मिरचीची लागवड बरेच शेतकरी करतात. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर प्रमुख भाजीपाला पिकांपैकी मिरची हे एक असून वर्षभर बाजारपेठेत कायम मागणी असणारे हे भाजीपाला पीक आहे. परंतु आपण पाहतो की, मिरचीवरील लिफ कर्ल वायरस त्यालाच आपण बोकड्या किंवा चुरडा मुरडा रोग म्हणतो. हा रोग मिरची पिकावरील सर्वात गंभीर असून मिरची पिकाचे अतोनात नुकसान करून शेतकऱ्यांना फार मोठ्या आर्थिक फटका देतो.
जर शेतकऱ्यांना या रोगाचे नियंत्रण व्यवस्थित पद्धतीने करता आले तरच मिरची पिकाच्या माध्यमातून चांगल्या उत्पादनाची अपेक्षा ठेवणे रास्त आहे. या लेखात आपण या रोगाच्या नियंत्रणासाठी कुठल्या उपाययोजना फायदेशीर ठरू शकतात, त्यांची माहिती घेऊ.
नेमका काय आहे हा रोग?
जेव्हा मिरची पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव होतो, त्यावेळी मिरचीच्या पानांचा आकार बदलतो व पानाच्या कडा काठाकडून गुंडाळल्या जातात व मिरचीचे झाड बोकडल्यासारखे दिसते. मिरचीवर जर या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर मिरचीला फुलधारणा होत नाही पर्यायाने फळधारणा देखील फारच कमी होते.
या एकात्मिक उपाययोजना ठरतील महत्त्वाच्या
1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा तुम्ही मिरचीची रोपवाटिका तयार करतात तेव्हा बियाणे खात्रीशीर व दर्जेदार घ्यावे.
2- जेव्हा तुम्ही मिरचीचे रोप वाटिका तयार कराल तेव्हा रोपवाटिकेच्या चारही बाजूने नेट किंवा एखादा कपडा बांधावा. याच्या मुळे काय होईल तर बाहेरील ज्या काही रसशोषक किडी आहेत त्यांचा रोपवाटिकेमध्ये शिरकाव होणार नाही.
3- रोपवाटिकेतून लागवडीसाठी रोपे आणण्यापेक्षा जर घरीच तुम्ही तुमच्या व्यवस्थापनाने रोपवाटिका तयार केली तर उत्तम ठरते.
4- मिरचीला पाण्याचा आणि अन्नद्रव्याचा पुरवठा करताना तो अतिरिक्त होणार नाही याची काळजी घ्यावी.जर हा पुरवठा अतिरिक्त झाला तर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो.
5- महत्त्वाचे म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये मिरची लागवड कराल त्या क्षेत्राच्या चारही बाजूला मका, ज्वारी, चवळीसारख्या सापळा पिकांची लागवड करणे गरजेचे आहे.
6- या रोगाचे प्रमुख वाहक ही प्रामुख्याने पांढरी माशी असून जर तुम्ही लागवडीसाठी मल्चिंग पेपरचा वापर केला तर पांढऱ्या माशीचे प्रमाण कमी राहते.
7- महत्त्वाचे म्हणजे मिरची पीक तणमुक्त ठेवणे खूप गरजेचे आहे.
नक्की वाचा:Vegetable Market: पाऊस आला भाजीपाल्याचे नुकसान करून गेला,भाजीपाल्याचे दर कडाडले
रासायनिक उपाय
1- मिरचीची रोपवाटिका टाकता त्यावेळेस बियाणे टाकायच्या वेळेस बीजप्रक्रिया केली नसेल तर जेव्हा रोप उगवेल तेव्हा दहा मिली डायमिथोएट दहा लिटर पाण्यातून फवारावे.
2- पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी दहा ग्रॅम डायफेनथिरियन (50 डब्ल्यू पी ) प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे गरजेचे आहे.
3- फूलकिडीच्या नियंत्रणासाठी फिफ्रोनिल( 5 एस सी) प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
4- जर मिरचीवर मावा आणि तुडतुडे यांचा प्रादुर्भाव असेल तर चार ग्रॅम थायमेथॉक्झाम किंवा चार मिली इमिडाक्लोप्रिड(17.8 एस एल) 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
5- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 10 ते 15 दिवसांच्या अंतराने फवारणी मध्ये अंतर ठेवावे व एकाच प्रकारचे कीटकनाशकाची फवारणी करू नये. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फवारणी करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे.
नक्की वाचा:Market Update: मूग आणि उडीद 8 हजाराच्या जवळ, शेतकऱ्यांना मिळू शकतो दिलासा
Share your comments