गहू उत्पादकेत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या चीनचे गहू लागवड क्षेत्र भारताच्या केवळ ८२ टक्के इतके आहे. भारतात गव्हाची सरासरी उत्पादकता (३१.२ क्विंटल/हेक्टर) आहे. परंतु, महाराष्ट्र राज्याची सरासरी गहू उत्पादकता देशाच्या निम्याहुंत कमी आहे. सरासरी गहू उत्पादकता कमी असण्याची प्रमुख कारणे म्हणजे; हलक्या जमिनीवर लागवड, वारंवार बदलणारे वातावरण, गव्हाची पेरणी शिफारशीत कालावधीपेक्षा उशिरा करणे,
अयोग्य पाणी व खत व्यवस्थापन, उत्पादनक्षम सुधारित वाणांच्या बियाण्याची अनुपलब्धता ही आहेत. सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादकतेत भरघोस वाढ करणे शक्य आहे.
हवामान :
गहू पिकाला थंड, कोरडे, स्वच्छ सूर्यप्रकाशित हवामान चांगले मानवते. बी उगवणीच्या कालावधीत १५ ते २० अंश सेल्सिअस तापमान, पिकवाढीच्या अवस्थेत ८ ते १० अंश सेल्सिअस आणि पीक तयार होण्याच्या अवस्थेत २० ते २५ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते.
. सरासरी ७ ते २१ अंश सेल्सिअस तपमानात गहू पीकाची वाढ चांगली होते. थंडीचा कालावधी वाढल्यास उत्पादनात वाढ होते, तर थंडीत खंड पडल्यास उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो.जमीन :
पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन निवडावी. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.६३ टक्क्यांपेक्षा अधिक असावे. जिरायती गहू लागवडीसाठी ओलावा धरून ठेवणारी भारी जमीन योग्य असते. खरीपात द्विदलवर्गीय पीक घेतले असल्यास, या पिकाचा बेवड गहू लागवडीसाठी उपयुक्त ठरतो.
पूर्व मशागत :
गहू पिकाची मुळे जमिनीमध्ये ६० ते ६५ सें.मी. खोलवर जातात. त्यामुळे जमीन चांगली भुसभुशीत करावी. त्यासाठी खरीपातील पिकाच्या काढणीनंतर लोखंडी नांगराने जमिनीची १५ ते २० सें.मी. खोलवर नांगरट करावी. त्यानंतर २ ते ३ कुळवाच्या पाळ्या उभ्या-आडव्या घालाव्यात. शेवटच्या कुळवणीपूर्वी एकरी १०-१२ बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळून द्यावे. आधीच्या पिकाची धसकटे, अन्य काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे.
लेखक - श्री. संतोष करंजे, विषय विशेषज्ञ (कृषिविद्या), कृषी विज्ञान केंद्र, बारामती
Share your comments