MFOI 2024 Road Show
  1. कृषीपीडिया

कडूनिंब : पृथ्वीतलावरील सुवर्ण वृक्ष.

शेतकरी बंधुंनो पैसे काय झाडाला लागतात? अशा उक्तीचा आपण बऱ्याच वेळा वापर करतो आणि खरोखरच आहे की पैसे झाडाला लागत नाहीत.परंतु आपण बारकाईने खोलवर विचार केला तर आपल्या लक्षात येईल खरोखरच पृथ्वीतलावर मानव जाती करिता सुवर्ण वृक्ष म्हणून ज्याचा उल्लेख करता येईल असा वृक्ष म्हणजे कडूनिंब होय . कडुनिंबाचा उल्लेख गरिबांचा धन्वंतरी किंवा खेड्यातील दवाखाना किंवा परकीय चलन मिळवून देणारा सुवर्णक्षण असा केला जातो.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
कडूनिंब : पृथ्वीतलावरील सुवर्ण वृक्ष.

कडूनिंब : पृथ्वीतलावरील सुवर्ण वृक्ष.

शेतकरी बंधुंनो कडुनिंबाचा प्रत्येक भाग हा बहुगुणी व बहुपयोगी असून त्याचे व्यापारी तत्त्वावर सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज आपण या पहिल्या भागात कडूनिंबा मधील विविध भागाचे उपयोग व महत्त्व तसेच सारांश रुपात कडुनिंबाच एक झाड मानवाला त्याच्या आयुष्यात सरासरी काय देणगी देऊन जातं या बाबी विषयी थोडे जाणून घेऊ या.

 (A) कडुनिंबाच्या विविध भागाचे उपयोग व महत्व

(१) कडुनिंबाची पाने : कडू निंबाच्या पानात अनेक औषधी गुणधर्म आहेत. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कडुनिंबाच्या पानाचा रस पितात किंवा पाने खातात. गजकर्ण, सूज ,हिवताप ,आतड्यातील बुरशी, इत्यादी व्याधीवर कडुनिंबाचा काढा प्रभावशाली असल्याचे आढळून आले आहे.जखमा लवकर भरून येण्यासाठी कडुनिंबाची पाने ठेचुन जखमेवर बांधतात. कडुनिंबाची पाने कडू व शीतकारक असतात. कडुनिंबाच्या पानांची पावडर तयार करून दंतमंजन म्हणून सुद्धा त्याचा उपयोग केला जातो.घरगुती धान्य दीर्घकाळ टिकण्यासाठी कडूनिंबाच्या पानाचा कीड प्रतिरोधक म्हणून उपयोग केला जातो. नैसर्गिक रित्या कडुनिंबाच्या पानगळी मुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थ वाढतात तसेच कडुनिंबाचा पाला, जमिनीत असणाऱ्या किडीच्या कोषअवस्थेचा नाश करण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरतो. घरात कडुनिंबाची पाने जाळल्यास घरातून डास पलायन करतात.

(२) कडूनिंबाची फुले : शेतकरी बंधूंनो साधारणता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मे महिन्याच्या शेवटपर्यंत कडुनिंबाला चांगला मोहोर येतो. कडूनिंबाची फुले कडू असतात व त्यांच्यात कफ नाशक गुणधर्म असतो. कडू निंबाच्या मोहराला असलेला वैशिष्ट्यपूर्ण रंग व गंध यामुळे मधमाशा मकरंद गोळा करण्याकरिता गर्दी करतात.

(३) कडूनिंबाची फळे किंवा बी : कडुनिंबाच्या फळांमध्ये Azadirachtin, Melian triole, Nimbin and Nimbicidin, Salanin इत्यादी सक्रिय रासायनिक घटक किंवा अल्कलाईड असतात . कडुनिंबातील फळांमध्ये असणाऱ्या या सक्रिय घटकामुळे मानवास तसेच पिकांना हानिकारक किडीचा व रोगाचा प्रतिबंध मिळण्यास मदत मिळते. कडुनिंबाच्या बियापासून किंवा फळापासून बनवलेली अनेक कीटकनाशके बाजारात उपलब्ध आहेत व ती कीड व्यवस्थापनात प्रभावी आढळून येत आहेत तसेच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून व मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा ती सुरक्षित आहेत. बरेच शेतकरी बंधू घरच्या घरी कडुनिंबाच्या बियाचा अर्क तयार करून त्याचा कीटकनाशक म्हणून सुद्धा वापर करतात. कडुनिंबाच्या बियापासून साधारणता वजनाच्या 50 टक्के तेल मिळते. हे तेल खूपच उपयुक्त असून औद्योगिक उत्पादनात या तेलास अनन्य साधारण महत्व आहे. शेतकरी बंधूंनो भारतात मुख्यता साबणाच्या उत्पादनात उत्पादनात कडुनिंबाच्या तेलाचा उपयोग होतो. याशिवाय टूथपेस्ट, सौंदर्यप्रसाधन, विविध क्रीम ,हेअर ड्राय लोशन, शाम्पू नेल पॉलिश इत्यादी उत्पादनात कडुनिंबाचा मोठा वाटा आहे.तेल काढल्यानंतर शिल्लक राहिलेल्या निंबोळी पेंडी मध्ये शेनखतापेक्षा अधिक नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम व मॅग्नेशियम आढळते. सेंद्रिय खत म्हणून निंबोळी च्या पेंडचा चांगला उपयोग होतो. निंबोळी फळातील गर खाण्यासाठी तसेच मूळव्याधीवर उपचार म्हणून उपयोगात आणला जातो.

(४) कडुनिंबाची साल : शेतकरी बंधूंनो कडुनिंबाची साल सुद्धा बहुगुणी असून दंतरोग, हिवताप तसेच कावीळ वरील औषधाच्या निर्मितीसाठी कडुनिंबाच्या सालीत असणाऱ्या टॅनिन चा उपयोग करतात.

(५) कडुनिंबाचे लाकूड : शेतकरी बंधूंनो कडुनिंबाचे लाकूड सागाच्या लाकडावर प्रमाणे बळकट असल्याने इमारतीच्या बांधकामासाठी त्याचा उपयोग केला जातो. कडुनिंबाच्या लाकडापासून कोरीव कलाकुसर, दरवाजे ,शोभिवंत छत, सामानसुमान भरण्याची खोकी खेळणी ,शेतीची अवजारे फर्निचर इत्यादी बनवता येते. कडुनिंबाच्या लाकडाला सहजासहजी कीड लागत नाही किंवा पाण्यात ते लवकर कुजत नाही.

(६) कडुनिंबाचे खोड व फांद्या : शेतकरी बंधुंनो कडुलिंबाच्या खोडापासून निंबिन व निंबडीन हे घटक मिळतात. कडू निंबाच्या खोडावर जखमा केल्यास डिंकासारखा रस पाझरतो. या रसाचा उपयोग डिंकासारखा होत नसला तरी प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्याने दक्षिण आशिया मध्ये निम डिंक अन्नात वापरतात. दातांच्या आरोग्यासाठी कडूनिंब मौल्यवान आहे. सकाळी कडुनिंबाच्या हिरव्या काडीचा दंतमंजना सारखा उपयोग करून दात हिरड्या साफ करता येतात.

(७) कडूनिंबाची मुळे : शेतकरी बंधूंनो कडुनिंबाच्या मुळ्या ओसाड माळराने, खडकाळ जमिनी, डोंगर उतारावर च्या जमिनी ,खारवट नापीक जमीन,तसेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जमिनीत खोलवर जातात व पाणी शोषून घेतात व या मुळ्यांना इजा झाली तर पुन्हा फुटवे फुटतात. बंधुंनो या कडुनिंबाच्या मुळामध्ये असलेल्या वैशिष्ट्यामुळे कडुनिंबाचे झाड प्रतिकूल परिस्थितीत तग धरून राहते व आपल्याला त्याचा खरा फायदा मिळतो.

 

(B) कडुनिंबाच एक झाड त्याच्या सरासरी आयुष्यात मानवाला काय देणगी देऊन जातात जात?

शेतकरी बंधूंनो सर्वसाधारणपणे सुरुवातीच्या पाच वर्षात कडुनिंबाची मुळे प्रथम खोलवर जमिनीत जातात आणि आणि त्यानंतर त्यांची खरी वाढ होते.

कडुनिंबाच्या लागवडीनंतर साधारणता पाच वर्षानंतर चांगली फळधारणा सुरू होते. सर्वसाधारण आदर्श परिस्थितीत एक कडुनिंबाचे झाड तीस ते पन्नास वर्षे जगू शकत. मध्यम आकाराच्या आठ मीटर उंचीच्या दहा ते पंधरा वर्षाच्या कडुनिंबाच्या वृक्षापासून प्रतिवर्षी 50 किलो पानाचे उत्पादन 35 ते 50 किलो निंबोळी बी आणि आणि ताज्या निंबोळ्या पासून 45 ते 50 टक्के तेल मिळतं. एका पंधरा वर्षाच्या आदर्श कडुनिंबाच्या वृक्षापासून चारशे किलो जळाऊ लाकूड मिळते व या लाकडापासून विविध वस्तू तयार करता येतात .

शेतकरी बंधूंनो वर निर्देशित सर्व बाबी मुळेच कडुनिंबाला सुवर्ण वृक्ष म्हणजे मौल्यवान देणगी देणारा वृक्ष म्हणून संबोधले जाते. 

 

राजेश डवरे कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.

English Summary: Nim is golden plant on earth Published on: 20 December 2021, 03:09 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters