गतवर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्ह्यात अद्याप पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने बहुतांश भागात अद्याप पेरण्या झालेल्या नाहीत. काही भागात विखुरलेल्या स्वरुपात पाऊस झाला आहे. पावसाळ्याचा जवळपास महिना उलटून गेला असला तरी अजूनही खरीपाच्या पेरणीला पुरेसा वेग पावसाअभावी आलेला नाही. यंदा पाऊस चांगला होईल असी आशा बळीराजा करत असताना यंदाही पावसाचे आगमन उशिरा झाले आहे त्यामुळे पेरणी थांबली आहे.
पाऊस लांबल्याने त्याचा परिणाम खरीप लागवडीवर झाला आहे. यानंतर पाऊस झाल्यास आपल्याला पिक नियोजन करावे लागेल. आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणार पाऊस याचा विचार करून आपल्या जमिनीत किती ओलावा आहे, तो किती काळ टिकू शकेल याचा अंदाज घेऊन पिकाचे नियोजन करावे. जमिनीची खोली व उपलब्ध ओलाव्यावर पिक पद्धतीचा अवलंब उत्पादन वाढीसाठी फायदेशीर ठरेल.
उशिरा पेरणीसाठी अवर्षणाचा ताण शान करणारे आणि लवकर पक्व होणाऱ्या वाणांचा वापर करावा. बाजरी (धनशक्ती: 74-78 दिवस), तूर फुले, (राजेश्वरी: 145-150 दिवस), सूर्यफुल (फुले भास्कर: 80-84 दिवस), हुलगा (फुले सकस: 90-95 दिवस) या वाणांचा वापर पेरणीसाठी करावा. उशिरा पेरणीसाठी जास्तीत जास्त प्रमाणावर आंतरपिक पद्धतीचा अवलंब करावा.
बाजरी+तूर (2:1) किंवा सुर्यफुल+तूर (2:1) आंतरपिक घेतल्यास सलग पिकापेक्षा निश्चितच जास्त फायदा मिळतो. सोयाबीन, मुग, मटकी, उडीद, चवळी, घेवडा यासारखी पिके उशिरा (30 जुन नंतर) पेरल्यास या पिकांवर वाढीच्या काळात मावा किडीचा आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. त्याचप्रमाणे ही पिके काढणीच्यावेळी पावसात सापडून उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येते. त्यामुळे 15 जुलै नंतर या पिकांची पेरणी करू नये.
पाऊस उशिरा आला किंवा लवकर आला तर शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे नियोजन हे परिस्थितीचा अंदाज घेऊन करावे. सूर्यफुल, एरंडी यासारखी पिके वगळता बहुतेक पिके हवामान घटकास संवेदनाक्षम असतात त्यामुळे खरीप हंगामात पेरणीस उशीर झाल्यास उत्पादनात घट येते. सोयाबीन, मुग, मटकी, उडीद, चवळी यासारखी कडधान्य पिके उशिरा (30 जुन नंतर) पेरल्यास या पिकांवर वाढीच्या काळात मावा किडीचा आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.
पावसाच्या आगमनानुसार करावयाचे पिक नियोजन:
पावसाचा कालावधी |
घ्यावयाची पिके |
घ्यावयाची आंतरपिके |
हे करू नका |
1 ते 15 जुलै दरम्यान पाऊस पडल्यास |
बाजरी, तूर, सूर्यफुल, हुलगा, एरंडी |
बाजरी+ तूर (2:1) |
मुग, मटकी, उडीद, चवळी, घेवडा 30 जुन नंतर पेरू नयेत. |
15 ते 31 जुलै दरम्यान पाऊस पडल्यास |
बाजरी, तूर, सुर्यफुल, हुलगा, एरंडी |
सुर्यफुल+तूर (2:1) |
त्याचप्रमाणे हि पिके काढणीच्यावेळी पावसात सापडून उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येते. सोयाबीन उशिरा पेरल्यास सप्टेंबर मध्ये तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे उत्पादनात घट येते म्हणून खरीप हंगामात उशिरा पेरणीसाठी पिकांचे योग्य नियोजन करणे अतिशय महत्वाचे आहे. पावसाचे आगमन लांबले असल्यास खरीप हंगामात कोणती पिके घ्यावीत यासंबंधी माहिती तक्त्यात दिली आहे त्यानुसार पिकांचे नियोजन करावे.
पिकाची पेरणी करताना योग्य वाणांची निवड, सुधारित व्यवस्थापन आणि रासायनिक खतांचा योग्य वापर करावा. उशिरा पेरणीसाठी मध्यम ते उशिरा पक्व होणारे पिकाचे वाण वापरले तर पिक वाढीसाठी उपलब्ध ओलावा कमी पडून उत्पादनात घट येऊ शकते म्हणून अवर्षणाचा ताण सहन करणारे लवकर पक्व होणारे पिकाचे वाण निवडावेत. उशिरा पेरणीसाठी जास्तीत जास्त प्रमाणावर आंतरपिक पद्धतीचा अवलंब करावा. खरीप हंगामामध्ये 25 ते 45 से.मी. खोलीच्या जमिनीवर आंतरपिक घेण्याची शिफारस केली आहे.
बाजरी+तूर (2:1) आंतरपिक घेतल्यास सलग पिकापेक्षा निश्चितच जास्त फायदा मिळतो. बाजरी आणि सूर्यफुल हि पिके 90 ते 100 दिवसात तयार होतात, तर तूर पिकाचा कालवधी 145 ते 150 दिवसांचा असल्यामुळे पिकाच्या योग्य वाढीस जमिनीतील उपलब्ध ओलाव्याची गरज वेगवेगळ्या वेळी भागवली जाते. पावसामध्ये खंड पडल्यास कमीत कमी एक पिक तरी निश्चितच पदरात पडते. अवर्षण परिस्थितीवर मात करण्यासाठी मदत होते. याशिवाय सोयाबीन+तूर (3:1), तूर+गवार (1:2), एरंडी+गवार (1:2), सूर्यफुल+तूर (2:1) घेतल्यास सलग पिकापेक्षा निश्चितच अधिक फायदा होतो. अशा रीतीने शेतकरी बंधूनी पावसाचा, जमिनीतील ओलाव्याचा योग्य अंदाज घेऊन पेरणीचे नियोजन करावे.
पिकांच्या सुधारित जाती, पेरणीचे अंतर व कालावधी:
पिके |
वाण |
कालावधी (दिवस) |
पेरणीचे अंतर (से.मी) |
हेक्टरी बियाणे (किलो) |
बाजरी |
धनशक्ती |
74-78 |
45 x 15 |
3 |
सूर्यफुल |
फुले भास्कर |
80-84 |
45 x 30 |
8-10 |
तूर |
फुले राजेश्वरी |
140-150 |
90 x 60 किंवा 180 x 30 |
3-4
|
हुलगा |
फुले सकस |
90-95 |
30 x 10 |
12-15 |
एरंडी |
व्हीआय-9 |
100-110 |
90 x 45 |
12-15 |
सद्यस्थितीत बाजरी, सूर्यफुल, तूर, एरंडी, हुलगा या पिकांचीच पेरणी करावी. मुग, उडीद, मटकी, चवळी, घेवडा या पिकांची लागवड बिलकुल करू नये. कारण हि पिके सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पावसात सापडतात तसेच भुरी रोगास बळी पडतात त्याचा परिणाम पिक उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर होतो.
लेखक:
डॉ. आदिनाथ ताकटे
प्रभारी अधिकारी, मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे विभाग)
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
9404032389
Share your comments