1. कृषीपीडिया

सुधारित करडई लागवड तंत्रज्ञान: तंत्र आणि मंत्र

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
सुधारित करडई लागवड तंत्रज्ञान

सुधारित करडई लागवड तंत्रज्ञान

कोरडवाहूभागातील रबी हंगामातील करडई हे महत्वाचे तेलबिया पीक असून ते खरीप  हंगामात जमिनीत साठवलेल्या ओलाव्यावर घेतले जाते. करडईची मुळे जमिनीत खोलवर जात असल्या कारणाने खालच्या स्थरातील ओलावा पिकाच्या वाढीसाठी वापरला जातो. त्यामुळे हे पीक अवर्षण परिस्थितीतही चांगले येते. करडईचे पीक आरोग्यवर्धक आहे. करडई तेल हे त्यात मोठ्या प्रमाणात असणार्‍या असम्पृक्त(ओमेगा -6) द्रव्यामुळे लोकप्रिय आहे.

करडई तेलाच्या वापरामुळे रक्ताचे अभिसरण सुरळीत होते, रक्तवाहिन्याची जाडी वाढत नाही. तसेच करडई तेलात विटामीन ई आणि इतर पोषकद्रव्ये असल्यामुळे काही प्रमाणात शरीराची प्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे करडई तेलाची मागणी वाढते आहे॰

आहार शास्रानुसार प्रती प्रौढास प्रती दिन ३० ग्रॅम तेल आवश्यक आहे. आपले तेलाचे उत्पादन कमी असल्याकारणाने तेलाची गरज भागवण्याठी मोठ्या प्रमाणात खाद्य तेल आयात केले जाते. करडई तेलबिया पिकाचे क्षेत्र कमी होत असून, राज्यात तीन लाख हेक्टरच्यावर असलेले करडईचे क्षेत्र आता केवळ १८ हजार हेक्टरपर्यंत उरले आहे. हे पीक नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठानी करडई पिकाचे क्षेत्र वाढविण्यावर भर दिला आहे.

यावर्षी पाऊस चांगला असल्याने शेतकऱ्यांना करडई पिकाबाबात मार्गदर्शन केले जात आहे. परंतु तरीही विदर्भातील, मराठवाडातील व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी करडई पेरणीकडे पाठ फिरविली आहे. हे पीक काटेरी असल्याने काढण्यासाठी या पिकाला मजूर मिळत नाहीत. परिणामी, या पिकाचे क्षेत्र कमी होत गेले महाराष्ट्रातील शेतकºयांनी हे पीक घ्यावे, यासाठीचे मार्गदर्शन करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील करडई पिकाखालील क्षेत्र कमी होण्याची प्रमुख कारणे:

  • शिफारशीत खतमात्राचा अभाव.
  • हलक्या जमिनीत करडईची लागवड.
  • करडईचे पीक एकाच जमिनीत सलग घेतले जाते.
  • स्थानिक वाणांचा वापर.
  • संकरित व सुधारीत वाणांचे बियाणे सहज उपलब्ध न होणे.
  • मावा किडीचे तसेच मर व करपा रोगाचे नियंत्रण वेळेवर न होणे.
  • करडईची पेरणी उशिरा किंवा लवकर करणे.
  • काटेरी झाडांमुळे काढणी मजुरांचा अभाव, तसेच यांत्रिकीकरणाची दुर्मिळता.
  • बाजारभावातील लवचिकतेचा अभाव.
  • करडईच्या तेलबियामध्ये असणारे तेलाचे कमी प्रमाण.

या विविध कारणांमुळे करडईचे क्षेत्र कमी होत चालले असले तरी हे पीक कमी पाण्यात, कमी खर्चात येणारे तसेच अवर्षणाचा ताण सहन करणारे पीक होय. या पिकाच्या लागवडीकरीता आधुनिक तंत्राचा वापर केल्यास अधिक उत्पादन मिळू शकते. चांगले दर मिळाल्यास शेतकरी या पिकाकडे वळतील, असा विश्वास आहे. करडईचे उत्पादन वाढवून स्वयंपूर्ण होण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय तेलबिया मिशन हा महत्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामध्ये उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा आहे.

 

शेतकर्‍यांच्या शेतावर राबविलेल्या आद्यारेखीय प्रात्येक्षिकावरून असे दिसून आले की, सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे पारंपारिक पद्धतीपेक्षा १८  ते ३६ टक्के अधिक उत्पादन मिळते. म्हणून आहे त्या क्षेत्रात अधिक उत्पादन व अधिक फायदा मिळविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यंत महत्वाचे आहे॰ सध्या करडईला चांगला बाजार भाव मिळत आहे त्याचा फायदा घेण्यासाठी मोठ्या प्रमानात  करडई पिकाची लागवड करून  तेलबियामध्ये  स्वयन्पूर्ती आणणे तसेच  आरोग्यदायी अशा करडई तेलाची उपलब्धता व वापर वाढवण्यासाठी  या संधीचा फायदा घेवून  जास्तीत जास्त क्षेत्रावर शेतकर्‍यांनी करडई पिकाची लागवड करावी.

जमीन:

करडई पिकासाठी मध्यम ते खोल भारी जमीन निवडावी. ६० से.मी.पेक्षा जास्त खोल जमिनीत ओलावा जास्त काळ टिकून राहतो  त्यामुळे करडई पीक चांगले येते. जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. पाणी साठून राहिल्यास पिकास अपाय होतो. करडई पीक काहीशा चोपण जमिनीतही येते.

पूर्व मशागत:

करडईची पिकाची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे जमिनीची खोल नांगरणी करावी व कुळवाच्या ३ ते ४  पाळया द्याव्यात. खरीप  हंगामात ६ x ६ मीटर अथवा १० x १० मीटर आकाराचे सपाट वाफे किंवा उतारास आडवे सरी वरंबे करून मुलस्थानी जलसंधारण करावे. त्यामुळे जमिनीत जास्तीत-जास्त ओलावा साठवला जातो. शेवटच्या पाळीपूर्वी जमिनीत ५ -६ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत (उपलब्ध असल्यास) द्यावे॰

पेरणी:

करडईची पेरणी वेळेवर करावी. लवकर म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पेरणी  केली असता पानावरील ठिपके रोगाचा प्रादुर्भाव होउन पिकाचे नुकसान होते तर उशिरा म्हणजे ऑक्टोबर नंतर केली असता पीकाची कोवळी अवस्था थंडीमध्ये येऊन त्यावर मावा र्किड येते. म्हणून करडई पिकाची पेरणी सप्टेंबरचा दूसरा पंधरवडा ते अक्टोबरचा पहिल्या पंधरवड्यात करावी.

बियाणे व बिजप्रक्रिया :

लागवडीसाठी करडईचे सुधारीत वाणाचे प्रमाणित बियाणे निवडावे. पेरणीसाठी प्रती हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे. तर खरीप पिकानंतर त्याच क्षेत्रात करडई पीक घ्यायचे असल्यास १२ ते १५ किलो बियाणे वापरावे. पेरणीपुर्वी बियाण्यास २ ग्रॅम बावीस्टीन/किलो किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम/किलो लावावे॰ त्यानंतर अझेटोब्याक्टर या जिवाणूसंवर्धकाची २५ ग्रॅम /किलो प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. यामुळे हवेतील नत्राचे स्थिरीकरण होऊन उत्पादनात वाढ होते. तसेच २५ ग्रॅम /किलो बियाणे प्रमाणे पी.एस.बी. या स्फुरद विरघळवणार्‍या जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी.

पेरणी व  पेरणी अंतर:

कोरडवाहु करडईची पेरणी दोन चाडयाच्या पाभरीने करावी म्हणजे बी आणि खत एकाच वेळी पेरता येते. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ४५ से.मी. ठेवावे व दोन झाडातील अंतर २० से,मी. राहील अशा रीतीने पेरणी करावी.

पीक पद्धती:

सलग पीक पद्धत: काही भागात करडईची पेरणी ज्वारी पिकात पट्टे टाकून  केली जाते. करडई व ज्वारी पिकाची पाण्याची गरज वेगवेगळी  आहे. करडई पिकास वाढीच्या अवस्थेत पाणी जास्त लागते तर ज्वारी पिकास वाढीच्या व दाणे भरण्याची अवस्थेत पाण्याची गरज असते. पट्टा पेर पद्धतीत सुरवातीच्या काळात करडई पीक जमिनीतील ओलाव्याचा मोठ्या प्रमाणात  वापर करते, त्यामुळे ज्वारीच्या फुलोर्‍याच्या अवस्थेत ओलावा कमी मिळतो  आणि करडईच्या शेजारील ज्वारीच्या ओळीची वाढ कमी होते पर्यायाने उत्पादनात घाट येते, म्हणून करडईचे सलग पीक घ्यावे. तसेच काढणीसाठी मुजूर मिळत नाहीत, म्हणून माचिणणे काढणी करण्यासाठी सलग करडई  पीक घ्यावे.

वार्षिक फेरपालट:

रबी हंगामात करडई –ज्वारी- हरभरा अशी वार्षिक पिकपद्धती घेतल्यास चांगले उत्पादन मिळते तसेच रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो आणि जमिनीचा पोत  टिकून राहतो.

खरीप – रबी पीक पद्धत:

खरीप हंगामात वेळेवर पाऊस पडल्यास भारी जमिनीत  कमी कालावधीचे  मूग किंवा उडीद हे कडधाण्याचे पीक घेऊन रबी हंगामात करडई हे पीक घ्यावे.

 

आंतर पीक पद्धती :

आंतर पीक पद्धतीमध्ये एका  पिकाचे नुकसान झाले तरी दुसर्‍या पिकांपासून काहीतरी उत्पन्न मिळते म्हणून सलग पीक लागवडीपेक्षा आंतर पीक फायदेशीर आहे. रबी हंगामात सहा ओळी हरभरा + तीन ओळी  करडई(६:३ ) किंवा चार  ओळी जवस + दोन ओळी करडई (४:२ )ही आंतरपीक पद्धत फायदेशीर आहे.

सुधारित /संकरीत वाण :

अ.न.

सुधारीत /संकरीत वाण

कालावधी

(दिवस)

उत्पादन/

(क्वि/हे.)

विशेष गुणधर्म

भीमा

१२०- -१३०

१२-१४

अवर्षनास प्रतिकारक,मावा किडीस व पानावरील ठिपके रोगास मध्यम प्रतिकारक.महाराष्ट्र राज्यात लागवडीसाठी प्रसारित. 

फुले कुसुमा

१२५ -१४०

जिरयती १२ -१५

बागायती२०-२२

संरक्षित पाण्याच्या ठिकाणी व बागायती लागवडीस योग्य, अखील भारतीय स्तरावर लागवडीसाठि शिफारस

३ 

एस.एस.एफ .६५८

११५-१२०

१२-१३

बिगर काटेरी,फुलांच्या पाकळ्यासाठी योग्य, अखील भारतीय स्तरावर लागवडीसाठि शिफारस

एस.एस.एफ. ७०८

११५ - १२०

जिरयती १३-१६

बागायती २०-२५

महाराष्ट्रात जिरायती आणि बागायतीलागवडीसाठी शिफारस.मावा किडीस मध्यम प्रतिकारक 

एस.एस.एफ.१२ -४०

(फुले नीरा)

१२०-१२५

जिरयती १२-१५

बागायती२०-२२

अधिक तेलाचे प्रमाण ३२.९%.मावा किडीस मध्यम प्रतिकारक,अखील भारतीय स्तरावर लागवडीसाठि शिफारस,

एस.एस.एफ.१३ -७१

(फुले भिवरा )

१२०-१३० 

जिरयती १३ -१६ 

बागायती २०-२५

अधिक उत्पादन, मावा किडीस मध्यम प्रतिकारक,अखील भारतीय स्तरावर लागवडीसाठि शिफारस,

पी.बी.एन.एस.१२

१३५-१३७

जिरयती १२-१५

बागायती २०-२५

मावा किडीस मध्यम प्रतिकारक , मराठवाडासहित अखील भारतीय स्तरावर लागवडीसाठि शिफारस, 

पी.बी.एन.एस.८६  (पूर्णा)

१२० -१३०

१२ -१५

मावा किडीस मध्यम प्रतिकारक , मराठवाद्यासाठी शिफारस

ए .के.एस.२०७

१२५-१३५

१२-१४

मावा किडीस मध्यम प्रतिकारक , विदर्भासाठी शिफारस

 

१०

नारी-५७ 

१२५-१३५

२०-२५

बागायती लागवडीसाठी शिफारस, तेलाचे प्रमाण अधिक अखील भारतीय स्तरावर लागवडीसाठि शिफारस,

११

आय.एस.एफ. -७६४

१२०-१३०

जिरयती १२-१५

बागायती २०-२५

अधिक उत्पादन, मावा किडीस मध्यम प्रतिकारक,अखील भारतीय स्तरावर लागवडीसाठि शिफारस

१२

अकोला पिंक

१३० – १३५

जिरयती १२-१५

विदर्भात लागवडीसाठी प्रसारित

 

संकरीत वाण 

१३

डी.एस.एह.१८५

१२०-१३५

जिरयती १२-१५

बागायती २०-२५

अधिक उत्पादन, मावा किडीस मध्यम प्रतिकारक, मर रोगास प्रतिकारक, अखील भारतीय स्तरावर लागवडीसाठि शिफारस

 

खत मात्रा:

करडई पीक रासायनिक खतास चांगला प्रतिसाद देते. करडईच्या भरघोस उत्पादनासाठी कोरडवाहू पिकास ५० किलो नत्र (११० किलो युरिया)व २५ किलो स्फुरद(१५६ किलो सिंगल सुपर फॉस्फेट )प्रती हेक्टरी द्यावे. बागायती करडई पिकास प्रती हेक्टरी  ७५ किलो नत्र (१६३ किलो युरिया) अधिक ३७.५ किलो स्फुरद  (२३५ किलो सिंगल सुपरफॉस्फेट) द्यावे.

 

विरळणी व आंतर मशागत:

करडई पीक हे जमिनीत साठवलेल्या ओलाव्यावर घेतले जाते.त्यामुळे विरळणी करून झाडाची योग्य संख्या ठेवणे महत्वाचे आहे. पेरणी नंतर १५ ते २० दिवसाचे आत विरळणी करावी. विरळणी करताना २० से.मी. अंतरावर  एक जोमदार रोप ठेवून विरळणी करावी. गरजेनुसार पिकाची खुरपण करुण शेत  स्वछ ठेवावे. पेरणी नंतर तिसर्‍या आठवड्यात  पहिली कोळपणी आणि पाचव्या आठवड्यात दुसरी कोळपणी करावी. कोळपणीमुळे जमिनीवर मातीचे आच्छादन  तयार होते व जमिनीच्या भेगावाटे ओलाव्याचे होणारे बाष्पीभवन रोखले जाते व हा ओलावा पिकाच्या वाढीसाठी उपयोगी पडतो.

पिकस संरक्षित पाणी देणे:

करडई  हे पीक अवर्षणास प्रतिकारक्षम असल्यामुळे हे पीक कमी पाण्यात येते. जमिनीत पुरेशी ओल असेल तर पिकास पाण्याची गरज भासत नाही. पाणी उपलब्ध असेल तर पेरणीनंतर ३०-३५ दिवसानी पहिले पाणी द्यावे. पाणी जमीनीस भेगा पडण्यापूर्वी द्यावे  व ५०-५५ दिवसणी दुसरे पाणी द्यावे. पिकात पाणी साठणार  नाही याची काळजी घ्यावी. पाणी देताना हलके पाणी द्यावे. पेरणीनंतर ५५-६० दिवसानी सायकोसील (लिओसील) या वाढ रोधकाची १००० पीपीए(१००० मिलि ५०० लिटर पाण्यात) प्रमाणे फवारणी केली असते उत्पादनात वाढ होते.

पीक संरक्षण:

 

करडई पिकावर प्रामुख्याने मावा कीड येते. सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात पेरणी केल्यास मावा कीडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. मावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमीथोंएट ३०%(१५ मिलि १० लिटर पाणी)किंवा थायोमिथोंक्झान/असिटामिप्रिड ३-४ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी किंवा असिफेट १६  ग्रॅम /१० लिटर पाणी किंवा क्लोथायनिडीन १ ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. या पिकावर पानावरील ठिपके (अल्टर्नेरिया )या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब+कार्बेंडेझिम हे संयुक्त बुरशिनाशक २०  ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. रोगाची तीव्रता कमी झाली नाही तर १०-१५ दिवसानी परत फवारणी करावी. पिकाची फेरपालट करावी म्हणजे रोगाचे नियंत्रण होते.

काढणी

करडई पीक १२०  ते १४० दिवसात तयार होते. करडईची काढणी पाने व बोंडे पिवळी पडल्यानंतर काढणी करावी. काढणी सकाळच्या वेळेस करावी. सकाळी आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने करडईचे काटे नरम पडतात, त्यामुळे सकाळी काढणी करताना टोचत नाही. पीक चांगले उन्हात वाळवून मग काठीने किंवा मळणी यंत्राने मळणी करावी. अलीकडे करडईची काढणी गव्हसाठी वापरतात त्या  एकत्रित काढणी व मळणी (कंबाइन हर्वेस्टर )द्वारे केली जाते. काढणी कमी वेळात व कमी खर्चात होते. या यंत्रामुळे काढणी व मळणीची कामे सोपी व सुटसुटित झाली असून कमी वेळात काढाणी होते. त्याचप्रमाणे करडीच्या झाडाचे बारीक तुकडे होऊन शेतात विखुरले जात असल्यामुळे जमिनीत मिसळून कुजल्यामुळे त्यापासून चांगले सेंद्रिय खत मिळते.

उत्पादन: करडई लागवडीसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कोरडवाहु पिकाचे मध्यम जमिनीत १२-१४ क्विंटल/हेक्टर तर भारी जमिनीत १५ -१७ प्रती हेक्टरी उत्पादन मिळते.

विशेष बाब

 करडईच्या तेलात संपृक्त स्निग्ध आम्लाचे प्रमाण इतर तेलापेक्षा बरेच कमी असल्याने ह्रदय रोग्यांना हे तेल वापरणे आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असते. या तेलाच्या वापरामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची मात्रा प्रमाणाबाहेर वाढत नाही. वैद्यक शास्त्रात औषधोपचार म्हणून करडईच्या पाकळ्यांचा उपयोग केला जातो. मानवी शरीरातील रक्ताभिसरण्याच्या कार्यक्षमतेवपर करडईच्या पाकळ्याचा इष्ट परिणाम होतो. रक्त वाहिन्यांमध्ये रक्त पुरवठा तसेच रक्तामध्ये प्राणवायू मिसळण्याचे प्रमाण वाढून रक्त वाहिन्यात गुठळ्या होण्याचे प्रमाण कमी होते. हदयरोग्यांच्या इलाजात करडईपाकळीयुक्त औषधांच्या वापरामुळे रक्तालीत कोलेस्टेऱॉलचे प्रमाण कमी होते.

 

मणक्याचे विकार, मानदुखी, पाठदुखी इत्यादींवर आयुर्वेदीक उपचारात करडई पाकळ्या इतर औषधासोबत वापरल्यास आराम मिळतो. करडई पाकळ्यांचा दररोज काढा काढून पिल्यास वरील रोगापासून ब-याच प्रमाणात फायदा होतो. करडईची फुले उमलण्यास सुरुवात होताच सायकोसिल या वाढ प्रतिरोधकाची १००० पी.पी.एम.तिव्रतेच्या (१००० मिली. ५०० लिटर पाण्यात) या द्रावणाची फवारणी केल्यास उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ झाल्याचे प्रयोगाअंती दिसून आलेले आहे.

                     

एस.एस.एफ.१२ -४० (फुले नीरा): अखील भारतीय स्तरावर लागवडीसाठि शिफारस

लेखक -

१. डॉ. मंगेश यु. दुधे

१. डॉ. सुजाता मुलपुरी

२. डॉ. शहाजी काकासाहेब शिंदे

 

१. भाकृअनुप - भारतीय तेलबिया अनुसंधान संस्थान, राजेन्द्रनगर, हैदराबाद- ५०० ०३०

२. निवृत्त प्राध्यापक, अखिल भारतीय समन्वित करडई संशोधन प्रकल्प,कृषक भवन,

  सोलापूर- ४१३ ००२  

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters