तण : मनुष्याने काही वनस्पतींची अन्न, वस्त्र, निवारा आणि इतर गरजांसाठी लागवड सुरू केली तेव्हापासूनच तणांच्या कल्पनेचा उगम झाला. ज्या वेळी मनुष्य एखाद्या वनस्पतीची हेतुपूर्वक लागवड करतो त्या वेळी शेतात वाढणाऱ्या इतर सर्व वनस्पतींना ‘तण’ म्हणतात. तणाची ही व्याख्या मर्यादित स्वरूपाची आहे. वास्तविक कोणत्याही ठिकाणी वाढणाऱ्या अनावश्यक वनस्पतींना तण म्हणून ओळखणे आवश्यक आहे. तलावांत, कालव्यांत अगर पाण्याच्या नळांत वाढणाऱ्या वनस्पती तसेच कारखाने, घरे व इतर इमारतींभोवती उगवून येणारी लहान झुडपे गवते ही सर्व तण या सदरातच येतात. शेतातील लागवडीखालील मुख्य पिकात दुसऱ्या कोणत्याही प्रत्यक्ष लागवड न केलेल्या परंतु उगवून आलेल्या वनस्पतींना तण असेच म्हणतात. काही वनस्पती उदा., शिंपी, कुंदा, हरळी या नेहमीच तण या नावाने ओळखल्या जातात तर काही वनस्पती सापेक्षतेने तण वा लागवडीखालील वनस्पती असतात. ‘अनावश्यक वाढणारी वनस्पती’ अशी तणाची सोप्या भाषेत व्याख्या करता येईल.
तणांमुळे होणारे नुकसान : रोग आणि किडी यांमुळे पिकांचे पुष्कळ नुकसान होते. पंरतु त्याहीपेक्षा जास्त नुकसान तणांमुळे होते, असा अंदाज आहे. तणांची मुळीच दखल न घेतल्यास (म्हणजे तणांवर काहीही उपाययोजना न केल्यास) ७० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान होते. खालील कारणांमुळे तणे पिकांचे शत्रू मानली जातात : (१) तणांची वाढ झपाट्याने होत असल्यामुळे लागवडीखालील पिकाला पाणी, प्रकाश आणि पोषक द्रव्ये यांचा योग्य पुरवठा होत नाही. (२) तणांमुळे प्रती हेक्टरी १५० किग्रॅ नायट्रोजन वाया जातो. (३) काही तणांच्या (उदा., लव्हाळा) मुळांवाटे विषारी द्रव्ये बाहेर पडतात व त्यांचा लागवडीखालील पिकावर अनिष्ट परिणाम होतो. (४) तणांचा नाश करण्यासाठी फार मोठा खर्च होत असल्याने पिकाच्या उत्पादनाचा खर्च वाढतो. (५) तणांमुळे लागवडीखालील पिकांचे उत्पन्न कमी येते व पिकाची कापणीही त्रासदायक होते. (६) पिकाची मळणी करतेवेळी तणांची बीजे पिकात मिसळल्यामुळे पिकाला बाजारात कमी किंमत येते. (७) कवक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पती), सूक्ष्मजंतू, व्हायरस व किडी या पिकांच्या शत्रूंना तणे आश्रय देतात. (८) काही तणे मनुष्य आणि जनावरांना विषारी असतात (उदा., सत्यनाशी अथवा पिवळा धोत्रा). (९) पाण्यात वाढणाऱ्या तणांमुळे पाण्याच्या प्रवाहात (नद्या, कालवे, पाण्याचे नळ) अडथळा निर्माण होतो. कृषिव्यवसायात मनुष्याची पुष्कळशी शक्ती तणांशी झगडण्यात खर्च होते. याबाबतीत शिथिलता आली की, तणांचा जोर वाढतो व मग तणनाशाचे काम आणखीच त्रासदायक आणि खर्चाचे ठरते.
विशेष गुणधर्म : लागवडीखालील पिकांशी होणाऱ्या स्पर्धेमध्ये तणे अनेक बाबतींत आघाडीवर असतात. त्याला तणांचे पुढील विशेष गुणधर्म कारणीभूत आहेत. (१) हवामानाची प्रतिकूल परिस्थिती, अवर्षण, रोग आणि किडी या सर्वांचा प्रतिकार लागवडीखालील पिकांच्या तुलनेने तणे जास्त परिणामकारक रीतीने करू शकतात. (२) तणांची बीजोत्पादनक्षमता जास्त असते. उदा., पिवळा धोत्रा, ज्वारीवरील टाळप (टारफुला), गाजर गवत वगैरे. एका वर्षात उत्पन्न झालेल्या तणांच्या बियांपासून उगवलेली झाडे नष्ट करण्यासाठी सात वर्षे लागतात, अशा अर्थाची इंग्रजी भाषेत म्हण आहे. (३) पुष्कळ तणे लागवडीखालील पिकांपेक्षा झपाट्याने वाढतात, त्यांना फुले लवकर येतात व ती पिकांपेक्षा लवकर तयार होतात. (४) तणांच्या बीजांची अंकुरणक्षमता (रुजून अंकुर फुटण्याची क्षमता) व सुप्तावस्था दीर्घकालीन असते. पुष्कळ तणे ५ वर्षांपेक्षा जास्त काळ अंकुरणक्षम असतात. १८७९ मध्ये जमिनीत काचेच्या नळ्यांत पुरलेल्या २० निरनिराळ्या तणांच्या बियांपैकी २५ वर्षांनंतर निम्म्या तणांच्या बिया अंकुरणक्षम असल्याचे आढळून आले व तीन तणांच्या बियांपासून ८० वर्षांनंतर रोपटी तयार करण्यात आली. (५) काही तणांची (उदा., हरळी, लव्हाळा) मुळे किंवा मूलक्षोड (जमिनीखालील आडवे खोड) जमिनीत खोलवर असतात त्यामुळे ती खणून काढण्यास फार त्रास पडतो. (६) सर्वसाधारणपणे पिकाखालील झाकलेल्या तणांची वाढ नीट होत नाही आणि प्रकाशाअभावी ती मरतात परंतु काही तणे पिकांवर वेलीसारखी वाढतात व त्यामुळे ती झाकली जात नाहीत.
फायदे : तणांमुळे पुष्कळसे तोटे होत असले, तरी काही फायदेही असतात, या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येत नाही. फुलावर येण्यापूर्वी तणे जमिनीत गाडल्यास पिकाला सेंद्रिय खताचा पुरवठा होतो (उदा., बावची, गोखरू). शिंबावंत (शेंगा येणाऱ्या) तणांपासून जमिनीला नायट्रोजनाचा पुरवठा होतो. ओसाड प्रदेशांत वाळूमुळे व जास्त पाऊस पडणाऱ्या प्रदेशांतील उतारावरील जमिनीचे वाहत्या पाण्यामुळे होणारे नुकसान तणांमुळे वाचते. हरळीसारख्या तणांचा जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग होतो. काही तणांचा औषधासाठी उपयोग होतो. गुम्मा (ल्युकस ॲस्पेरा) नावाचे तण सर्पदंशावर गुणकारी आहे. पिवळ्या धोत्र्याच्या बियांपासून काढलेले तेल त्वचारोगावर उपयोगी आहे. कासे गवतासारख्या तणांचा उपयोग घरे अथवा झोपड्या शाकारण्यासाठी व लव्हाळ्याचा उपयोग उदबत्त्या तयार करण्यासाठी करतात. पिवळ्या धोत्र्याच्या झाडांमुळे क्षारधर्मी (अल्कलाइन) जमिनी सुधारण्यास मदत होते..
जैविक शेती मित्र निखिल
कास्तकार ग्रूप समिती महाराष्ट्र राज्य
9529600161
Share your comments