सोयाबीनवर २७२ निरनिराळ्या किडींचा प्रादुर्भाव झालेला पाहावयास मिळतो. त्यांपैकी २० ते २५ किडी महत्त्वाच्या आहेत. सोयाबीनवर पडणाऱ्या किडींचे पुढील सहा गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहेत. १) बियाणे व रोपे खाणाऱ्या किडी, २) खोड पोखरणाऱ्या किडी, ३) पाने खाणाऱ्या किडी, ४) रस शोषणाऱ्या किडी, ५) फुले व शेंगा खाणाऱ्या किडी आणि ६) साठवलेल्या बियाण्यातील किडी. यापैकी सोयाबीनवर मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या व नुकसानकारक असणाऱ्या खोडमाशी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, पाने पोखरणारी अळी, चक्री भुंगे, उंट अळी, केसाळ अळी, हुमणी तसेच तुडतुडे, फुलकिडे व पांढरी माशी इत्यादी किडींची ओळख, प्रादुर्भावाची लक्षणे याची माहिती आपण घेणार आहोत.
खोडमाशी (Sci. Name : Melanagromyza sojae)
- किडीची ओळख : प्रौढ माशी आकाराने फक्त २ मि.मी. व चमकदार काळ्या रंगाची असते. प्रौढ माशी दलपत्र किंवा पानाच्या आतमध्ये अंडी घालते. अंड्यामधून बाहेर पडणारी या किडीची छोटी अळी पिकाला नुकसानकारक असते. पूर्ण विकसित अवस्थेत ही अळी हलक्या पिवळ्या रंगाची व साधारणतः ३ ते ४ मि.मी. लांबीची असते.
प्रादुर्भावाची लक्षणे : पानाच्या शिरांद्वारे अळी सोयाबीनच्या खोडांमध्ये प्रवेश करून खोडाचा गाभा पोखरून खाते. उगवणीपासून ७ ते १० दिवसापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव पिकावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. प्रादुर्भावग्रस्त रोपे पिवळी पडून सुकतात व मरून जातात. खोडापासून शेंड्यापर्यंत झाड पोखरल्यामुळे अन्नद्रव्याचा पुरवठा कमी होऊन पाने पिवळी पडून पानांवर लालसर काळे ठिपके दिसू लागतात. तसेच पानाचा अर्धा भाग सुकून वरच्या बाजूस मुडपला जातो व झाडे वाळून नष्ट होतात. त्यामुळे शेतातील रोपांची संख्या कमी होते व उत्पादनात घट येते. खोडमाशी सोयाबीन पिकावर जीवनाच्या ४ ते ५ पिढ्या राहतात. पिकाच्या नंतरच्या अवस्थेमध्ये खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्यास खोड पोखरल्यामुळे शेंगांची संख्या व सोयाबीनच्या बियांचे वजन कमी होते. तसेच काही शेंगांमध्ये दाणे भरले जात नाहीत.
नियंत्रण/व्यवस्थापन :
- पेरणीच्या वेळी थायमेथोक्झाम ७० डी. एस. ची ३ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.
- रासायनिक कीटकनाशक पीक ७ ते १० दिवसांचे असताना किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसताच क्लोरोपायरीफॉस २० टक्के इ.सी. १.५ लीटर प्रति हे. किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के इ.सी. ८०० मि.ली. प्रति हे. किंवा इथोफेनप्रॉक्स १० इ.सी. १ ली. प्रति हे. किंवा क्लोरॅथुनिलीप्रोल १८.५ टक्के एस.सी. १५० मि.ली. किंवा इथिऑन ५० टक्के इ.सी. १५०० मी.ली. ५०० ते ७०० लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.
तंबाखूवरील पाने खाणारी अळी (Sci. Name: Spodoptera litura)
किडीची ओळख : या किडीचा प्रादुर्भाव मुख्यतः तंबाखू पिकावर दिसून येतो. परंतु या किडीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन व इतर बऱ्याच पिकांचे नुकसान होताना पाहावयास मिळते. प्रौढ पतंग २ ते ३ सें.मी. व मळकट भुरकट रंगाचा असतो, त्याच्या पंखांवर पांढऱ्या रंगाच्या वेड्या-वाकड्या रेषा असतात व खालच्या बाजूचे पंख पांढरे असतात.
प्रादुर्भावाची लक्षणे : ही बहुभाक्षीय कीड असून ती उडीद, सोयाबीन, कापूस, टमाटे, तंबाखू,एरंडी,मिरची, कांदा, हरभरा, मका इत्यादी पिकांमध्ये आढळून येते. प्रौढ अळ्या समूहामध्ये स्वतंत्रपणे व पानांना मोठी छिद्रे पाडून खातात. पूर्ण वाढ झालेल्या अळ्या पाने अधाशीपणे फस्त करतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास पानांच्या फक्त शिराच शिल्लक राहतात. तृतीय अवस्थेपासून या अळ्या विलग होऊन स्वतंत्रपणे सोयाबीनची पाने, कोवळी शेंडे, फुले व कोवळ्या शेंगा यांना नुकसान पोहोचवितात. किडीचा प्रादुर्भाव पीक फुलात असताना व शेंगा तयार होत असताना झाल्यास परिणामी उत्पादनात लक्षनीय घट येते. या किडीमुळे ३० ते ७० टक्के एवढे नुकसान होण्याची शक्यता असते.
नियंत्रण/व्यवस्थापन :
- अळीच्या नर पतंगांना आकर्षित करण्यासाठी एकरी ४ कामगंध सापळे लावावेत.
- या किडीच्या अळ्या सुरुवातीला पानावर समूहामध्ये राहतात, म्हणून प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्येच शेतामध्ये फिरून अशी पाने तोडून कीटकनाशकामध्ये बुडवावीत व या अळ्यांना नष्ट करावे.
- किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात आल्यावर पिकावर किडीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या अवस्थेच्या वेळी एन.पी.व्ही. व्हायरस आधारित जैविक कीटकनाशक २५० एल.ई./हे. फवारणीसाठी वापरावे.
- रासायनिक कीटकनाशक क्विनॉलफॉस २५ इ.सी. १.५ ली. प्रति हेक्टर किंवा इंडोक्झाकार्ब १४.५ एस.सी. ५०० मि.ली. प्रति हेक्टर किंवा ट्रायझोफॉस ४० इ.सी. ८०० मि.ली. प्रति हेक्टर फवारवे.
- किंवा स्पीनेटोरॅम ११.७ टक्के एस. सी. ४५० मि.ली./हे. यापैकी एका कीटकनाशकाचा ५०० ते ७०० ली. पाण्यात मिसळून फवारणीसाठी आलटून पालटून वापर करावा.
चक्री भुंगे/ करगोटा भुंगे (Sci. Name: Obereopsis brevis)
ओळख : सोयाबीनचे उत्पादन घेणाऱ्या प्रमुख राज्यांमध्ये ही कीड मुख्य किडींपैकी हानिकारक असणारी एक कीड आहे. प्रौढ कीड नारंगी रंगाची असून तिच्या पंखांचा खालचा भाग काळा असतो. अँटेना शरीराच्या लांबी एवढ्याच व मागे वळलेल्या असतात. या किडीची अळी पाय विरहित व पिवळ्या रंगाची असते. पूर्ण विकसित अळी साधारणतः २ सें.मी. लांबीची असते. मुंगे गर्द भुरकट काळ्या पंखामुळे सहज ओळखता येतात.
प्रादुर्भावाची लक्षणे : सर्वप्रथम मादी पानाचे देठ,फांदी किंवा मुख्य खोडावर करगोट्याच्या आकाराचे दोन चक्र बनविते. कालांतराने अळी अंड्यातून बाहेर निघून खोडाचा आतील भाग खाऊन रोपाला पोकळ बनविते. त्यामुळे झाडाला फुले व शेंगा लागण्यावर वाईट परिणाम होतो व उत्पादन कमी येते. पूर्ण विकसित अळी रोपाला आतूनच कापून टाकते, त्यामुळे रोप मोडून जमिनीवर पडते. ही अळी पुन्हा जमिनीवर शिल्लक असलेल्या उभ्या रोपाचा शरीराच्या लांबी एवढा तुकडा कापून त्याच्या आतमध्ये पडून राहते. संशोधनाद्वारे असे सिद्ध झाले आहे की जून- जुलै महिन्यात दिल्या गेलेल्या अंड्यामधून तयार झालेली अळी त्याच खरीप हंगामामध्ये कोषामध्ये रूपांतरित होते. थोड्या दिवसांनंतर प्रौढ कीड कोषातून बाहेर निघून पुन्हा आपले जीवनचक्र सुरू करते. जुलैमध्ये या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
नियंत्रण/व्यवस्थापन :
- उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करावी .
- जास्त दाट पेरणी करू नये व पेरणी करताना खतांबरोबर फोरेट १० जी १० कि. ग्रॅ. प्रति हे. जमिनीत फेकीव पद्धतीने जमिनीत टाकावे तसेच नत्र खतांचा संतुलित वापर करावा.
- उभ्या पिकात प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळून आल्यास ती उपटून शेताबाहेर खड्ड्यात पुरावेत.
- पिकावर प्रादुर्भाव दिसताच रासायनिक कीटकनाशक ट्रायझोफॉस ४० इ.सी. ६२५ मि.ली. प्रति हेक्टर किंवा थायक्लोप्रिड २१.७ एस.सी. ७५० मि.ली. प्रति हे. ५०० ते ७०० ली. पाण्यात मिसळून फवारावे.
पाने गुंडाळणारी अळी (Sci. Name : Hedylepta indicata)
ओळख : या किडीची अळी लहान, हिरवट रंगाची असून तिचे डोके काळे असते. पूर्ण वाढ झालेली अळी हिरव्या रंगाची २ ते २.५ सें.मी. लांबीची असते व हात लागताच ती लांब उडून पडते. ही कीड जुलै ते सप्टेंबर महिन्यापर्यंत सक्रिय असते.
प्रादुर्भावाची लक्षणे : या किडीच्या अळ्या सुरुवातीस पाने पोखरून त्यावर उपजीविका करतात. ही कीड एक किंवा अधिक पाने एकमेकांस जोडून पानाच्या सुरळीत राहून त्यावर जगते. चिटकलेली पाने उघडून पाहिल्यास किडीची विष्ठा दिसते. परिणामतः प्रादर्भाव झालेली पाने गळून पडतात. सोयाबीन पिकामध्ये गुंडाळलेली पाने दिसल्यास या किडीचा प्रादुर्भाव झाला, असे समजावे.
नियंत्रण/व्यवस्थापन : या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास पिकावर क्विनॉलफॉस २५ इ.सी. १.५ ली. प्रति हे. किंवा इंडोक्झाकार्ब १४.५ एस.सी. ५०० मि.ली. प्रति हे. किंवा ट्रायझोफॉस ४० इ.सी. ८०० मि.ली. प्रति हेक्टर हे फवारावे. यापैकी एका कीटकनाशकाचा ५०० ते ७०० ली. पाण्यात मिसळून फवारणीसाठी आलटून पालटून वापर करावा.
पाने पोखरणारी अळी (Sci. Name : Aproaerema modicella)
ओळख : प्रौढ कीड करडा रंगाचा पतंग असून त्याच्या वरच्या पंखांच्या कडांवर छोटा पांढरा डाग असतो. खालील पंखांच्या बाहेरील कडांवर छोटी केसांची लव असते. अळी साधारणतः ४ ते ६ मि.मी. लांब व काळसर भुरकट रंगाची असते. या किडीचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेदरम्यान अधिक पाहावयास मिळतो.
प्रादुर्भावाची लक्षणे: या किडीच्या अळ्या पानाच्या दोन्ही पृष्ठभागाच्या आतमध्ये राहून पानाचा हिरवा भाग (हरितद्रव्य) पोखरून खातात व त्यामुळे पानाच्या पृष्ठ भागावर पांढरट/तपकिरी रंगाची पुरळ फुटल्याप्रमाणे वेड्यावाकड्या रेषा व डाग (सुरंग) दिसतात. पानांचा आकार जर कपासारखा किंवा पक्षाच्या चोचीसारखा झाला असेल तर तेथे पाने पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे ओळखावे. प्रादुर्भावग्रस्त पाने गुंडाळल्यासारखी दिसतात, सुरकुततात व वाळून जातात. अधिक प्रादुर्भाव झाल्यास पीक जळल्यासारखे दिसण्याचा भास होतो. प्रादुर्भावग्रस्त झाडांच्या शेंगा नीट भरत नाहीत. या किडीची आर्थिक नुकसान मर्यादा पीक रोप अवस्थेत (७ ते १० दिवस) असताना १ अळी प्रति रोप ही आहे.
नियंत्रण/व्यवस्थापन : किडीचा प्रादुर्भाव झाल्यास ट्रायझोफॉस ४० टक्के इ. सी. ६२५ मि.ली. प्रति हे. ५०० ली. पाण्यात मिसळून पिकावर फवारावी.
उंट अळी (Sci. Name : Crysodexis acuta)
ओळख : या अळ्या हिरव्या रंगाच्या असून त्या चालताना पाठीत बाक काढत चालतात म्हणून त्यांना उंट अळी असे म्हणतात. या अळीचा प्रादुर्भाव ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत जास्त असतो.
प्रादुर्भावाची लक्षणे : या अळ्या सुरुवातीला पानाचा हिरवा भाग खरवडून खातात. पूर्ण वाढ झालेल्या अळ्या पाने खाऊन फक्त शिरा शिल्लक ठेवतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास अळ्या फुलकळी, फुले व शेंगा खातात, ज्यामुळे वांझ झाडांचे प्रमाण वाढते. या किडीची आर्थिक नुकसान मर्यादा पीक फुले लागण्याच्या अवस्थेत (३० ते ३५ दिवस) असताना ४ अळ्या प्रति मीटर आहे.
नियंत्रण/व्यवस्थापन : किडीच्या प्रारंभिक अवस्थेमध्येच पुढीलपैकी एका कीटकनाशकाची फवारणी केल्यास किडीचे नियंत्रण होऊ शकते. क्विनॉलफॉस २५ इ.सी. १.५ ली. प्रति हे. किंवा क्लोरोपायरीफॉस २० इ.सी. १.५ ली. प्रति हे. किंवा ट्रायझोफॉस ४० इ.सी. ८०० मि.ली. प्रति किंवा प्रोफेनोफॉस ५० इ.सी. १ ली. प्रति किंवा लॅम्बडा-सायहॅलोथिन ४.९ टक्के सी.एस./३०० मि.ली./हे. यापैकी एका कीटकनाशकाची ५०० ते ७०० ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी.
बिहारी केसाळ अळी (Sci. Name : Spilosoma oblique)
या किडीमध्ये प्रौढ पतंगाचे पंख फिकट पिवळे असतात. या किडीला छोटे-छोटे काळे ठिपके असणारी गुलाबी छाती असते. अळ्या छोट्या-मळकट पिवळ्या रंगाच्या असतात व मोठ्या होऊन त्या लाल-भुरकट रंगाच्या दिसू लागतात. अळ्यांच्या अंगावर रोम सदश केस असतात. त्या पुंजक्यांनी सोयाबीनच्या झाडावर आढळतात. जुलै ते ऑक्टोबर या महिन्यात या किडींची तीव्रता जास्त आढळते.
प्रादुर्भावाची लक्षणे: या किडीची प्रादुर्भावाची लक्षणे तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीप्रमाणेच आहेत. अळ्या लहान अवस्थेपासूनच पानाचा खालचा भाग खरवडून खातात. त्यामुळे पानांचा पातळ पापुद्रा शिल्लक राहतो व ते जाळीदार होतो. त्यानंतर मोठ्या अळ्या शेतात पसरतात व पूर्ण पाने खातात. किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या सुरुवातीच्या काळात झाल्यास फुले, शेंगांची संख्या व दाण्यांचे वजन घटते व मोठे नुकसान होते.
नियंत्रण/व्यवस्थापन : किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात आल्यावर पिकावर क्विनॉलफॉस २५ इ.सी. १.५ ली. प्रति हे. किंवा इंडोक्झाकार्ब १४.५ एस.सी. ५०० मि.ली. प्रति हे. किंवा ट्रायझोफॉस ४० इ.सी. ८०० मि.ली. प्रति हे. यापैकी एका कीटकनाशकाची ५०० ते ७०० ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हमणी (Sci. Name : Holotrichia consanguinea)
ओळख : या किडीची अळी पांढऱ्या रंगाची असते. प्रौढ अवस्थेत ही कीड निशाचर व मळकट काळ्या रंगाची असून रात्री प्रकाशाच्या स्रोताजवळ व दिवसा जवळच्या झाडावर राहतात.
प्रादुर्भावाची लक्षणे : सोयाबीन शेतामध्ये या किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे स्पष्ट दिसून येतात. या किडीची अळी जमिनीच्या खाली ३ ते ४ सें.मी. राहून रोपांची मुळे खाते, त्यामुळे रोप मरगळते व सुकते. सुकलेली रोपे सहजपणे उखडून पडतात व उपटली जातात. अशी लक्षणे शेतात इकडे तिकडे विखुरलेल्या स्वरूपात दिसून येतात.
नियंत्रण/व्यवस्थापन :
- पावसाळ्याच्या सुरुवातीस कडुनिंब व बाभळीच्या झाडावर कीटकनाशकांची फवारणी करून भुंगेऱ्यांचा नाश करावा.
- शेतात शेणखत पसरण्यापूर्वी त्यात असलेल्या हमणीच्या अंडी व अळ्यांचा नाश करण्यासाठी १० टक्के फॉलिडॉल भुकटी मिसळावी.
सोयाबीनवरील रस शोषणाऱ्या किडी
रसशोषण करणाऱ्या किडींमध्ये तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे व काही प्रमाणात लाल कोळीचा सुद्धा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडींमुळे सोयाबीनची वाढ कमी होऊन या किडी विषाणूजन्य व बुरशीजन्य रोग पसरविण्यास सुद्धा कारणीभूत ठरतात.
- हिरवे तुडतुडे ( Name : Apheliona maculosa)
ओळख : ही कीड हिरव्या रंगाची २.५ मि.मी. लांब पाचरीच्या आकाराची असून ती तिरपी चालते. ही कीड प्रामुख्याने ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत जास्त सक्रिय राहते.
प्रादुर्भावाची लक्षणे : पिल्ले व प्रौढ तुडतुडे पानाच्या खालच्या बाजूस राहून पेशीतील रस शोषण करतात. त्यामुळे सुरुवातीला पानांवर फिकट हिरवे चट्टे दिसू लागतात. ही कीड शरीरातील विषारी द्रव्य पानाच्या पेशीत सोडतात. त्यामुळे पानाच्या कडा पिवळ्या पडून वरील बाजूकडे वक्र होतात. सततच्या ढगाळ व पावसाळी हवामानामुळे या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो. या किडीच्या प्रादुर्भावामुळे २० ते ३५ टक्के उत्पादनात घट येऊ शकते.
पांढरी माशी ( Name: Bemisia tabaci)
ओळख : रसशोषण करणाऱ्या गटातील ही एक महत्त्वाची कीड आहे. प्रौढ माशी १ ते २ मि.मी. आकाराची फिकट पांढऱ्या रंगाची असून तिच्या पंखावर मेणचट थर असतो. या माशीची पिल्ले पायविरहित व अंडाकृती असतात तसेच ते पानाच्या खालच्या बाजूला चिकटलेले असतात. ही कीड प्रामुख्याने सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत जास्त सक्रिय राहते.
प्रादुर्भावाची लक्षणे : ही कीड तीन प्रकारे सोयाबीन पिकास नुकसानकारक असते. पिल्ले तसेच प्रौढ कीड पानाच्या खालच्या भागातील रसशोषण करतात, त्यामुळे रोपांची वाढ खुंट्रन व फुले व शेंगा गळू लागतात. याबरोबरच ही कीड खालच्या पानांच्या वरील पृष्ठभागावर चिकट पदार्थ सोडते. या चिकट पदार्थावर काळी बुरशी वाढते त्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेला अडथळा निर्माण होतो. प्रौढ पांढरी माशी पिवळा मोझेंक रोगास कारणीभूत असणाऱ्या विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार करण्यास कारणीभूत ठरते.
फुलकिडे (Sci. Name : Neohydatothrips variabilis)
ओळख : फुलकिडे हिरवट पिवळसर रंगाची असून निमुळत्या टोकाची दिसतात. शेजारी टोमॅटो, मिरची, वांगी अशा प्रकारचे पीक असेल तर सोयाबीनवर त्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते.
प्रादुर्भावाची लक्षणे : या किडीच्या तोंडाची रचना विशिष्ट प्रकारची असते. ज्यात करवतीसारखे पाते असलेला भाग असतो त्याच्या सहाय्याने ही कीड पानांना, फुलकळीच्या देठांना खरवडून रसशोषण करतात. असे खरवडल्यामुळे फुलगळ मोठ्या प्रमाणात होऊ लागते. या किडीमुळे विषाणूजन्य शेंडामर या रोगाचा प्रसार होतो.
रस शोषणाऱ्या किडींचे नियंत्रण : रसशोषणाऱ्या किडींच्या (हिरवे तुडतुडे, पांढरी माशी व फुलकिडे) नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड ४८ एफ.एस, ची १.२५ ग्रॅ. प्रति कि.ग्रॅ. बियाण्यास पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. तसेच पिकावर प्रादुर्भाव झाल्यास किंवा डायमेथोएट ३० इ.सी. ५०० मि.ली. किंवा ट्रायझोफॉस ४० इ.सी. ८०० मि.ली. किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ एस.सी. ८०० मि.ली. यांपैकी एका कीटक नाशकाची प्रति हेक्टरी ५०० ते ७०० ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी.
लेखक
श्री. आशिष वि. बिसेन
(वरिष्ठ संशोधन साहाय्यक, कीटकशास्त्र विभाग)
भा.कृ.अनु.प.- केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर.
इ.मेल. ashishbisen96@gmail.com
Share your comments