शेतकरी शेतात उत्पन्न घेण्यासाठी आहोरात्र मेहनत घेत असतो. भर उन्हात शेताची मशागत पुर्ण करत असतो. पिकाचे उत्पन्न घरात येईपर्यंत तो मेहनत करत असतो. बऱ्याच वेळा सगळी परिस्थिती बळीराजाच्या बरोबर असते. म्हणजे वेळेवर पाऊस पडतो, पेरणीचा उतारा चांगला येतो. या गोष्टी ठीक असतानाही शेतकऱ्यांना किडीमुळे मोठं आर्थिक नुकसान होत असतं. पिकांवर येणाऱ्या रोगराईमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत जातो. हा खर्च कमी करायचा असेल तर किडीवरील नियोजन योग्य असायला हवे. यासाठी कामगंधचा उपयोग होत असतो.
शेतांमधील किडींच योग्य नियोजन करण्यासाठी आणि त्यांची संख्या आर्थिक नुकसानपातळीच्या खाली ठेवण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर फायदेशीर ठरतो. कीटक स्वजातीतील नर किंवा मादी यांच्याशी सुसंवाद किंवा संबंध साधण्यासाठी शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा रासायनिक गंध सोडतात. हा गंध स्वजातीतील कीटकांशी विशिष्ट प्रकारच्या संदेशवहनाचे कार्य करतो. या गंधामुळे नर/मादीमध्ये चेतना निर्माण होऊन नर-मादी एकमेकांकडे आकर्षित होतात आणि मिलनासाठी योग्य जोडीदार मिळवू शकतात. त्यामुळे या गंधाला कामगंध (फेरोमोन) असे म्हटले जाते. वेगवेगळ्या किडींचा फेरोमोन वेगवेगळा असतो. काही कीटकांमध्ये नर कीटक मादीला, तर काहींमध्ये मादी कीटक नराला आकर्षित करतात. कीटकांच्या या सवयी लक्षात घेऊन कृत्रिम कामगंध (फेरोमोन) तयार केले जातात.
सापळे मोठ्या प्रमाणात लावल्याने लिंग प्रलोभन रसायनांचे (ल्यूर) सूक्ष्म कण वातावरणात पसरतात. कीटकांच्या शरीरातून सोडला जाणारा गंध आणि वातावरणातील कृत्रिम रसायनांचा संदेश यातील फरक त्यांना कळेनासा होऊन त्यांचा गोंधळ उडतो आणि ते कामगंध सापळ्यात अडकतात परिणामी त्यांचे मिलन होऊ शकत नाही.
- सर्वेक्षणासाठी प्रत्येक जातीच्या कीटकांसाठी हेक्टरी पाच सापळे लावावे. किडीचे पतंग मोठ्या प्रमाणावर पकडण्यासाठी हेक्टरी १५ ते २० सापळे उभे करावे.
- कापूस पीक ३० ते ४० दिवसांचे असताना हिरवी अळी, ठिपक्याची बोंड अळी आणि तंबाखूची पाने खाणारी अळी यांच्या प्रादुर्भावाची माहिती व योग्य नियंत्रणासाठी सापळ्यांचा वापर करावा.
- प्रत्येक जातीसाठी वेगवेगळे सापळे वापरावेत. सापळ्यात अडकलेले पतंग दर आठवड्याला काढून नष्ट करावे.
- सापळ्यामधील लिंग प्रलोभने १५ ते २० दिवसांनी बदलणे आवश्यक असते.
- सापळा साधारणतः पिकाच्या उंचीनुसार जमिनीपासून दोन ते तीन फुटांवर राहणे आवश्यक असतो.
- सापळा वाऱ्याच्या दिशेला समांतर असावा, त्यामुळे लिंग प्रलोभन रसायनाचे सूक्ष्म कण शेतात पसरून किडीचे जास्तीत जास्त पतंग सापळ्याकडे आकर्षित होतात.
- सापळ्यात ल्युर लावताना हात स्वच्छ धुवावे, हातास कोणताही उग्रवास असू नये.
काय होतात कामगंध सापळे वापराचे फायदे-
- किडींची आर्थिक नुकसानीची पातळी ठरवून योग्य वेळी कीटकनाशकांची फवारणी कामगंध सापळ्यांमुळे शक्य होते.
- रसायनांचा वापर घटल्यामुळे परोपजीवी मित्रकीटक सुरक्षित राहून त्यांच्या संख्येत वाढ होऊन नैसर्गिक नियंत्रणाचे चक्र क्रियाशील राहते.
- सापळ्यांच्या वापरामुळे पर्यावरणाची कुठलीही हानी होत नाही.
- कमी खर्चात किडींचे प्रभावी नियोजन शक्य होते.
- शेतात कामगंध सापळे उभे केल्यामुळे पक्षी थांबे तयार होऊन किड नियंत्रणासाठी मदत होते.
वेगवेगळ्या किडी आणि त्यांच्यासाठी वापरण्यात येणारे लिंग प्रलोभन रसायने (ल्युर) :
- १)हिरवी बोंडअळी किंवा घाटेअळी : हेली ल्युर
- २)गुलाबी बोंडअळी : गॉसिप ल्युर
- ३)ठिपक्यांची बोंडअळी : विट्टे ल्युर
- ४)तंबाखूचे पाने खाणारी अळी : लिट ल्युर
- ५)वांग्यावरील फळ आणि खोड पोखरणारी अळी : लुसी ल्युर
- ६)केळीवरील खोडकिडा : सोर्डी ल्युर किंवा कॉस्मो ल्युर
- ७)फळमाशी : क्युल्युर
लेखक :
खुशाल जवंजाळ
(वरीष्ठ संशोधन सहकारी)
मो. नं. 8530887696
सुरज कुमरे (वरिष्ठ संशोधन सहकारी)
कापूस संशोधन विभाग, डॉ. पं.दे.कृ. वि., अकोला.
गजानन चोपडे, एम.एस.सी ऍग्री( कृषी कीटकनाशास्त्र)
Share your comments