तरीही आज घडीला या पिकाची फुलशेती ही आर्थिकदृष्ट्या अतिशय परवडण्यासारखी आहे. !
आजपरिस्थितीत निशिगंधा (रजनीगंधा) या फुलाला मागणी नसेल असे चित्र कुठेही नाही..!
त्यामुळे मित्रहो साधारणपणे 10 गुंठे मध्ये साधारणतः 4 हजार ते 5 हजार कंद लावून आपण या पिकाची शेती सुरू करू शकता.
निशिगंधा (रजनीगंधा) लागवडीचे नियोजन
लागवड केल्यापासून निशिगंधा (रजनीगंधा) हे पीक २ ते ३ वर्षे त्याच जमिनीमध्ये असते. त्यामुळे जमिनीची चांगली मशागत करावी. लागवड पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत करावी.
नवीन लागवडीचे नियोजन
या फुलशेती ची लागवड आपण बारमाही पाण्याची सुविधा असल्यास कधीपण करू शकता.
लागवडीची पद्धत
गादी वाफे : आकार ९० सेंमी रुंदी, ४५ सेंमी उंची ठेवावी.
सरी : दोन रोपांमधील अंतर ३० बाय ३० सेंमी ठेवावे.
खत व्यवस्थापन
हेक्टरी ४० ते ५० टन शेणखत जमिनीत मिसळावे.
हेक्टरी २०० किलो नत्र, १५० किलो स्फुरद, २०० किलो पालाश तीन हप्यामध्ये (लागवडीच्या वेळी, लागवडीच्या ४५ दिवसानंतर व लागवडीच्या ९० दिवसानंतर) द्यावे
जाती
सिंगल (पाकळ्यांचा एक थर)
सिंगल प्रकारच्या जातींची लागवड ही सुट्टी फुले तसेच फुलदांडे उत्पादनासाठी केली जाते.
या प्रकारात अर्का प्रज्वल, अर्का निरंतर, फुले रजनी, सुवासिनी, बिदान रजनी, पुणे लोकल या जाती उपलब्ध आहेत.
डबल (पाकळ्यांचा एकापेक्षा जास्त थर)
डबल प्रकारच्या जातींची लागवड ही फुलदांड्यांच्या उत्पादनासाठी घेतली जाते.
या प्रकारात वैभव, फुले रजत, अर्का शृंगार, पुणे डबल या जाती उपलब्ध आहेत.
कंद प्रक्रिया
लागवडीपूर्वी ३० ग्रॅम वजनाचे कंद कार्बेन्डाझिमच्या द्रावणात (१० लिटर पाण्यात २ ग्रॅम) २० मिनिटे ठेवावेत. त्यानंतर लागवड करावी.
आच्छादन आणि ठिबक सिंचनावर लागवड
या पद्धतीचा वापर केल्याने मजुरीचा खर्च तसेच पाण्याची बचत होते. ठिबक सिंचनातून पिकाच्या गरजेनुसार काटेकोर पद्धतीने पाणी आणि गरजेनुसार खतांची मात्रा देता येते. लागवड करताना गादी वाफ्यांची रुंदी १.२ मी, उंची ३० ते ४० सेंमी तर लांबी गरजेनुसार ठेवावी. दोन वाफांमध्ये ५० ते ६० सेंमी अंतर ठेवावे. या जागेचा वापर फुले तोडणी तसेच आंतरमशागतीची कामे करण्यासाठी होतो. तसेच दुसऱ्या वर्षी जास्त दाटी होत नाही. झाडांमध्ये हवा खेळती राहून फुलांचे उत्पादन चांगले मिळते. झाडांची वाढ झाल्यानंतर मुख्य कंदाच्या बाजूने फुटवे निघण्यास सुरवात होते, तेव्हा मल्चिंग पेपरचे छिद्र मोठे करावे. साधारणपणे एका वाफ्यावर कंदाच्या दोन ओळी लावाव्यात. यामध्ये २ किंवा १ ड्रीपचे लॅटरल पाईप वापरता येतात.
जुन्या लागवडीचे व्यवस्थापन
एक वर्षापेक्षा जुन्या लागवडीची योग्य काळजी घ्यावी.
उन्हाळा असल्यामुळे पाणी देणे चालू ठेवावे.
जुनी मेलेली, सुकलेली पाने काढून टाकावीत. फुले संपलेले आणि वाळलेले फुलांचे दांडे कापून टाकावेत.
खतांचे प्रमाण कमी करावे. पाऊस सुरू होण्यापूर्वी सरी किंवा वाफे स्वच्छ करून माती भरणी करावी. शक्य असल्यास शेणखत मिसळून नंतरच माती भरावी.
कंद काढणी
कंद पूर्णपणे तयार झाल्यानंतर पाने सुकतात. अशावेळी पाणी देणे थांबवावे, एक आठवड्याने कंद काढण्यास सुरवात करावी.
कंद काढतेवेळी त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.काढलेल्या कंदाची लगेच लागवड करू नये. काढणीनंतर किमान १० ते १५ दिवस कंद सावलीत सुकवावेत.
लागवडी पूर्वी कंदांना कार्बेन्डाझिम (१० लिटर पाण्यात २ ग्रॅम)ची बेणे प्रक्रिया करावी. नंतरच लागवडीसाठी वापर करावा.
Share your comments