विविध पिके जसे सोयाबीन,तंबाखू , तूर,हरभरा,मिरची,कोबी,फ्लॉवर,सूर्यफूल,भेंडी व काही गवंतांवर आढळते. एखाद्या भागामध्ये अनुकूल हवामाना तयार झाल्यामुळे तिचा जेव्हा प्रचंड प्रादुर्भाव होतो (आऊटब्रेक), त्यावेळीच तिचे असे लष्करी स्वरूप पाहण्यास मिळते, अन्यथा ती विखुरलेल्या स्वरूपात दिसते व वर्षभर सक्रिय असते. हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा/बोंड अळी/घाटेअळी ही भारतातील प्रथम क्रमांकाची गंभीर नुकसान करणारी व महत्त्वाची अळी समजली जाते; मात्र अलीकडे या अळीला मागे सारून स्पोडोप्टेरा अळी तिची जागा घेते की काय, अशी भीती वाटू लागली आहे.
राष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञांचे मत:-हैदराबाद येथील इक्रिसॅट या आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन संस्थेत, तसेच इंदूर (मध्य प्रदेश) येथील राष्ट्रीय सोयाबीन संशोधन संचालनालयात (पूर्वीची एनआरसी फॉर सोयाबीन) या किडीवर संशोधन झाले आहे.स्पोडोप्टेरा अळीसाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन(IPM) पद्धत सर्वांत महत्त्वाची आहे.
प्रादुर्भाव थोडा कुठे दिसू लागला की त्वरित उपाय कराल, तर पुढील मोठे नुकसान टाळता येऊ शकते. बरं, एकात्मिक कीड व्यवस्थापन(IPM) पद्धत काही महागडी नाही, स्टेप बाय स्टेप आणि अत्यंत वेळेवर उपाय कराल, तर या अळीवर नियंत्रण मिळवणे अवघड जाणार नाही. वर उल्लेखलेल्या संस्थांतील शास्त्रज्ञ म्हणतात, की ही अळी अत्यंत लहान अवस्थेत असतानाच तिचे नियंत्रण सोपे होते, ती मोठी झाली की नियंत्रण सोपे राहत नाही. एकात्मिक कीड व्यवस्थापन(IPM)च्या शिफारस पद्धती वापरल्या नाहीत, आपल्या सोयीस्कर पद्धतीने रसायने वापरली, तर पुढे एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या शिफारशी वापरूनही अळी आटोक्यात येणे अवघड जाते. नांगरणीवेळी कोष नष्ट करण्यापासूनच या अळीच्या नियंत्रणाकडे वळले पाहिजे. प्रादुर्भाव दिसतो आहे संभाव्य प्रादुर्भाव ओळखून प्रतिबंधक व नियंत्रण उपाय करायला हवा फक्त अंधाधुंद फवारणी करून उपयोग नाही. इक्रिसॅट संस्थेतील शास्त्रज्ञ म्हणतात की भुईमुगातील ही महत्त्वाची अळी आहे.
या किडीला प्रतिकारक जाती तपासण्याचे काम केले; मात्र अळीला कोणत्या जातीची चव आवडेल त्यावर तिचा प्रादुर्भाव अवलंबून राहतो. तशी ठाम प्रतिकारक जात कोणती आढळली नाही. मात्र ज्या वेळी खाद्य नसेल, त्या वेळी तिला पसंत नसणाऱ्या जातीवरही ती हल्ला करेल. शेतकरी रसायनांचा अनियंत्रित व चुकीचा वापर करतात.लेबल क्लेम हे वाचले सुद्धा जात नाही. रासायनिक किटकनाशकांच्या बाबतीतली छोटी चुक पुढे जाऊन मोठे नुकसान देऊ शकते व कीड रसायनाच्या बाबतीत प्रतिरोधक बनल्याने कीड वाढण्याचे नेमके कारणही समजून घेतले जात नाही. म्हणून रासायनिक कीटकनाशके फवारण्याआधीचे एनआरसीने स्पोडोप्टेरा अळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन(IPM) मॉडल तयार केले आहे.
महाराष्ट्रातील शास्त्रज्ञांचे मत:-
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ म्हणतात, की मोनोकल्चर म्हणजे एक पीक पध्दतीमध्ये ही समस्या उदभवू शकते.चंद्रपूर भागात सन २००८ मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात या अळीचा हल्ला होण्याचे कारण म्हणजे पेरणी जूनच्या पंधरवड्यात झाली. त्या काळात पाऊस झाला; पण तो जोरदार नव्हता. पुढेही जो पाऊस झाला तो हलका ते मध्यम, रिमझिम असाच झाला. ढगाळ वातावरण, ८० ते ९०% आर्द्रता या हवामानाच्या साथीमुळे स्पोडोप्टेरा किडीचे प्रजनन जलद होण्यास मदत झाली. साहजिकच तिचा उद्रेक झाला. अनेक शेतकऱ्यांनी मशागतीकडे योग्य लक्ष दिले नाही. ज्यांनी दिले, त्यांच्या शेजाऱ्यांनी तशी काळजी न घेतल्याने कीड त्यांच्या शेतात गेली. या किडीचे प्रमाण तपासण्यासाठी फेरोमोन ट्रॅप महत्वाची भूमिका बजावतात.
स्पोडोप्टेरा किडीची मादी एक वेळी ३०० ते ४०० अंडी पानांखाली घालते. त्यातून समजा १५० माद्या जन्मल्या व त्या पुढे सरासरी ३०० अंडी घालतील असे गृहीत धरले, तरी एक पिढी सुमारे ४५ हजार अळ्यांची निर्मिती करू शकते. दुसऱ्या पिढीत ही संख्या विश्वास बसणार नाही; पण ६० लाखांवर जाऊ शकते. या किडीची प्रजननक्षमता एवढी प्रचंड आहे. फेरोमोन ट्रॅप हे किडीचे सर्वेक्षण व किडीचे पतंग मोठ्या प्रमाणात पकडून भविष्यात होणाऱ्या अळीस अटकाव घातला जाऊ शकतो. या किडीसाठी फनेल ट्रॅपमध्ये स्पोडो ल्यूर लावली जाते. या ल्युरकडे प्रौढ नर पतंग आकर्षित होतात.
राष्ट्रीय सोयाबीन संशोधन संचालनालयाने दिलेली माहिती सोयाबीन, एरंडी, भुईमूग, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर आदी विविध पिकांवर तसेच तणांवरही स्पोडोप्टेरा अळी आढळते. रब्बी हंगामात सूर्यफूल, करडई, अगदी मिरची पिकाचे नुकसानही ती करते. अळी हीच नुकसान करणारी अवस्था आहे. आक्रमक होऊन ती पाने खाते.
संकलन - IPM school
Share your comments