1. कृषीपीडिया

रब्बी हंगामात अशी करा गव्हाची शेती; जाणून घ्या! लागवड तंत्र

महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्वाचे पीक असुन गव्हाची लागवड जिरायती व बागायती अशा दोन्ही प्रकारच्या शेतात केली जाते. राज्यात गव्हाचे कमी उत्पादन होण्याची प्रमुख कारण म्हणजे कोरडवाहू लागवड.

KJ Staff
KJ Staff


महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्वाचे पीक असुन गव्हाची लागवड जिरायती व बागायती अशा दोन्ही प्रकारच्या शेतात केली जाते. राज्यात गव्हाचे कमी उत्पादन होण्याची प्रमुख कारण म्हणजे कोरडवाहू लागवड. योग्य वाणांची निवड न‌ करणे, नाजूक अवस्थेमध्ये पाण्याचा ताण, पीक संरक्षणाचा अभाव. गव्हाच्या अधिक उत्पादनासाठी वेळेवर पेरणी, योग्य वाणांचा वापर, योग्य पेरणीची पद्धत, खतांचा समतोल वापर, योग्य पाणी व्यवस्थापन व पीक संरक्षण या बाबी महत्त्वाच्या आहेत. यासर्व बाबींची माहिती आपण या लेखातून घेणार आहोत.

 जमीन

गव्हास पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन मानवते अशा जमिनीत गव्हाचे उत्पादन जास्त होते.

पूर्वमशागत

 खरीप पिकानंतर खोल नांगरणी करावी व वखर पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी.

 हवामान

गव्हाच्या वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी थंड हवामान खूप महत्त्वाचे असते.

 वाण

कोरडवाहू वाण :-  एके डी डब्ल्यू २९९७ -१६ (शरद) पिडीकेव्‍ही वाशिम, एम एसी एस १९६७, एन आय ५४३९

मर्यादित ओलीत:- पीडीकेव्ही वाशिम

बागायतीसाठी (वेळेवर पेरणीसाठी):- एके डब्ल्यू १०७१( पूर्णा )एकेडब्ल्यू ३७२२(विमल), एचडी-२१८९

बागायती (उशिरा पेरणीसाठी) :- पीडीकेव्ही सरदार, एके ए डब्ल्यू ४६२७

 


पेरणीची
वेळ

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात कोरडवाहू गव्हाची पेरणी करावी. तर बागायती गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत करू शकतो.

 बिजप्रमाण

बियाण्याचे प्रमाण गव्हाच्या जातीवर, पेरण्याच्या वेळेवर अवलंबून असते. कोरडवाहू जातीसाठी साधारण ७५ किलो प्रति हेक्टरी बियाणे लागते. तर बागायती गव्हाची वेळेवर पेरणी केल्यास १२५ किलो प्रति हेक्टर लागत असते. बागायती जमिनीवर गव्हाची उशिरा पेरणी केल्यास तेव्हा १५० प्रति हेक्टर एवढे प्रमाण लागते.

 बीजप्रक्रिया

बियाण्याची जमिनीतील बुरशीपासून तसेच कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची ठरते. गव्हाच्या बियाण्यास थायरम किंवा व्हिटावॅक्स ७५% भुकटी २.५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे. त्यानंतर जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी व बियाणे सावलीत घालावे.

पेरणी

कोरडवाहू गव्हाची पेरणी करताना जमिनीत ओलावा आहे, की नाही याची खात्री करावी. त्यानंतर पेरणी करावी बागायती गव्हाची पेरणीसाठी जमिनीत पुरेशी ओल नसल्यास सर्वप्रथम ओलित करावे नंतर पेरणी करावी. कोरडवाहू व बागायती गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर २२.५ सेंमी ठेवावी व उशिरा पेरणीसाठी १५ ते १८ सेंमी इतके ठेवावे. पेरणी करताना गव्हाचे बी जास्त खोल पडणार नाही याची दक्षता घ्यावी लागते.  साधारणतः ५ ते ६ सेंटीमीटर पेक्षा खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी.

 खत व्यवस्थापन

कोरडवाहू गव्हास प्रति हेक्टरी ४० किलो नत्र २० किलो स्फुरद द्यावे वेळेवर पेरणी असलेल्या बागायती गव्हास प्रति हेक्टरी  १०० ते १२० किलो नत्र ५० ते ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे.  बागायती उशिरा पेरणीसाठी ८० किलो नत्र ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश अशी खतांची मात्रा द्यावी.

 


तण नियंत्रण

 गव्हाच्या पिकास लागवडीपासून ३० ते ४० दिवस शेत तणविरहित असणे महत्त्वाचे असते. त्यासाठी तण बघून एक ते दोनवेळा निंदणी करावी. अरुंद पाणाच्या तणांच्या नियंत्रणासाठी २४ डि (सोडियम साॅल्ट) या तणनाशकाची फवारणी करावी. रुंद पानांच्या त्यांच्या बंदोबस्तासाठी अलग्रीप तणनाशकाची फवारणी प्रति हेक्टरी ४ ग्रॅम क्रियाशील घटक किंवा २० ग्रॅम औषधाची ५०० लिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी पर्यंत फवारणी करू शकता.

 जल व्यवस्थापन

गहू या पिकासाठी वाढीच्या काळात नाजूक अवस्थांमध्ये पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात मोठी घट होते.

मुकुटमुळे फुटण्याची सुरुवात या गव्हाच्या नाजूक अवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येते.

 कीड व्यवस्थापन

 खोडकिडा -

गव्हाला ओंबी लागल्यानंतर खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळून येतो.  या अळ्या गव्हाच्या गाभ्यात शिरतात, त्यामुळे पिकाचा वरील भाग वाळतो. या किडीच्या नियंत्रणासाठी कुठलीही लेबल क्लेम रासायनिक कीटकनाशक उपलब्ध नाही.  त्यामुळे या किडीचे व्यवस्थापन एकिकृत पद्धतीने करावे लागते.

या किडीच्या एकीकृत व्यवस्थापनाकरिता

१) जमिनीची उन्हाळ्यात खोल नांगरणी करून जमीन तापू द्यावी, त्यामुळे किडीचे नष्ट होण्यास मदत होते.

 २) शिफारस केलेल्या वेळेनुसार पेरणी केल्यास या किडीचे नियंत्रण होण्यास मदत होते.

 ३) वाढीच्या अवस्थांमध्ये पिकास पाण्याचा ताण पडणार नाही, याची दक्षता घ्यावी.

४) रासायनिक खतांचा योग्य प्रमाणात वापर. अशा पद्धतीने व्यवस्थापन केल्यास खोडकिडीवर आपण नियंत्रण आणू शकतो.

मावा -

ही पिवळसर अथवा काळपट रंगाची रसशोषक कीड असून या किडीचे प्रौढ आणि पिल्ले पानांच्या खालच्या बाजूला राहून रस शोषण करतात.  त्यामुळे पाने पिवळसर दिसून लागतात व रोगट बनतात. मावा ही कीड तिच्या विष्टेद्वारे पानावर चिकट पदार्थ टाकते, त्यावर काळी बुरशी वाढते. त्यामुळे प्रकाश संश्लेषण ही क्रिया बंद होऊन रोप मरण पावते.या किडीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही एसी ४० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

रोग व्यवस्थापन

 तांबेरा :- तांबेरा रोग गव्हावरील प्रमुख बुरशीजन्य रोग आहे  तांबेरा या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो. रोगामुळे पानांवर खोडावर व पिकाच्या ओब्यावर नारंगी रंगाचे डाग दिसून येतात  काही दिवसांनी काळे पडतात. तांबेरा या रोगापासून आपल्या पिकास वाचवायचे असल्यास प्रतिबंधक वाणांचा वापर करावा उदाहरणार्थ एचडी २१८९ ,पूर्णा तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर जाणवल्यास मॅन्कोझेब ७५% डब्ल्यू टी २० ते २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

काजळी किव्हा कानी

 काजळी:-

या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गव्हाच्या बियाणांमार्फत होतो. या रोगामध्ये गव्हास काजळीचा प्रादुर्भाव झाला तर दाण्याऐवजीकाळी भुकटी तयार होते.या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या पिकास होवू नये म्हणून कार्बाक्झीन ३७.५ टक्के + थायरम ३६.५ टक्के ३ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करावी.

लेखक  -

पूजा लगड

Msc( Agri)

महेश गडाख

Msc ( Agri)

परशराम हिवरे

Msc( Agri)

English Summary: Learn how to cultivate wheat during rabi season Published on: 22 September 2020, 06:04 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters