबेरा (पुक्सीनिया रेकांडिटा),
३) पानांवरील रेषांचा किंवा पिवळा तांबेरा (पुक्सीनिया स्ट्रीफॉमिस)
काही शिफारसी :-
तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी प्रति हेक्टरी मॅंकोझेब १५०० ग्रॅम प्रति ५०० लिटर पाण्यातून फवारावे.
करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड २० ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून १५ दिवसांच्या अंतराने गरजेनुसार दोन वेळा फवारावे.
मावा किडीच्या नियंत्रणासाठी थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) १ ग्रॅम किंवा ॲसिटामिप्रीड (२०एसपी) ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने गरजेनुसार दोन वेळा फवारावे.
१८) सुधारित वाण :-
अलीकडील काळात प्रसारित झालेले जिरायती, बागायती, वेळेवर तसेच बागायती उशीर पेरणीसाठीचे वाण व त्यांचे वैशिष्टे :-
अ) बागायत वेळेवर पेरणी :-
- A) तपोवन (एनआयएडब्ल्यू ९१७) :-
बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम सरबती वाण
दाणे मध्यम परंतु ओंब्यांची संख्या जास्त
प्रथिनांचे प्रमाण १२.५ टक्के
तांबेरा रोगास प्रतिकारक
चपातीसाठी उत्तम वाण
पीक ११५ दिवसांत कापणीस तयार
उत्पादन क्षमता ४५ ते ५० क्विंटल प्रतिहेक्टर
- B) त्र्यंबक (एनअयएडब्ल्यू ३०१) :-
बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम सरबती वाण
दाणे टपोरे आणि आकर्षक
प्रथिनांचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा अधिक
तांबेरा रोगास प्रतिकारक
चपातीसाठी उत्तम वाण
पीक ११५ दिवसांत कापणीस तयार
उत्पादन क्षमता ४० ते ४५ क्विंटल प्रतिहेक्टर
- C) गोदावरी (एनआयडीडब्ल्यू : २९५) :-
बागायत वेळेवर पेरणीसाठी उत्तम बक्षी वाण
दाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक
प्रथिनांचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा अधिक
तांबेरा रोगास प्रतिकारक
रवा, शेवया, कुरडई यासाठी उत्तम वाण
पीक ११० ते ११५ दिसात कापणीस तयार
उत्पादन क्षमता ४५ ते ५० क्विंटल प्रतिहेक्टर
ब) बागायत उशिरा पेरणी :-
- A) (एनआयएडब्ल्यू :३४) :-
बागायती उशीरा पेरणीसाठी उत्तम सरबती वाण
दाणे मध्यम आणि आकर्षक
प्रथिनपांचे प्रमाण १३ टक्के
तांबेरा रोगास प्रतिकारक
चपातीसाठी उत्तम वाण
पीक १०५ ते ११० दिवसात कापणीस तयार
उत्पादन क्षमता ३५ ते ४० क्विंटल प्रतिहेक्टर
क) जिरायती पेरणी :-
- A) पंचवटी (एनआयडीडब्ल्यू : १५) :-
जिरायत पेरणीसाठी उत्तम बन्सी वाण
दाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक
प्रथिनांचे प्रमाण १२ टक्के
तांबेरा रोगास प्रतिकारक
रवा, शेवया, कुरडई यासाठी उत्तम
पीक १०५ दिवसांत कापणीस तयार
उत्पादन क्षमता १२ ते १५ क्विंटल प्रतिहेक्टर
काही वाण व तंत्रज्ञान.
नेत्रावती (एन.आय.ए.डब्ल्यू. - १४१५)
प्रमुख वैशिष्ट्ये
प्रसारित वर्ष २०१०
जिरायती आणि मार्यादित सिंचन पेरणीसाठी उत्तम सरबती वाण
पेरणीचा कालावधी - ऑक्टोबर महिन्याचा दुसरा पंधरवडा.
पेरणीचे अंतर - २२.५ सें.मी.
प्रतिहेक्टरी रासायनिक खताचे प्रमाण - ४० किलो नत्र : २० किलो स्फुरद.
चपातीसाठी उत्तम
तांबेरा रोगास प्रतिकारक
द्विपकल्पीय विभागासाठी जिरायत-मर्यादित पाणी (पेरणीनंतर ४२ दिवसांनी एक पाणी)
दाणे मध्यम व आकर्षक. प्रथिनांचे प्रमाण १२ टक्के.
पीक ११०-११५ दिवसात कापणीस तयार होते.
प्रतिहेक्टरी उत्पादन - जिरायत - १८ ते २० क्विंटल.
मर्यादित सिंचन - २७ ते ३० क्विंटल.
संकलन - संजय गानोरकर
प्रतिनिधी - गोपाल उगले
Share your comments