हरभ-याच्या बाबतीत एक मशागतीय पद्धत सध्या खूप मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसते ते म्हणजे हरभरा खुडणे होय.मागे ८-१० वर्षापर्यंत शेतकर्याने जर स्वतःच्या शेतात हरभरा पेरला नसेल तर ते शेजार्याच्या शेतात हरभ-याची भाजी खुडायला जायचे. हि पौष्टिक भाजी चविष्ट लागते आणि सुकवून वर्षभर खाता येते. या भाजीचे गरगट्टे तर भाकरी सोबत अगदी आवडीने खाल्ले जाते.
हरभरा खुडणे का महत्वाचे आहे
बागायती हरभ-याची हिरवी वाढ खूप होते आणि असे झाल्यास तिचे फूल लागण्याचे प्रमाण कमी होते. नुसती हिरवी वाढ रोगास अधिक बळी पडते, म्हणून साधारण पणे पेरणी नंतर ४२ ते ५० दिवसानंतर हरभ-याचे शेंडे खूडणे याला शास्त्रीय आधार आहे. इंग्लिशमध्ये याला “निप्पिंग” किंवा “टॉपिंग” असे म्हणाले जाते याचे फायदे असे
सलग वाढ होण्यापेक्षा फांद्या फुटाण्याची संख्या वाढते.
फूल लागण्याचे प्रमाण वाढते.
घाट्यांची संख्या वाढते.
घाट्यांचा आकार वाढतो.
बुरशीजन्य रोगांचे प्रमाण कमी होते.
पिकावरील मॅलिक असिडचे प्रमाण कमी होते त्यामुळे किड कमी आकर्षित होते.
प्रथिणयुक्त,चवदार, हिरवी भाजी खायला मिळते.
काही भागात जेंव्हा चारा टंचाई असते तेंव्हा हि हिरवी भाजी जनावरांना हिरवा चारा म्हणून वापरली जाते इत्यादि.
तर असे एकना अनेक फायदे असलेली हि हरभरा खुडण्याची पद्धत महत्वाची आहेच. त्याकडे दुर्लक्ष व्हायला नको. एक मोठे कारण सध्या संगितले जाते कि खुडायला कष्ट खूप लागतात त्यामुळे याकडे दुर्लक्ष केले जाते. जर मजूर लावून हि भाजी खूडून घेतली तरी ती नक्की फायदेशीर आहे कारण एकतर हरभऱ्यांचे उत्पन्न वाढेल व सध्या मार्केटमध्ये अश्या हिरव्या हरभरा भाजीला चांगलीच मागणी आहे, ती विकूनही आपण यातून उत्पन्न मिळवू शकतो.
तेंव्हा पेरणीनंतर साधारण ४२ ते ५० दिवसांनी जेंव्हा १५ ते २० से.मी ऊंची होईल तेंव्हा खुडणी अवश्य करा.रासायनिक संजीवक “टिबा” (ट्राय अयोडो बेंझोईक अॅसिडची ) ७५ पीपीएमची फवारणी करूनही आपल्याला हे परिणाम मिळू शकतात पण पारंपारिक हरभरा खुडणे अधिक फायद्याचे ठरते.
Share your comments