1. कृषीपीडिया

अधिक उत्पादनासाठी सोयाबीनवरील किड व्यवस्थापन आहे महत्त्वाचे

जागतिक पातळीवर सोयाबीन या पिकाला प्रथम व अग्रगण्य स्थान आहे. सोयाबीन मध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्य तेल असल्यामुळे जागतिक स्तरावर महत्वाचे पिक म्हणून गणले जाते.

KJ Staff
KJ Staff


जागतिक पातळीवर सोयाबीन या पिकाला प्रथम व अग्रगण्य स्थान आहे. सोयाबीन मध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्य तेल असल्यामुळे जागतिक स्तरावर महत्वाचे पिक म्हणून गणले जाते. एकूण तेल उत्पादना पैकी जवळ जवळ ५८ टक्के सोयाबीन तेलाचा वाटा आहे. तर एकूण प्रथिनांपैकी जवळ जवळ ६० टक्के प्रथिने सोयाबीन पासून उपलब्ध होतात. कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे नगदी पिक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे.  दरम्यान नांदेड, परभणी, उस्मानाबाद, लातूरसह इतर जिल्ह्यात ही सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सोयाबीनच्या बियाणे निकृष्ट निघाल्याने अनेक शेतकऱ्याचे नुकसान झाले. यासह पेरणी केल्यानंतर आपण जर पिकांची योग्य काळजी नाही घेतली तरी आपल्याला मोठे नुकसान होते असते. कारण सोयाबीनवर मोठ्या प्रमणावर कीड पडत असते. सोयाबीनच्या पिकांतील कीड व्यवस्थापन कसे असावे आणि औषधांची मात्रा किती असावी याची माहिती असणं आवश्यक असते. 

किडी त्यांचे व्यवस्थापन-

 तंबाखु वरील पाने खाणारी अळी:-

प्रादुर्भावाची लक्षणे जीवनक्रम:-

  • ही बहुभक्षीय किड असून ती उडीद, सोयाबीन, कापूस, टमाटे, तंबाखू, एरंडी, मिरची, कांदा, हरभरा, मका इत्यादी पिकांमध्ये आढळून येते.मादी पतंगाने घातलेल्या एका अंडीपुंज्यामध्ये साधारणतः ८० ते १०० अंडी असतात. अंडीपुंज्यातून बाहेर पडल्यावर ही अळी फिक्कट हिरवी आणि थोडीशी पारदर्शक असते. या अळीच्या कोषावस्थेपर्यंत जाण्याअगोदर ५ ते  ६ अवस्था होतात.
  • पहिल्या २ अवस्थांमध्ये या अळ्या समुहामध्ये पानांच्या मागील बाजूस राहून पानातील हरित द्रव्य खातात, त्यामुळे पाने जाळीदार होतात.
  • तृतीय अवस्थेपासून या अळ्या विलग होऊन स्वतंत्रपणे सोयाबीनची पाने, कोवळी शेंडे, फुले व कोवळ्या शेंगा खातात. परिणामी उत्पादनात लक्षणीय घट येते.
  • या किडींचा कोष जमिनीवर पडलेल्या पानांमध्ये तयार होतो.

 किडीचे व्यवस्थापन :-

  • १० अळ्या प्रति मीटर फुले येण्याच्या अवस्थेत व ३ अळ्या प्रति मी. शेंगा लागण्याच्या वेळी आढळल्यास ही या किडीची आर्थिक नुकसान मर्यादा असते.
  • अळीच्या नर पतंगांना आकर्षित करण्यासाठी एकरी ४ कामगंध सापळे लावावेत.
  • किडीचा प्रादुर्भाव लक्षात आल्यावर पिकावर किडीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या अवस्थेच्या वेळी एन.पी.व्ही. व्हायरस आधारीत जैविक कीटकनाशक २५० एल.ई. प्रति हे फवारणीसाठी वापरावे.
  • या किडीने आर्थिक नुकसानीची पातळी पीक फुलावर येण्यापुर्वी ३ ते ४ लहान अळ्या प्रति मीटर ओळीत आढल्यास केंद्रिय किटकनाशक मंडळाद्वारे लेबल क्लेम शिफारसित इंडोस्किकार्ब १५.८ ए.सी. ६.६ मि.ली. किंवा स्पायनेवोरमची ११.७ ए.सी. ९ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 


हिरवी
उंटअळी :-

प्रादुर्भावाची लक्षणे जीवनक्रम:-

  • ही अळी नावाप्रमाणेच हिरवी असून पोटावर कमी असलेल्या पायांमुळे ती उंटाप्रमाणे पाठीस विशिष्ट वाक देऊन किंवा कुबड काढून चालते.
  • मादीचा पतंग एका ठिकाणी केवळ एकच अंडे घालतो. त्या अंड्यामधून निघालेली अळी प्रथम पानांमधील हरित द्रव्य खाते.
  • नंतर मोठी झालेली अळी पानांचा पूर्ण भाग खातात त्यामुळे पानांच्या शिराच शिल्लक राहतात व झाडांची वाढ खुंटते.

किडीचे व्यवस्थापन:-

  • ४ लहान अळ्या प्रति मीटर ओळीत आढल्यास आर्थिक नुकसानीची पातळी समजावी. केंद्रिय किटकनाशक मंडळाद्वारे लेबल क्लेम शिफारसित प्रोफेनोफोस ५० इ.सी. २० मि.लि. किंवा क्लोरट्रनिप्रोल १८.५ ई.सी. ३ मि.लि. किंवा इंडोस्किकार्ब १५.८ ए.सी. ६.६ मि.लि. किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के १२.५ मि.लि. किंवा थायमिथोक्झाम १२.६ + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५ टक्के २.५ मि.लि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • पाने गुंडाळणारी अळी:-

प्रादुर्भावाची लक्षणे जीवनक्रम:-

  • ही अळी हिरवट रंगाची असून तिचे डोके काळे असते.
  • पुर्ण वाढलेली अळी ६ ते ८ मि.मि. लांब असून शरीराचा भाग निमुळता असतो.
  • अळी सुरुवातीला पाने पोखरून उपजीविका करते त्यामुळे किडग्रस्त पाने आक्रसतात.
  • पुढे अळी पानाची गुंडाळी करुनच पानाचा हिरवा भाग खाते.
  • पानाच्या गुंडाळीत अळी अथवा तिचा कोष असतो.
  • जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने भुरकट पडून वाळून जातात व झाडांची वाढ खुंटते.

किडीचे व्यवस्थापन:-

  • या किडीचे नियंत्रनासाठी केंद्रिय किटकनाशक मंडळाद्वारे लेबल क्लेम शिफारसित मिथील पॅराथीऑन २ टक्के भुकटीची २० किलो प्रती हे. प्रमाणे धुरळणी करावी.

 

  • केसाळ अळी :-

प्रादुर्भावाची लक्षणे जीवनक्रम:-

  • या किडीची मादी पानाच्या खालच्या बाजूस पुंजाक्याणी अंडे घालते.
  • अळ्या लहान अवस्तेपासूनच खालचा भाग खरवडून खातात त्यामुळे पानांचा पातळ पापुद्रा शिल्लक राहतो, व ते पाने जाळीदार होतात. त्यानंतर मोठ्या अळ्या शेतात पसरतात व पुर्ण पाने खातात.
  • लहान अळ्या मळकट पिवळ्या तर मोठ्या अळ्या भुरकट लाल रंगाच्या असून शरीरावर नारंगी रंगाचे दाट केस असतात.
  • किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या सुरुवातीच्या काळात झाल्यास फुले, शेंगांची संख्या, दाण्यांचे वजन घटते व उत्पादनात मोठे नुकसान होते.

व्यवस्थापन:-

  • अंडीपुंज असलेली पाने तसेच जाडीदार पाने त्यावरील अळ्यांसह गोळा करुन केरोसीन मिस्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे समजल्यावर क्लोरट्रनिप्रोल १८.५ ई.सी.३ मि.लि. किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के १२.५ मि.लि. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

  • खोडमाशी:-

प्रादुर्भावाची लक्षणे जीवनक्रम:-

  • या किडीच्या प्रौढ माशा चकचकीत काळ्या रंगाच्या असतात.
  • मादी माशी देठावर व पानावर अंडी घालतात.
  • अंड्यातून बाहेर पडलेल्या पाय नसलेल्या अळ्या पाने पोखरतात आणि त्याद्वारे फांदीचा आतील भाग पोखरून खातात त्यामुळे झाडाला अन्नद्रव्ये मिळत नाहीत.
  • खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाचे सुर्वातीच्या अवस्थेत झाल्यास किडग्रस्थ झाड वाळते व मोठ्या प्रमानात नुकसान होते. मोठ्या झाडावर असा परिणाम दिसत नाही, परंतु अशा झाडांवर खोडमाशीचे अळीच्या प्रौढ माशीला बाहेर येण्यासाठी केलेले छिद्र आढळते.
  • खोडमाशीची अळी तसेच कोष फांद्यात व खोडात असतो. अशा किडग्रस्थ झाडावरील फुलांची गळ होते. शेंगातील दाण्याचे वजन कमी होवून उत्पादनात १६ ते ३०टक्केपर्यंत घट होते.

व्यवस्थापन:-

  • फोरेट १० किलो प्रती हे पेरणीच्या वेळेस जमिनीत मिसळून द्यावे. तसेच केंद्रिय किटकनाशक मंडळाद्वारे लेबल क्लेम शिफारसित क्लोरट्रनिप्रोल १८.५ एस. सी.२ मि.लि. किंवा इथिऑन ५० टक्के ई.सी. १५ मि.लि.किंवा थायमिथोक्झाम १२.६ टक्के + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५ टक्के २.५ मि.लि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • चक्रीभुंगा :-

प्रादुर्भावाची लक्षणे जीवनक्रम:-

  • प्रौढ भुंग्याचे पंख काळ्या भुरकट रंगाचे असतात, त्यामुळे ते सहज ओळखू येतात.
  • पिकाच्या सुरुवातीच्या काळात मादी भुंगे देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर अंडी घालण्यासाठी दोन समांतर खापा करून त्यामध्ये अंडी घालतात, त्यामुळे अन्न पुरवठा बंद होतो आणि खापाच्या वरचा भाग वाळून जातो.
  • अळी १९ ते २२ मि.मि. लांब दंड गोलाकृती गुळगुळीत पिवळसर रंगाची असून शरीरावर लहान लहान उभट भाग दिसतात.
  • अळ्या देठ, फांदी आणि खोड पोखरून जमिनीपर्यंत पोहचतात. यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते.
  • या किडींचा प्रादुर्भाव पिक दिड ते दोन महीन्याच्या अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड इतर झाडांसारखे दिसत असल्यामुळे प्रादुर्भाव लक्षात येत नाही.
  • पुर्ण वाढलेली अळी पोखरलेल्या भागात कोषावस्थेत जाते. लवकर पेरलेल्या सोयाबीनवर चक्रभुंग्याचा प्रादुर्भाव जास्त असतो.

व्यवस्थापन:-

  • किडीची आर्थिक नुकसानीची पातळी सोयाबीन पिकात फुलोऱ्या पुर्वी ३ ते ५ चक्रभुंगा प्रती मि ओळीत आढळ्ल्याबरोबर केंद्रिय किटकनाशक मंडळाद्वारे लेबल क्लेम शिफारसित प्रोफेनोफोस ५० इ.सी. २० मि.लि किंवा थायोक्लोप्रीड २१.७ ए. सी. १५ मि.लि. किंवा क्लोरट्रनिप्रोल १८.५ ई.सी. ३ मि.लि. किंवा इथिऑन ५० टक्के ई.सी. १५ मि.लि. किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के १२.५ मि.लि. किंवा थायमिथोक्झाम १२.६ + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५ टक्के २.५ मि.लि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

  • पांढरी माशी:-

प्रादुर्भावाची लक्षणे जीवनक्रम:-

  • रस शोषन करणाऱ्या गटातील ही महत्वाची किड आहे. प्रौढ माशी १ ते २ मि.मी आकराची, फिक्कट रंगची असून तिच्या पंखावर पांढरा मेनचट पातळ थर असतो. पांढऱ्या माशीचे प्रौढ आणि पिल्ले पानाच्या मागील बाजूस राहून पानातून रस शोषण करतात. परिणामी पिकांची वाढ खुंटते, पाने पिवळी पडून गळतात. प्रादुर्भाव अधिक झाल्यास फुले व शेंगा गळतात. रस शोषणाशिवाय पांढरी माशी आपले शरिरातून साखरेसारखा चिकट पदार्थाबाहेर टाकते. त्यावर काळी बुरशी वाढल्यामुळे झाडाचे अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत बाधा येते. पांढरी माशी सोयबीनचे मोझॅक रोगाचा प्रसार करते. त्यामुळे पाणे पिवळी पडून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते.

किडीचे व्यवस्थापन:-

  • रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी केंद्रिय किटकनाशक मंडळाद्वारे लेबल क्लेम शिफारसित इमिडाक्लोप्रिड ४८ एफ.एस. ची १.२५ ग्रॅ. प्रति कि.ग्रॅ. बियाण्यास पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी. तसेच पिकावर प्रादुर्भाव झाल्यास मेथिल डिमेटॉन २५ इ.सी. ६०० मि.लि. किंवा फॉसफॉमिडॉन ८५ इ.सी. २०० मि.लि. किंवा डायमेथोएट ३० इ.सी. ५०० मि.लि. किंवा ट्रायझोफॉस ४० इ.सी. ८०० मि.लि. यांपैकी एका किटकनाशकाची प्रति हेक्टरी ५०० ते ७०० लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

 संपर्क:-

 श्री. गणेश कंकाळ,

मो. क्र. ८८०५१६४५४३
डॉ. संदीप कामडी,

९४२३४२१५६७

श्री. शरद भुरे,

९५८८६१९८१५

डीएई-बिआरएनएस

सोयाबीन प्रकल्प,

कृषि वनस्पतीशास्त्र विभाग,

कृषि महाविद्यालय नागपूर

English Summary: Insect management is important for more soya bean production Published on: 30 June 2020, 07:14 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters