बदलत्या वातावरणामुळे पिकांचे कितपत नुकसान होऊ शकते याचा प्रत्यय शेतकरी बांधवांना गेल्या अनेक वर्षांपासून येत आहे. नुकत्याच पूर्णत्वास आलेल्या खरीप हंगामात देखील हवामान बदलाचा शेतकरी बांधवांना मोठा फटका बसला होता. सध्या राज्यात सर्वत्र रब्बी हंगामाची पिके जोमात वाढण्याच्या अवस्थेत आहेत मात्र पीकवाढीच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यावर वातावरणातील बदल शेतकऱ्यांना डोकेदुखी देत आहे.
या टप्प्यात वातावरणात होत असलेले बदल सरळ उत्पादनावर परिणाम करू शकतो. त्यामुळे पिकांच्या वाढीच्या काळात बळीराजाने विशेष काळजी घेणे अपरिहार्य ठरणार आहे. तसेच पिकांची पेरणी करताना शेतकरी बांधवांनी काही चूक केली असेल तरीदेखील याचा फटका उत्पादनात घट स्वरूप शेतकऱ्यांना बसू शकतो. कृषी तज्ञांच्या मते, रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करताना बियाण्यावर बीजप्रक्रिया जर केली गेली नसेल तर या वातावरणामुळे पिकांवर पाने कुरतडणाऱ्या आळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव बघायला मिळणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसताच एक किलो झिंक सल्फेट आणि 500 ग्राम चुना पाण्यात द्रावण तयार करून याची पंधरा दिवसाच्या अंतराने साधारणता तीन फवारण्या कराव्या लागणार आहेत. तसेच ज्या जमिनीत मॅगनीजची कमतरता असेल तर 100 लिटर पाण्यात 500 ग्रॅम मॅगनीज सल्फेटचे द्रावण तयार करून पिकाला पहिल्यांदा पाणी देण्याच्या दोन दिवस आधी फवारणीचा सल्ला देण्यात आला आहे. यानंतर पिकाच्या आवश्यकतेनुसार, तसेच केळीच्या व रोगाच्या प्रादुर्भावानुसार फवारणी केली गेली तर रब्बी हंगामातील पिकांची जोमदार वाढ अटळ आहे.
तसं बघायला गेलं तर, रब्बी पिकांसाठी थंडी खूप फायदेशीर ठरते. मात्र अति तिथे माती याप्रमाणे जास्तीची थंडी रब्बीतील पिकांना हानी पोहचवू शकते. यामुळे पिकांची वाढ देखील खुंटण्याचा धोका कायम असतो. तसेच गारठा सदृश्य स्थिती असल्यास फवारणी केलेली देखील निरर्थक सिद्ध होणार आहे. त्यामुळे संपुर्ण वातावरण निवळल्यानंतर फवारणी करण्याचा सल्ला कृषी वैज्ञानिक देत असतात. तज्ञांच्या मते, ढगाळ वातावरण असताना तसेच वातावरणात धुके असताना केलेली फवारणी पिकांच्या वाढीसाठी अनुकूल नसते अशा कालावधीत केलेल्या फवारणीमुळे पिकांची हानी होऊ शकते आणि त्यामुळे उत्पादनात देखील घट होऊ शकते. म्हणून अशा काळात फवारणी टाळण्याचा सल्ला दिला जातो.
वातावरण स्वच्छ व निरभ्र असल्यास फवारणी केल्याचे फायदेशीर ठरू शकते. अन्यथा ढगाळ व दूषित वातावरणात फवारणी केल्यास फवारणीचा खर्च वाया जाऊ शकतो शिवाय यामुळे पिकावर विपरीत परिणाम देखील घडू शकतो. यामुळे वेळ व पैसा दोन्ही वाया जाण्याची शक्यता आहे.
Share your comments