या पिकात विविध प्रकारच्या हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता आहे.
लागवड हलक्या ते भारी जमिनीत करता येते. लागवडीसाठी सेंद्रिय पदार्थ भरपूर असलेली व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. लागवडीपूर्वी जमीन नांगरून ढेकळे फोडून घ्यावीत. कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीअगोदर हेक्टरी १५ ते २० टन शेणखत घालावे. लागवडीसाठी जमीन भुसभुशीत करावी.
कोथिंबीर पेरणीसाठी ३ X २ मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करावेत.
कोथिंबिरीची पेरणी बी फोकून करतात किंवा २० सें.मी. अंतरावर रेषा पाडून बी पातळ पेरणी करता येते.
सुधारित जाती कोइमतूर-१, कोइमतूर-२, लाम सी.एस.- २, लाम सी.एस.- ४, स्थानिक वाण, जळगाव धना, वाई धना या जातींची निवड करावी.
बी पेरणी अगोदर धणे रगडून त्यांचे दोन भाग करावे. धण्यासाठी पीक घ्यावयाचे असल्यास हेक्टरी १५ किलो बियाणे लागते. कोथिंबिरीसाठी पीक घेताना हेक्टरी ३० ते ४०किलो बियाणे पुरेसे होते. बी पेरणीपूर्वी रात्रभर भिजवून पेरल्यास बी लवकर म्हणजे दहा दिवसांत उगवते.
पूर्वमशागतीच्या वेळी शेणखत वापरावे. या शिवाय पेरणीपूर्वी माती परीक्षणानुसार
२० किलो नत्र (४० किलो युरिया), ४० किलो स्फुरद (२४० किलो सिंगल सुपर फॉस्फेट) व २०किलो पालाश (४९किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. पेरणीनंतर २० दिवसांनी २० किलो नत्र द्यावे किंवा एक टक्का युरियाची फवारणी करावी.
पिकास उन्हाळ्यात चार ते सहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. आंतरमशागत म्हणून सुरवातीच्या काळात एक खुरपणी करून पीक तणमुक्त ठेवावे.
बी पेरल्यानंतर ३५ ते ४० दिवसांनी कोथिंबीर काढणीस तयार होते. काढणी सकाळी अथवा सायंकाळी करणे योग्य असते.
Share your comments