अतिमहत्वाचे! IFFCO नॅनो युरियाचे फायदे आणि वापरतांना घ्यावयाची काळजी
शेतीक्षेत्रात अलीकडे अमुलाग्र बदल घडतांना दिसत आहेत, या बदलामुळे शेती क्षेत्रात मोठी क्रांती घडून येत आहे तसेच हे बदल शेतकऱ्यांसाठी देखील खूप फायदेशीर ठरत आहेत. जगात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीला फायदेशीर बनविण्यात येत आहे. उत्पादनात वाढ व्हावी म्हणून शास्त्रज्ञ नेहमीच वेगवेगळे शोध लावत असतात. पिकांची गुणवत्ता सुधारावी तसेच पिकातून मोठ्या प्रमाणात उत्पादन प्राप्त करता यावे म्हणून शास्त्रज्ञ अनेक खते विकसित करत असतात. नॅनो युरिया देखील शास्त्रज्ञांनी विकसित केलेले एक खत आहे, नॅनो युरिया प्रामुख्याने नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार करण्यात आलेले एक खत आहे. भारत सरकारने याला चांगले प्रोत्साहित देखील केले आहे.पिकाला वाढीसाठी नायट्रोजनचे आवश्यकता असते, पिकांची ही गरज नॅनो युरिया मार्फत पूर्ण केली जाऊ शकते. पिकांच्या वाढीसाठी युरिया खूप महत्त्वाचा घटक आहे, मात्र हा रासायनिक घटक आधी जमिनीत टाकला जात होता म्हणजे सॉलिड फॉर्म मध्ये होता, त्यामुळे जमिनीवर याचा विपरीत परिणाम होत होता, जमिनीचा पोत त्यामुळे खराब होत होता मात्र आता नॅनो युरिया हा लिक्विड फॉर्म मध्ये आलाय त्यामुळे हे फक्त पिकाच्या पानावर मारले जाईन आणि यामुळे जमिनीची प्रत खालावणार नाही. म्हणून नॅनो युरियाचा वापर पिकाच्या उत्पादन वाढीसाठी तर फायद्याचा आहे शिवाय यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास देखील होणार आहे. आज आपण नॅनो युरियाच्या फायद्याविषयी जाणून घेणार आहोत तसेच नॅनो युरिया वापरताना घ्यावयाची काळजी देखील जाणून घेणार आहोत.
नॅनो युरियाचे फायदे
- नॅनो युरियाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे सर्व पिकांसाठी वापरले जाऊ शकते.
- यामुळे उत्पादन तर वाढणारच आहे शिवाय पर्यावरणाचा ऱ्हास देखील कमी होणार आहे
- यापासून पर्यावरणीय प्रदूषण हे नगण्य होते म्हणजेच माती, हवा आणि पाण्याची गुणवत्ता यामुळे सुधारते शिवाय कार्यक्षमता देखील उच्च आहे.
- उत्पादन वाढीसह यामुळे गुणवत्तेत देखील सुधारणा होते.
नॅनो युरियाचा वापर
नॅनो युरिया प्रति लिटर पाण्यासाठी दोन ते चार मिली वापरण्याची शिफारस केली गेली आहे. ज्या पिकांना नायट्रोजन कमी प्रमाणात लागते त्या पिकांसाठी 2 मिली तर ज्या पिकांना नायट्रोजन हे अधिक लागते त्या पिकांसाठी चार मिली प्रति लिटर असे प्रमाण घेउन फवारणी करावी. भाजीपाला, तेलबियांचे पिके, अन्नधान्य , कापुस इत्यादी पिकांसाठी दोनदा युरियाची फवारणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे, तसेच कडधान्य पिकासाठी एकदा फवारणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या पिकात दोनदा फवारणी करायची आहे, त्या पिकात पेरणी अथवा लागवड झाल्यानंतर 30 ते 35 दिवसांनी पहिली फवारणी करावी, तर दुसरी फवारणी फुलोर येण्याच्या एक आठवड्याआधी करावी. एक एकर क्षेत्रासाठी दीडशे लिटर पाणी करून फवारणी करावी.
नॅनो युरिया वापरतांना घ्यावयाची काळजी
- नॅनो युरियाची बाटली वापरण्यापूर्वी चांगली हलवा.
- प्लेट फॅन नोजल वापरा.
- नॅनो युरियाची सकाळी किंवा संध्याकाळीच फवारणी करावी. तीव्र सूर्यप्रकाश, जोरदार वारा आणि जास्त दव असेल तेव्हा याची फवारणी करणे टाळावे
- नॅनो युरियाची फवारणी केल्यानंतर १२ तासांच्या आत पाऊस पडल्यास फवारणी पुन्हा करावी नाहीतर याचा पिकावर काहीच परिणाम होणार नाही.
- सागरिका सारखे जैव उत्प्रेरक, 100% विरघळणारी खते आणि कृषी रसायने याच्यात मिक्स करून फवारणी केली जाऊ शकते.
- नॅनो युरिया हे विषमुक्त आहे, तथापि, सुरक्षिततेसाठी पिकावर फवारणी करताना फेस मास्क आणि हातमोजे वापरण्याचा सल्ला दिला जातो.
- मुलाच्या आणि पाळीव प्राण्यांच्या आवाक्याबाहेर, थंड आणि कोरड्या जागी नॅनो युरिया स्टोर करावा.
नॅनो युरियाची 500 मिली बाटलीची किंमत सुमारे 240 रुपये आहे. खरेदी करण्यासाठी, तुमच्या जवळच्या इफको विक्री केंद्राशी संपर्क साधा किंवा www.iffcobazar.in या वेबसाइटवर ऑनलाइन ऑर्डर करून तुम्ही थेट तुमच्या घरी औषधे मागवू शकता.
Share your comments