कपाशी पिकावर तुडतुडे यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. जर आपण याबाबतीत कपाशीच्या वाणाचा विचार केला तर ज्या कपाशीच्या वाणाच्या पानावर लव नसते असे वाण लवकर व जास्त प्रमाणात या किडीस बळी पडतात. तसेच ज्या कपाशीच्या वाणाच्या पानावर खालच्या बाजूला लांब व दाट केस असतात अशा वाणावर प्रादुर्भाव कमी होतो.
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाने दिलेली उघडीप किंवा ढगाळ वातावरण असते अशा वातावरणामध्ये तुडतुडे किडेची वाढ जास्त होते.
नक्की वाचा:सर्व पिकांना मल्टीप्लायरची बीज प्रक्रिया करा आणि फरक पहा
या किडीची पिल्ले आणि प्रौढ पानाच्या खालच्या बाजूस राहून रस शोषण करतात व पानात विषारी द्राव सोडतात. त्यामुळे पानाच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवर विपरीत परिणाम होऊन झाडाची वाढ खुंटते.
प्रादुर्भाव झालेली पाने खालच्या बाजूला मुरगळतात व कडा पिवळसर होऊन तपकिरी होतात व अशी पाने वाळतात नंतर गळून जातात. जर कपाशी पिकाला पाते, फुले आणि बोंडे लागल्यानंतर जर प्रादुर्भाव झाला तर उत्पादनामध्ये घट निश्चित येते. यासाठी या किडीचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे याबद्दल माहिती घेऊ.
कपाशीवरील तुडतुडे किडीचे एकात्मिक व्यवस्थापन
1- सर्वात महत्त्वाचे म्हणजे कपाशीचा हंगाम संपल्यानंतर पिकाचे जे काही अवशेष असतात ते व्यवस्थित जमा करून घ्यावे व त्यांचा नायनाट करावा.
2- वाणाची निवड करताना ती तुडतुडे किडीस प्रतिकारक्षम असलेल्या वाणाची निवड करावी. तसेच लागवड शिफारशीनुसारच योग्य अंतरावर करणे गरजेचे आहे.
3- खताच्या मात्रा देताना त्या शिफारशीनुसारच द्याव्यात. अतिरिक्त नत्रयुक्त खतांचा वापर टाळणे गरजेचे असून बागायती क्षेत्र असेल तर नत्राच्या मात्रा विभागून द्याव्यात.
नक्की वाचा:गव्हाच्या या नव्या वाणामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत
4- एकच पीक न घेता प्रत्येक वर्षाला फेरपालट करणे गरजेचे आहे. त्यासोबतच चवळी, मूग, सोयाबीन आणि उडीद सारखे अंतर पिके घेणे गरजेचे आहे.
5- तुम्ही बिगर बिटी कपाशी बियाण्याची लागवड करत असाल तर अशा बियाण्यास थायोमेथाक्साम( 70 डब्ल्यू एस ) चार ते पाच ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करून घ्यावी.
6- सुरुवातीच्या कालावधीमध्ये रासायनिक कीटकनाशकांची फवारणी टाळावी. यामुळे मित्र कीटक जसे की ढाल किडा, क्रायसोपा इत्यादी मित्र किडींचे संवर्धन होते.
7- जर या किडीचे दोन ते तीन तुडतुडे प्रतिपान किंवा पानाच्या कडा मुरगळलेल्या आणि पिवळसर झालेल्या दिसल्यास निंबोळी अर्क 5% किंवा अझाडेरेक्टिन ( 1000 पीपीएम ) एक मिली यापैकी एक कीटकनाशकांची फवारणी करावी.
कपाशीच्या लागवडीपासून साठ दिवसांपर्यंत जैविक घटकांचा फवारण्यासाठी वापर करणे गरजेचे आहे. लागवडीला सात दिवस झाल्यानंतरच रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा व कीटकनाशकांचे लागोपाठ फवारणी न करता वापर आलटूण पालटून करावा.
Share your comments