सुधारित पद्धतीने आले लागवड तंत्रज्ञान

30 April 2021 08:22 AM By: भरत भास्कर जाधव
आले लागवड तंत्रज्ञान

आले लागवड तंत्रज्ञान

उष्ण व दमट हवामान, ओलिताची सोय असलेल्या ठिकाणी उष्ण आणि कोरड्या हवामानातही आल्याची लागवड करता येते. लागवडीचा कालावधी : एप्रिल ते मे, या काळात ३० अंश ते ३५ अंश सेल्सिअस तापमान फुटवे फुटून उगवण चांगली होते. वाढीसाठी सरासरी २० ते ३० अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता. साधारणतः २५ टक्के सावलीच्या ठिकाणी पीक चांगले येते.

जमीन :

चांगली निचरा होणारी, मध्यम प्रतीची, भुसभुशीत कसदार जमीन लागवडीस योग्य. नदीकाठची गाळाची जमीन कंद वाढवण्याच्या दृष्टीने योग्य. हलक्या जमिनीत भरपूर शेणखत, कंपोस्ट खत किंवा हिरवळीच्या खताचा वापर करावा. जमिनीची खोली कमीत कमी ३० सें.मी. असावी. लागवडीसाठी आम्लधर्मी, खारवट, चोपण जमिनी शक्यतो टाळाव्यात. कोकणातील जांभ्या जमिनीत, तसेच तांबड्या पोयट्याच्या जमिनीत चांगले उत्पादन. जमिनीचा सामू ६.५ ते ७ असावा. चुनखडी असलेल्या जमिनीत पीक येते. परंतु त्यावर पिवळसर छटा कायम दिसते. उत्पादनात घट येते.

जाती :

ज्या भागात हे पीक घेतले जाते, त्या भागाच्या नावावरून जात ओळखली जाते. उदा. कालिकत, कोचीन, आसाम, भारत, उदयपुरी, औरंगाबादी, गोध्रा इ.राज्यात माहिम जातीची लागवड केली जाते. काही जाती बाहेरच्या देशातून आयात केल्या आहेत. त्यामध्ये रिओ-डी-जानरो, चायना, मारन जमेका या जातींचा समावेश आहे.

पूर्वमशागत :

लागवडीपूर्वी जमिनीची एक फुटापर्यंत खोल उभी, आडवी नांगरट करावी. १ ते २ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. हे पीक जमिनीत १८ महिन्यांपर्यंत राहत असल्यामुळे जमिनीची चांगली पूर्वमशागत करावी. जमिनीतील बहुवार्षिक तणांचे कंद, काश्या वेचून गोळा कराव्यात. मोठे दगड-गोटे वेचून काढावेत. शेवटच्या कुळवाच्या पाळीअगोदर हेक्‍टरी ३५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.  स्फुरद व पालाश या खतांचा संपूर्ण हप्ता द्यावा.

लागवडीच्या पद्धती :

सपाट वाफे पद्धत :

पठारावरील सपाट जमिनीवर जेथे पोयटा किंवा वाळूमिश्रीत जमीन आहे अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड करावी. जमिनीच्या उतारानुसार २ x १ मीटर किंवा २ x ३ मीटरचे सपाट वाफे करावेत. सपाट वाफ्यामध्ये लागवड २० x २० सें.मी. किंवा २२.५ x २२.५ सें.मी. अंतरावर करावी.

सरी वरंबा पद्धत :

मध्यम व भारी जमिनीमध्ये सरी वरंबा पद्धतीने आल्याची लागवड करावी. लाकडी नांगराच्या साह्याने ४५ सें.मी. वरती सऱ्या पाडाव्यात. वरंब्याच्या दोन्ही बाजूस वरून १/३ भाग सोडून दोन इंच खोल लागवड करावी. दोन रोपांमधील अंतर २२.५ सें.मी. ठेवावे.

रुंद वरंबा किंवा गादी वाफा पद्धत :

काळ्या जमिनी, तसेच तुषार सिंचन, ठिबक सिंचनाचा जेथे वापर केला जातो अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड करावी.. या पद्धतीमध्ये १५ ते २० टक्के उत्पादन जास्त मिळते.

जमिनीच्या उतारानुसार रुंद वरंब्याची (गादी वाफ्याची) लांबी ठेवावी. १२० सें.मी. वरती सरी पाडून घ्यावी म्हणजे मधील वरंबा ६० सें.मी. रुंदीचा होईल. दोन रुंद वरंब्यातील पाटाची रुंदी ६० सें.मी. सोडावी. या रुंद वरंब्याची उंची २० ते २५ सें.मी. ठेवून त्यावरती २२.५ सें.मी. x २२.५ सें.मी. अंतराने लागवड करावी.

लागवडीचा हंगाम आणि लागवड :

लागवड १५ एप्रिलपासून ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. यानंतर लागवड केल्यास कंदमाशी व कंदकूज यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. लागवडीसाठी निरोगी बियाण्याची निवड करावी. मातृकंदापासून बियाण्याचे तुकडे वेगळे करावेत.

बियाणे निवडताना कंदाचे वजन २५ ते ५५ ग्रॅमच्या दरम्यान असावे. लांबी २.५ ते ५ सें.मी. असावी. बियाणे सुप्तावस्था संपलेले २ ते ३ डोळे फुगलेले निवडावे.

हेक्टरी २५ क्विंटल बियाणे लागते.

लागवड करताना कंद ४ ते ५ सें.मी. खोल लावावा. लागवड करताना कंदावरील डोळा वरती आणि बाहेरच्या बाजूस असल्यास त्या डोळ्यापासून निपजणारा कोंब मजबूत असतो, त्याची चांगली वाढ होते.

जर डोळा खाली आणि आतल्या बाजूला राहिल्यास डोळा लहान आणि कमकुवत राहतो. लागवडीच्या वेळी कंद पूर्ण झाकले जातील याची काळजी घ्यावी.

बीजप्रक्रिया :

बीजप्रक्रिया करताना प्रथम रासायनिक कीडनाशकाची बीजप्रक्रिया करावी. यासाठी  क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २० मि.लि. किंवा डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १० मि.लि. या कीटकनाशकांपैकी एक कीटकनाशक आणि कार्बेन्डाझिम (५० टक्के) १५ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये कंद १५ ते २० मिनिटे चांगले बुडवावेत. २० मिनिटानंतर बियाणे सावलीत सुकवून त्यानंतर जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. बियाणे सावलीत सुकविल्यानंतर लागवडीच्या अगोदर ॲझोस्पिरिलम २५ ग्रॅम, तसेच पी.एस.बी. २५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात मिसळून १० ते १५ मिनिटे बियाणे बुडवून ठेवावे. त्यानंतर लागवड करावी. बियाणे प्रक्रियेसाठी १० लिटरचे द्रावण १०० ते १२० किलो बियाण्यास वापरावे.

 

तणनाशकाचा वापर :

लागवडीनंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी जमीन ओलसर असताना ४ ते ५ ग्रॅम ॲट्राझीन प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

लागवडीनंतर १२ ते १५ दिवसांनी ४ ते ५ मि.लि. ग्लायफोसेट प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

उगवण सुरू झाली की, कोणत्याही प्रकारच्या तणनाशकाचा वापर शक्यतो टाळावा.

खत व्यवस्थापन :

या पिकासाठी एकूण १६ अन्नद्रव्यांची कमी-अधिक प्रमाणात आवश्‍यकता असते. संतुलित आणि योग्यवेळी प्रमाणशीर खते वापरावीत. हेक्टरी १२० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद आणि ७५ किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. संपूर्ण स्फुरद आणि पालाशची मात्रा जमीन तयार करतेवेळी द्यावी.

नत्र खताचा निम्मा हप्ता आले पिकाची उगवण पूर्ण झाल्यानंतर साधारणतः एक महिन्यांनी द्यावा. राहिलेला अर्धा नत्र उटाळणीच्या वेळी २.५ ते ३ महिन्यांनी द्यावा. त्या वेळी हेक्‍टरी १.५ ते २ टन करंज पेंड किंवा निंबोळी पेंड द्यावी. त्यानंतर एक महिन्याच्या अंतराने हेक्‍टरी ३७.५ किलो पालाश दोन वेळा मिसळावे.

 

पाणी व्यवस्थापन :

 • लागवड जास्त पावसाच्या प्रदेशात जिरायती पद्धतीने केली जाते. तर कमी पावसाच्या प्रदेशात पाणी देऊन केली जाते.
 • सुरवातीच्या काळात या पिकास पाणी देणे गरजेचे असते. कारण मुळांना स्थिरता प्राप्त होण्यासाठी आणि चांगला तग धरून राहण्यासाठी हा कालावधी महत्त्वाचा असतो.
 • लागवडीनंतर आंबवणीचे पाणी जमिनीच्या मगदुरानुसार तिसऱ्या-चौथ्या दिवशी लगेच द्यावे.
 • पावसाचे पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
 • पावसामध्ये १० ते १२ दिवस खंड पडल्यास या पिकास पाणी द्यावे.
 • हिवाळ्यात १२ ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
 • पाणी व्यवस्थापनासाठी तुषार सिंचन, ठिबक सिंचन पद्धतींचा वापर करावा.
 • गादीवाफा पद्धतीने लागवड करावी.
 • एका गादीवाफ्यावर एक ठिबक सिंचनाची नळी टाकून दोन लिटर तास पाणी देणाऱ्या तोट्या बसवाव्यात.
 • जमिनीच्या मगदुरानुसार ठिबक सिंचन संच सुरवातीस अर्धा ते पाऊण तास सकाळ-संध्याकाळ आणि त्यानंतर एक ते दीड तास चालवावा.

     आंतरमशागत :

 • तणनाशकांचा वापर केला नसल्यास वेळच्या वेळी खुरपणी करावी.
 • उटाळणी पीक २.५ ते ३ महिन्याचे असताना करावी. यासाठी लांब दांड्यांच्या खुरप्याने माती हलवली जाते. यामुळे मुळ्या तुटून त्याठिकाणी नवीन तंतूमय मुळे फुटतात.
 • पिकास पाचव्या ते सहाव्या महिन्यात फुले येतात. त्यास हुरडे बांड असे म्हणतात.
 • उशिरात उशिरा उटाळणी हुरडे बांड येण्यापूर्वी करावी. हुरडे बांड फुटल्यानंतर या पिकाच्या पानांची वाढ थांबून फण्यांची वाढ होण्यास सुरवात होते. उटाळणी केली नाही, तर उत्पादनामध्ये १० ते १५ टक्के घट येते.
 • उटाळणीनंतर पाण्याचा हलका ताण द्यावा, म्हणजे फुटवे चांगले फुटतात.

आंतरपिके :

 • पीक २५ टक्के सावलीच्या भागामध्ये चांगल्या प्रमाणात वाढते. हे पीक नारळ, सुपारी, कॉफी इत्यादीच्या बागेमध्ये घेतल्यास उत्पादनात वाढ होते.
 • आल्यामध्ये आंतरपीक म्हणून कोथिंबीर, झेंडू, मिरची, तूर, गवार यांसारखी पिके घेतात. आंतरपिकाची मुख्य पिकाशी स्पर्धा होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

 

संजीवकांचा वापर :

 • उत्पादनात वाढ होण्यासाठी आणि तंतूचे प्रमाण कमी करण्यासाठी युरिया व नॅप्थील ॲसेटिक ॲसिडचा वापर ६० आणि ७५ व्या दिवशी शिफारसीप्रमाणे करावा फवारावे.
 • फुटव्याच्या संख्या वाढविण्यासाठी २०० पी.पी.एम. प्रमाणात इथेफॉनच्या ७५ व्या दिवसांपासून १५ दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात.

उत्पादन : प्रतिहेक्टरी ओल्या आल्याचे सरासरी उत्पादन १५ ते २३ टन.

द्विहंगामी पीक :  उत्तम निचऱ्याची जमीन असेल, तर आले १४ ते १६ महिने जमिनीमध्ये ठेवून  द्विहंगामी पीक घेता येते. याचे उत्पादन पहिल्या वर्षीपेक्षा दीडपट ते दुप्पट मिळते. पाने सुकल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी पिकास पाणी द्यावे.

साधारणतः अडीच ते तीन महिन्यांनंतर पुन्हा नवीन फुटवे फुटू लागतात.

बियाण्यांची साठवण :

 • काढणीनंतर असणाऱ्या जाड मुळ्या तोडून सावलीत हवेशीर ठिकाणी बियाणे रचून साठवण करावी. काढणीनंतर निवडलेल्या गड्डे बियाणे २० मि.लि. क्विनॉलफॉस (२५ ई.सी.) आणि १५ ग्रॅम कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यू.पी.) प्रति १० लिटर पाण्यात मिसळून त्यात १० ते १५ मिनिटे बुडवावे. त्यानंतर ते सावलीत सुकवावे.
 • प्रक्रिया केलेल्या बियाण्याची साठवण चर खणून किंवा खड्ड्यात केली असता उगवण क्षमता चांगली राहते.
 • बियाण्याच्या गरजेनुसार सावलीत आवश्‍यक तेवढ्या लांबी-रूंदीचा व एक मीटर खोलीचा खड्डा काढावा.
 • खड्डा खोदताना त्या जमिनीतील पाण्याची पातळी एक मीटरपेक्षा खोल आहे याची खात्री करावी.
 • खड्ड्याच्या तळाला एक इंच जाडीचा वाळूचा थर टाकावा.
 • खड्ड्याच्या तळाला व कडेला लाकडाचा भुसा, पालापाचोळा, वाळलेले गवत टाकावे. अशा खड्ड्यामध्ये बियाण्यांची साठवण करावी.
 • खड्ड्याच्या तोंडावर लाकडी फळीचे झाकण ठेवावे. त्यास हवेसाठी छिद्र ठेवावे.
 • खड्ड्यातील आले व फळी यामध्ये थोडे अंतर सोडावे. त्यामुळे खड्ड्यात हवा खेळती राहते. अशा प्रकारे साठविलेल्या बियाण्यांची उगवणक्षमता चांगली राहते.
 • पत्रा, सिमेंट अगर कौलारू छप्पर असलेली बंद खोली बियाणे साठवण्यासाठी वापरू नये. अडीच ते तीन महिन्यांत आल्याच्या कंदाचे डोळे फुगून बारीक कोंब येतात. असे कोंब असलेले आले बियाण्यांसाठी वापरावे.
 • बियाण्यांच्या वजनामध्ये २५ ते ३० टक्के घट येते.

 

        लेखक :

        वैष्णवी वि. बहाळे.

       शेतीशाळा प्रशिक्षक, (नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई )

       उपविभाग : अमरावती

       ता. भातकुली जि. अमरावती.

 

 

ginger cultivation ginger cultivation technology लागवड तंत्रज्ञान आले लागवड आले लागवड तंत्रज्ञान
English Summary: Improved ginger cultivation technology

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.