सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्राच्या बहुतेक भागातील शेतकरी विशेषतः जळगाव, धुळे, नासिक अहमदनगर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी विशेषतः फळबागांसाठी तसेच भाजीपाला व अन्य पिकांसाठी मल्चिंग पेपरचा वापर करताना दिसतात. कारण मल्चिंग पेपरचा वापर हा अनेक दृष्टीने फायदेशीर आहे. पण मल्चिंग पेपर वापरताना बरीचशी काळजी घ्यावी लागते. व्यवस्थितपणे पाण्याचे नियोजन करावे लागते याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक असते.
मल्च फिल्मची निवड कशी करावी-
मल्चिंग पेपर हे वेगवेगळ्या रंगांमध्ये, आकारामध्ये असतात. रंग, जाडी, आकार इ. गोष्टींचा विचार करून पिकांच्या गरजेनुसार मल्चिंग पेपरची निवड करावी लागते. उदा. भुईमूग पिकासाठी जर मल्चिंग पेपर वापरायचे ठरवले तर सात मायक्रॉन जाडीचा पेपर वापरायचा असतो. एक वर्षाच्या कालावधीची पिके असतील तर २० ते २५ पंचवीस मायक्रॉन जाडीचा पेपर वापरणे फायद्याचे असते. मध्यम कालावधीच्या पिकांसाठी ४० ते ५० मायक्रॉन जाडीचा व बहुवार्षिक पिकांसाठी ५० ते १०० मायक्रोन जाडीचा पेपर वापरणे फायद्याचे असते.
मल्चिंग पेपर कसा वापरावा-
- ज्याठिकाणी किंवा ज्यापिकासाठी मल्चिंग पेपर वापरायचा आहे. त्यावेळी प्रथम संबंधित पिकासाठी लागणारे बेड व्यवस्थित तयार करावे.
- बेड तयार करताना माती, दगड, काडी कचरा काढून स्वच्छ माती युक्त बेड तयार करावे.
- बेड तयार केल्यानंतर संपूर्ण बेड व्यवस्थितपणे ओले करावे व चांगला वापसा आल्यानंतर पेपर बेडवर व्यवस्थितपणे अंथरावा त्यामुळे हवा इत्यादी घटकांचा प्रभाव न होता बाष्पीभवन रोखले जाते.
- विविध पिकांच्या लागवड अंतर वेगवेगळे असते त्या लागवड अंतरानुसार पेपरचे अंतर ठरवली जाते.
- आपल्याला जेवढा पेपर आवश्यक आहे, तेवढा पेपर व्यवस्थित कापून घ्यावा.
मल्चिंग पेपर वापरतांना घ्यावयाची काळजी
मल्चिंग पेपर अंथरतांना सर्वात जास्त लक्ष तापमानावर द्यायचे म्हणजे उन्हाचे प्रमाण जास्त असेल व वातावरणात तापमान जास्त असेल तर अशावेळी पेपर अंथरू नये. कमी ऊन असताना शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी पेपर अंथरावा.
पेपर फिल्मला छिद्रे पाडत असताना फार काळजी घेणे आवश्यक आहे. कारण छिद्रे पाडत असताना ठिबक नळ्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. मल्चिंग पेपरला छिद्रे पाडत असताना ते छिद्रे एक समान असावेत व छिद्रे पाडतांना पेपरला छिद्र पडू नये याची काळजी घ्यावी. शक्यतो छिद्र पाडताना ते मलचिंग ड्रिलच्या साह्याने पाडावे. त्यामुळे छिद्र एकसारखे व पेपर ही फाटत नाही.
पाणी देण्याची पद्धत
बेडवर मल्चिंग पेपर अंथरल्या पूर्वी ठिबक च्या नळ्या टाकाव्यात कारण बऱ्याचदा भाजीपाला पिकांसाठी ठिबक सिंचनाची आवश्यकता असते. भुईमूग सारख्या पिकांसाठी तुषार सिंचनाचा वापर करू शकतात.
मल्चिंग पेपर वापरण्याचे फायदे
- उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते त्यामुळे आपल्याला उपलब्ध पाण्यात नियोजन करावे लागते. मल्चिंग पेपर असेल तर पाण्याचे बाष्पीभवन पूर्णतः थांबते व पाण्याची बचत होते. त्यामुळे बाष्पीभवनामुळे जमिनीच्या वरच्या भागात होणारे क्षारांचे संचयन थांबते.
- खतांच्या एकूण मात्रेत बचत होते कारण मल्चिंग पेपरमुळे खत पाण्यात वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते.
- जमिनीत होणाऱ्या हानिकारक सूक्ष्मजीवांची वाढ थांबते.
- मल्चिंग पेपरमुळे तण वाढू शकत नाही कारण पेपरमुळे तळापर्यंत सूर्य प्रकाश पोहोचत नाही, त्यामुळे तणांची वाढ होत नाही व त्यांचा प्रादुर्भाव कमी होतो.
- जमिनीचे तापमान वाढल्यामुळे जमिनीचे निर्जंतुकीकरण होते.
- मल्चिंग पेपर आच्छादनाच्या खाली सूक्ष्म वातावरण निर्मिती होते. ज्यामध्ये कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण अधिक असते.
- मातीला व पिकांना आवश्यक असलेल्या सूक्ष्मजीवांची वाढ होते.
- जमिनीचे मौलिक गुणधर्म सुधारतात उगवण दोन-तीन दिवस लवकर होते.
- भुईमुगाचा सारख्या पिकात मुळांवरील गाठीचे प्रमाण वाढते.
- पावसाळ्यात पावसामुळे होणारी जमिनीची धूप थांबते.
त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी खर्चिक असलेल्या मल्चिंग पेपरचा वापर करून अधिक उत्पादन वाढ करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकावे जेणेकरून कमी उत्पादन खर्चात अधिक उत्पन्न मिळेल.
Share your comments