शेतकरी बंधुंनो आपण सर्वजण जागतिक संकटाला सामोरे जात आहोत.या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामात पिकांवर येणाऱ्या विविध रोगा संदर्भात होणारा फवारणीचा खर्च कमी होने हा उद्देश समोर ठेवून प्रमुख खरीप पिकावरील रोगाच्या प्रतिबंध करण्यासाठी कमी खर्चाच्या उपायोजना आपल्यासमोर मांडत आहे.
-
सोयाबीन :
-
सोयाबीन या पिकावर येणाऱ्या मूळ आणि खोड सड, शेंगे वरील करपा कॉलर रॉट पानावरील बुरशीजन्य ठिपके या रोगाच्या प्रतिबंधासाठी पेरणीपूर्वी Carboxin 37.5 टक्के अधिक Thiram 37.5 टक्के या मिश्र बुरशीनाशकाची तीन ग्रॅम प्रति किलो बियास या प्रमाणात बिजप्रक्रीया करा व जमिनीत निंबोळी ढेप व तत्सम सेंद्रिय खते टाका.
-
सोयाबीन पिकात तज्ञांच्या सल्ल्याने संबंधित भागात शिफारशीत कीड व रोग प्रतिकारक वाणाची पेरणी करा.
-
सतत त्याच त्याच शेतात सोयाबीनचे पीक घेणे टाळा व पिकांची फेरपालट करा.
-
कपाशी :
-
कपाशीच्या पिकात अनुजीवी करपा या रोगाच्या प्रतिबंधासाठी व्हीटा व्याक्स एक ग्रॅम अधिक थायरम तीन ग्रॅम प्रति किलो बी या प्रमाणात बिजप्रक्रीया करा.
-
बीटी कपाशीच्या पिकाला माती परीक्षणाच्या आधारावर गरजेनुसार लाल्या या विकृतीचे प्रतिबंधसाठी हेक्टरी 20 ते 25 किलो मॅग्नेशिअम सल्फेट जमिनीत सेंद्रिय खतात मिसळून द्या.
-
कपाशीची लागवड करताना शिफारशीत अंतरावर लागवड करा अतिशय दाट अंतरावर कपाशीची लागवड केल्यास बोंडसड या विकृतीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो.
-
कपाशी सारख्या पिकात दहिया व इतर रोगाच्या प्रतिबंधसाठी रोगग्रस्त अवशेषचा नायनाट करा तंतू विरहीत बियाण्याचा लागवडीसाठी वापर करा नत्रयुक्त खताचा अवास्तव वापर टाळा पिकांची फेरपालट करा व उडीद मूग यासारखी शिफारशीत आंतरपिके कपाशीच्या पिकात घ्या.
-
तुर :
-
तुर पिकात मर वांझ या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी या रोगाला बळीपडणारे वान उदाहरणार्थ मारोती यासारख्या वानाची पेरणी टाळा.
-
तुर पिकात मर व वांझ रोगासाठी प्रतिकारक वाण उदाहरणार्थ पीकेव्ही तारा बीएसएमआर 736, बीडीएन 716 यासारख्या वाणाची पेरणी करा (तुरीचे वाण निवडताना जमिनीच्या प्रकारानुसार निवडणे गरजेचे आहे म्हणून तज्ञांचा सल्ला घेऊन वान निवडा).
-
तूर पिकात मर रोगाच्या प्रतिबंधासाठी Carboxin 37.5 टक्के अधिक Thiram 37.5 टक्के या मिश्र बुरशीनाशकाची तीन ग्रॅम प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात बिजप्रक्रीया करा व नंतर पंधरा ते अर्ध्या तासानंतर ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशक याची दहा ग्रॅम प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात बीज प्रक्रिया करा.
-
तुर पिकात कोलेतोट्राय कम या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी शेतातील रोगट फांद्या व झाडे गोळा करून नष्ट करावीत.
-
तूर पिकात फायटोप्थोरा करपा या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी रोगग्रस्त शेतात व पाणी साचणाऱ्या जमिनीत तूर पीक घेणे टाळावे.
-
उडीद व मुग :
-
उडीद व मुग पिकात मूळकुजव्या या रोगाच्या प्रतिबंधासाठी पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा व्हीरिडी या जैविक बुरशीनाशकाची चार ग्रॅम प्रति किलो बियाण्याला या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी तसेच रोगट झाडाचे अवशेष जाळून नष्ट करावेत.
-
मुग व उडीद पिकात पेरणीसाठी संबंधित भागा करता शिफारसीत केलेल्या कीड व रोग प्रतिकारक वाणाची पेरणी करावी.
-
मुग पिकाकरिता पीकेव्ही ग्रीन गोल्ड ए के एम 9911 किंवा बीएम २००३ - २ हेवान भुरी रोगाचा करिता साधारण प्रतिकारक्षम आढळून आले आहेत. पीकेव्ही ए के एम चार हा वाण बहु रोग प्रतिकारक्षम आढळून आला आहे.
-
उडीद पिकात पीकेव्ही उडीद 15 (एकेयु १५) हा वान भुरी या रोगा करिता तर पीडीकेव्ही ब्लॅक गोल्ड ( एकेयु १० -१ ) हा वान भुरी व करपा रोगा करता कमी बळी पडणारा म्हणून आढळून आला आहे.
- ज्वारी :
- ज्वारी पिकात दाण्यावरील बुरशी या रोगाच्या प्रतिबंधासाठी थायरम 75% डब्ल्यू एस तीन ग्रॅम प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात घेऊन बीज प्रक्रिया करावी.
- ज्वारीवरील खडखड्या व इतर रोगाच्या प्रतिबंध करण्यासाठी पिकांची फेरपालट माती परीक्षणाच्या आधारावर पालाशयुक्त खताचा वापर योग्य शिफारशीत वेळी पेरणी आंतरपीक व मिश्र पिकाचा वापर तसेच कीड व रोग प्रतिकारक वाणाचा वापर करावा.
- सर्व खरीप पिकाकरिता रोग प्रतिबंधासाठी सर्वसाधारण उपाययोजना :
- मागचा हंगाम संपल्यानंतर उन्हाळ्यात कॉल नागरी करा शेतातील रोगट धसकटे पालापाचोळा फांद्या गोळा करून नष्ट करा.
- सर्व पिकाकरिता माती परीक्षण करून घेऊन सर्व खरीप पिकात अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करताना माती परीक्षणाच्या आधारावरच शिफारसी सेंद्रिय जैविक व रासायनिक या तिन्ही रूपात शिफारशीत प्रमाणात शिफारशीत वेळीच पिकांना खताच्या मात्रा द्या .
- सर्व खरीप पिकात उपलब्धतेनुसार संरक्षित ओलीत देताना संतुलित ओलीताचा वापर करा व अतिरिक्त पाण्याचा वापर टाळा.
- ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकचा सेंद्रिय खतांबरोबर जमिनीत ओल असताना पेरणीपूर्व वापर केला तर मर मूळकुजव्या व जमिनीतून प्रसारित होणाऱ्या अनेक बुरशीजन्य रोगाचा प्रतिबंध मिळतो.
- आगामी खरीप हंगामात एकच एक पीक पद्धतीचा वापर टाळा व पिकांची फेरपालट करा तसेच शिफारशीत बहुपीक पद्धतीचा अंगीकार करा.
लेखक :-
अमरेश गजानन शेरेकर ,
शेतीशाळा प्रशिक्षक,
(नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प,मुंबई)
उपविभाग : अमरावती. ता. भातकुली. जिं.अमरावती.
Share your comments