शेतकरी बांधवांसाठी मातीचे संवर्धन करणे आवश्यक आहे. आपण शेतीच्या दृष्टीने विचार केला असता आपल्या मातीचा वरचा फक्त चार इंचाचा थरशेतीसाठी उपयुक्त असतो. याला इंग्रजीमध्ये टॉप सॉईल असे म्हणतात. कारण याच थरांमध्ये पिकांच्या वाढीसाठी लागणारी सर्व पोषक द्रव्ये सामावलेली असतात.
जर मातीच्या संवर्धनाच्या उपाययोजना केल्या नाहीत तर पाण्यासोबत ते पोषकद्रव्ये सुद्धा वाहून जातात. परिणामी जमिनीची सुपीकता कमी होते. पिकांची उत्पादकता घटते आणि शेतकऱ्याला रासायनिक खते आदी पाहिजे साधनांचा आधार घ्यावा लागतो. काही ठिकाणी मातीचा थर हा मर्यादित असतो. अशा ठिकाणी होणारी धूप यामुळे हळूहळू संपूर्ण मातीचा थरचवाहून जातो. अशा ठिकाणी भविष्यात पुन्हा शेती करनेच अशक्यप्राय होऊन बसते.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मृदा संधारण याची कामे केलेली नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ प्रवाहासोबत वाहून आणला जातो आणि धरणात येऊन साठतो. गेल्या काही वर्षात अशा प्रकारे हजारो टन गाळ धरणात झालेले आहे. परिणामी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात घटली आहे.
याचे गंभीर परिणाम आपल्याला नजीकच्या काळात भोगावे लागणार आहेत. यामुळे माती संधारण गरजेचे बनले आहे.आपण मातीचा प्रकार, तिचा कसदार पणा, तिची सुपीकता या सर्वांबद्दल माहिती करून घेतली तर आपण त्या मातीचा उत्तम उपयोग करून घेऊ शकू. वेगवेगळ्या प्रकारची माती वेगवेगळ्या पिकांकरिता योग्य व चांगले असते.हे सर्व जर आपण जाणून घेतले तर आपल्या शेतीकरिता ते अनेक मार्गांनी उपयुक्त ठरेल.
वनस्पती व पिकांची चांगली वाढ होण्याकरिता उत्तम जमीन लागते हे सर्वांना माहीतच आहे. पिकांची उत्तम मशागत, उत्तम खाते व चांगले बियाणे पेरण्याची पद्धत इत्यादी बरोबर तिथल्या मातीचे हे चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. आता ही माती म्हणजे काय त्याची थोडक्यात माहिती घेऊ.
माती म्हणजे नेमके काय?
मातीच्या पातळ थरात पृथ्वी आच्छादलेली आहे. माती निर्माण होण्याची निसर्गातली प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची व शतकानुशतके चाललेले असते. पाऊस, थंडी आणि वारा यांच्या माऱ्याने खडक झिजुन शेवटी त्यांचे मातीमध्ये किंवा जमिनीत रूपांतर होते. जमीन वाढणाऱ्या झाडांना आधार देते तसेच त्यांना पोषक अन्नद्रव्य पुरवत जमिनीत सूक्ष्म जीवजंतू राहतात. ज्यायोगे मातीमध्ये हवा व पाणी खेळते राहण्यास मदत होते. मातीचे चार प्रमुख घटक आहेत. खनिज द्रव्य,सेंद्रिय द्रव्य, जलवायू वनस्पतींची उत्तम वाढ होण्याकरता हे चारही घटक ठराविक प्रमाणात असावेत. त्याचबरोबर यात किटकांची टरफले,प्राणीमात्रांचे अवशेष हेही मिसळून राहतात. मातीच्या निर्मितीला निर्जीव खडक व अनेक सजीव कारणीभूत आहेत. वनस्पती व प्राणी मेले की कुजतात व त्यांचा अंश सुद्धा मातीत मिसळतो.साधारणअडीच सेंटीमीटर मातीचा थर तयार होण्यासाठी सहाशे पन्नास वर्षे लागतात. परंतु हाच थर वाहून जाण्यासाठी पावसाची एक मोठी सर पुरेशी ठरते. पृथ्वीवरील जमीन आहे तेवढीच राहणार तिच्यात वाढ होणार नाही म्हणून उपलब्ध असलेली अनमोल जमिनीचा पूर्व काळजीने वापरली पाहिजे.
जमिनी सोबतच मातीही अनमोल आहे. शेतीमध्ये जमिनीतली माती कोणत्या प्रकारचे आहे याला खूप महत्त्व आहे. जमीन चांगली असेल तर उत्पादन चांगले मिळते. वेगवेगळ्या प्रदेशानुसार मातीचा रंग वेगळा असतो. आज जमिनीतून जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकरी विविध मार्गांचा अवलंब करतात, पण नंतर जमिनीचे जोपासना करत नाहीत.
पूर्वी शेतकरी शेतातल्या मातीचा कस वाढावा म्हणून झाडाचा पाला, शेतातला टाकाऊ कचरा, माशांची कुट्टी, राख, कोळसा, शेण,कोंबड्यांची विष्ठा, शेळ्या व मेंढ्यांच्या लेंड्या टाकत असत व सुपीकता वाढवत असत. परंतु आज शेतकरी शेती मध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व फवारण्याचा वापर करतात. त्यामुळे उत्पन्न ठराविक मर्यादेपर्यंत वाढते पण नंतर मात्र जमीन नापीक व्हायला सुरुवात होते व उत्पादनात घट होते.
शेतकरी वेगवेगळ्या रासायनिक खतांचा वापर करून जमीन बनवत आहे. परंतु या जमिनी खरोखरच सुपीक आहेत का? याचा विचार करणे गरजेचे आहे. कारण सर्वच उत्पादनक्षम जमिनी सुपीक नसतात. जमिनीची सुपिकता वाढवणे आणि टिकवणे या गोष्टी शाश्वत शेती उत्पादनासाठी फार महत्त्वाचे आहेत. दरवर्षी शेतातल्या जमिनीतली माती पावसाच्या पाण्याने वाहून जाते. त्यासाठी काहीतरी नियोजन करायला हवे.माती वाहून जाऊ नयेम्हणून बांधबंदिस्ती करायला हवी हे सर्व जण करत नाहीत.
लेखक
मिलिंद जि. गोदे
Share your comments