ज्वारीस द्या संरक्षित पाणी

Tuesday, 25 December 2018 08:15 AM


पावसाळ्यात कमी झालेल्या पावसाचा रब्बी ज्वारीच्या पेरण्यांना चांगलाच फटका बसला आहे. रब्बी हंगामात पुणे विभागातील नगर, पुणे, आणि सोलापूर जिल्ह्यातील ज्वारीचे सुमारे 10 लाख 34 हजार 134 हेक्टर क्षेत्र पेरणीपासून वंचित राहिले आहे. त्यामुळे ज्वारीच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. रब्बी ज्वारीच्या पेरण्यांची भिस्त बहुतांश परतीच्या पावसावर असल्याने, शेतकरी काही प्रमाणात अवलंबून होते. मात्र प्रतीच्या पावसानेही हुलकावणी दिल्याने जमिनीत पुरेशी ओल होऊ शकली नाही.

पुणे विभागात रब्बी ज्वारीच्या फक्त 21% पेरण्या झालेल्या आहेत. सध्या पाण्याच्या सुविधा असलेल्या ठिकाणी ज्वारीचे पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. काही जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये विखुरलेल्या स्वरुपात काही प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत, परंतु अशा ठिकाणी पिके सुकत असल्याचे चित्र आहे. त्याचा मोठा फटका उत्पादनावर होण्याचा अंदाज आहे.ज्वारीचे आगर म्हणूनओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात अत्यंत कमी पेरण्या झालेल्या आहेत. अवघे 18% पेरणी झाली आहे. 

ज्या ठिकाणी ज्वारीच्या पेरण्या ह्या ऑक्टोबरच्या पहिल्या व दुसऱ्या पंधरवड्यात झालेल्या आहेत अशा शेतकऱ्यांची ज्वारीची पिके पोटरीत तर काहींची फुलोऱ्यात आहे. ज्वारी पोटरीत आल्यापासून दाणे भरण्यापर्यंतच्या काळात जास्त ओलाव्याची गरज असते. या काळात ओलावा कमी पडल्यास पीक उत्पादनात फारच घट येते. साधारणपणे ज्वारीची पेरणी केल्यानंतर 50 ते 55 दिवसांनी पीक पोटरीत येते.यावेळी कणीस ताटातून बाहेर पडण्याच्या अवस्थेत असते. पिकांची वाढ शेवटच्या पानापर्यंत झालेली दिसून येते. अशा वेळी ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय असेल त्यांनी पाणी दयावे. पाणी मिळाल्याने ज्वारी निसवण्याची प्रक्रिया पूर्ण होते. अन्नद्रव्य ताटातून कणसात जाण्यासाठी मदत होते आणि कणसांचा आकार मोठया होण्यास मदत होते.

कोरडवाहू ज्वारी पिकाची उत्पादनक्षमता ही प्रामुख्याने जमिनीतील साठविलेल्या ओल्याव्यावरच अवलंबून असते. जमिनीवरच्या थरातील पाणी बाष्पीभवनामुळे उडून गेल्यास जमिनीस भेगा पडतात. ज्वारीची पेरणी केल्यानंतर पाऊस न झाल्यास 30 ते 35 दिवसांनी जमिनीस भेगा पडण्यास सुरुवात होते. सद्य परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यात बहुतेक पिके ही पोटरी अवस्थेत तर काही फुलोऱ्यात आहेत आणि बहुतांश जमिनीस मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत. पोटरी अवस्थेत असणाऱ्या पिकास शेतकरी बंधूनी दातेरी कोळप्याने  कोळपणी करणे अत्यंत गरजेचे आहे. यावेळी टणक झालेल्या जमिनीवरून कोळपे ओढणे अवघड जाते. दातेरी कोळप्याच्या दातऱ्याचे कोन कोळपे ओढण्यास सोपा जाईल असा असावा. दातेरी कोळप्यामुळे जमिनीवरील भेगा बुजण्यास काही प्रमाणात मदत होते आणि या कोळपणीचा उपयोग ज्वारीच्या फुलोरयास मदत होईल. नंतर पडणाऱ्या थंडीमुळे दाणे भरण्याची अवस्था पूर्ण होते. एकंदरीत ज्वारीच्या पिकास तिसऱ्या, पाचव्या आणि आठव्या आठवड्यातील कोळपणीमुळे ज्वारीचे पीक हाती येण्यास हमखास यश येते.

रब्बी ज्वारीस पाणी देण्याच्या अवस्था:

  • ज्वारी पिकाचा जोमदार वाढीचा काळ(पेरणीनंतर 28 ते 30 दिवस)
  • पीक पोटरीत असतांना (पेरणीनंतर 50 ते 55 दिवसांनी )
  • पीक फुलोऱ्यात असतांना(पेरणीनंतर 70 ते 75 दिवसांनी)
  • कंसात दाणे भरण्याचा काळ (पेरणीनंतर 90 ते 95 दिवस)

सर्वसाधारणपणे 70-75 दिवसात ज्वारी फुलोऱ्यात येते. या अवस्थेत पाणी मिळाल्याने कणसात दाणे भरण्यास मदत होते आणि कणसाचे वजन वाढून एकूण उत्पादन वाढते. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असेल त्यांनी ज्वारीच्या पिकास पाणी दयावे. ज्वारीची पेरणी झाल्यानंतर 90-95 दिवसात दाणे चिकाच्या अवस्थेत असतात. पिकास पाण्याची गरज असल्यास चौथे पाणी दयावे. हलक्या व मध्यम जमिनीतील ज्वारीस या पाण्याची गरज भासते. भारी जमिनीत ओल धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते. तसेच या अवस्थेत काळ्या भारी जमिनीस भेगा पडलेल्या असतात. भेगाळलेल्या जमिनीस पिकाला पाणी देणे मुश्किल होते आणि गरजेपेक्षा जास्त पाणी दयावे लागते आणि ज्वारी लोळण्याचे प्रमाण वाढते. भारी जमिनीत तीन पाणी दिले असता मिळणारे उत्पादन, चार पाण्याच्या उत्पादनाच्या जवळपास मिळते.

कोरडवाहू ज्वारीस संरक्षित पाणी देण्यासाठी तुषार सिंचन पद्धत फायदेशीर दिसून आली आहे. कमी पाणी उपलब्ध असल्यास तुषार सिंचनाने पीक वाचविता येते. मात्र एक पाणी उपलब्ध असल्यास पेरणीनंतर 28-30 दिवसांनी किंवा 50-55 दिवसांनी पाणी दिल्यास ज्वारीची वाढ चांगली होऊन हमखास उत्पादन मिळू शकते. दोन पाणी उपलब्ध असल्यास पहिले पाणी 28-30 व दुसरे पाणी 50-55 दिवसांनी दयावे. याप्रमाणे संरक्षित पाणी देल्यास ज्वारीच्या उत्पादनात 25-30 टक्क्यांनी वाढ होते.

डॉ. आदिनाथ ताकटे, प्रभारी अधिकारी, मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे विभाग)
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
9404032389

sorghum jowar ज्वारी protected irrigation संरक्षित सिंचन
English Summary: Protected Irrigation for Sorghum

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णयCopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.