1. कृषीपीडिया

मित्रकीटकांचे कीड व्यवस्थापनातील महत्व

अलीकडच्या काळात कीडनाशकांच्या अविवेकी वापराने प्रतिकूल परिणाम दिसून येत आहेत. यामध्ये किडींमध्ये वाढलेली प्रतिकारशक्ती, मित्रकीटकांची कमी होत चाललेली संख्या, दुय्यम किडींचा उद्रेक, दूषित झालेले पर्यावरण आदींचा समावेश होतो. या समस्या कमी करण्यासाठी "एकात्मिक कीड व्यवस्थापन' पद्धतीला प्राधान्य देणे क्रमप्राप्त व काळाची गरज आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
मित्रकीटकांचे कीड व्यवस्थापनातील महत्व

मित्रकीटकांचे कीड व्यवस्थापनातील महत्व

अलीकडच्या काळात कीडनाशकांच्या अविवेकी वापराने प्रतिकूल परिणाम दिसून येत आहेत. यामध्ये किडींमध्ये वाढलेली प्रतिकारशक्ती, मित्रकीटकांची कमी होत चाललेली संख्या, दुय्यम किडींचा उद्रेक, दूषित झालेले पर्यावरण आदींचा समावेश होतो. या समस्या कमी करण्यासाठी "एकात्मिक कीड व्यवस्थापन' पद्धतीला प्राधान्य देणे क्रमप्राप्त व काळाची गरज आहे. त्यात मित्रकीटकांच्या वापराद्वारे जैविक कीडनियंत्रण ही शाश्वत शेतीची गुरुकिल्ली आहे. जैविक घटकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि पुरवठा करणे हीदेखील तेवढीच महत्त्वाची बाब आहे.

प्राणीजगतात कीटकांचा वर्ग फार विशाल आहे. त्यात जशा हानिकारक किडी आहेत तसेच उपयुक्त कीटकही अनंत आहेत. अशा उपयुक्त कीटकांमध्ये "जीवो जीवस्य जीवनम्‌' या तत्त्वावर जगणारे आणि जैविक नियंत्रणामध्ये योगदान देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हानिकारक व मित्रकीटक यांच्यातील गफलत टाळण्यासाठी त्यांची आपल्याला ओळख असणे आवश्यक आहे.

 मित्र कीटकांची ओळख :-

अ) परोपजीवी कीटक :- हे मित्रकीटक नुकसानकारक किडींपेक्षा आकाराने लहान व चपळ असतात. किडीच्या अंगावर किंवा शरीरामध्ये राहून त्यांना ते हळूहळू खातात व मारतात. यातील काही कीटक असे.

1) ट्रायकोग्रामा :-

या परोपजीवी कीटकाच्या अनेक प्रजाती नुकसानकारक किडींचे जैविक नियंत्रण करताना आढळतात. त्यापैकी ट्रायकोग्रामा चिलोनीस ही प्रजाती जैविक नियंत्रणातील एक मुख्य उदाहरण आहे. या परोपजीवी कीटकांचा उपयोग ऊस, भात, मका व ज्वारीवरील खोडकिडी, कांडी कीड, कपाशीवरील बोंड अळी, भाजीपाला पिकांवरील शेंडा व फळे पोखरणारी अळी, घाटे अळी, डाळिंबावरील सुरसा, कोबीवरील चौकोनी ठिपक्‍याचा पतंग आदी किडींच्या नियंत्रणासाठी होतो.

प्रसारण मात्रा :- एका ट्रायकोकार्डवर सुमारे 20 हजार परोपजीवीयुक्त अंडी असतात. अशा ट्रायकोकार्डसचे पाच ते 10 प्रति हेक्टर या प्रमाणात तर प्रौढांचे 50 हजार प्रौढ प्रति हेक्टर याप्रमाणे प्रसारण करावे. किडीच्या प्रादुर्भावानुसार आठवड्याच्या अंतराने चार ते पाच प्रसारणे करावीत.

2) चिलोनस :-

या परोपजीवी कीटकांचा उपयोग बटाट्यावरील पाकोळी, कपाशीवरील बोंड अळी व अन्य पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी होतो. या परोपजीवी कीटकाची चिलोनस ब्लॅकबर्नी ही प्रजाती परिणामकारक आहे.

प्रसारण मात्रा - 50 हजार ममीज प्रति हेक्टर.

प्रसारण- गरजेनुसार तीन ते चार प्रसारणे करावीत.

3) एनकार्शिया :-

हे कीटक भाजीपाला, फळपिके, फुलपिके व पॉलिहाऊसमधील पिकांवरील रस शोषक किडी (उदा. पांढरी माशी, मावा, उसावरील लोकरी मावा) आदींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहेत.

प्रसारण - नुकसानकारक किडींचा प्रादुर्भाव दिसू लागताच त्यांचे प्रसारण करावे.

4) एपिरिकॅनिया -

हे मित्रकीटक उसावरील नुकसानकारक पायरिला या किडीच्या पिल्ले व प्रौढ अवस्थांवर परजीवीकरण करतात. या मित्रकीटकांमुळे पायरिलाचे अत्यंत प्रभावी नियंत्रण होते.

प्रसारण - 50 हजार अंडी किंवा 5000 कोष प्रति हेक्टर. गरजेनुसार पुढील प्रसारणे करावीत.

5) अपेंटॅलीस (कोटेशिया) -

भाजीपाला पिकातील शेंडा व फळे पोखरणारी अळी, उसावरील खोडकीड, कांडी कीड, हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा (घाटे अळी किंवा बोंड अळी) आदींच्या नियंत्रणासाठी या कीटकांचा उपयोग होतो.

प्रसारण - 50 हजार प्रौढ प्रति हेक्टर.

हेही वाचा : कोबीवर्गीय पिकावरील किडीच्या एकात्मिक व्यवस्थापनाची सूत्रे

6) ब्रेकॉन -

कापसावरील बोंड अळी, बटाट्यावरील पाकोळी, भेंडीवरील शेंडा व फळे पोखरणारी अळी, भात, मका व उसावरील खोड किडा, नारळावरील काळ्या डोक्याची अळी व अन्य पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी यांचा उपयोग होतो.

प्रसारण - 50 हजार प्रौढ प्रति हेक्टर.

7) कोपिडोसोमा -

हे मित्रकीटक बटाट्यावरील पाकोळीच्या जैविक नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

प्रसारण - 5000 अळ्या प्रति हेक्टर. गरजेनुसार चार ते पाच वेळा प्रसारणे करावीत.

8) एनासियस - हे परोपजीवी कीटक सध्या जैविक नियंत्रणातील महत्त्वाचे उदाहरण आहे. कपाशीमध्ये सन 2007 पासून मोठ्या प्रमाणात उपद्रव करून नुकसान करणाऱ्या पिठ्या ढेकूण (मिलीबग) या किडीच्या नैसर्गिक नियंत्रणात या कीटकांचा मुख्य सहभाग होता.

ब) परभक्षी कीटक :-

हे कीटक नुकसानकारक किडीपेक्षा आकाराने मोठे व सशक्त असतात. एक परभक्षी कीटक त्याच्या जीवनात अनेक किडींचा नायनाट करतो.

1) लेडी बर्ड बीटल (ढाल किडे) -

 हे परभक्षी कीटक बहुतांश पिकांवरील रस शोषण करणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे व पिठ्या ढेकूण आदी किडींवर उपजीविका करतात. मका, ज्वारी, कापूस, ऊस, कडधान्ये, भाजीपाला इत्यादी पिकांवर हे मित्रकीटक मोठ्या प्रमाणावर आढळतात. यांच्या अनेक प्रजाती आढळून येतात.

प्रसारण - 2500 प्रति हेक्टर.

2) ग्रीन लेस विंग अर्थात क्रायसोपर्ला (हिरवा जाळीदार पतंग) -

या कीटकाच्या अळी व प्रौढ अवस्था या मावा, पांढरी माशी, तुडतुडे, कोळी, फुलकिडे, पिठ्या ढेकूण, खवले किडी यांच्या सर्व अवस्था व बोंड अळीची अंडी, प्रथमावस्थेतील अळ्या खातात. हे कीटक कापूस, मका, कडधान्ये व भाजीपाला पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात.

प्रसारण - 5000 अंडी प्रति हेक्टर किंवा 10 हजार अळ्या प्रति हेक्टर.

 

3) प्रार्थना कीटक -

हे मित्र कीटक निसर्गतः आढळून येतात. हे कीटक पतंगवर्गीय किडींच्या अळ्या खाऊन त्यांची संख्या नियंत्रित ठेवतात.

4) डिफा (कोनोबाथ्रा) एफिडीव्होरा -

हे कीटक जैविक नियंत्रणातील उत्कृष्ट उदाहरण आहेत. उसावरील लोकरी माव्याच्या प्रभावी जैविक नियंत्रणासाठी यांचा उपयोग होतो. पूर्ण विकसित अळी 300 पेक्षा जास्त मावा किडी खाते. एक अळी पानावरील लोकरी मावा तीन ते पाच दिवसांत संपवते.

प्रसारण - लोकरी माव्याचा प्रादुर्भाव दिसून येताच 50 कोष प्रति गुंठा किंवा 1000 अळ्या प्रति हेक्टर सोडाव्यात.

5) परभक्षी कोळी (एम्ब्लीसियस) - हे कीटक भाजीपाला, फुलझाडे व पॉलिहाऊसमधील पिकांवर नुकसान करणाऱ्या लाल कोळी व दोन ठिपक्यांच्या कोळी नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

6) सिरफीड माशी -

या परभक्षी कीटकांची अळी मुख्यतः मावा या रसशोषक किडीला फस्त करतात. या कीटकांचा उपयोग ऊस, ज्वारी, मका, भाजीपाला पिकांमध्ये होतो. हे कीटक निसर्गतः मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात.

लेखक :-

अमरेश गजानन शेरेकर ,

शेतीशाळा प्रशिक्षक,

(नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प,मुंबई)  

उपविभाग : अमरावती. ता. भातकुलीजिं.अमरावती.

English Summary: Importance of pests in pest management Published on: 21 May 2021, 11:44 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters