1. कृषीपीडिया

कपाशी पिकावरील एकात्मिक कीड व्यवस्थापन; जाणून घ्या ! किडींची सर्व माहिती

KJ Staff
KJ Staff


बीटी कपाशीमुळे कपाशीच्या क्षेत्र आणि उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. परंतु या पिकांवर होणाऱ्या रोग आणि किडींच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होत असते. कपाशीवर रसशोषण करणाऱ्या मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, पिठ्या ढेकूण इत्यादी किडींचा सुरुवातीच्या वाढीच्या काळात अधिक प्रादुर्भाव दिसतो. यासह ठिपकेदार बोंडअळी, अमेरिकन बोंडअळी आणि शेंदरी बोंडअळी यांचा प्रादुर्भावही दिसून येतो. अगदी कापूस वेचणीच्या काळातही तांबडे ढेकूण, करडे ढेकूण आदींचा प्रादुर्भाव आढळतो. यासर्व किडींमुळे कपाशीचे उत्पन्न जवळपास ५० ते ६० टक्के घटते.

कपाशीच्या कमी उत्पादकतेच्या अनेक कारणांपैकी किडींमुळे होणारे नुकसान हे एक प्रमुख कारण आहे. त्यासाठीच्या किटकनाशकांच्या फवारणीच्या संख्येत आणि खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. याचे प्रमुख कारण म्हणजे किटकनाशकाचा अतिरेकी वापर होय. यासाठी पिकाच्या टप्प्यानुसार आणि किडीनुसार किटकनाशकाची फवारणी आणि इतर पध्दतीचा अवलंब करुन कीड व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

कपाशीचे नुकसान टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करूनदेखील योग्य प्रमाणात किडींचे नियंत्रण होत नव्हते. यावर जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने बीटी कापूस हा पर्याय शोधण्यात आला. बीटी तंत्रज्ञानामुळे उत्पादनात सर्वसाधारपणपणे २५-३० टक्के वाढ होऊन बोंडअळीसाठी कीटकनाशकांचा वापरही कमी झाला. त्यामुळे पर्यायाने वातावरणाचे होणारे नुकसान टाळण्यास मदत झाली. परंतु रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याचबरोबर नवीन किडी, पावसाचा लहरीपणा, वातावरणातील बदल, किडींचे बदलते स्वरूप, किडींमध्ये रासायनिक कीटकनाशके व बीटी जनुकासंबंधी निर्माण होत असलेली प्रतिकारशक्ती अशा अनेक कारणांमुळे कपाशीचे अपेक्षित शाश्वत उत्पादन मिळत नाही.

यापैकी सध्या बीटी कपाशीवर सर्वांत ज्वलंत समस्या आहे ती म्हणजे कायिक वाढीच्या काळात रसशोषण करणाऱ्या किडींची आणि गुलाबी बोंडअळीची.  मागील ३-४ वर्षांपासून प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्यामुळे कपाशीवरील किडींच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी किडींची ओळख, नुकसानीचा प्रकार आणि त्यांचे एकात्मिक पद्धतीने किडींचे व्यवस्थापन याबाबतची माहीती असणे अत्यंत आवश्यक आहे. कीड व्यवस्थापन या लेखात संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

 


रस शोषणाऱ्या किडी

 • मावा

नुकसानीचा प्रकार : पिले व प्रौढ मावा पानांच्या खालच्या बाजूने आणि कोवळ्या शेंड्यांवर समूहाने राहून त्यातील रसशोषण करतात. अशी पाने आकसतात व मुरगळतात, त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. याशिवाय मावा शरीरातून चिकट गोड द्रव बाहेर टाकतो, त्यामुळे पानावरील भाग चिकट बनतो. कालांतराने त्यावर काळी बुरशी वाढून पानांवर काळा थर जमा होतो आणि त्यामुळे पानांच्या अन्ननिर्माण करण्याच्या प्रक्रियेत बाधा येऊन त्यांच्या वाढीवर अनिष्ठ परिणाम होतो.

 • तुडतुडे किडे  :-

नुकसानीचा प्रकार : तूडतुडे - या किडीचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे जुलैच्या शेवटच्या आठवडयापासून सुरु होतो. सद्यपरिस्थितीत बीटी कपाशीवर तुडतुडयांच्या प्रादुर्भावाची तीव्रता खूप वाढली आहे. सर्वात जास्त प्रादुर्भाव ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत आढळून येतो. तुडतुडयाची प्रौढ व पिल्ले पानाच्या मागील बाजूने राहून रस शोषण करतात. त्यामुळे सुरुवातीला पानाच्या कडा पिवळसर पडतात. पाने आकसतात व नंतर कडा तपकिरी किंवा लालसर होतात. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास झाडाची संपूर्ण पाने तपकिरी होतात. याबरोबरच कपाशीची उशिरा पेरणी आणि नत्रयुक्त खतांचा गरजेपेक्षा जास्त वापर या किडीच्या वाढीस मदत करतो. जास्त प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण पाने लाल तांबडी होऊन त्यांच्या कडा मुरगळतात, परिणामी झाडाची वाढ खुंटते.

कपाशीवरील फुलकिडे :-

नुकसानीचा प्रकार : फुलकिडे पावसाळयाच्या शेवटी आणि लांब उघाड पडली तर मोठया संख्येत वाढतात. सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यात उग्र रूप धारण करतात. मागील ४ ते ५ वर्षापासून फुलकिडयांचा प्रादुर्भाव बीटी कपाशीवर जास्त प्रमाणात वाढत आहे. प्रौढ फुलकिडे आणि पिल्ले कपाशीच्या पानामागील भाग खरवडून त्यातून निघणारा रस शोषणून घेतात. प्रादुर्भावग्रस्त भागातील पेश शुष्क होतात. तो भाग प्रथम पांढुरका आणि नंतर तपकिरी होतो. त्यामुळे पाने व कळया आकसतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास पाने कडक होऊन फाटतात. झाडाची वाढ खुंटते.

 


कपाशीवरील पांढरी माशी :-

नुकसानीचा प्रकार : पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे सप्टेंबरच्या पहिल्या आठवडयापासून सुरु होतो. नोव्हेंबर महिन्यातही याचा प्रादुर्भाव अधिक जाणवत असतो. याचे एक कारण आहे, ते म्हणजे  सुरुवातीच्या काळातील रासायनिक किटकनाशकांचा अतिरेकी वापर. पांढऱ्या माशीचे प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने राहून रस शोषण करत असल्लाने पाने कोमेजतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास पाने लालसर ढिसूळ होऊन वाळतात. याशिवाय पिल्ले त्यांच्या शरिरातून गोड चिकट द्रव बाहेर टाकतात. त्यामुळे संपूर्ण झाड चिकट व त्यावर बुरशी वाढून काळसर होते. त्यामुळे पानाच्या अन्न निर्माण करण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊन विपरित परिणाम होतो आणि झाडाची वाढ खुंटते.

 • मिलीबग (पिठ्या ढेकूण) :-

 नुकसानीचा प्रकार : पिठ्या ढेकणाची पिले व प्रौढ या दोन्ही अवस्था कपाशीची पाने, कोवळी शेंडे, पात्या, फुले व बोंडे यातून रसशोषण करतात. त्यामुळे ते सुरुवातीला सुकतात व नंतर वाळून जातात. हे ढेकूण आपल्या शरीरातून मेणचट गोड रस बाहेर टाकतात. ज्यावर बुरशी वाढून कपाशीची झाडे फिकट आणि काळपट पडतात. परिणामी झाडाची वाढ खुंटते आणि झाडे वळून सुकतात.

 


कपाशीवरील बोंड अळ्या :-

 • ठिपक्यांची बोंडअळी :-

 नुकसानीचा प्रकार : या किडीची अळी प्रथम झाडाच्या शेंडयात शिरुन आतील भाग खाते, त्यामुळे शेंडे सुकून जातात. पीक फुलावर येताच अळी कळयात शिरते नंतर बोंडात शिरुन त्यांचे नुकसान करते. कीड लागलेल्या कळ्या व बोंडे गळून पडतात. झाडावर राहिलेली बोंडे लवकर फुटतात व त्यापासून कमी प्रतीचा कापूस मिळतो. कीड लागलेल्या कळ्या व बोंडे झाडाखाली गळून पडलेली दिसतात.

हेही वाचा : कपाशीवरील बोंड अळीचे व्यवस्थापन

 

 • अमेरिकन/हिरवी बोंडअळी :-

नुकसानीचा प्रकार :

ही बहूभक्षी कीड असून विविध पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान करते. अळ्या अंड्यातून बाहेर पडल्यानंतर सुरुवातीस कोवळी पाने, कळ्या, फुले यावर उपजीविका करतात. बोंडे आल्यानंतर त्यामध्ये तोंड खुपसून आतील भाग खातात. त्यामुळे लहान बोंडे, पात्या, फुले, कळ्या गळून पडतात किंवा झाडावरच पावसाच्या पाण्यामुळे सडतात. या किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात बऱ्याच प्रमाणात घट येते. सततचे पावसाळी वातावरण, ७५ टक्यापेक्षा जास्त हवेतील आर्द्रता, कमी सूर्यप्रकाश या बाबी या किडीच्या प्रादुर्भावास पोषक आहेत.

 


शेंदरी/गुलाबी बोंड अळी :-

डोमकळी

नुकसानीचा प्रकार : शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवडयापासून बोंडामध्ये आढळून येतो. उष्ण व ढगाळ हवामानात थोडा पाऊस आल्यास अळीची वाढ झपाटयाने होते. अळी कळ्या, फुले किंवा बोंडे यांना बारीक छिद्र करून आत शिरते. प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. किडलेली पाते, बोंडे गळून पडतात किंवा परिपक्व न होताच फुटतात. अळ्या बोंडामध्ये आत शिरल्यानंतर वरून तिचा प्रादुर्भाव लक्षात येत नाही. अळी बियांना छिद्र करून सरकी खाते. त्यामुळे रुईची प्रत खराब होते आणि सरकीतील तेलाचे प्रमाण कमी होते. सरकी  किडलेली असल्यामुळे बियाण्यांची उगवण शक्ती बरीच कमी होते.


इतर महत्त्वाच्या किडी

 • तंबाखुवरील पाने खाणारी अळी –

 ही कीड विविध पिकावर जगणारी असून सध्या बीटी कपाशीवर या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. सुरुवातीच्या काळात अळ्या समुहाने राहून पानाच्या मागील हिरवा भाग खरवडून खातात. नंतर एक-एकटया राहून संपूर्ण पाने खातात. फक्त मुख्या शिरा व उपशीरा तेवढ्याच शिल्लक ठेवतात. ही अळी फुले, कळया व बोंडावर सुध्दा प्रादुर्भाव करून खूप नुकसान करते.

पाने पोखरणारी अळी –

ज्या शेतामध्ये वेलवर्गीय भाजीपाला घेतल्यानंतर कपाशीची लागवड केली जाते, अशा ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो. या किडीची अळी पानाच्या आत शिरून हिरवा भाग खाते. त्यामुळे पानावर नागमोडी आकाराच्या रेषा दिसतात.

 


लाल ढेकूण :
-

 लाल ढेकणेसुद्धा कपाशीवर आढळतात. परंतु त्यामळे फारसे नुकसान होत नाही. काही वेळेलाच त्यांचा प्रादुर्भाव आढळतो. प्रौढ ढेकणे व पिले, पाने व कोवळ्या शेंड्यातील रस शोषण करतात. याशिवाय ते बोंडांनासुद्धा नुकसान पोचवितात. अशी प्रादुर्भावग्रस्त बोंडे बरोबर उमलत नाहीत. त्यामुळे अशा बोडातील अपरिपक्व सरकीवरसुद्धा हल्ला चढवितात. अशी सरकी पेरणीयोग्य राहात नाही. तसेच त्यातील तेलाचे प्रमाणही घटते.

 • पांढुरके ढेकूण :-

पांढुरके ढेकणे पिकाच्या शेवटच्या काळात कपाशीवर आढळून येतात. यामुळेही फारसे नुकसान होत नाही. पांढुरक्या ढेकण्याची लांबी ६ मि.मि. असून त्यांचा रंग भुरकट पांढुरका असतो. प्रौढ व पिले अपरिपक्व, अर्धवट उमललेल्या बोडांवर बहसंख्येने आढळून येतात. बोंडाच्या कच्च्या सरकीतील रस पितात. अशी सरकी परिपक्व होत नाही.

 • कोळी :

या किडीचा प्रादुर्भाव कोरडवाहू कापूस पिकावर सर्वसाधारणपणे सप्टेंबरच्या पहिल्या प्रकारचे असतात. एक लाल कोळी आणि दुसरे वुली कोळी. या किडीला आठ पाय असतात. बारकाईने पाहिल्यास पानांच्या खालच्या बाजूने शिरांच्या जवळपास चपळतेने इकडे-तिकडे फिरताना दिसते. लाल आणि वूली कोळी पानांतील रसशोषण करतात. लाल कोळींनी रसशोषण केलेली पाने प्रथम लालसर तांबडी होऊन मुरगळतात आणि कडक होतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने वाळून गळून पडतात. अशा परिस्थितीत लहान बोंडेसुद्धा गळतात. वुली कोळींनी रसशोषण केलेल्या पानांवर पांढुरके केसाळ चट्टे पडतात.

 


कपाशीवरील प्रमुख किडींची आर्थिक नुकसानीची पातळी.

रस शोषणाऱ्या किडी

 • मावा : १५-२० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे.
 • तुडतुडे : २-३ पिले प्रतिपान.
 • फुलकिडे : १० फुलकिडे प्रतिपान.
 • पांढरी माशी : ८ ते १० प्रौढ माशी किंवा २० पिले प्रतिपान.

बोंड अळ्या

 • ठिपक्यांची बोंडअळी : ५-१० टक्के कळ्या, फुले अथवा बोंडाचे नुकसान किंवा ८ ते ९ पतंग प्रतिसापळा सलग तीन दिवस.
 • अमेरिकन बोंडअळी : १ अंडी प्रतिझाड किंवा १ अळी प्रतिझाड किंवा ५-१० टक्के कळ्या, फुले अथवा बोंडाचे नुकसान किंवा ८ ते ९ पतंग प्रति सापळा सलग तीन दिवस.
 • शेंदरी बोंडअळी : ५-१० टक्के कळ्या, फुले अथवा बोंडाचे नुकसान किंवा ८ ते ९ पतंग प्रतिसापळा सलग तीन दिवस.

एकात्मिक कीड व्यवस्थापन

कपाशीवरील किडींच्या व्यवस्थापनासाठी केवळ रासायनिक किटकनाशकांचाच वापर न करता मशागती, यांत्रिक, जैविक पध्दतीचा वापर करावा. तसेच गरज पडल्यास आर्थिक नुकसानीच्या पातळीनुसार पातळीनुसार रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.

मशागत पध्दती -

 • कपाशीच्या शेताच्या कडेने पाण्याच्या चारीतील तसेच पडीक जमिनीतील किडींच्या पर्यायी यजमान वनस्पती जसे गाजर गवत, पेटारी, बावची, रानभेंडी, रुचकी, कोळशी, कडूजिरे, कंबरमोडी, काळाधोतरा इत्यादींचा नायनाट करावा.
 • रस शोषण करणा­या तसेच बोंड अळींचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जास्तीच्या नत्र खताचा वापर टाळावा.
 • आंतरमशागत करुन पीक तण विरहीत ठेवावे.
 • तसेच ज्या तणावर पिठया ढेकणावर जगणारे परोपजीवी कीटक (प्रोम्युसिडी, अॅनासियस, अॅनागायरस) आढळून येतील अशी तणे काढू नयेत.

यांत्रिक पध्दती -

 • प्रादुर्भावग्रस्त व गळालेली पाते / पात्या आणि गळालेली बोंडे जमा करुन नष्ट करावीत.
  पिठया ढेकणाचे व्यवस्थापन करताना सर्व पिकावर फवारणी करण्याऐवजी फक्त प्रादुर्भावग्रस्त पिकावर फवारणी करावी अथवा प्रादुर्भावग्रस्त भाग किडीसहीत काढून नष्ट करावा.
 • गुलाबी बोंड अळीग्रस्त डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसहीत नष्ट कराव्यात.
 • पिवळ्या रंगाला पांढऱ्या माश्या आकर्षित होऊन चिकटतात व मरतात म्हणून पिवळे चिकट सापळे कपाशीचे शेतामध्ये लावावेत.
 • कपाशीचे शेतात पक्षांना बसण्यासाठी हेक्टरी किमान २५ पक्षी थांबे उभे करावेत, म्हणजे पक्षी त्यावर बसून शेतातील अळया टिपून खातील.
 • पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी कपाशीच्या शेताच्या कडेने, पाण्याच्या चारीतील तसेच पडीक जमिनीतील पिठ्या ढेकणाच्या पर्यायी यजमान वनस्पती जसे गाजर गवत, पेठारी, बावची, रानभेंडी, रुचकी, कोळशी इत्यादींचा व अमेरिकन बोंड अळीच्या पर्यायी खाद्य वनस्पती जसे कोळशी, पेटारी, कडूजीरे, कंबरमोडी, काळा धोतरा इत्यादींचा नायनाट करावा.

जैविक पध्दती -

 • ढालकिडा (लेडी बर्ड बीटल) :

या किटकाचे प्रौढ भुंगे व त्यांच्या अळ्या प्रामुख्याने मावा किडीवर जगतात.  म्हणून पिकावर मावा किडीसोबत लेडी बर्ड बीटल अधिक प्रमाणात आढळून येतात. याचा प्रादुर्भाव अधिक असेल तर रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळावा. गुलाबी बोंड अळीसाठी पीक १२० ते १३०  दिवसाचे झाल्यावर ट्रायको ग्रॉमाटॉयडीया बॅक्ट्री या परोपजीवी किटकांचे कार्ड (दीड लाख अंडी प्रति हेक्टरी) पिकावर लावावेत.

क्रायसोपा :

क्रायसोपाची हेक्टरी  १० हजार अंडी या प्रमाणात कपाशीचे शेतात एक सारख्या प्रमाणात, पीक ४० ते ४५ दिवसाचे झाल्यानंतर ३० दिवसाच्या अंतराने दोनवेळा सोडावीत. हे मित्र कीटक मावा, तुडतुडे, बोंड अळया (लहान) व अंडी यावर जगतात. कपाशीवरील किडींचे नैसर्गिक शत्रू कीटक (शेतक­यांचे मित्र कीटक) उदा. सीरफीड माशी, पेंन्टाटोमीड ढेकूण, कातीन, भुंगे, ड्रॅगनफ्लाय (चतूर), रॉबरमाशी, गांधीलमाशी, प्रार्थनाकीटक (मँन्टीड), टॅकनिड माशी ई. चे संवर्धन करावे.

वनस्पतीजन्य आणि जैविक किटकनाशकाचा वापर :

 • पाच टक्के निंबोळी अर्काची अथवा अॅझाडिरेक्टीन १० हजार पीपीएम 1 मि.ली. प्रति लिटर किंवा १५०० पीपीएम २.५  मि.ली. प्रति लिटर फवारणी करावी. पिठ्या ढेकणासाठी व्हर्टिसिलीयम लिकॅनी या बुरशीची ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
 • तंबाखुवरील पाने खाणाऱ्या (स्पोडोप्टेरा) अळीच्या व्यवस्थापनासाठी एस.एल.एन.पी.व्ही. ५०० एल.ई. विषाणू २ मि.ली. प्रति लिटर पाणी किंवा नोमुरीया रिलाई या बुरशीची ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी प्रादुर्भाव आढळून येताच करावी.
 • ढाल किडा, क्रायसोपा, क्रिप्टोलिमस आदी मित्रकिडींचे संवर्धन करावे. मित्र कीटक – यांचेमुळे शत्रूकिडींचे व्यवस्थापन होण्यासाठी मदत होऊ शकते .
 • ट्रायकोग्रामा चिलोनिस या कीटकाची अंडी १.५ लाख/ हे. कमीत कमी दोन वेळेस ४५ व ५५ व्या दिवशी किंवा बोंड अळीची अंडी दिसू लागताच शेतात सोडावीत.
 • व्हर्टिसिलियम लिकॅनी (४० ग्रॅम/१० लिटर पाण्यात) ही बुरशी रसशोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी वापरावी. कामगंध सापळे (हेक्टरी ५) शेतात लावून दररोज प्रत्येक बोंडअळीचे पतंग मोजावे. जेणेकरून किडींची आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेता येईल. तसेच प्रकाश सापळ्यांचा उपयोग करावा. पक्ष्यांना बसण्यासाठी शेतात पक्षी थांबे लावावेत. पाच टक्के निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी किंवा अझाडीरॅक्टीन १,५०० पीपीएम (२.५ लिटर) १००० लिटर पाण्यात मिसळून प्रतिहेक्टरी फवारणी करावी.
 • बीटी कपाशीमध्ये शेंदरी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोग्रामा बॅक्टेरी या परोपजीवी किडींचा १.५ लाख अंडी प्रतिहेक्टर या प्रमाणात दोनवेळा ५० व ६० दिवसांनंतर वापर करावा. वरील उपाययोजना केल्यानंतरही जर किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास पुढील कोणत्याही एका रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी.

 


रासायनिक पध्दती -

रोप अवस्थेतील पिठया ढेकणाचे रासायनिक कीड नियंत्रण -

 • पीक रोप अवस्थेत असताना प्रादुर्भाव आढळल्यास दाणेदार कीटकनाशक फोरेट १० जी किंवा फिप्रोनील ०.३ टक्के भुकटी १० कि.ग्रॅ. प्रति हेक्टर याप्रमाणे जमिनीत ओल असताना झाडांच्या भोवती बांगडी पध्दतीने द्यावे.
 • पिठ्या ढेकूण या किडीच्या शरीरावर मेणासारखा थर असल्यामुळे किटकनाशकाच्या १० लिटर द्रावणात २० ग्रॅम कपडे धुण्याची पावडर किंवा फिश ऑईल रोझिन सोप वापरावे.

कपाशीवरील किडींच्या व्यवस्थापनासाठी वापरावयाचे कीटकनाशके -

अ.क्र.

किडी

कीटकनाशके  (मात्रा / १० लि. पाणी साधा पंप या क्रमाने.)

 

१.

तुडतुडे, फुलकिडे, मावा -

फ्लोनीकॅमीड ५० डब्ल्युजी २ ग्रॅम, बुप्रोफेझीन २५ एससी २० मिली , डायफेन्थुरॉन ५०  डब्ल्युपी 12 ग्रॅम, फिप्रोनील 5 एससी 30 मिली किंवा अॅसिफेट 75 एसपी 8 ग्रॅम.

२.

पांढरी माशी -

निंबोळी तेल ५ टक्के ५० मिली, डायफेन्थुरॉन ५० डब्ल्युपी १२ ग्रॅम, बुप्रोफेझीन २५  एससी 20 मिली , अॅसिफेट 75 एसपी 20 ग्रॅम , फ्लोनीकॅमीड 50 डब्ल्युजी 2 ग्रॅम ,फिप्रोनील 5 एससी 30 मिली.

३.

बोंडअळी

(ठिपक्याची बोंडअळी, अमेरिकन बोंडअळी, शेंदरी  बोंडअळी)

प्रोफेनोफॉस ५० ईसी ३० मिली, थायोडीकार्ब ७५ डब्ल्युपी २० ग्रॅम ,इमामेक्टीन बेंन्झोएट ५एसजी ४ ग्रॅम , स्पिनोसॅड  ४५ एससी ४  मिली, क्लोरॅनट्रानी१८८.लीप्रोल 18.5 एससी 3 मिली , फ्ल्युबेन्डामाईड 20 डब्ल्युजी 5 ग्रॅम , फ्ल्युबेन्डामाईड 39.35 एससी 2.5 मिली , नोव्हाल्युरॉन 10 ईसी 20 मिली.

४.

तंबाखुवरील पाने खाणारी अळी -

क्लोरॅनट्रानीलीप्रोल १८.५ एससी ३ मिली  नोव्हल्युरॉन 8.8 एससी 20 मिली , डायफ्ल्युबेंझ्युरॉन 25 डब्ल्युपी 6 ग्रॅम.

५.

पिठया ढेकूण -

अॅसिफेट ७५ एसपी २०  ग्रॅम  क्लोरपायरिफॉस 20 ईसी 20 मिली , बुप्रोफेझीन 25 एससी 20 मिली.

६.

लाल कोळी-

डायकोफॉल १८.५ टक्के ५४ मिली, फोसॅलोन ३५ ईसी ३४ मिली.

 

 • नोव्हेंबर महिन्याच्या अगोदर कोणत्याही सिंथेटिक पायरेथॉईड गटामधील कीटकनाशकाची किंवा इतर कीटकनाशकांच्या मिश्रणाचा वापर टाळावा.

काय करू नये -

 • जर शक्य असेल तर पिकाच्या पहिल्या दोन महिन्याच्या काळात रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. जेणेकरून नैसर्गीकरीत्या होणारे कीड नियंत्रण टिकून राहावे.
 • लेडीबर्डची अळी व भुंगे, क्रायसोपाची अळी व प्रौढ, सायरफीड माशी, जिओकोरिस पिल्ले व ढेकूण आणि कोळी हे सर्व नैसर्गिकरित्या आढळणारे परभक्षी व परोपजीवी आहेत. जे मावा, तुडतुडे, फुलकीडे, पांढरी माशी आणि पिठ्या ढेकूण यांचे प्रभावीपणे नियंत्रण करतात.
 • पतंगवर्गीय दुय्यम कीटक जसे कापसाची पाने गुंडाळणारी अळी आणि कापसावरील उंट अळी इत्यादी विरूद्ध फवारणी करू नये. या किडीच्या अळ्या कापूस पिकास अगदीच कमी नुकसान पोहचवतात व ते ट्रायकोग्रामा, अॅपेटॅलीस आणि सायसीरोवा फॉरमोसा जे कपाशीवरील बोंड अळयांवर आक्रमण करतात. बीटी कापसावर नंतरचा निवड दबाव टाळण्यासाठी बीटी पावडरची फवारणी करू नये.
 • अॅसीटॅमीप्रीड, इमिडॅक्लोप्रीड, क्लोथीयानिडीन आणि थायामिथाक्झाम या निओनिकोटिनॉईड गटातील कीटकनाशकांचा जे कीटकांची प्रतिकारशक्ती वाढवतात. त्यांचा वापर टाळावा कारण संकरीत कापसाच्या बियाण्यास इमिडॅक्लोप्रीड याची बीजप्रक्रिया केलेली असते. जागतिक आरोग्य संघटना वर्ग १ मधील (अतिशय घातक वर्ग) कीटकनाशके जसे फॉस्फॅमिडॉन, मिथाइल पॅराथिओन, फोरेट, मोनोक्रोटोफॉस, डायक्लोरवास, कार्बोफ्युरान, मिथोमील, ट्रायझोफॉस आणि मेटाक्स्टिॉक्स यांचा वापर करू नये.
 • पांढ–या माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पायरेथ्रॉईडस यांचा वापर टाळावा. कीटकनशकांचे मिश्रण टाळावे.
 • कीटकनाशकांचे मिश्रण पर्यावरणाला जास्त घातक असल्यामुळे ते नवीन किडीच्या प्रादुर्भावसाठी कारणीभूत ठरते.

 

लेखक

श्री. आशिष वि. बिसेन

(वरिष्ठ संशोधन साहाय्यक, कीटकशास्त्र विभाग)

 भा.कृ.अनु.प.- केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर.

 इ.मेल. ashishbisen96@gmail.com

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters