आताच्या शेती पद्धतीमध्ये असे बरेच पिके आहेत की त्यांची नावेदेखील ऐकायला फार कमी येतात किंवा अजून देखील त्यांची लागवड हव्या त्या प्रमाणात भारतात केली जात नाही. खास करून यामध्ये बऱ्याच प्रकारच्या औषधी पिकांची नावे सांगता येतील. जर आपण बदललेल्या पीक पद्धतीचा विचार केला तर शेतकरी बंधू जास्त प्रमाणात नगदी आणि औषधी पिकांची शेती मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत.
त्यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांच्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ होण्यास मदत होते. अशी बरीच पिके असतात की त्यांना वर्षभर बाजारपेठेत चांगली मागणी असते वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांमध्ये त्यांचा वापर होतो. म्हणून या लेखात आपण किनोवा या नगदी पिकाची माहिती घेणार असून याला देखील बाजारपेठेत भरपूर मागणी असते.
नेमके काय आहे किनोवा?
क्विनोवा हे रब्बी हंगामात घेतले जाणारे नगदी पीक असून लागवड ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत केली जाते. हे एक पौष्टिक धान्य असून याला प्रथिनांचा उत्कृष्ट स्त्रोत म्हणून देखील ओळखले जाते. हे पिक औषधी पिकांच्या यादीत देखील येते.
जर आपण याचा आरोग्यदायी महत्वाच्या बाबतीत विचार केला तर शरीरातील चरबी कमी करण्यासाठी,कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.
विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पौष्टिक तृणधान्यांच्या श्रेणीमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. जर आपण या वनस्पतीचा विचार केला तर सुरुवातीला हिरवीगार होते व नंतर गुलाबी होते. या पिकाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वर्षातून अनेक वेळा याची लागवड केली जाऊ शकते.
परंतु हिवाळ्यामध्ये क्विनोवा लागवड केली तर जास्त उत्पादन मिळते.क्वीनोवाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी सेंद्रिय पद्धतीने लागवड करणे महत्त्वाचे ठरते. लागणाऱ्या जमिनीचा विचार केला तर चांगला पाण्याचा निचरा होणारी हलकी तसेच वालुकामय जमीन उपयुक्त ठरते.
अशा पद्धतीने करता येते लागवड
त्यासाठी जमिनीची चांगली खोल नांगरून जमीन भुसभुशीत करून समतल बेड तयार केले जातात व मातीला पोषण देण्यासाठी कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मातीत मिसळली जाते. या पिकाची वैशिष्ट्य म्हणजे यावर कीटक व रोग येण्याची शक्यता नसते, परंतु तरीदेखील स्टेम बोरर, मावा किंवा लिफ होपर इत्यादी कीटकांचा प्रादुर्भाव होऊ शकतो
व त्याला जैविक कीडनियंत्रण करून अटकाव करता येतो. जर आपण लागणाऱ्या बियाण्याचा विचार केला तर एका हेक्टरसाठी 5 ते 8 क्विंटल बियाणे लागते. तसेच पेरणीपूर्वी पाच ग्राम ऍप्रॉन (35 एसडी) नावाच्या औषधाने बीजप्रक्रिया केली जाते. पेरणी किंवा लागवड करताना याच्या बिया ओळीत लावाव्या लागतात व हलकेसे पाणी द्यावे लागते.
याला लागवडीसाठी जास्त पाणी लागत नाही फक्त दोन ते तीन पाण्याची सोय असेल तरी आपण चांगले उत्पादन या माध्यमातून घेऊ शकतो. लागवड केल्यानंतर पहिले पाणी लगेच दिले जाते व पीक 30 दिवसांचे झाल्यानंतर तणनियंत्रण करण्यासाठी खुरपणी करणे गरजेचे असून व त्यानंतर दुसरे पाणी द्यावे.
लागवड होऊन सत्तर दिवस झाले तर तिसरे पाणी देणे फायदेशीर ठरते. परंतु पिकाची गरज ओळखून पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
क्वीनोवा लागवडीतून किती उत्पन्न मिळू शकते?
यासाठी कमी सिंचनाची आवश्यकता असते व व्यवस्थापन देखील कमीत कमी करावे लागते. परंतु तरीदेखील या पिकापासून चांगले उत्पादन मिळते. आपण एका अंदाजानुसार विचार केला तर एका एकर जमिनीवर 20 ते 24 क्विंटल उत्पादन मिळते.
जर आपण बाजारपेठेचा विचार केला तर हे पीक प्रतिक्विंटल 8 हजार ते 10 हजार रुपये विकले जाते. त्यामुळे एका एकर जमिनीतून चांगले आर्थिक उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकते. या पिकाला जास्त खत व्यवस्थापन किंवा किटक व रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अतिरिक्त खर्च जास्त करावा लागत नसल्याने उत्पादन खर्च कमी होतो व नफा वाढतो.
नक्की वाचा:तुर पिकात कळ्या व फुले दिसू लागताच पहिल्या फवारणीसाठी करा याच औषधाचा वापर
Share your comments