1. कृषीपीडिया

गुलाब लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान, जाणून घ्या ! छाटणीची पद्धत

गुलाब हे निसर्गाची सर्वात सुंदर देन असून फुलांमध्ये या पिकाचे स्थान सर्वात वरचे असल्यामुळे गुलाबाच्या फुलाला ‘फुलांची राजा’ असे संबोधतात. माणसाला प्रेम, आदर, कुतघ्नता, आनंद, दुख, इत्यादी सर्व भावना व्यक्त करताना गुलाबाची फुले दिली जातात.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
rose

rose

गुलाब हे निसर्गाची सर्वात सुंदर देन असून फुलांमध्ये या पिकाचे स्थान सर्वात वरचे असल्यामुळे गुलाबाच्या फुलाला फुलांची राजा’ असे संबोधतात. माणसाला प्रेम, आदर, कुतघ्नता, आनंद, दुख, इत्यादी सर्व भावना व्यक्त करताना गुलाबाची फुले दिली जातात. गुलाबामध्ये अनेक आकर्षक जाती, विविध रंगछटा, आणि सुवास असल्यामुळे या फुलांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात सातत्याने केला जातो. आयुर्वेदात गुलाबाच्या औषधी गुणधर्माविषयी भरपूर माहिती उपलब्ध आहे. गुलाब सभोवतालचे वातावरण शांत, प्रसन्न, आणि शुद्ध ठेवत असल्यामुळे अलीकडच्या औद्योगिक क्रांतीच्या युगातही गुलाबाच्या फुलांचा वापर शोभेसाठी तसेच प्रदूषण रोखण्यासाठी होतो. गुलाबापासून अत्तर, गुलाबपाणी, जॅम, जेली, सरबत, गुलकंद, तसेच उच्च प्रतीचे मद्यही तयार करतात.

गुलाबाच्या पाकळ्यांमधील साखर आजारी माणसांसाठी उत्तम समजली जाते. त्यामुळे गुलाब हे व्यापार व आहाराच्या दृष्टीने एक महत्वाचे फुलपीक आहे. आधुनिक युगात गुलाबाची फुले ‘कट फ्लॉवर’ म्हणून वापरतात. फुलांच्या एकूण उलाढालीत जगात गुलाबाचा पहिला नंबर लागतो. जगात नेदर्लंड, जर्मनी, इंग्लंड, कोलंबिया, केनिया, भारत, टांझानिया या देशांमध्ये गुलाबाची व्यापारी पद्धतीने शेती केली जाते. भारतात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक, आणि गुजरात या राज्यात गुलाबाचे कट फ्लॉवर्ससाठी उत्पादन घेतले जात असून महाराष्ट्र लांब दांड्यांच्या फुलांच्या उत्पादनात आघाडीवर आहे. परदेशात तसेच देशातील विविध भागात गुलाबाच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे गुलाब हे भरपूर उत्पन्न मिळवून देणारे फुलपीक आहे. अशा या फुलपीकाची शेती कशी केली जाते याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

हवामान 

गुलाबाचे पीक उष्ण तसेच समशीतोष्ण हवामानात चांगले येते, तरी पण उत्तम दर्जाची फुले मिळविण्यासाठी दिवसाचे सरासरी तापमान २५ ते ३२ अंश सेल्सिअस आणि रात्रीचे सरासरी तापमान १५ ते १७ अंश सेल्सिअस असावे. सापेक्ष आर्दता ६०-६५ % असावी. ५-६ तास स्वच्छ सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी गुलाबाची वाढ चांगली होऊन फुले चांगली येतात. गुलाबाच्या झाडांची वाढ सावलीत नीट होत नाही. 

जमीन-

    गुलाबाला हलकी ते मध्यम जमीन मानवते. हलक्या ते मध्यम जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होतो, परंतु या जमिनी कसदार नसतात. म्हणून अशा जमिनीमध्ये शेणखतांचा भरपूर वापर करावा. भारी जमिनीतून पाण्याचा निचरा नीट होत नाही परिणामी त्याचा झाडाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. झाडाची पाने पिवळी पळून पानांवर काळे ठिपके पडतात. शेवटी पाने गळून जातात. साधारणपणे जांभ्या दगडापासून तयार झालेली आम्लयुक्त आणि ५.५ ते ६.८ इतका सामू असलेली जमीन गुलाबाच्या लागवडीसाठी उत्तम असते. पाणथळ आणि चोपण जमिनी गुलाबाच्या लागवडीसाठी निवडू नये.

हेही वाचा:आपल्या रानात लावा या प्रजातीची काकडी आणि महिन्याला कमवा लाखो रुपये, शासन सुद्धा मदत करेल

सुधारित जाती-

    गुलाबाच्या फुलांचा आकार, रंग, सुवास, पाकळ्यांची संख्या आणि ठेवण, दंड्याची लांबी, झाडांच्या वाढीची सवय यानुसार गुलाबाच्या जातींचे निरनिराळे प्रकार पडतात.

  • हायब्रीड टी- हायब्रीड टी या गुलाबाच्या प्रकाराची लागवड लांब दांड्याच्या फुलांसाठी मोठ्या प्रमाणावर केली जाते. झाडे मध्यम ते जोमदार वाढतात. फुले मोठी, दुहेरी, आकर्षक रंगाची आणि झुपकेदार असतात. या प्रकारच्या जातींमध्ये अमेरिकन हेरिटेज, ॲनिमल स्पार्क्स, आरिणा, ॲव्हान, बेलएंज, डॉ बी.पी. पाल, अरुणा, आकाशसुंदरी, अनुपमा, अनुराग, अभिसारिका, अर्जुन, हसिना, मृदुला, रक्तगंधा, प्रेसिडंट राधाकृष्णन, पूर्णिमा, ब्लू मून, ग्रँड मुघल, गंगा, गोलकोंडा, डायमंड जूबिली, कॉन्फिडन्स, ला फ्रांस, आफ्रिकन स्टार, ख्रिश्चन डायर, डॉ. होमी भाभा, आयफेल टॉवर, फर्स्ट प्राइज, गार्डन पार्टी, गोल्डन जायंट, ग्रॅनडा, जॉन एफ. केनेडी, लॅडोरा,ग्लॅडिएटर,मारीया कॅलास, पापा मिलांड, पुसा सोनिया, रेड डेव्हिड, रोझ गझार्ड, रॉयल हायनेस, स्नो गर्ल, समर सनशाईन, सुपर स्टार, व्हीर्गो, इत्यादी जातींचा समावेश होतो.
  • फ्लोरिबंडा- हायब्रीड टी आणि पाॅलिएन्था या प्रकारातील जातींच्या संकरातून ‘फ्लोरिबंडा’ गुलाबाची निर्मिती झाली आहे. या प्रकारातील फुले लहानलहान झुपक्यात येतात. प्रत्येक फुल हे मोठ्या आकाराचे असते पण फुलांचा आकार हायब्रीड टी पेक्षा लहान असतो. या प्रकारात बंजारण, ऑलगोल्ड, चंद्रमा, चार्लस्टन, डिअरेस्ट, डिव्होश
  • मर्सडीज, पावडर पफ, दिल्ली प्रिंसेस, अरुनिमा, हिमांगिनी, आईसबर्ग, आकाशनर्तकी, सिंधुर, मोहिनी, मधुरा, नव सदाबहार, नीलांबरी, प्रेमा, सिपर्ल, समर स्नो इत्यादी जातींचा समावेश होतो.
  • पाॅलिएन्था या प्रकारातील झाडे मध्यम उंचीची असून फुले एकेरी, लहान, पसरट आणि झुपक्याने येतात. कुंडीत, परसबागेत आणि कुंपणाला लावण्यासाठी या प्रकारातील जातींचा उपयोग केला जातो. या प्रकारात एको, पिंकशॉवर, प्रीती, रीशी बंकीम, व्हाटरटॅग, बेबी रेड, चायना डॉल, बॉर्डर किंग, अंजाणी, नर्तकी, स्वाति इत्यादी जातींचा समावेश होतो.
  • मिनिएचर- लहान झाड, लहान आणि झुपक्याने येणारी फुले, लहान पाकळ्या, लहान आणि नाजुक देठ असलेला हा छोटा गुलाब असतो. या प्रकारातील झाडे लहान आणि काटक असतात. कमी जागेत अथवा कुंडीत लावण्यासाठी हा प्रकार उत्तम असतो. या प्रकारात सिंड्रेला, ट्विंकल, रेड फ्लश, बेबी गोल्डस्टार, चंद्रिका, डार्क ब्युटी, ड्वार्फ किंग, मॅजिक मिस्ट, पिक्सी, रोझमरीन, इत्यादी जाती येतात.
  • वेलवर्गीय गुलाब- या प्रकारात वेलीसारखे आणि जोमदार वाढणारे गुलाब येतात. कुंपण, भिंती, कमानी आणि मांडव यावर चढविण्यासाठी या प्रकारातील जातींचा उपयोग होतो. या प्रकारात दिल्ली व्हाईट पर्ल, कसिनो, कॉकटेल, फाऊंटेन, गोल्डन शॉवर, हँडल, पिणाटा, रॉयल गोल्ड, सिल्वर मून इत्यादी. जाती येतात.
  • सुवासिक गुलाब- या प्रकारात सुगंध देणाऱ्यी जातींचा समावेश होतो. अत्तर, सुगंधी तेल, गुलाब पाणी इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी या प्रकारातील जातींची लागवड केली जाते. या प्रकारात‌ अॅव्हान ब्लू मून, कॉन्फिडन्स, क्रिमसन ग्लोरी, आयफेल टावर, कीस ऑफ फायर, सुगंधा, डबल डिलाईट, अॅनेल फेस, आम्रपाली, नुरजहान, मधुरा, रूपाली, पिंक पॅराकेट इत्यादी जातींचा समावेश होतो.

अभिवृद्धी-

    गुलाबाची अभिवृद्धी बी, फाटे कलम, गुटी कलम आणि डोळे भरून करता येते. यापैकी फाटे कलमाने गुलाबाच्या खुंटाची निपज केली जाते. गुटी कलमाने वेलवर्गीय गुलाबाची अभिवृद्धी केली जाते तर व्यापारी जातींची अभिवृद्धी करण्यासाठी डोळा भरून कलमे केली जातात. गुलाबाच्या संकरीत जाती तयार करण्यासाठी गुलाबाची अभिवृद्धी बिया पेरूनच केली जाते. डोळे भरणे ही गुलाबाची अभिवृद्धी करण्यासाठी वापरली जाणारी सर्वात महत्वाची व्यापारी पद्धत आहे. सर्वसाधारणपणे इंगजी टी पद्धतीने गुलाबावर डोळे भरले जातात. गुलाबावर डोळे भरताना जमिनीत वाढलेल्या झाडाच्या फांदयावर डोळे भरून इंसीतू बडिंग करतात अथवा पाॅलीथीन पिशवीत स्वतंत्र खुंटरोप तयार करून डोळे भरतात. खुंटरोपावर ज्या ठिकाणी डोळा भरावायचा आहे त्या जागी इंग्रजी टी आकाराचा काप घेऊन साल मोकळी करावी. कलम फांदीवरील डोळा काळजीपूर्वक काढून तो खुंटरोपावरील खाचेत बसवावा आणि पाॅलीथीन पट्टीने घट्ट बांधावा. डोळ्याचे टोक बांधलेल्या जागी नेहमी वर असावे. या डोळ्यांमधून ८-१० दिवसात फुट येण्यास सुरवात होते.  

हेही वाचा:सुगंधित शेती शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर शेती

पूर्वतयारी-

    लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीची आडवी-उभी नांगरणी करून तणे व धसकटे वेचून काढावीत. त्यानंतर वखराच्या २-३ पाळया देऊन जमीन भुसभुशीत करावी.

   लागवड-

    गुलाबाची लागवड दोन प्रकारे करता येते. पहिली पद्धत म्हणजे शेतात खुंटरोप वाढवून त्यावर डोळे भरणे आणि दुसरी पद्धत म्हणजे तयार कलमे लावणे. उत्पादन लवकर घेण्यासाठी तयार कलमांची लागवड करावी. कलमांची लागवड करण्यासाठी ठराविक अंतरावर १.५ फुट लांब, १.५ फुट रुंद आणि १.५ फुट खोल आकाराचे खड्डे खणावेत. खड्डे शेणखत आणि माती यांच्या मिश्रणाने (1:1) या प्रमाणात भरून घ्यावेत. कलमांची लागवड पावसाळ्याच्या सुरूवातीला जून महिन्यात करावी. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात सुद्धा लागवड करता येते. गुलाबाची लागवड जमिनीचा प्रकार, जात, इत्यादि गोष्टी लक्षात घेऊन ६० x ६० से.मी. किंवा ७५ x ७५ से.मी. अंतरावर करावी.

वळण आणि छाटनीच्या पद्धती-

गुलाबाची छाटणी तीन प्रकारे केली जाते.

  • हलकी छाटणी (लाइट प्रुनिंग)- या प्रकारात झाडाच्या वाढलेल्या फांद्या निम्या उंचीवर छाटल्या जातात. या छाटणीमध्ये झाडांवर फांद्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे फुलांची संख्याही जास्त असते. मात्र फुले आखूड दांड्याची आणि लहान होतात.
  • जोरकस छाटणी (हेवी प्रुनिंग)- या प्रकारात झाडाच्या खोडाजवळील फांद्यांवर ३-४ डोळे राखून छाटणी करतात. त्यामुळे फुले मोठी होतात पण फुलांची संख्या मात्र कमी मिळते.
  • मध्यम छाटणी (मेडियम प्रुनिंग)- या प्रकारात काही फांद्या उंचीवर छाटून तर काही फांद्या खरडुन ही छाटणी केली जाते. काही फांद्या तळापासून छाटून विरळणी केली जाते. महाराष्ट्रातील समशीतोष्ण हवामान असणाऱ्या भागात गुलाबाची दोन वेळा छाटणी केली जाते. पहिली छाटणी उन्हाळ्यात केली जाते जिला खरड छाटणी पण म्हणतात. ही छाटणी साधारणपणे मे-जून महिन्याच्या केली जाते. दुसरी छाटणी हिवाळ्यात ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला केली जाते. या फुलांचा हंगाम जानेवारी पर्यंत राहतो.

खते आणि पाणी व्यवस्थापनहेक्टरी एकूण ६०० किलो नत्र, २०० किलो स्फुरद, व २०० किलो पालाश खालीलप्रमाणे विभागून घ्यावे. जून छाटणीनंतर १५० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व १०० किलो पालाश व त्यानंतर एक महिन्याने १५० किलो नत्र प्रती हेक्टरी द्यावे. ऑक्टोबर छाटणीनंतर सुद्धा वरीलप्रमाणेच खते द्यावित.  पावसाळ्यात पाणी नसताना १५ दिवसांनी, हिवाळ्यात १०-१२ दिवसांनी आणि उन्हाळ्यात ५-७ दिवसांनी पाण्याच्या पाळया द्याव्यात.

आंतरमशागत-

    नियमित खुरपणी करून तणे काढावीत. मुळयाजवळील माती मोकळी करणे महत्वाचे आहे. तसेच खुंटावरील फूट वेळोवेळी काढावी. पावसाळ्यात आळयामध्ये पाणी साचू देऊ नये.

महत्वाच्या किडी व त्यांचे व्यवस्थापन-

  • खवलेकिड- ही अतिशय शुक्ष्म कीड असून ती स्वतभोवती मेणासारख्या चिकट पदार्थाचे कवच तयार करून त्यामध्ये राहते. ही कीड फांद्यावर किंवा पानांवर सतत एकाच ठिकाणी राहून अन्नरस शोषण करते. या कीडीचा प्रादुर्भाव झाल्यास फांदया आणि पाने सुकून जातात.

नियंत्रण- खवलेकिडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट  ३० टक्के प्रवाही २५ मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

  • मावा- या किडीची पिवळसर हिरवट रंगाची पिल्ले तसेच काळसर तपकिरी रंगाचे प्रौढ किडे कोवळे शेंडे, कळ्या आणि पानांच्या मागील बाजूस पुंजक्याने राहून अन्नरस शोषण करतात. त्यामुळे पाने, शेंडे आणि कळ्या निस्तेज होऊन त्यांची वाढ खुंटते. पाने पिवळी पडून वाळतात.

   नियंत्रण- या कीडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट  ३० टक्के प्रवाही ३३ मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

  • तुडतुडे- हे भुरकट हिरव्या रंगाचे कीटक पाने आणि फांद्याच्या कोवळ्या भागातील रस शोषून घेतात. त्यामुळे पानांची कडा प्रथम फिकट हिरवी होऊन नंतर पिवळट हिरवी आणि शेवटी लाल होते आणि पाने चुरघडतात.

   नियंत्रण- तुड्तुड्याच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट  ३० टक्के प्रवाही १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

  • फुलकिडे- हे भुरकट काळसर रंगाचे किडे पानांच्या मागील बाजूस तसेच झाडाच्या कोवळ्या भागावर राहून पाने आणि फुलांच्या पाकळ्या खरडतात आणि त्यातून पाझरणारा अन्नरस शोषून घेतात. फुलकिडींमुळे गुलाबाच्या झाडाची पाने आणि फुले आकसतात व वेळीवाकडी होतात.

   नियंत्रण- या कीडीच्या नियंत्रणासाठी क्विनाॅलफाॅस ९५% इ.सी. २० मीली १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

  • पिढ्या ढेकूण- या किडीची पिल्ले आणि प्रौढ कीड फांद्याच्या खोबणीत, पानांच्या देठांच्या खोबणीत तसेच खोडावर पांढर्‍या पुंजक्याच्या स्वरुपात राहून झाडातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे गुलाबाच्या कळ्या उमलत नाहीत. तर उमललेल्या फुलांच्या पाकळ्या सुकून गळून पडतात.

  नियंत्रण- या कीडीच्या नियंत्रणासाठी मॅलाथिऑन  ५०% इ.सी. ३० मिली १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

  • कळ्या खाणारी अळी- या अळ्या हिरवट राखळी रंगाच्या असून त्यांच्या अंगावर उभे पट्टे असतात. या अळ्या कळ्या किंवा उमलणार्‍या फुलांना छिद्रे पाडून आतील भाग खातात. अळ्यांचा अर्धा भाग कळीच्या बाहेर असतो.  नियंत्रण- या अळीच्या नियंत्रणासाठी क्विनाॅलफाॅस ९५% इ.सी. २० मीली १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • लाल कोळी- हे लालसर रंगाचे लहान अंडाकृती किडे पानांच्या मागील बाजूस जाळी तयार करून त्यामध्ये राहतात आणि पाणातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पानांवर पिवळसर किंवा तांबूस डाग पडून पाने निस्तेज होऊन गळू लागतात. कीडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास पानावर मोठ्या प्रमाणात जाळी दिसून येते आणि पानगळही होते.  नियंत्रण- या किडीच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे गंधक २५ ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • सूत्रकृमी- सूत्रकृमी हे अतिशय सुक्ष्म प्राणी असून ते उघड्या डोळ्यांनी दिसून येत नाहीत. सूत्रकृमी ओलसर दमट जमिनीत राहतात. ही कीड गुलाबाच्या झाडाच्या मुळातून आत शिरते आणि अन्नरस शोषते. या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यास झाडे खालून वर वाळत जातात. काही सूत्रकृमींमुळे पिकांच्या मुळांवर गाठी येतात, परिणामी झाडे पिवळी पडतात. त्यांची वाढ खुंटते आणि नंतर झाडे मरतात.

   नियंत्रण- सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी दर हेक्टरी २५ किलो दानेदार फोरेट (१०%) अथवा २ टन निबोली पेंड जमिनीत मिसळूण द्यावी.

महत्वाचे रोग व त्यांचे व्यवस्थापन-

  • भुरी- (पावडरी मिल्ड्यु) हा बुरशीजन्य रोग असून गुलाबाच्या झाडांवर सर्वत्र आढळून येतो. या रोगांमुळे गुलाबाचे कोवळे शेंडे, पाने, कळ्या आणि त्यांचे देठ यावर पांढरट रंगाच्या बुरशीची वाढ दिसून येते. बुरशीचा प्रादुर्भाव झालेल्या भागाची वाढ खुंटते आणि पुढे ते भाग सुकून वाळतात. या रोगाचा प्रादुर्भाव विशेषतः हिवाळ्यात जास्त प्रमाणात होतो.  नियंत्रण- या रोगांच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे गंधक २० ग्रॅम किंवा  कॅरोथेन (४८%) भुकटी १० ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून १०-१५ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
  • काळे ठिपके- (ब्लॅक स्पॉट) या बुरशीजन्य रोगामुळे गुलाबाच्या पानांवर गोलाकार, २-५ मी.ली. आकाराचे काळे, किंवा काळसर तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. या रोगामुळे पाने पिवळी होऊन गळून पडतात आणि झाडाची वाढ थांबते. भारी जमीन, अति पाणी असलेल्या जमिनीत या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो. नियंत्रण- या रोगाच्या नियंत्रणासाठी २५ ग्रॅम डायथेन एम-४५ किंवा २० ग्रॅम कार्बेंडाझिम (५०% डब्लु.पी.) १० लीटर पाण्यात मिसळून १०-२० दिवसांच्या अंतराने पिकावर फवारावे.
  • केवडा- (डाऊनी मिल्ड्यु) या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने झाडाचे कोवळे शेंडे, पाने, कळ्या आणि पाकळ्या यांवर होतो. या बुरशीजन्य रोगामुळे पानांवर वरच्या बाजूस जांभळट, लालसर, ते गर्द तपकिरी रंगाचे वेळ्यावाकळ्या आकाराचे डाग पडतात. पाने पिवळी पडून वाळू लागतात. शेंडे व कळ्यांची वाढ खुंटुन त्या पूर्ण करपतात.  नियंत्रण- या रोगाच्या नियंत्रणासाठी २५ ग्रॅम कॉपर  ऑक्सिक्लोराईड (५०% डब्लु.पी.) १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • करपा- हा बुरशीजन्य रोग प्रामुख्याने गुलाबाच्या जुन्या फांद्यावर दिसून येतो. या रोगामुळे फांद्यावर काळपट तांबूस रंगाचे ठिपके पडतात. नवीन फुटीवर हे ठिपके फारसे आढळत नाहीत.  नियंत्रण- या रोगाच्या नियंत्रणासाठी २५ ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड (५०% डब्लु.पी.) १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलांची काढणी आणि उत्पादन-

    गुलाबाची फुले काढतांना ती पुर्णपणे वाढ झालेली असावी. मात्र उमललेली नसावीत. साधारणपणे गुलाबाची छाटणी केल्यापासुन सहा ते आठ आठवळ्यांनी फुले तयार होतात. फुलांची काढणी बाजारपेठेणूसार करावी जसे लांबच्या बाजारपेठेसाठी एक पाकळी उमललेल्या अवस्थेत तर स्थानिक बाजारपेठेकरिता पहिल्या दोन पाकळ्या उमललेली फुले व परदेशी बाजारपेठेत पाठविण्यासाठी बंद कळीच्या अवस्थेत असतांना काढणी करावी. तसेच हार तयार करण्यासाठी, अत्तर तयार करण्यासाठी, देवाला वाहण्यासाठी अथवा गुलकंदसारखे पदार्थ तयार करण्यासाठी पूर्ण उमललेल्या फुलांची काढणी करावी. फुलांची काढणी सकाळी अथवा संध्याकाळी करावी. काढणी करताना फुलांच्या दांडयाची लांबी साधारणपणे स्थानिक बाजारपेठेसाठी २०-३० से.मी., लांबच्या बाजारपेठेसाठी ३०-४५ से.मी., अति लांबच्या बाजारपेठेसाठी ४५-६० से.मी. तर परदेशी बाजारपेठेसाठी ६० से.मी. पेक्षा जास्त असावी. फुलांचा दांडा जेवढा लांब तेवढे फुलांचे काढणी नंतरचे आयुष्य जास्त असते.   गुलाबाचे जाती, वय व अंतरानुसार प्रती झाड प्रती वर्ष ५०-६० फुलांचे उत्पन्न मिळते. एक वर्षानंतर गुलाबाचे हेक्टरी ३ लाख, दोन वर्षानंतर ६ लाख आणि ३ वर्षांनंतर ८ लाख फुले मिळतात.    

    लेखक  

 श्री. सुचित लाकडे

विषय विषेशज्ञ( उद्यानविद्या)

कृषि विज्ञान केंद्र, साकोली.

8329737978

 

English Summary: Improved technology of rose cultivation Published on: 27 June 2020, 03:44 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters