हळद आणि आले हे मसाल्याचे पीक असून मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.या लेखात आपण हळद आणि आले पिकावरील कंदकुज,करपा तसेचपानांवरील ठिपके या रोगाविषयी माहिती घेऊ.
हळद आणि आले पिकांवरील रोग
हळद( रोग नियंत्रण )
- कंदकूज- हळद पिकावरील कंदकूज हा रोग प्रामुख्याने पीथिएम, फायटोप्थोरा,रायझोक्टोनियाया बुरशीमुळे होतो.या रोगाचे लक्षणे म्हणजे हळद पिकाच्या कंदा तील कोवळ्या फुटींवर लगेच दिसून येतात. नवीन आलेल्या फुटव्यांची पाने पिवळसर तपकिरी रंगाची होतात. खोडाचा रंग तपकिरी काळपट होतो. प्रादुर्भावग्रस्त फुटवा ओढल्यास सहज हातामध्ये येतो. जमिनीतील कंद बाहेर काढले असतो मग पडून त्यातून घाण वास येणारे पाणी बाहेर पडत असते. उत्पादनात 50 टक्क्यांपेक्षा अधिक घट येऊ शकते.
नियंत्रण
कंदकूज रोगाच्या प्रतिबंधासाठी जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा प्लस दोन ते अडीच किलो प्रति एकरी 250 ते 300 किलो सेंद्रिय खतांमध्ये मिसळून द्यावे. कंदकूज रोगा सुरूवात झाल्यानंतर कॉपर ऑक्सिक्लोराईड चार ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी.रोगाची तीव्रता जास्त असल्यासमॅटॅलॅझील+ मॅन्कोझेब( संयुक्त बुरशीनाशक) चार ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. आळवणी करताना जमिनीस वापसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास थोडासा पाण्याचा ताण द्यावा.
करपा
सकाळी पडणारे धुके व दव या रोगास अनुकूल असते. कॉलेटोटिकम कॅफसीसी बुरशीमुळे पानांवर अंडाकृतीठीपके पडतात.तीव्रता वाढल्यास संपूर्ण पान करपते.टॅफ्रीना या बुरशीमुळे लहान तांबूस रंगाच्या संख्या गोलाकार ठिपके पानांवर आढळतात पुढे वाढत जाऊन संपूर्ण पान करपते.
नियंत्रण
या रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रादुर्भावाची तीव्रता लक्षात घेऊन 15 दिवसांच्या अंतराने सात महिने पूर्ण होईपर्यंत आलटून पालटून फवारण्या कराव्यात.
आले ( रोग नियंत्रण)
- कंद कुज- प्रथम पानांचे शेंडे वरून व कडांनी पिवळे पडून खालपर्यंत वाळत जातात.खोडाचा जमिनीलगतचा भाग काळपट राखी पडतो. याच ठिकाणी माती बाजूस करून पाहिल्यास गड्डा वरून काळा पडलेला व निस्तेज झालेला दिसतो. हा रोग प्रामुख्याने सूत्रकृमी किंवा खुरपणी, आंतरमशागत करताना कंदास इजा झाल्यास त्यातून रोगकारक बुरशीचा आत मध्ये प्रादुर्भाव होऊन कंद कुजण्यास सुरुवात होते.
प्रतिबंधात्मक उपाय
कंद कुज प्रतिबंधासाठी जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा प्लस दोन ते अडीच किलो प्रति एकरी 250 ते 300 किलो सेंद्रिय खतांमध्ये मिसळून द्यावे.
कंद कुजण्यास सुरुवात झाल्यानंतर कॉपर ऑक्सिक्लोराईड चार ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी. मॅटॅलॅक्सिल+ मॅन्कोझेब या संयुक्त बुरशीनाशक चार ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी.
पानावरील ठिपके
ढगाळ वातावरण सतत राहिल्यास आणि आर्द्रता 90 टक्क्यांच्या वर राहिल्यास रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. रोगाची सुरुवात कोवळ्या पानावर होऊन नंतर तो सर्व पानावर पसरतो. पानांवर असंख्य लहान गोलाकार ठिपके तयार होतात.
नियंत्रण
मॅन्कोझेब अडीच ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड अडीच ग्रॅम अधिक सरफेक्टन्टएक मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हवामानाची परिस्थिती पाहता सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात 15 ते 20 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
Share your comments