1. कृषीपीडिया

क्षारयुक्त पाणी शेतीसाठी वापरतांना घ्यावयाची काळजी?

क्षारयुक्त आणि चोपण जमिनीची सुधारणा करतांना फार खर्च येतो आणि बराच कालावधी लागतो. त्यामुळे क्षारयुक्त पाणी शेतीसाठी वापरतांना काळजी घ्यायला पाहिजे. आणि त्यासाठी पाण्याची प्रत माहिती करून घेणे आवश्यक आहे. शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची प्रत ही त्यातील एकूण विद्राव्य क्षारांचे प्रमाण, क्षारांचे घटक आणि कॅल्शियम आणि सोडियम ह्यांचे प्रमाण ह्या बाबींवर मुखत्यः अवलंबून असते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Water issue news

Water issue news

डॉ. आदिनाथ ताकटे

शेतीसाठी क्षारयुक्त पाण्याचा वापर करतांना प्रत्येक पाळीच्या वेळी पाण्यावाटे जमिनीत क्षार टाकले जातात. जमिनीस दिलेले पाणी बाष्पीभवनाद्वारे निघून जाते. जमिनीचा निचरा बरोबर नसल्यास हे क्षार जमिनीच्या बाहेर किंवा जमिनित खोलवर जाऊ शकत नाही. अशा रीतीने जमिनीच्या वरच्या थरात क्षारांचे प्रमाण वाढत जाते आणि जमिनी क्षारयुक्त बनतात. क्षारयुक्त पाण्यात सोडियमचे प्रमाण जास्त असल्यास आणि पिकाखालील जमिनीत चुन्याचे प्रमाण कमी असल्यास जमिनी चोपण बनतात, म्हणजे त्या जमिनीतील सोडीयमचे प्रमाण वाढून तिचे प्राकृतिक गुणधर्म बिघडतात. त्यामुळे जमिनीचा सामू वाढून तिच्यातील अन्नद्रव्यांची उपलब्धतता कमी होते. आणि जमिनीची उत्पादनक्षमता खालावते.

क्षारयुक्त आणि चोपण जमिनीची सुधारणा करतांना फार खर्च येतो आणि बराच कालावधी लागतो. त्यामुळे क्षारयुक्त पाणी शेतीसाठी वापरतांना काळजी घ्यायला पाहिजे. आणि त्यासाठी पाण्याची प्रत माहिती करून घेणे आवश्यक आहे. शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची प्रत ही त्यातील एकूण विद्राव्य क्षारांचे प्रमाण, क्षारांचे घटक आणि कॅल्शियम आणि सोडियम ह्यांचे प्रमाण ह्या बाबींवर मुखत्यः अवलंबून असते. पाण्यातील विद्राव्य क्षारांचे प्रमाण आणि सोडियम ह्यानुसार पाण्याचे चार वर्गात वर्गीकरण केले जाते, ते म्हणजे कमी, मध्यम, जास्त आणि फार जास्त क्षारांचे प्रमाण असलेले पाणी. त्याचप्रमाणे सोडियमचे प्रमाण विचारात घेऊन कमी, मध्यम, जास्त आणि फार जास्त सोडियम असणारे पाणी असे चार वर्ग करण्यात येतात. ह्या निरनिराळ्या वर्गातील क्षारयुक्त पाणी वापरतांना योग्य ती काळजी घेणे आवश्यक ठरते.

क्षारयुक्त पाण्यात विद्राव्य क्षार जास्त प्रमाणात असतात. भारी पोताच्या आणि कमी निचऱ्याच्या जमिनीत अशा क्षारयुक्त पाण्याचा शेतीसाठी वापर केल्यास त्या जमिनी क्षारयुक्त किंवा चोपण बनतात. त्यांची उत्पादनक्षमता खालावते.

कमी क्षारयुक्त पाणी हे सर्व प्रकारच्या जमिनीसाठी आणि पिकांसाठी वापरता येते.तरी पण जमिनीचा निचरा फार कमी असल्यास निचरा चर खोदणे आवश्यक ठरते.मध्यम क्षारयुक्त पाणी शेतीसाठी वापरता येते, परंतु त्यासाठी जमिनीचा निचरा चांगला असायला पाहिजे.तो कमी असल्यास निचरा चराची तजवीज करावी लागते.त्याचप्रमाणे क्षारास मध्यम संवेदशील असलेल्या पिकांची निवड करणे आवश्यक ठरते.

जास्त क्षारयुक्त पाण्याचा वापर करता येतो, परंतु त्यासाठी जमिनीचा निचरा चांगला असायला पाहिजे. निचरा कमी असल्यास, निचरा चर खोदुन जमिनीचा निचरा वाढवावा लागतो. त्याचप्रमाणे क्षारास जास्त संवेदशील असलेल्या पिकांची निवड करणे आवश्यक आहे. फार जास्त क्षारयुक्त पाणी ओलितासाठी योग्य नसते.अशा पाण्याचा फक्त आपत्कालीन परिस्थितीत वापर करावा. पण त्यासाठी निचरा चांगला असावा लागतो.

कमी सोडियम असलेले पाणी सर्व जमिनीसाठी आणि पिकासाठी वापरता येते. तरी पण जमिनीचा निचरा चांगला असणे आवश्यक ठरते. मध्यम सोडियम प्रमाण असलेले पाणी हलक्या पोताच्या, सेंद्रीय पदार्थ जास्त असलेल्या आणि चांगला निचरा असलेल्या जमिनीसाठी वापरणे योग्य असते.जास्त सोडियमचे प्रमाण असलेले पाणी शेतीसाठी वापरता येते. परंतु त्यासाठी जमिनीचा निचरा चांगला आणि सेंद्रीय पदार्थाचे आणि चुनखडीचे प्रमाण जास्त असावे लागते. त्याचप्रमाणे जमिनीतील जास्तीचे पाणी निघून जाण्यास निचरा चर खोदणे आवश्यक ठरते. तसेच असे पाणी शेतीसाठी वापरतांना जमिनीस जीप्स्मचा वापर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कमी पाणी लागणाऱ्या पिकाची निवड करून कमीत कमी पाण्याचा वापर करावा.

चांगल्या प्रतीचे पाणी शेतीसाठी वापरताना सुध्दा काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. असे पाणी वापरताना ते ज्या जमिनीस द्यावयाचे आहे त्या जमिनीचे गुणधर्म लक्षात घेणे आवश्यक असते.जमिनीचा पोत भारी, निचरा कमी आणि जमिनीत खालच्या थरात क्षारांचे प्रमाण जास्त असल्यास पाण्याची प्रत चांगली असूनही त्याचा वापर करणे योग्य नसते आणि अशा जमिनीस पाण्याचा वापर करायचा असल्यास जमिनीचा निचरा सुधारण्यासाठी निचरा चर, सेंद्रीय खतांचा जास्त प्रमाणात वापर, कमी कालावधीचे आणि कमी पाणी लागत असलेल्या पिकांची निवड आणि पाणी देण्याची योग्य पद्धत ह्या बाबींचा अवलंब करणे आवश्यक असते.
पाणी तपासणीसाठी नमुना कसा घ्याल?

पाणी तपासणीसाठी एक लिटर पाणी पुरेसे होते. पाण्याचा नमुना स्वच्छ प्लास्टिकच्या बाटलीत घ्यावा. विहिरीतून पाण्याचा नमुना घेताना विहिरीच्या मध्य भागातील काही बादल्या पाणी उपसून टाकल्यानंतर पाण्याचा नमुना घ्यावा. तसेच बोअरवेल मधील पाण्याचा नमुना घेताना १ ते २ तास पंप सुरु केल्यानंतर घ्यावा. नदी, ओढे व कॅनॉल याच्यामधील पाण्याचा नमुना वाहत्या पाण्यामधून मध्यभागी घ्यावा. पाण्याचा नमुना बाटलीत भरण्यापूर्वी बाटली त्या पाण्याने दोन ते तीन वेळा विसळून घ्यावी व बाटलीवर घट्ट बुच बसवून नमुना तपासणीसाठी ताबडतोब जवळच्या प्रयोगशाळेकडे पाठवावा. कारण अशा नमुन्याचे चोवीस तासात तपासणी करणे आवश्यक आहे.बाटलीसोबत शेतकऱ्याचे नाव, पत्ता आणि नमुना कशातून घेतला याबाबतची सविस्तर माहिती लिहिलेली असावी.

भारी पोत, निचरा कमी आणि खालच्या थरात क्षारांचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनीस चांगल्या प्रतीच्या पाण्याचा वापर केल्याने जमिनीवर वाईट परिणाम होऊ शकतात.अशा पाण्याचा वापर केल्यास जमिनीच्या खालच्या थरातील क्षार पाण्यात विरघळतात आणि निचरा कमी असल्यामुळे पाण्यात विरघळलेले क्षार जमिनीच्या निचऱ्यावाटे जाऊ शकत नाही.उलट केशाकर्षणाने हे क्षार विरघळलेले पाणी जमिनीच्या पृष्ट्भागाशी येत असते.बाष्पीभवनाद्वारे पाण्याची वाफ होते आणि क्षार मात्र जमिनीच्या वरच्या थरात राहतात.ही क्रिया होऊन जमिनीच्या वरच्या थरातील क्षारांचे प्रमाण वाढून त्या क्षारयुक्त बनतात.याच कारणास्तव बागायती शेतीसाठी पाण्याची प्रत,जमिनीचे गुणधर्म,पिकाची जात आणि प्रचलित हवा

क्षारास प्रतिकार करणारी पिके :

•कापूस,ताग,धौचा,शुगरबीट,ओट,पालक,घास,खजूर,बार्ली,
•नारळ,पेरू,निलगिरी,चिकू

मध्यम प्रतिकार करणारी पिके :

•गहू,ज्वारी,बाजरी,मका,ऊस,सूर्यफुल,सोयाबीन,भुईमुग,
•अंजीर,बोर,डाळिंब,पपई,द्राक्ष,कलिंगड,आंबा,केळी,
•टोमॅटो,गाजर,काकडी,भोपळा,कांदा,बटाटा,लसूण.

क्षारयुक्त पाण्याचा वापर करतांना घ्यावयाची काळजी

जमिनीला साधारणतः उतारा द्या.
उताराच्या दिशेने खोल नांगरट करा.
शेतात उताराच्या दिशेने योग्य मशागत करा.
पिकाची लागवड सरीच्या बगलेत करा.
पिकांमध्ये नियमित वेळोवेळी उताराच्या दिशेने आंतरमशागत करा.
सेंद्रीय खतांचा तसेच हिरवळीच्या खतांचा जास्त प्रमाणात वापर करा.
रासायनिक खतांमध्ये नत्रयुक्त खतांचा शिफारशीपेक्षा २५ टक्के जास्त वापर करा.
सरीमध्ये पाचटांसारखे आच्छादन टाका.
पिकांना वारंवार परंतु मर्यादित पाणी द्या.
पाण्याचे पाणी उपलब्ध असल्यास खारवट पाण्यात ते ठराविक प्रमाणत मिसळू द्या.
एक आड एक सरी भिजवा.
ठिबक सिंचन वापर, विद्राव्य क्षारांची मात्रा २ डेसीसायमन प्रति मीटरपेक्षा कमी असल्यास करावा.
क्षार सहनशील पिकांची निवड करावी. उदा. गहू, ज्वारी, ऊस, मका. सूर्यफुल, कापूस, शुगरबीट, ई.
पाणी जास्त क्षारयुक्त असेल तर निलगिरी, बांबू, सुबाभूळ इत्यादिंची वृक्षशेती करावी.

पाणी तपासणीसाठी नमुना कोठे पाठवाल?

महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाततर्फे,प्रत्येक जिल्ह्यात मृद सर्वेक्षण मृद चाचणी प्रयोगशाळा अस्तित्वात आहेत,तसेच राज्यातील चारही कृषि विद्यापीठाच्या कार्य क्षेत्रातील काही संशोधन केंद्रांवर तसेच राज्यातील काही कृषि विज्ञान केंद्रे;साखर कारखाने; खाजगी खत कंपन्या येथे माती–पाणी परिक्षणाची सुविधा शुल्कासह केली जाते.

लेखक - डॉ.आदिनाथ ताकटे,मृद शास्रज्ञ,एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी, मो. 9404032389

English Summary: Precautions to be taken while using saline water for agriculture Published on: 23 March 2024, 10:26 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters