सध्या दरवर्षी मुगाची मागणी बाजारपेठेत चांगली असून भावही चांगले मिळत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात मूग लागवड करण्याकडे बऱ्याच जणांचा कल दिसून येत आहे. उन्हाळ्यामध्ये देखील मुगाची लागवड केली तर भरपूर उत्पादन मिळू शकते. उन्हाळ्यामध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश व हवामान उष्ण असल्यामुळे मूग पीक चांगले प्रकारे येऊ शकते.
उन्हाळ्या मधील मूग लागवडीचा सगळ्यात जास्त महत्त्वाचा फायदा म्हणजे किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव फार कमी प्रमाणात होतो.जर सिंचनाची सुविधा उपलब्ध असेल तर मुगाचेचांगले उत्पादन उन्हाळ्यात मिळू शकते. या लेखात आपण उन्हाळी मूग लागवडीबद्दल माहिती घेऊ.
उन्हाळी मूग लागवड
- आवश्यक हवामान- आपल्याला माहित आहेच की मूग पीक खरीप हंगामात जास्त प्रमाणात घेतले जाते. मात्र सिंचनाची सुविधा उपलब्ध असेल आणि काही सुधारित जातीमुळे आता उन्हाळ्यातही वैशाखी मूगम्हणून लागवड केली जाते. हे पीक उष्ण हवामानात चांगले येते. साधारणपणे 21 ते 35 अंश तापमानात मुगाची चांगली वाढ होते.
- आवश्यक जमीन- उन्हाळी मूग पिकासाठी मध्यम ते भारी जमीन फायदेशीर असते. तसेच जमिनीत पाण्याचा चांगला निचरा होणारी व जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण चांगले असणारी असावी. उन्हाळी मूग लागवड करताना थंडीचे प्रमाण कमी झाल्यानंतर फेब्रुवारीअखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. पेरणी उशीरा झाली तर जून-जुलैमध्ये पडणाऱ्या पावसामुळे नुकसान होऊ शकते.
- उन्हाळी मुगाची लागवड व व्यवस्थापन- उन्हाळी मुगाची लागवड करण्यापूर्वी अगोदर शेत ओलूनचांगला वाफसा आल्यानंतर पेरणी करावी.पेरणी केल्यानंतर तीन ते चार दिवसांनी हलकेसे पाणी द्यावे. पहिल्या हलक्या पाण्या नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे आणि पिकाच्या गरजेनुसार आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
- पिकाच्या संपूर्ण कालावधीत पाच ते सहा पाण्याच्या पाळ्यांची आवश्यकता भासते. जर उन्हाळी मूग साठी तुषार सिंचनाचा वापर केला तर चांगला फायदा होतो. उन्हाळी मूगवर तसा कीड व रोगांचा प्रादुर्भाव फार कमी होतो. परंतु जरी भुरी व करपा या सारख्या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर रोग नियंत्रणासाठी अडीच ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक किंवा एक ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति लिटर पाण्यातून फवारावे.
- मुगाची काढणी व उत्पादन-उन्हाळी मूग 60 ते 65 दिवसात काढणीस येतो.जवळ जवळ 70 ते 75 टक्के शेंगा तयार होऊन वाळल्यावर पहिली तोडणी करावी. तयार शेंगा दोन ते तीन तोड्यामध्ये तोडून घ्यावे. चार ते पाच क्विंटल प्रति एकरी उत्पादन मिळू शकते.
Share your comments