1. कृषीपीडिया

जाणून घ्या खपली गहू लागवड कशी करावी?

खपली गव्हाखाली सध्या मर्यादित क्षेत्र आहे. दिवसेंदिवस हे क्षेत्र कमी होत चालले आहे. परंतु खपली गव्हामध्ये असणाऱ्या पोषक घटकामुळे त्याचे महत्व कायम आहे. खपली गव्हाखाली भारतात अंदाजे एक लाख हेक्टर क्षेत्र आहे. यातील बहुसंख्य खपली ही स्थानिक स्वरुपात खाण्यासाठी वापरली जाते. भारतामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात या राज्यात खपली गहू ठराविक जिल्ह्यामध्ये घेतला जातो. महाराष्ट्रामध्ये सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर व सातारा जिल्ह्यात खपली गव्हाची लागवड केली जाते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
खपली गहू लागवड

खपली गहू लागवड

बाजारपेठेमध्ये गव्हाच्या किमतीच्या तुलनेत खपली गव्हास चांगला दर मिळतो. त्या मुळे सुधारित रोग प्रतिकारक जाती व लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास शेतकरी ह्या पिकामध्ये चांगला आर्थिक फायदा मिळवू शकतात.

 

खपली गव्हाची वैशिष्ठे खालील प्रमाणे:

१) खपली गहू प्रामुख्याने पौष्टिक, वात-पित्तशामक, शक्ति वाढविणारा आहे.

२) खपली मधुमेह, हृदयविकार, आतड्यांचा कर्करोग, बद्धकोष्टता, हाडांची झीज भरून काढणारा, दातांच्या तक्रारी इत्यादी आजारांत आहारासाठी योग्य आहे.

३) खपली पचावयास हलकी आहे. शेवया, कुरडया, बोटुकली, खीर, रवा, पास्ता इ. पदार्थ बनवले जातात.

४) या गव्हापासून बनविलेली चपाती चवीला इतर सरबती जातीपेक्षा गोडसर असते.

५) या गव्हामध्ये १२ ते १५ टक्के प्रथिने, ७८ ते ८३ टक्के कर्बोदके आणि तंतूचे प्रमाण १६ टक्के आहे.

६) काळी, कसदार तसेच हलक्या, चोपण जमिनीमध्ये लागवड करता येते.

खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान

 

हवामान :

खपली गव्हास रात्री थंड आणि दिवसा कोरडे हवामान लागते. जास्त पावसात खपली तग धरू शकत नाही. ढगाळ हवामानात किड व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. खपली गव्हास वाढीच्या काळात साधारण १० अंश ते २३ अंश से. ग्रे. व दाणे भरण्याच्या अवस्थे मध्ये २५ अंश से. ग्रे. पेक्षा जास्त तापमान आवश्यक असते. तापमान थोडे वाढले तरी खपली गहू ते सहन करू शकतो.

 

जमीन व पूर्वमशागत :

खपली गहू काळ्या, कसदार व निच-याच्या जमिनीत चांगला येतो. तसेच हलक्या, क्षारपड व चोपण जमिनीमध्ये सुद्धा चांगले उत्पन्न मिळते. चांगल्या उत्पादनासाठी मातीचा सामू ६ ते ८ पर्यंत असावा. पिकाच्या उपयुक्त मुळ्या ६० ते ७५ सेंमी. खोलवर जात असल्यामुळे जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी, त्याकरता खरीप हंगामात पिक काढणी झाल्यावर लोखंडी नांगराने किंवा ट्रक्टरने १५ ते २० सेंमी. खोलवर जमीन नांगरावी आणि ३ ते ४ वेळा वखराच्या पाळ्या द्याव्यात व जमिनीत असलेली आधीच्या पिकाची धसकटे व तण वेचून जमीन स्वच्छ करावी.

 

खत व्यवस्थापन :हेक्टरी १० ते १२ टन शेणखत/कंपोस्ट खत प्रती हेक्टर कुळवाच्या पाळीने मिसळावे व जमीन पेरणीयोग्य करून घ्यावी. ६० किलो नत्र, ६० किलो स्फुरद, ४० किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. उर्वरित अर्धे नत्र पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी खुरपणीनंतर द्यावे.

 

बियाणे व बीजप्रक्रिया :बियाणे म्हणून वापरताना खपली गहू टरफलासहीत वापरला जातो. १ हेक्टर पेरणीसाठी १०० किलो बियाणे वापरावे. टोकन पद्धतीने लागवड करण्यासाठी ४० ते ५० किलो बियाणे पुरेसे होते. पेरणीपूर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा थायरम बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी तसेच २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर + २५ ग्रॅम स्फुरद विरघळविणा-या जीवाणुंची बीज प्रक्रिया गुळाच्या पाण्याबरोबर करावी, बियाणे सावलीमध्ये वाळवून पेरणी करावी.

 

खपली गव्हाच्या सुधारित जाती :

सुधारित वाण-----------उंची (से.मी.)-------पीक फुलावर येण्याचा कालावधी--------पिक तयार होण्याचा कालावधी---------उत्पादन क्वि/हे.

डीडीके-१००९----------------८१--------------------------७३-----------------------------------१०६-----------------------------------३९-४२

डीडीके-१०२९ ---------------८५--------------------------७२-----------------------------------१०७-----------------------------------४०-४४

एम.ए.सी.एस. २९७१-------८६--------------------------७०-----------------------------------११०-----------------------------------४६-५०

एच. डब्लू १०९८------------८५--------------------------७२-----------------------------------१०५------------------------------------४५-५०

 

आघारकर संशोधन संस्थेने २००९ साली एम.ए.सी.एस. २९७१ ही खपलीची अधिक उत्पन्न देणारी, बुटकी जात प्रसारीत केली आहे. या जातीच्या लागवडीची शिफारस महाराष्ट्र, कर्नाटक या भागासाठी वेळेवर पेरणीसाठी करण्यात आली आहे.

पेरणीपूर्वी अशी करा उगवण क्षमतेची चाचणी :खपली गव्हाची पेरणीपूर्वी उगवण क्षमता तपासताना १०० दाणे ओल्या गोणपाटावर रांगेमध्ये ठेवावे व गोणपाट झाकून ठेवावे त्यास रोज सकाळी गोणपाट ओलसर होईपर्यंत पाणी मारावे. ४-५ दिवसांनी गोणपाट उघडून मोड आलेले दाणे/बिया मोजाव्यात व उगवण क्षमता ८५% असल्यास बियाणे पेरणी साठी योग्य आहे असे समजावे.

 

पेरणी :पेरणीचे दोन ओळीतील अंतर २३ सें.मी. ठेवून करावी. बियाणे ५ से.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये, त्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता कमी होते. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा/वापसा असताना पेरणी करावी. पेरणी शक्यतो दक्षिण-उत्तर दिशेने करावी त्यामुळे पिकास पुरेसा सूर्यप्रकाश मिळुन उत्पादनामध्ये वाढ होते. तसेच उभी आडवी पेरणी करू नये. पेरणी शक्यतो दोन चाड्याच्या पाभरीने किंवा सुधारित खते व बियाणे पेरणी यंत्राने करावी, म्हणजे पेरणी बरोबरच रासायनिक खते देखील देता येईल. पेरणी केल्यानंतर लगेच पाणी द्या त्यामुळे उगवण चांगली होते. टोकन पद्धतीत सरी वरंबा पद्धत वापरावी बियाणे टोकन करताना वरंबा उतारावर टोकन करावी.

एकात्मिक तणनियंत्रण :पेन्डीमिथेलीन ३० % ई.सी हे तणनाशक पेरणीनंतर लगेच २.५ लिटर प्रति/हे. ६०० ते ८०० लिटर पाण्यात मिसळून जमिनीत ओलावा असताना फवारावे. पिक २५-३० दिवसांचे झाल्यावर १ खुरपणी/कोळपणी करावी. खुरपणी शक्य नसेल तर रुंद पानाच्या तणांच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर ३० दिवसांनी २,४-डी सोडियम हे तणनाशक प्रति हेक्टरी १.२ किलो ६०० ते ८०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तणनाशक जमिनीत पुरेसा ओलावा असताना फवारावे.

 

पाण्याचे नियोजन :खपली गव्हास मुकुट मुळे फुटण्याची अवस्था (२१-२५ दिवस), फुटवे फुटण्याची अवस्था (३०-३५ दिवस), कांडी धरण्याची अवस्था (४०-४५ दिवस), पिक फुलावर असताना (६०-७० दिवस) आणि दाणे चिकात असताना (७५-८५ दिवस) अशा पिक वाढीच्या नाजूक अवस्थामध्ये पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. दाणे पक्व होण्याच्या अवस्थेत पिकास पाणी देऊ नये. त्यामुळे पिक लोळण्याची व बुरशीजन्य रोग येण्याची शक्यता असते, अशा लोळलेल्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव जास्त होतो.

 

किड व रोग नियंत्रण :मावा व तुडतुडे : खपली गव्हामध्ये जास्तकरून मावा व तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीचे नियंत्रणासाठी प्रादुर्भाव दिसुन आल्यावर ५% निंबोळी अर्क २०० मि. ली. १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, प्रादुर्भाव जास्त असल्यास मिथाईल डिमेटॉन २५ टक्के प्रवाही ४०० मि.लि. किंवा थायामिथोक्‍झाम (२५ डब्ल्यू.जी.) ५० ग्रॅम किंवा ॲसिटामिप्रीड २५० ग्रॅम/ हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी १५ दिवसानी वरीलप्रमाणे करावी. जैविक उपायांमध्ये व्हर्टिसिलियम लेकॅनी किंवा मेटारायझियम ॲनिसोफिली २५० ग्रॅम /हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळुन १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे.

 

वाळवी :वाळवीचा बंदोबस्त करण्यासाठी बांधावर असलेली वारूळे खणुन काढावित व त्यातील राणीचा नाश करावा. वारुळ नष्ट केल्या नंतर जमीन सपाट करावी व मध्यभागी सुमारे ३० से.मि. खोलवर एक छिद्र करावे आणि त्यात क्लोरपायरीफॉस २० टक्के प्रवाही हे किटकनाशक १५ मि.लि. १० लिटर पाण्यात मिसळुन हे औषधाचे मिश्रण ५० लिटर एका वारुळासाठी या प्रमाणात वारुळात टाकावे किंवा क्विनॉलफॉस ५ % दाणेदार किंवा कार्बोफ्युरॉन ३ % दाणेदार हेक्टरी २५ किलो जमिनीत टाकावे किंवा शेणखताबरोबर शेतात टाकावे. जमिनीमध्ये निंबोळी पेंड २०० किलो प्रति हेक्टरी टाकावी.

रोग नियंत्रण :सुधारित खपली गहू वाण सहसा रोगास बळी पडत नाही त्यामुळे फवारणीची गरज भासत नाही. तरीपण बुरशीजन्य रोग आढळून आल्यास मॅन्कोझेब (डायथेन एम ४५) हे बुरशीनाशक २५ ग्रॅम, १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. काजळी किंवा काणी या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशकाची बिज प्रक्रिया करावी, तसेच शेतातील रोगट झाडे मुळासकट उपटून नष्ट करावीत.

उंदीर नियंत्रण :उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी विषयुक्त आमिषांचा वापर करावा. हे आमिष तयार करण्यासाठी वीघटक सौम्य विष तसेच झिंक फॉसस्फाईड वापरावे. प्रथम १०० ग्रॅम पिठामध्ये ५ ग्रॅम तेल व ५ ग्रॅम गुळ मिसळून त्याच्या गोळ्या २-३ दिवस उंदरांच्या येण्याजाण्याचा मार्गावर ठेवावे, त्यामुळे उंदरांना चटक लागेल. त्यानंतर वरीलप्रमाणे गोळ्या कराव्यात त्यात ३ ग्रॅम झिंक फॉस्फाईड टाकून, हातमोजे घालून किंवा काठीने मिश्रण करावे. पीठाच्या गोळ्या करून उंदरांच्या येण्याजाण्याचा मार्गावर ठेवाव्या जेणेकरून ते खाऊन उंदीर मरतील. मेलेले उंदीर पुरून टाकावेत. लोळलेल्या खपली मध्ये उंदीर प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. उंदरांचे प्रमाण जास्त आढळून असल्यास शेतात ४-५ पिंजरे प्रती एकर लावावेत.

 

अधिक उत्पन्न व गुणवत्ता मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे फवारण्या कराव्यात :खपली फुटवे फुटण्याच्या अवस्थेत असताना (३० दिवसांनी) १९:१९:१९ @ ७० ग्रॅम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. खपली दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरियाची फवारणी करावी.

खपली गव्हाची काढणी करताना खालील मुद्दे लक्षात घ्या :खपली कापणी करताना शक्यतो सकाळी करावी कारण सकाळी वातावरणात ओलावा असतो त्यामुळे ओंब्या गळून पडत नाहीत. दुपारी उन्हामध्ये तापमान वाढल्यास ओंब्या गळण्याची शक्यता जास्त असते. काढणी केल्यानंतर पेंड्या एक ते दोन दिवस उन्हामध्ये वाळवून मळणी यंत्राने मळणी करावी.

 

संकलन - संजय गानोरकर

प्रतिनिधी - गोपाल उगले

 

English Summary: Learn how to plant crusty wheat? Published on: 24 September 2021, 01:04 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters