झेंडू हे फक्त राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात महत्वाचे फुलपिक आहे. या फुलांचा उपयोग फुलांच्या माळा करणे, व्यासपीठ सजविणे यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. याशिवाय निरनिराळया पुष्प रचनेमध्ये, बगीच्यांमध्ये रस्त्यालगत, तसेच कुंड्यांमध्ये लागवड केली जाते. झेंडूचे पीक राज्यात तिन्ही हंगामात घेतले जाते व त्यास मोठ्या प्रमाणावर मागणी असते. झेंडूचा उपयोग मुख्यत्वे करून सुट्या फुलान्साठीच केला जातो.
झेंडूची लागवड
नवीन फळबागेत आंतरपीक म्हणुन करता येते.
तसेच भाजीपाल्याच्या पिकात - मिश्र पीक म्हणुन झेंडू घेता येतो. कोरडवाहू पीक म्हणून अन्य पिकांबरोबर झेंडूची शेती करता येते. झेंडूची स्वतंत्र लागवड देखील करता येते.
झेंडूसाठी कशी लागते जमीन?
हलकी ते मध्यम. सामू ७ ते ७.५ पर्यंत. भरपूर सेंद्रिय कर्बनी युक्त, पाण्याचा चांगला निचरा होणारी.
भारी आणि सकस - रोपे खूप वाढतात परंतु फुले कमी मिळतात.
झेंडूच्या जाती नेमक्या कोणत्या बरं?
आफ्रिकन आणि फ्रेंच असे दोन प्रकार पडतात.
अ) आफ्रिकन झेंडू :
१) क्रेकर जॅक २) आफ्रिकन टॉंल डबल मिक्सड ३) यलो सुप्रीम ४)गियाना गोल्ड ५) स्पॅन गोल्ड ६) हवाई ७) अलास्का ८) आफ्रिकन डबल ऑरेंज ९) सन जाएंट
आ) फ्रेंच झेंडू :
१) स्पे २) बटरबॉल ३) फ्लेश ४) लेमन ड्रोप्स ५) फ्रेंच डबल मिक्स्ड
इ) फ्रेंच हायब्रिड :
१) पेटीट २) जिप्सी ३) हार्मनी हायब्रिड ४) रेड हेड ५) कलर मॅजीक ६) क्वीन सोफी ७) हार बेस्टमून
ई) झेंडूच्या प्रचलित जाती :
१) मखमली २) गेंदा ३) गेंदा डबल
सुधारित संकरीत झेंडूच्या जाती
- पुसा नारंगी, (क्रॅकर जॅक जर गोल्डन जुबिली):- या जातीस लागवडीनंतर १२३-१३६ दिवसानंतर फुले येतात. झुडुप ७३ से. मी. उंच वाढते व वाढ देखील जोमदार असते. फुले नारंगी रंगाची व ७ ते ८ से. मी. व्यासाची असतात. हेक्टरी उत्पादन ३५ मे. टन / हेक्टर याप्रमाणे येते.
- पुसा बसंती (गोल्डन यलो जरसन जायंट):- या जातीस १३५ ते १४५ दिवसात फुले येतात. झुडुप ५९ से. मी. ऊंच व जोमदार वाढते. फुले पिवळ्या रंगाची असून ६ ते ९ से. मी. व्यासाची असतात. प्रत्येक झुडुप सरासरी ५८ फुले देते. कुंड्यात लागवड करण्यासाठी ही जात जास्त योग्य आहे.
- एम. डी. यू.१:- झुडुपे मध्यम उंचीची असतात. ऊंची ६५ से. मी. पर्यत वाढते. या झुडुपास सरासरी ९७ फुले येतात व ४१ ते ४५ मे. टन प्रती हेक्टर याप्रमाणे उत्पादन येते. फुलांचा रंग नारंगी असतो व ७ से. मी. व्यासाची असतात.
झेंडूची लागवड कशी करणार?
- बियांपासून रोपे तयार करण्यासाठी २ x १ चौरस मीटर आकाराचे कुजलेले शेणखत टाकून गादीवाफे तयार करावेत. खात्रीच्या ठिकाणाहून बी अथवा रोपे आणावीत.
- एक हेक्टर लागवडीसाठी ७५० ते १२५० ग्रॅम बियाणे पुरेसे होते. लागवडीसाठी निवडलेले बियाणे शक्यतो मागील हंगामातील असावे.
- रोपांना ५ - ६ पाने आल्यावर म्हणजे हंगामाप्रमाणे पेरणीनंतर ३ - ४ आठवड्यांनी रोपांची शेतात लागन करावी.
झेंडूची लागवड
लागवडीपुर्वी सपाट वाफे अथवा सरी वाफे तयार करून घ्यावेत. जातीनुसार तसेच हंगामानुसार झेंडू लागवडीसाठी दोन ओळीत, दोन झाडात पुढीलप्रमाणे अंतर राखावे.
हंगाम नुसार झेंडू लागवडीचे अंतर
- पावसाळी
उंच ६० x ६० सेमी
मध्यम ६० x ६० सेमी
- हिवाळी
उंच ६० x ४५ सेमी
मध्यम उंच ४५ x ३० सेंमी
बुटका ३० x ३० सेंमी
- उन्हाळी
उंच ४५ x ४५ सेंटिमीटर
मध्यम उंच ४५ x ३० सेंटिमीटर
खते आणि पाणी व्यवस्थापन :
पहिली खुरपणी झाल्यानंतर झेंडूच्या पिकाला हेक्टरी २५ किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश मिळण्यासाठी देऊन झाडांना मातीची भर लावावी. फक्त नत्रयुक्त खत अथवा अधिक नत्र वापरु नये.
झेंडूच्या पिकाला पावसाळ्यात आवश्यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. झाडांना कळ्या आल्यापासून तोडणी संपेपर्यंत पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. तसेच याच काळात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी देऊ नये. उन्हाळ्यात ५ ते ७ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण :
१) लाल कोळी (रेड स्पायडर माईट) :
या किडीचा उपद्रव साधारणपणे फुले येण्याच्या काळात होतो. ही कीड पानांतील रस शोषून घेते. त्यामुळे झाडाची पाने धुरकट, लालसर रंगाची दिसतात.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात २० ग्रॅम (दोन काडेपेटी) प्रोटेक्टंट आणि २० ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक (८० %) या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.
२) केसाळ अळी (हेअरी कॅटरपीलर) :
ही अळी झाडाची पाने कुरतडून खाते, त्यामुळे पानाच्या फक्त शिराच शिल्लक राहतात.
उपाय : या अळीच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात २० ग्रॅम प्रोटेक्टंट अथवा २० मिली क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.
३) तुडतुडे (लीफ हॉपर) : या किडीची पिले आणि पौढ कीड पानांतील रस शोषून घेते. त्यामुळे पाने वाळतात आणि नंतर सुकतात. कोवळ्या फांद्यांमधील रस शोषून घेतल्यामुळे फांद्या टोकांकडून सुकत जातात.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात २० ग्रॅम प्रोटेक्टंट आणि १५ मिली लिटर मॅलॅथिऑन (५०% प्रवाही) या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.
महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण :
१) मुळकुजव्या : झाडाच्या मुळांवर बुरशीची लागण झाल्यामुळे झाडाची मुळे कुजतात, मुळांवर तपकिरी रंगाचे डाग पडतात. मुळांवर सुरू झालेली कुज खोडाच्या दिशेने वाढत जाते. त्यामुळे रोपे कोलमडतात आणि मरतात.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात ३० मिली जर्मिनेटर आणि २५ मिली कॉपर ऑक्सिक्लोराईद या प्रमाणात मिसळून रोपांच्या मुळांभोवती जमिनीत ओतावे.
२) पानांवरील ठिपके : या बुरशीजन्य रोगामुळे पानांवर तपकिरी रंगाचे गोलसर ठिपके पडतात. या ठिपक्यांचा आकार वाढत जाऊन ते एकमेकांत मिसळतात. त्यामुळे पानांवर काळसर तपकिरी रंगाचे वेडेवाकडे डाग दिसतात. काही वेळा पानांच्या देठावर आणि फांद्यावरही बुरशीची लागण दिसून येते.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी १० ल्लीतर पाण्यात ३० मिली थ्राईवर, २५ मिली क्रॉंपशाईनर किंवा २० ग्रॅम डायथेन एम - ४५ (७५ % पाण्यात मिसळणारी पावडर) या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.
फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री:
झेंडू लागवडीनंतर २.५ ते ३ महिन्यांनी फुले येतात.
लागन - जून तोडणी ऑगस्ट - सप्टेंबर
लागन - जानेवारी तोडणी मार्च - एप्रिल
झेंडूची पूर्ण उमललेली फुले देठाजवळ तोडून वेचणी करावी.
हारांसाठी देठविरहित फुले तसेच गुच्छ किंवा फुलदाणीसाठी देठासह फुले तोडावीत.
फुलांची तोडणी दुपारनंतर करावी.
फुले तोडताना कळ्या व कोवळ्या फांद्या यांना इजा करून नये.
तोडलेली फुले सावलीच्या ठिकाणी गारव्याला ठेवावीत.
कटफ्लॉवर्ससाठी ६ ते ९ फुलांच्या जुड्या बांधून त्या कागदी खोक्यांतून विक्रीसाठी पाठवाव्यात.
झेंडू पिकाचे उत्पादन किती येत असेल बरं?
पावसाळी पिक - सरासरी हेक्टरी ६ ते ८ टन
उन्हाळी पिक - उत्पादन हेक्टरी ३ ते ५ टन
फुलांचे पॅकेजिंग आणि साठवण करायची तरी कशी?
फुलांच्या काढणीनंतर त्यांच्या रंग, आकार व जातीनुसार फुलांची प्रतवारी करावी व नंतर फुले बांबूच्या करंड्यात भरावीत.
फुले बाजारात विक्रीसाठी पाठविताना पॉलिथीन पिशव्यांत अथवा पोत्यात भरून पाठवावीत.
कटफ्लॉवर्ससाठी फुलांच्या जुड्या बांधून वर्तमानपत्रात गुंडाळून फुले कागदी खोक्यांत भरावीत.
*झेंडूची तोडणी केलेली फुले पॉलीथीनच्या पिशवीत थंड जागी ठेवल्यास ६ ते ७ दिवसांपर्यंत चांगली राहतात.
फवारण्या नेमक्या कोणत्या आणि केव्हा?
१) पहिली फवारणी : (लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी)
जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १५ ० मिली. + १०० लि.पाणी.
२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी )
जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली + हार्मोनी २०० मिली. + १५० लि.पाणी.
३) तिसरी फवारणी : (लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी )
थ्राईवर ७५० मिली.+ क्रॉंपशाईनर ७५० मिली. + राईपनर ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली + हार्मोनी ३०० मिली. + २०० लि.पाणी.
४) चौथी फवारणी : (लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी )
थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली + न्युट्राटोन ७५० मिली + हार्मोनी ४०० मिली. + २५० लि.पाणी.
Share your comments