आपण बऱ्याच पिकांचे लागवड करतो. लागवडीनंतर त्यांचे व्यवस्थापन व्यवस्थित पद्धतीने केले जाते व नंतर पीक काढणीला येते. काही पिके अशी आहेत त्यांची लागवड आणि व्यवस्थापन यापेक्षा त्यांची काढण्याची पद्धत ती खूप बारकाईने आणि व्यवस्थित करावी लागते.
आपण बऱ्याच वेळेस भाजीपाला पिकांच्या बाबतीत पाहतो की, अमुक अशी परिस्थिती भाजीपाला पिकाची आली तर काढणी करावी लागते जसे की पक्वता ओळखता येणे खूपच महत्त्वाचे असते. तसेच तोडणी सकाळ किंवा संध्याकाळी करणे फायद्याचे ठरते,अशा काही गोष्टी असतात. अशीच काढणीची योग्य पद्धत दालचिनी साठी खूप महत्त्वाचे आहे. या पिकाची काढण्याची पद्धत खूपच वेगळी आहे. या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊ.
नक्की वाचा:काही नवे! शेतीत हटके प्रयोग करणाऱ्या शेतकरी बंधूंसाठी ठरेल शतावरी लागवड फायद्याची
दालचिनीची काढणी
दालचिनीची लागवड केल्यानंतर नोव्हेंबर ते मार्च या कालावधीमध्ये काढणी केली जाते. महत्त्वाचे म्हणजे दालचिनीची काढणी म्हणजे तिची साल काढावी लागते व ती सकाळच्या वेळेस काढावी लागते. यासाठी काढणीला निवडलेली दालचिनीची फांदी जमिनीपासून वीस ते तीस सेंटिमीटर उंचीवर तोडावी. नंतर ती साल काढल्यानंतर सावलीत सुकवावी. यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे दालचिनीची साल काढण्यासाठी झाडाच्या फांद्या तोडाव्या लागतात. त्यामुळे झाडाची व्यवस्थापन योग्य असेल तर लागवडीनंतर दोन ते तीन वर्षांनी दालचिनीचे झाड काढण्यासाठी तयार होते. या दोन ते तीन वर्षाच्या कालावधीत दालचिनीच्या झाडाची किमान एक फांदी 150 सेंटीमीटर ते 175 सेंटिमीटर उंच, बुंध्याची जाडी चार ते पाच सेंटीमीटर आणि खोडावरील साल 70 टक्के तपकिरी रंगाची झालेली असणे गरजेचे आहे.
दालचिनीच्या काढणीतील महत्त्वाचे टप्पे
1- काढणीसाठी दालचिनीचे झाड तोडावे लागते त्यामुळे काढणीचा हंगाम खूपच महत्त्वाचा ठरतो. साधारणपणे नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी दालचिनी काढण्याचा आहे. परंतु हा हंगाम देखील जमीन, वातावरण आणि जातीनुसार बदलतो. आपल्या भागातील वातावरण कसे आहे याची निश्चिती करून घेणे महत्त्वाचे ठरते.
2- आता दालचिनी काढणीस तयार झाली आहे हे ओळखणेदेखील महत्वाचे आहे त्यासाठी तयार फांदीवरील सालीचा एक लहानसा तुकडा चाकूने काप देऊन काढावा लागतो. जर हा सालीचा तुकडा एकदम सहजतेने निघाला तर साल काढण्यासाठी तयार आहे असे समजावे व खोड तोडावे. आणि जर साल सहजपणे निघाली नाही तर पंधरा दिवसांनी पुन्हा तपासावे व जोपर्यंत साल सहजपणे सुटत नसेल तोपर्यंत झाड तोडू नये.
3- साल काढताना ती सकाळीच काढावी व फांदी तोडताना जमिनीपासून पंचवीस ते तीस सेंटिमीटर उंचीवर तोडावी व आजूबाजूला असलेल्या हिरव्या लहान फांद्या लगेच तोडून बाजूला कराव्यात. पाने सावलीत वाळवावीत.
4- मुख्य खोडाचे 30 सेंटिमीटर आकाराचे तुकडे वेगळे करून साल लगेच काढण्यास घ्यावी. त्यासाठी खोडाच्या दोन्ही बाजुस उभे खोल काप द्यावेत. चाकूची बोथट बाजू या कापा मध्ये घुसवून साल हलवून घ्यावी. त्यानंतर ती काढावी. साल काढण्याअगोदर सालीवरून ब्रास चा रूळ किंवा चाकू ची धार फिरवून साल रगडावे. त्यामुळे वरचा लाकडाचा भुसा सालीवरून निघून जातो.
5- साल काढल्यानंतर ती सावलीमध्ये वाळवावी. परंतू थेट सूर्यप्रकाशात वाळवू नये परंतु साल काढलेले खोड मात्र उन्हात वाळवावे.
6- सायंकाळी वाळलेल्या खोडावर साल पूर्ववत चिकटवावे. त्यासाठी ती दोरीने खोडावर बांधून ठेवावे. हे साल बांधलेले खोड दुसऱ्या दिवशी सावलीत वाळवावे. तिसऱ्या दिवशी साल खोडावरून सोडून सावलीत वाळविण्यास ठेवावे. साधारण पाचव्या ते सहाव्या दिवशी साल वाळते.
7- साल सावलीमध्ये सुकविलेल्या नंतर एकदाच दोन तास उन्हात सुकवावी. सुकविताना ती मलमलच्या पिशवीत भरून उन्हात ठेवावी. सुकविलेली साल डब्यात हवाबंद करून ठेवावे.
8- एका दालचिनीच्या झाडापासून पाचव्या ते सहाव्या वर्षी सरासरी 300 ग्रॅम वाळलेली साल व 250 ग्रॅम पाने मिळतात.
9- जेव्हा दालचिनीचे झाड तोडतो तेव्हा त्याला असंख्य धुमारे फुटतात. हे धुमारे वाढू द्यावीत व त्यापैकी सरळ आणि सशक्त चार ते पाच धुमारे ठेवून बाकीच्यांची विरळणी करावी. (स्त्रोत-ॲग्रोवन)
Share your comments