1. कृषीपीडिया

जिरायत भागात कशी कराल गव्हाची लागवड; जाणून घ्या! सविस्तर माहिती

KJ Staff
KJ Staff


गहू हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. ज्याची भारतात एकूण अन्नधान्य उत्पादनाच्या जवळपास ३ टक्के भागीदारी आहे. सुमारे ७५-८०% गहू चपातीसाठी वापरला जातो. तसेच गव्हाचा उपयोग बेकरीमध्ये पाव, बिस्कीट, केक इ. पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. महाराष्ट्रात जिरायत गव्हाचे सरासरी हेक्टरी उत्पादन उत्तर भारताच्या तुलनेत फारच कमी आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात वर्षातून खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तीन कृषि हंगामात पिके घेतली जातात. महाराष्ट्रातील ८७% क्षेत्र हे अवर्षणप्रवण आहे. या सर्व क्षेत्रात खरीप हंगामातील पिके ही पावसाच्या पाण्यावर घेतली जातात. परंतु रब्बी हंगामातील पिके ही बहुतांश सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पेरली जातात. त्यासाठी अवर्षणप्रवण क्षेत्रात रब्बी जिरायत गहू उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविणे आवश्यक आहे.

आपण यामागील लेखात गव्हाची पेरणी कशी करावी याची माहिती घेतली. आता पण जिरायत शेतीत गव्हाची पेरणी कशी करायची आणि किडीचे व्यवस्थापनाविषयी माहिती घेणार आहोत. जिरायती गव्हाची लागवड ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. या पेरणीचा काळ १५ ते ३० ऑक्टोबर दरम्यान केली जाते. जिरायती पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर २३ सें.मी. ठेवावे. तर बियाणे ५ से.मी. पेक्षा जास्त खोल पेरु नये, त्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता कमी होते. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा/वापसा असताना पेरणी करावी. पेरणी शक्यतो दक्षिण-उत्तर दिशेने करावी त्यामुळे पिकास पुरेसा सूर्यप्रकाश मिळुन उत्पादनामध्ये वाढ होते.

 


जमीन:

गहू पिकासाठी चांगल्या निचऱ्याची भारी आणि खोल जमिनीची निवड करावी. हलक्या व मध्यम जमिनीत भरपूर भरखते घालणे आवश्यक आहे. जिरायत गहू ओलावा टिकवून धरणाऱ्या भारी जमिनीतच घ्यावा. जमिनीची पूर्वमशागत योग्य पद्धतीने करून जमीन तयार ठेवावी.

पूर्वमशागत:

गव्हाच्या पिकाकरिता जमीन चांगली भुसभुशीत होण्याकरिता योग्य व पुरेशी मशागत करणे आवश्यक असते. कारण गव्हाच्या पिकाच्या उपयुक्त मुळ्या ६० ते ७५ सेंमी. खोलवर जात असल्यामुळे पिक घ्यायचे आहे. त्या जमिनीची चांगली मशागत गरजेची असते. म्हणूनच, खरीप हंगामात पिक घेऊन झाल्यावर लोखंडी नांगराने १५ ते २० सेंमी. खोलवर जमीन नांगरावी आणि ३ ते ४ वेळा वखराच्या पाळ्या द्याव्यात. अशाप्रकारे मशागत केल्याने जमिनीत असलेली आधीच्या पिकाची धसकटे व तण वेचून जमीन स्वच्छ करणे शक्य होते.

 

पेरणीची वेळ: जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुस-या पंधरवड्यात करावी. म्हणजेच १५ ते ३० ऑक्टोबर दरम्यान.

पेरणी:

पेरणीचे दोन ओळीतील अंतर २३ सें.मी. ठेवून करावी. बियाणे ५ से.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये.  खोलवर पेरणी केल्यास बियाण्याची उगवण क्षमता कमी होते. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा/वापसा असताना पेरणी करावी. पेरणी शक्यतो दक्षिण-उत्तर दिशेने करावी, त्यामुळे पिकास पुरेसा सूर्यप्रकाश मिळुन उत्पादनामध्ये वाढ होते. तसेच उभी आडवी पेरणी करू नये. एकेरी पेरणीमुळे आंतरमशागत करणे सुलभ होते. पेरणी शक्यतो दोन चाड्याच्या पाभरीने किंवा सुधारित खते व बियाणे पेरणी यंत्राने करावी, म्हणजे पेरणीबरोबरच रासायनिक खते देखील देता येतील. जमिनीच्या उतारानुसार २.५ ते ४.० मीटर रूंदीचे व ७ ते २५ मीटर लांब सारे पाडावेत व उताराला आडव्या दिशेने पाट पाडावेत.

बियाणे व बीज प्रक्रिया:

जिरायत गव्हासाठी हेक्टरी ७५ ते १०० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा थायरम बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी तसेच २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर + २५ ग्रॅम स्फुरद विरघळविणा-या जीवाणुंची बीज प्रक्रिया गुळाच्या पाण्याबरोबर करावी. नंतर प्रक्रिया केलेले बियाणे सावलीमध्ये वाळवून पेरणीसाठी वापरावे.

सेंद्रिय तसेच रासायनिक खत व्यवस्थापन:

 • हेक्टरी १० ट्रक्टर ट्रोली शेणखत/कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत २ टन प्रती हेक्टर कुळवाच्या पाळीने मिसळावे.
 • जिरायत गव्हास पेरणीच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्र आणि २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश द्यावे.
 • गहू फुटवे फुटण्याच्या तसेच फुलोरा येण्याच्या अवस्थेत असताना १९:१९:१९ @ ७० ग्रॅम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 • गहू दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरियाची फवारणी करावी.

 


जिरायत/कोरडवाहू गव्हाचे सुधारित वाण

अ.क्र.

जात/ वाण

प्रसारण

वर्ष

फुलावर येण्याचा कालावधी (दिवस)

परीपक्व होण्याचा कालावधी (दिवस)

सरासरी उत्पादन

(क्वि/हे.)

वैशिष्ट्ये 

सरबती वाण

१.

एन. आय. ५४३९

१९७५

५५-६०

१०५-११०

१२-१५

चपातीसाठी चांगला

२.

एच.डी.२७८१ (आदित्य)

२००२

५५-६०

१००-११०

१६-१८

तांबेरा रोगास प्रतिकारक

३.

के.९६४४ (अटल)

२०००

६०-६२

११०-११५

११-१५

तांबेरा रोगास प्रतिकारक, उष्णता सहनशील

४.

एन.आय.ए.डब्लू. १४१५ (नेत्रावती)

२०१०

६०-६५

११०-१२०

१८-२०

१२ टक्क्यांपेक्षा अधिक, तांबेरा रोगास प्रतिकारक

बन्सी वाण

५.

एम.ए.सी.एस. १९६७

१९८७

५५-६०

१०५-११०

१०-१२

पास्ता साठी उत्तम

६.

एकेडीडब्लू २९९७-१६(शरद)

२००५

५०-६०

११०-११५

१२-१४

चपाती व पास्ता साठी उत्तम

७.

एन.आय.डी.डब्लू. १५ (पंचवटी)

२००२

५५-६०

११५-१२०

१२-१५

प्रथिने १२%, दाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक, तांबेरा रोगास प्रतिकारक

८.

एम.ए.सी.एस. ४०२८

(बायोफोर्टीफाईड वाण)

२०१८

५१-५५ (लवकर)

९९-१०५ (लवकर)

१८-२०

प्रथिने १४.७%,

जस्त ४०.३ पीपीएम,

लोह ४६.१ पीपीएम

तांबेरा रोगास प्रतिकारक


आंतरमशागत:

पेरणीपासून ३० ते ४० दिवसाचे आत तणाचे प्रमाण लक्षात घेवून एक किंवा दोनवेळा खुरपणी करावी. जरुरी प्रमाणे १-२ कोळपणी करून जमीन मोकळी करावी त्यामुळे तणांचा नाश होतो व जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते. जिरायती गव्हामध्ये जमिनीवर आच्छादनाचा वापर केल्यास बाष्पीभवन कमी होऊन जमिनीत ओलावा जास्त टिकून राहतो.

 पाणी व्यवस्थापन:

जिरायत गहू हा पावसावर आणि कमी पाणी असणाऱ्या भागामध्ये घेतला जातो. त्यामुळे पाण्याचे नियोजन नसल्यामुळे पिकासाठी पाणी देणे शक्य होत नाही. तरीही १ किंवा २ पाणी उपलब्ध झाले तर जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या पाळ्या कमी-जास्त असू शकतात. पाण्याचा साठा एकच पाणी देण्याइतका उपलब्ध असेल, तर पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी पाणी द्यावे. पाण्याचा साठा दोन पाणी देण्याइतका उपलब्ध असेल, तर पहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी आणि दुसरे पाणी ४० ते ४२ दिवसांनी द्यावे. गहू पिकाच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत, त्यावेळी पिकास पाणी देणे फायद्याचे आहे.

गव्हावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन:

जिरायत गहू पिकावर अनेक किडींची नोंद करण्यात आली असली तरी आपल्या जिरायत विभागात या पिकावर मुख्यतः खोड किडी, तुडतुडे, मावा, वाळवी इत्यादी व प्राण्यामध्ये उंदराचा प्रादुर्भाव होतो. त्याची व्यवस्थापनाबाबतची माहिती या ठिकाणी दिलेली आहे.

 खोडकिडाः

या किडीचे नियंत्रणासाठी उभ्या पिकातील किडग्रस्त झाडे आठवड्याचे अंतराने २-३ वेळा मुळासकट उपटून नाश करावीत, उभ्या पिकतात पीक पोटरीवर येण्याचे सुमारास हेक्टरी २ किलो कार्बारील ५० टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मावा व तुडतुडे:

या किडीचे नियंत्रणासाठी प्रादुर्भाव दिसून आल्यावर ५% निंबोळी अर्क २०० मि.ली. १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रादुर्भाव जास्त असल्यास मिथाईल डिमेटॉन २५ टक्के प्रवाही ४०० मि.लि. ५०० लिटर पाण्यात मिसळून फवीरणी करावी किंवा कार्बारील १० टक्के भुकटी हेक्टरी २० किलो या प्रमाणात धुरळावी. आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी/धुरळणी १५ दिवसांनी वरीलप्रमाणे करावी.

वाळवी किंवा उधई :

वाळवीचा बंदोबस्त करण्यासाठी बांधावर असलेली वारूळे खणून काढावीत व त्यातील राणीचा नाश करावा. वारुळ नष्ट केल्यानंतर जमीन सपाट करावी व मध्यभागी सुमारे ३० सें.मी. खोलवर एक छिद्र करावे आणि त्यात क्लोरपायरीफॉस २० टक्के प्रवाही हे किटकनाशक १५ मि.लि. १० लिटर पाण्यात मिसळुन हे औषधाचे मिश्रण ५० लिटर एका वारुळासाठी या प्रमाणात वारुळात टाकावे. किंवा क्विनॉलफॉस ५ % दाणेदार किंवा फोरेट १० % दाणेदार किंवा कार्बोफ्युरॉन ३ % दाणेदार हेक्टरी २५ किलो जमिनीत टाकावे किंवा शेणखताबरोबर द्यावे.

 


उंदीर:

उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी विषयुक्त आमिषांचा वापर करावा. हे आमिष तयार करण्यासाठी विघटक सौम्य विष तसेच झिंक फॉसस्फाईड वापरावे. प्रथम १०० ग्रॅम पिठामध्ये ५ ग्रॅम तेल व ५ ग्रॅम गुळ मिसळून त्याच्या गोळ्या २-३ दिवस उंदरांच्या येण्याजाण्याचा मार्गावर ठेवावे. त्यामुळे उंदरांना चटक लागेल. त्यानंतर वरीलप्रमाणे गोळ्या कराव्यात त्यात ३ ग्रॅम झिंक फोस्फाईड टाकून, हातमोजे घालून किंवा काठीने मिश्रण करावे. पीठाच्या गोळ्या करून उंदरांच्या येण्याजाण्याचा मार्गावर ठेवाव्या जेणेकरून ते खाऊन उंदीर मरतील. मेलेले उंदीर पुरून टाकावेत.

रोग व त्यांचे व्यवस्थापन :

 • तांबेरा व पानावरील करपा :

तांबेरा व करपा रोगापासून नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधक जातींचा वापर करावा. तांबेरा व करपा रोगाची लागण दिसताच मॅन्कोझेब (डायथेन एम ४५) हे बुरशीनाशक २५ ग्रॅम, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोगाची तीव्रता लक्षात घेउन १० ते १५ दिवसांचे अंतराने फवारण्या कराव्यात.

 • काजळी किंवा काणी:

या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास व्हिटॅव्हॅक्स किंवा कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाची २.५ ग्रॅम प्रतिकिलो याप्रमाणे बिज प्रक्रिया करावी. तसेच शेतातील रोगट झाडे मुळासकट उपटून नष्ट करावीत.

कापणी व मळणी:

पीक तयार होताच वेळेवर कापणी करावी. कापणीस उशीर झाल्यास गव्हाचे दाणे शेतात झडू शकतात. म्हणून पीक पक्व होण्याच्या २ ते ३ दिवसाअगोदर कापणी करावी व कापणीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५ टक्के असावे. गव्हाची मळणी यंत्राच्या सहाय्याने करावी किंवा गव्हाची कापणी व मळणी कंबाईन हार्वेस्टर मशीनने करावी.

उत्पादन:

जिरायती गव्हाचे भरघोस उत्पन्न मिळविण्यासाठी पेरणीच्या वेळेनुसार योग्य वाणांचा वापर, योग्यरीतीने पेरणी, बियाण्याचे प्रमाण, खतांचा समतोल वापर, पाण्याचा योग्यवेळी पाळ्या, आंतरमशागत व पीक संरक्षण या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. वरीलप्रमाणे गव्हाची जिरायत लागवड केल्यास सरासरी १२ ते १५ क़्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते.

जिरायत गव्हाची लागवड करताना खालील मुद्दे लक्षात घ्या.

 • गव्हाच्या कल्याण सोना, सोनालीका आणि लोकवन या जाती तांबेरा रोगास बळी पडत असल्यामुळे त्याची लागवड करु नये.
 • जमिनीची मशागत करताना खरीप पीक जर सोयाबीन किंवा गळीत धान्य असेल तर एकच कुळवणी करावी.
 • रासायनिक खताचा डोस शिफारसीप्रमाणे द्यावा.
 • बियाणे निवड करताना जिरायत लागवडीसाठी योग्य व सुधारित वाणाची निवड करावी.
 • बियाणे कीड व रोग मुक्त असावे.

 जिरायत गहू पिकात पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याचे तंत्रज्ञान:

रब्बी हंगामात पावसाचे पाणी गहू पिकाच्या जमिनीत कसे मुरवता येईल यासाठी खालील तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे.

 • बांध बंदिस्ती करणे:

ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पावसाची तीव्रता जास्त असल्यास व जमिन उताराची असल्यास, पावसाचे पाणी जास्त वेगाने वाहून जाते. त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी असते. त्यासाठी उथळ व मध्यम खोल जमिनीत समपातळीतील बांध व खोल जमिनीत ढाळेचे बांध टाकावेत. त्यामुळे जमिनीवरून वाहून जाणारे पावसाचे पाणी ठिकठिकाणी थोपविले जाईल व जमिनीत पाणी मुरवण्याची क्रिया दीर्घकाळ होऊन, जमिनीत ओलावा अधिक साठविण्यास मदत होते. तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढून विहिरीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते.

 • आंतरबांध व्यवस्थापन:

पावसाळ्यापूर्वी किंवा पावसाळा सुरू होताच जिरायत गहू पिकाखालील विशेषतः खोल जमिनीत लहान सरी वरंबे पाडून किंवा लहान सारे पडावेत व जमिनीत बांधणी करावी. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीवरून वाहून जाण्याचे प्रमाण कमी होत जास्त प्रमाणात जमिनीत मुरते. जमिनीत ओलाव्याची अधिक साठवण होते.

 


उतारास आडवी मशागत करावी:

बांध बंधिस्ती केलेल्या जिरायत गहू क्षेत्रात नांगरणी, कुळवणी, पेरणी व कोळपणी यासारखी शेती मशागतीची कामे जमिनीच्या उतारास आडवी करावीत. नांगरणीमुळे जमीन भुसभुशीत होऊन त्यात जास्त ओलावा साठवण्यास मदत होते. कुळवणी केल्यामुळे तणांचा नाश होतो. तणे पिकांपेक्षा दुपटीने अधिक ओलावा शोषून घेतात. त्यामुळे तणांचा बंदोबस्त केल्यास पिकास अधिक ओलावा मिळतो. तसेच जिरायत गव्हात आंतरमशागत केल्याने जमिनीच्या पृष्ठभागावर भुसभुशीत मातीचा थर तयार होतो व त्याचा आच्छादनासारखा काही प्रमाणात उपयोग होतो. त्यामुळे जमिनीस भेगा पडण्याचे प्रमाण कमी होते. तसेच जमिनीच्या भेगावाटे उडून जाणाऱ्या ओलाव्याची हानी कमी होते.

कोळपणी करणे अतिशय महत्वाचे आहे:

रब्बी हंगामात जिरायत गहू पीक वाढत असतांना त्याबरोबर तण देखील वाढत असते. हे तण पाणी, अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश याबाबतीत पिकांशी स्पर्धा करते. पीक उगवून आल्यानंतर त्यात ठराविक दिवसात कोळपणी करणे अतिशय महत्वाचे असते. त्याचा मुख्य उद्देश म्हणजे तण नष्ट करणे आणि वाया जाणारी ओल थोपविणे. “एक कोळपणी आणि अर्धे पाणी” अशी म्हण आहे. याचा अवलंब करून जिरायत रब्बी गव्हाकरिता दोन वेळेस कोळपणी करण्याची शिफारस केली आहे. पहिली कोळपणी पीक तीन आठवड्यांचे झाल्यावर करावी. दुसरी कोळपणी पिक ५ आठवड्यांचे झाल्यावर करावी. त्यावेळेस जमिनीत ओल कमी झाल्याने जमिनीला सूक्ष्म भेगा पडू लागतात. त्या कोळपणी केल्याने बुजल्या जातात. त्यामुळे बाष्पीभवनाची क्रिया मंद होते व जमिनीत ओलावा साठवून राहण्यास मदत होते. कोळपे चालविल्याने खोलवर मशागत करता येते आणि जमीन भुसभुशीत होवून मातीचा थर चांगला बसू शकतो. यामुळे जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहतो.

 • आच्छादनाचा वापर:

रब्बी हंगामामध्ये जिरायत गव्हात आच्छादनाचा वापर हा बाष्पीभवन थांबविणे आणि तणांचा बंदोबस्त करणे असा दुहेरी उपयुक्त आहे. आच्छादन साधारणपणे तूरकाठ्याचा भुसा, धसकटे, वाळलेले गवत, भाताचे काड किंवा भुसा इ. प्रकाराने करता येते. दर हेक्टरी ५ ते १० टन आच्छादनाचा वापर करावा. त्यामुळे पिकाचे ४० ते ५० टक्के उत्पादन वाढते असे सिध्द झाले आहे. आच्छादन जितक्या लवकर टाकता येईल तेवढ्या उपयुक्त ठरते. कोणत्याही परिस्थितीत पीक ६ आठवड्यांचे होण्याच्या आत आच्छादनाचा वापर करावा. त्यामुळे बाष्पीभवना वाटे होणाऱ्या ओलाव्याची हानी कमी होवून पिकास महत्वाच्या पाणी देण्याच्या अवस्थेत ३५ ते ५० मी.मी. ओलावा अधिक मिळतो. तसेच जमीन भेगाळण्याची तीव्रता कमी होते. म्हणूनच रब्बी जिरायत गव्हास आच्छादनाचा वापर करणे म्हणजे एक संरक्षक पाणी दिल्यासारखे आहे.

 • शेततळी:

साधारणतः एकूण पावसाच्या पाण्यापैकी १५ ते २० टक्के पाणी जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जाते. पाणलोट क्षेत्रात शेततळी खोदून असे वाहून जाणारे पाणी त्यात साठविता येतो. शेततळी पाणलोट क्षेत्राच्या खोलगट भागात खोदावेत. उंचवट्याच्या जमिनीवरून वाहून जाणारे पाणी तळ्याकडे वळवण्यासाठी योग्य ठिकाणी गवताचे रस्ते तयार करावेत. अशाप्रकारे तळ्यात साठविलेले पाणी पिकास पाणी देण्याच्या अवस्थेत संरक्षक पाणी म्हणून वापरता येते. रब्बी जिरायत गव्हास एक संरक्षक पाणी दिल्यास उत्पादनात ५० ते ६० टक्के वाढ होते. अशा पद्धतीने वरील सर्व बाबींचा आपण एकात्मिक अवलंब केल्यास पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरवून रब्बी हंगामातील जिरायत गव्हास वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी फायदेशीर होईल.

 

लेखक -

डॉ. विजेंद्र एस. बाविस्कर ; ८३७४१७४७९७

कृषि विद्यावेत्ता

अखिल भारतीय समन्वित गहू संशोधन प्रकल्प,

आघारकर संशोधन संस्था (महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी), पुणे ४११००४

डॉ. यशवंतकुमार के. जे., डॉ. सुधीर नवाथे,  श्री. एस. एस. खैरनार आणि श्री. विठ्ठल गीते

अखिल भारतीय समन्वित गहू संशोधन प्रकल्प, अनुवांशिक आणि वनस्पती पैदास विभाग

आघारकर संशोधन संस्था (महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी), पुणे ४११००४

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters