1. कृषीपीडिया

तूर पिकावरील एकात्मिक कीड नियंत्रण

जगात कडधान्यांचे सगळ्यात जास्त उत्पादन, वापर आणि आयात भारतातच होते. कडधान्यांमध्ये तूर हे पीक सर्वांत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील तुरीचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता यांचा विचार केल्यास तुरीची सरासरी उत्पादकता फारच कमी म्हणजे ७ ते ८ क्किंटल प्रती हेक्टर आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


जगात कडधान्यांचे सगळ्यात जास्त उत्पादन, वापर आणि आयात भारतातच होते. कडधान्यांमध्ये तूर हे पीक सर्वांत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील तुरीचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता यांचा विचार केल्यास तुरीची सरासरी उत्पादकता फारच कमी म्हणजे ७ ते ८ क्किंटल प्रती हेक्टर आहे. उत्पादकता कमी असण्याच्या अनेक कारणांपैकी तुरीवर आढळणाऱ्या किडी व रोग हे एक अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. किडींच्या प्रादुर्भावामुळे तुरीच्या उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. तर रोगांच्या प्रादुर्भावामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट येते. उत्पन्न व उत्पादकता जर वाढवायची असेल तर तुरीवर आढळणाऱ्या किडी व रोगांचे योग्यवेळी योग्य पद्धतीने प्रभावी नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे आहे.

खोडमाशी :

या किडीची मादी खोडावरील स्वत: केलेल्या खाचेत अंडी घालते. पीक रोपावस्थेत असताना खोडमाशीची अळी अंड्यातून बाहेर पडल्यानंतर कोवळे खोड पोखरून आत शिरते व खोडाच्या आतील भागावर उपजीविका करते, त्यामुळे रोपांचा शेंड्याकडील भाग वाळून रोपे मरतात.

नियंत्रण : पेरणीच्या वेळी १० टक्के फोरेट १० किलो प्रतिहेक्टरी जमिनीत मिसळावे अथवा उगवण झाल्यानंतर ट्रायझोफॉस ४० टक्के प्रवाही ८ मि.ली. किंवा बुप्रोफेझिन २५ टक्के प्रवाही २० मि. ली. अनुक्रमे प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मावा :- मावा किडींची पिल्ले व प्रौढ पानाच्या खालच्या बाजूस राहून अथवा कोवळ्या शेंड्यावर, फुलांवर देठावर आणि शेंगांवर राहून त्यातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात व त्याच्या वाढीवर परिणाम होतो. प्रादुर्भाव जर जास्तच वाढला तर शेंगांचा आकार बदलतो. ही कीड चिकट गोड पदार्थ बाहेर टाकते. त्यावर काळ्या बुरशीची वाढ होऊन प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होतो.

 


नियंत्रण :
या किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच बुप्रोफेझिन २५ टक्के प्रवाही २० मि. ली किंवा मिथिल डिमेटॉन २० टक्के प्रवाही १० मि.ली. किंवा इंमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के प्रवाही ३ मि.ली. प्रती १० लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने गरज पडल्यास करावी.

पाने गुंडाळणारी अळी :-

पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अळ्या कोवळ्या देठांवर अथवा पानांच्या घड्या करून आत लपून बसतात व उदरनिर्वाह करतात. वाढणारे कोवळे शेंडे, पाने एकमेकांना चिकटल्यामुळे मुख्य खोडाथी वाढ खुंटते. पानावर, देठावर अथवा झाडावर लहान आकाराचे तपकिरी रंगाचे पतंग एक-एक अथवा ओळीने अंडी घालतात. एका वेळेस एक मादी १०० अंडी घालते. अंड्यातून ३-४ दिवसात अळी बाहेर पडते. अळी अवस्था २-३ आठवड्यांची असते तर कोशावस्था ४-६ दिवसांची असते.

नियंत्रण : क्लोरान्ट्रानीलीप्रोल १८.५ टक्के प्रवाही ३ ते ४ मि.ली. किंवा बुप्रोफेझिन २५ टक्के प्रवाही २० मि.ली.किंवा डायक्लोरोव्हॉस ७६ टक्के प्रवाही २० मि.ली. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे.

 

पिठ्या ढेकूण :

या किडींचा प्रादुर्भाव पिकाच्या रोपावस्थेत ते काढणी दरम्यान आढळून येतो. या किडींची पिल्ले व प्रौढ तुरीच्या पानातून, कोवळ्या शेंड्यातून रस शोषून घेतात. त्यामुळे पाने व शेंडे निस्तेज होऊन वाळतात. ही कीड शरीरातून चिकट गोड द्रवपदार्थ बाहेर टाकते, त्यावर काळी बुरशी वाढते. त्यामुळे झाडे चिकट व काळपट पडून झाडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊन झाडांची वाढ खुंटते व उत्पादनात घट येते. प्रौढ पिठ्या ढेकणाच्या मागील बाजूस लांबट कापसासारखी पिशवी असते त्यात पितथा ढेकणाची पिल्ले असतात.

नियंत्रण : ज्या ठिकाणी मित्र किडी अधिक क्रियाशील आहेत अशा ठिकाणी रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा व व्हटीसिलीयम लेकॅनी, मेटारायझीयम ऑनेसोप्ली या जैविक कीटकनाशकांची ४० म/१०लीटर पाण्यातून फवारणी करावी. फवारणी करताना वातावरणात आर्द्रता अधिक असणे आवश्यक आहे. रासायनिक कीटकनाशकांचा वापर गरज पडली तरच करावा. यामध्ये डायक्लोरोव्हॉस ७६ टक्के प्रवाही २० मि.ली., प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही २० मि.ली., ट्रायझोफॉस ४० टक्के प्रवाही २० मि.ली., या कीडनाशकांची प्रती १० लीटर पाण्यातून गरजेनुसार आलटून पालटून फवारणी करावी.

 


फुलकिडे :

अतिशय लहान, निमुळते आणि नाजूक असलेले फुलकिडे त्यांच्या पिंजारलेल्या पंखामुळे सहज ओळखू येतात. ही कीड रंगाने काळसर तपकिरी असून कोवळ्या पानांच्या पेशीत अंडी घालतात. पिले आणि प्रौढ दोघेही पानाच्या खालच्या अथवा वरच्या बाजूस राहून पाने खरवडतात व त्यातून स्रवणाऱ्या रसावर ते उपजीविका करतात. प्रादुर्भावग्रस्त पाने निस्तेज होऊन चंदेरी पांढऱ्या रंगाचे ठिपके पानांवर पडतात व पाने आतील बाजूस वळतात. कोरड्या हवामानात यांची वाढ झपाट्याने होते. कोवळ्या पानांच्या पेशीमध्ये मादी फुलकिडे अंडे घालते. हवामानानुसार दोन ते तीन आठवड्यात जीवनक्रम पूर्ण होतो.

नियंत्रण : किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास बुप्रोफेझिन २५ टक्के प्रवाही २० मि. ली. किंवा मिथिल डिमेटॉन २० टक्के प्रवाही १० मि.ली. किंवा व इमिडॅक्लोप्रीड १७.८ टक्के प्रवाही ३ मि.ली. प्रती १० लीटर पाण्यामध्ये अ मिसळून फवारणी करावी. दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने गरज पडल्यास करावी.

 


शेंगा पोखरणारी अळी
:-

पिकाच्या कळी व फुलोन्यापासून ते काढणीपर्यंत या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे तुरीचे सर्वाधिक नुकसान या किडीमुळे होते. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचा प्रादुर्भाव कळी  व फुलांवर होतो. नंतरच्या अवस्थेतील अळ्यांचा प्रादुर्भाव शेंगांवर होतो. सुरुवातीच्या काळात अळ्या पिकाच्या कोवळ्या पानावर, फुलांवर किंवा शेगांवर उपजीविका करतात व नंतर शेंगा भरताना शेगांतील कोवळे दाणे खातात. अळ्या शरीराचा पुढील भाग शेंगांमध्ये खुपसून आतील कोवळ्या दाण्यावर त्या उपजीविका करतात. या किडीची अळी शेंगांवर अनियमित आकाराचे छिद्र पाडून, अर्धी आत व अर्धी बाहेर राहून शेंगांतील परिपक्व तसेच अपरिपक्व दाणे खाते. एक अळी साधारणत: २०-२५ शेंगांचे नुकसान करते. तुरीच्या प्रतिझाडावर एक अळी असल्यास उत्पादनात प्रती हेक्टरी १३८ किलो तर एका झाडावर तीन अळ्या असल्यास प्रती हेक्टरी ३०८ किलो इतकी घट येते, असे एका प्रयोगानंतर आढळून आले आहे.

 


पानाफुलांची जाळी करणारी अळी (मरुका) :

पीक फुलोऱ्यापासून या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. कमी कालावधीत येणाऱ्या वाणांवर जास्त आर्द्रता व मध्यम तापमान असलेल्या भागात या किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ही अनुकूलता या किडीस मिळाल्याने या किडीचे पुनरुत्पादन जलद होते. या किडींच्या अळ्या पाने, फुलकळ्या आणि शेंगा एकत्र करून त्यांचा गुच्छ तयार करून त्यात लपून बसतात व उदरनिर्वाह करतात. त्यामुळे वाढणारे कोवळे शेंडे, पाने व शेंगा एकमेकांना चिकटून मुख्य खोडाची वाढ खुंटते व शेंगांची वाढ होत नाही.

 पिसारी पतंग :

 पिकाच्या कळी, फुलोरा आणि शेंगांमध्ये या किडीच्या अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येतो. अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्या कळ्यांना, फुलांना व शेंगांना छिद्रे पाडून आतील भाग खातात. पूर्ण वाढ झालेल्या अळ्या प्रथम शेंगांचा पृष्ठभाग खरवडून खातात. नंतर शेंगांच्या बाहेर राहून आतील दाणे खातात. पूर्ण वाढलेल्या अळ्या कोशावस्थेत जाण्यापूर्वी शेंगांवर छिद्रे पाडतात व त्या छिद्रांमधून जेव्हा त्या बाहेर पडतात तेव्हा झालेल्या नुकसानीचा प्रकार आढळून येतो. त्यानंतर पूर्ण वाढलेल्या अळ्या शेंगावर अथवा शेंगांवरील छिद्रांमध्ये कोशावस्थेत जातात. तुरीच्या कळी व फुलगळीच्या अनेक समस्या दिसून येत असून त्यामागे नैसर्गिक कारणाशिवाय पाण्याचा ताण व या किडीचा प्रादुर्भाव ही मुख्य दोन कारणे आहेत. पावसाळ्याच्या उत्तरार्धात या किडीचे प्रमाण भरमसाठ वाढते.

सर्वेक्षण : पीक कळी अवस्थेत असताना शेतकन्यांनी हेक्टरी २० ते २५ झाडांचे सर्वेक्षण करावे कारण तूर पिकाचे खरे आर्थिक नुकसान पीक फुलो-यात असताना आणि शेंगा भरताना आढळून येते. रोज सर्वेक्षण केल्यानंतर कामगंध सापळ्यातील नर पतंगांची संख्या जर सलग ८ ते १० आढळून आल्यास त्वरित पीक संरक्षणाचे उपाय योजावेत. आठवड्यातून किमान एका वेळेस तरी हेक्टरी २० ते २५ झाडांचे सर्वेक्षण करावे.

नियंत्रण : पीक कळ्या, फुलांवर आल्यापासून शेंगा पोखरणाऱ्या अळीचा मादी पतंग मोठ्या प्रमाणावर अंडी घालण्यास सुरुवात करतो. अशावेळी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर विलंब झाल्यास व बारीक अळ्या दिसू लागल्यास प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही २० मि.ली. प्रती १० लि.पाण्यातून फवारणी करावी. लहान अळ्या या कळ्या, फुलांना छिद्रे पाडून खातात. फुलगळीचे हे मुख्य कारण आहे. विषाणूंच्या फवारणीची कार्यक्षमता अतिनील किरणात टिकविण्यासाठी अर्ध्या लीटर पाण्यात ५० ग्रॅम नीळ टाकावी.

जैविक नियंत्रण : प्रती हेक्टर एचएएनपीव्ही (HaNPV) २५० रोगग्रस्त अळ्यांचा अर्क ०.५ मि.ली. प्रती लीटर पाणी (२४१०' तीव्रता) किंवा ५०० रोगग्रस्त अळ्यांचा अर्क १ मि.ली. प्रती लीटर पाणी (१४१०% तीव्रता) या प्रमाणात फवारणी करावी.

 


शेंग माशी :

पीक फुलोऱ्यापासून ते काढणीपर्यंत शेंग माशीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात आढळून येतात. कोवळ्या शेंगेच्या आत माशी अंडी घालते. अळीची संपूर्ण वाढ झाल्यानंतर तिची माशी शेगांना छिद्र पाडून बाहेर पडते. अंड्यातून अळ्याबाहेर पडल्यानंतर त्या दाण्यांचा पृष्ठभाग कुरतडून खातात. त्यामुळे दाण्यांवर नागमोडी खाचा तयार होऊन कीडग्रस्त दाणे खाण्यासाठी अथवा बियाण्यासाठी उपयोगी पडत नाहीत. प्रादुर्भावग्रस्त बियाण्यांची लवकर उगवण होत नाही व अशा बियाण्यास बाजारात दरसुद्धा कमी मिळतो. या किडीच्या प्रादुर्भावामुळे ३० ते ४० टक्क्यापर्यंत घट येते. पूर्ण वाढ झालेली अळी शेंगेला पारदर्शक छिद्रे पाइते व तेथेच कोशावस्थेत जाते.

नियंत्रण : कोवळ्या शेंगांमध्ये जास्त अंडी घालण्याची या किडीची सवय लक्षात घेता शेंगा धरण्याच्या अवस्थेत पहिली फवारणी व त्यानंतर १० ते १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी. निंबयुक्त कीटकनाशक  ॲझाडिरेक्टीन ०.०३ टक्के (३००पीपीएम) ५०मि.ली. प्रती १० लि.पाणी किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ ईसी १० मि.ली. किंवा क्लोरान्ट्रानीलीप्रोल १८.५ टक्के प्रवाही ३ मि.ली प्रती १० लीटर या प्रमाणात आलटून पालटून फवारणी करावी. या किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा चांगला उपयोग होतो.


भुंगेरे :

पीक फुलोऱ्यापासून या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. प्रौढ भुंगेरे फुलकळ्या व फुले अधाशीपणे खातात. एक दिवसात एक भुंगा २० ते ३० फुलांना हानी पोहोचवतो. पावसाळ्यात ही कीड उग्र स्वरूप धारण करते.

नियंत्रण : सायपरमेथ्रीन १० टक्के प्रवाही १० मि.ली. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ ईसी १० मि.ली. प्रती १० लीटर पाणी या प्रमाणात आलटून पालटून फवारणी करावी.

तुरीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

  • शिफारस केलेल्या वाणांची शिफारस केलेल्या वेळेतच योग्य अंतरावर पेरणी करावी.
  • वेळेवर आंतरमशागत करून पीक तणविरहित ठेवावे. पेरणीच्या वेळी तुरीच्या बियाणात १०० २०० ग्रॅम ज्वारीचे बियाणे टाकावे.
  • शेताच्या बांधावरील तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांची पर्यायी खाद्य तणे उदा. कोळशी, रानभेंडी, पेटारी ही तणे वेळोवेळी काढून नष्ट करावीत.
  • शेतात पक्ष्यांना बसप्यासाठी मचाण म्हणजचे इंग्रजी 'टी' आकाराचे पक्षी थांबे ५०-६० प्रती हेक्टरी उभारावेत, शेतातील किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीवर (१० अळ्या प्रती १० झाडे) असल्यास किंवा ५ टक्के प्रादुर्भावग्रस्त शेंगा आढळून आल्यास पीक संरक्षणाचे उपाय योजावेत.
  • केसाळ अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यास अळ्या व अंडीपुंज वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. शेंगा पोखरणाऱ्या हिरव्या अळीसाठी पीक कळी अवस्थेत आल्यापासून हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत, जेणेकरून किडींची आर्थिक नुकसानीची पातळी कळेल.
  • अळ्यांचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास तुरीचे झाड थोडेसे वाकडे करून हळुवार हलवून अळ्या पाडून त्या गोळा करून नष्ट कराव्यात. तसेच पूर्ण वाढ झालेल्या अळ्या वेचून त्यांचा नाश करावा.
  • पीक कळ्या, फुलावर आल्यापासून शेंगा पोखरणाऱ्या अळीचे मादी पतंग मोठ्या प्रमाणात अंडी घालण्यास सुरुवात करतात. अशावेळी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
  • पीक कळी व फुलोरा अवस्थेत असताना शेतकरी बांधवांनी आठवड्यातून किमान एक वेळा हेक्टरी २० ते २५ झाडांचे सर्वेक्षण व निरीक्षण करून कीड नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. अशाप्रकारे तुरीवरील किडींचे प्रभावी कीड नियंत्रण जर अंमलात आणले तर तुरीचे उत्पादन वाढण्यास निश्चितच मदत होईल.

लेखक 

श्री. आशिष वि. बिसेन

(वरिष्ठ संशोधन साहाय्यक, कीटकशास्त्र विभाग)

 भा.कृ.अनु..- केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर.

 .मेल. ashishbisen96@gmail.com

English Summary: Integrated pest control on tur crop Published on: 26 September 2020, 12:02 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters