शेतीक्षेत्रात रासायनिक खते तसेच कीटकनाशकांच्या वाढत्या वापराचे दुष्परिणाम दिसून येऊ लागले आहेत. अशा खतांमुळे तसेच कीटकनाशकांमुळे जमिनीची प्रत तर घसरत चालली आहे आणि याचा परिणाम म्हणून जमिनीची पीकवाढीची क्षमताही कमी होत आहे. त्याचबरोबर रासायनिक खते तसेच कीटकनाशकांचे अंश उत्पादनात येऊन ते मानवी शरीरात गेल्यास गंभीर व्याधी निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे रासायनिक खते तसेच कीटकनाशकांच्या वाढत्या प्रसाराला आळा घालावा, अशी मागणी पुढे येत आहे. त्याचबरोबर सेंद्रिय शेतीवर भर देण्यासाठी शेतक-यांना प्रोत्साहन दिले जात आहे. परंतु अजूनही सेंद्रिय शेतीकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येते. त्यामुळे रासायनिक खते तसेच कीटकनाशकांचा बेसुमार वापर सुरूच आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अशी खते वा कीटकनाशके फवारताना पुरेशी काळजी घ्यावी लागते. अन्यथा फवारणी करणा-यांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. याचे प्रत्यंतर नुकतेच एका दुर्घटनेच्या निमित्ताने आले. विदर्भात फवारणी दरम्यान झालेल्या विषबाधेमुळे १८ जणांना जीव गमवावा लागला.
तर जवळपास ५५० जणांवर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे रासायनिक कीटकनाशकाच्या वाढत्या वापराचा मुद्दा पुन्हा चच्रेत आला आहे.
सर्वसाधारणपणे आपल्या देशात ७०च्या दशकात रासायनिक खतांच्या तसंच कीटकनाशकांच्या वापरास सुरुवात झाली. त्यावेळी काही पिकांच्या संकरीकरण केलेल्या म्हणजे हायब्रीड जाती आल्या. एखाद्या पिकाचा संकर केला की, त्याला अधिक प्रमाणात खाद्याची आवश्यकता भासते. हे लक्षात घेऊन संकरित जातींच्या पिकांसाठी रासायनिक खतांच्या वाढत्या वापरावर भर दिला जाऊ लागला. या खतांच्या वापराने उत्पादनात वाढ होते, असा दावा करण्यात आला आणि अधिक उत्पन्नासाठी उत्पादनवाढीच्या दृष्टीने रासायनिक खतांच्या अधिकाधिक वापराकडील शेतक-यांचा ओढा वाढला. परंतु या खतांमुळे जमिनीतील जीव-जंतू मारले जाऊ लागले. या रासायनिक खतांचा प्रभाव एवढा असतो की, ती थेट झाडांच्या मुळांशी लावल्यास मुळे नष्ट होतात. यात ‘जिओ जिवश्च जीवनम’ ही नैसर्गिक प्रक्रिया धोक्यात आली. खरे तर हे जीवजंतू एकमेकांवर अवलंबून राहून जगत असतात.
. त्यातील काही जीव-जंतू नष्ट झाले तर काहींची प्रतीकारशक्ती वाढली. पुढे पिकांवर अनेक रोग पडू लागले. या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वा रोग नियंत्रणात आणण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला जाऊ लागला. परंतु याही औषधांची हळूहळू किडींना सवय होत गेली. पुढे पुढे या किडी प्रचलित कीडनाशकांना दाद देईनाशा झाल्या. मग अधिक तीव्रतेच्या रासायनिक कीडनाशकांचा वापर सुरू झाला. अशा कीडनाशकांमुळे पिकांवरील रोगांचा नायनाट करणे शक्य झाले. त्याचबरोबर या कीडनाशकांचे दुष्परिणामही समोर आले. मुख्यत्वे या कीडनाशकांचे अंश पिकात येऊ लागले आणि पुढे ते मानवी शरीरात जाऊन आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली.
खरे तर विविध पिकांना किडी-रोगांचा धोका ब-याच वर्षापासून राहत आला आहे. साहजिक त्यावेळी करण्यात येणारे उपाय आता प्रभावी ठरतील का, याचा विचार होण्याची आवश्यकता हेती. परंतु तसे झाले नाही. किंबहुना पिकांवरील किडी-रोगांचा नायनाट करण्यासाठी रासायनिक कीडनाशकांचा वापर हाच एकमेव पर्याय असल्याचा समज दृढ झाला. उदाहणार्थ, पूर्वी पिकांच्या मुळाशी लागलेल्या किडी नष्ट करण्यासाठी आंबवलेल्या ताकाचा वापर केला जात असे. आता असे उपाय फारसे कोणाला माहीत नाहीत.
त्यामुळे त्यांचा वापर होणे कठीण आहे. वास्तविक अशा उपायांची माहिती सर्व शेतक-यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. दुसरीकडे रासायनिक कीडनाशकांचा वाढता वापर लक्षात घेता विविध कंपन्या अशा कीडनाशकांच्या उत्पादनांवर भर देऊ लागल्या. रासायनिक कीडनाशकांचे उत्पादन करणे, त्यांची विक्री करणे आणि त्याद्वारे नफा कमावणे एवढेच या कंपन्यांचे उद्दिष्ट राहिले. परंतु या कीडनाशकांचा वापर कसा करावा, तो करताना संबंधितांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी, याची माहिती देण्यावर पुरेसा भर देण्यात आला नाही. अशा उत्पादनांवर त्याच्या वापरासंदर्भातील सर्व माहिती दिल्याचा दावा कंपन्या करू शकतात. परंतु ही माहिती स्थानिक भाषेत देण्यात आली आहे का, हा मुद्दाही महत्त्वाचा ठरतो. शिवाय शेतकरीवर्गात अशिक्षित, अल्पशिक्षित शेतक-यांची, शेतमजुरांची संख्याही लक्षात घेण्यासारखी आहे. त्यामुळे या शेतक-यांना, शेतमजुरांना रासायनिक कीडनाशकांच्या वापराबाबतची माहिती कशी दिली जाणार, हा खरा प्रश्न असतो. त्यादृष्टीने या शेतक-यांसाठी विशेष प्रशिक्षणावर भर दिला जायला हवा आहे.
संकलन - IPM school
Share your comments